गुरुवार, १२ जून, २०२५

1968. अनुकरणीय भाऊ वाटण्या

राम चाले वाटे, 
लक्ष्मण झाडी काटे..! 
ऐसे बंधु नाही कोठे, 
संसारात...!!
     
      परवा बंडु (केशव) भेटला. कसं काय आला म्हणलो गंगाखेडला. तर तो म्हणाला शेताच्या वाटण्या झाल्या.  कशा? तर ठरल्याप्रमाणे शेती सर्वांच्या नावावर करून घेण्यासाठी आलोत म्हणाला. कशा वाटण्या झाल्या म्हणून विचारले तर दोन प्राध्यापक भावांनी प्रत्येकी ३.५ एकर जमीन घेतली आणि मला एकट्याला ९.५ एकर दिली आणि मुलीचे लग्न पण थाटात ते पण दोघेच करून देणार. तसेच मुलाला पण तेच शिकवत आहेत आणि गावाकडचे प्लॉट, घर मलाच दिले असे म्हणाला.
     या तीन भावांची नावं आहेत प्रा. बालासाहेब रंगनाथ दहिफळे, प्रा. युवराज रंगनाथ दहिफळे, केशव रंगनाथ दहिफळे आणि हे माझ्या (खादगाव ता. गंगाखेड) गावात घडले आहे.
      सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात २/३ भाऊ असतात. एखादा शिकतो तर एखादा शेतीत काम करतो. एकत्र कुटुंब असते. बाप कारभारी असतो. बाप शेतीच्या बेभरवशी उत्पन्नातून शिकणाऱ्याची आर्थिक तजवीज करत असतो. कधी सावकाराकडून व्याजाने कर्ज पण काढतो. शेतीत काम करणारा वयात येतो, लग्न होते, दोघे नवरा बायको शेतीत राबतात. कारभारी मात्र बापच असतो.
     तिकडे शिकणारा शिकत असतो. शासकीय, संस्थेवर, निमशासकीय नोकरी लागेपर्यंत घरून खर्च देणे चालूच असते. नोकरीला लागल्यावर त्याच तोलामोलाचे पाहुणे भेटतात. थाटात लग्न लागते. शेतकरी भाऊ त्याच्या आनंदात मनापासून सामील असतो. नोकरीवाला बायकोला घेऊन शहरात संसार थाटतो. कालांतराने वाटण्याची वेळ येते. गावातील पंच, नातेवाईक, भावकीतील लोक बोलावले जातात व तंतोतंत वाटण्या केल्या जातात. शेतकरी भाऊ वाटण्या करतो व नोकरीवाला चांगली वाटणी उचलतो. घराचे पण तसेच. याचे शिक्षण चालू असताना अडचण आल्यास कर्ज पण होते, कर्जाच्या पण बरोबरीच्याच वाटण्या. हे सर्व गोडीने झालं तर ठीक नाही तर भांडण, पोलिस, कोर्ट.
    हे सर्व घडत असताना नोकरीला लागलेला व आर्थिक स्थैर्य लाभलेला भाऊ, शेतकरी असणाऱ्या आपल्या भावाच्या बाबतीत थोडी पण ढिलाई देत नाही. तो भुतकाळ विसरून जातो, की मी शिकत असताना हाच भाऊ शेतात राबत होता व माझ्या खर्चाची तजवीज करत होता. मला जर त्यावेळी महिन्याला मेस ला, फिस ला, हॉस्टेल किंवा रूमच्या भाड्याचे पैसे मिळाले नसते तर मी पण आज शेतातच असतो. आज मला महिन्याला ७०/८० हजार नक्कीच पगार मिळतो. यात त्या बिचाऱ्या शेतकरी भावाचे काही योगदान आहे का नाही? मग त्या भावाचे काय? त्याच्या मुलाचे काय? मी तर माझ्या पगाराच्या बचतीतून शेती घेईल पण भावाला थोडीफार जास्त दिली तर काय बिघडेल.
     भावांनो प्रा. दहिफळे बंधूंच्या वाटण्या खरोखरच अनुकरणीय आहेत. दोघे पण उदगीरला स्थायिक झालेत. दोघांनी घर बांधलेत. केशव गावाकडे असतो. केशवचा मुलगा उदगीरला दहिफळे सर कडे शिकतो. केशवच्या मुलीचे लग्न पण दोघे प्रा. बंधू लाऊन देणार आहेत. दोघा भावांनी मिळून ७ एकर जमीन घेतली आणि एकट्या केशव ला ९.५ एकर जमीन दिली. वरील सर्व वडील रंगनाथ दहिफळे मामा ज्यांचे वय ८५/९० वर्षे आहे यांच्याच समोर घडत आहे हे विशेष. कारण त्यांचे संस्कार फळाला आले.
     धन्यवाद दोन्ही प्राध्यापक भावांचे आणि विशेषतः दोघांच्या पत्नीचे पण. आपण समाजासमोर एक आदर्श बंधू प्रेमाचे उदाहरण ठेवले.🙏🙏
एवढे कधी लिहित नाही,पण काळाची गरज असल्यामुळे हा सर्व खटाटोप. कारण मी सुद्धा याचा बळी आहे 😄.
 
@ राजेश फड यांच्या फेसबुक वॉल वरून साभार..! 🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...