गुरुवार, १९ जून, २०२५

1998. नातं : सासू सुनेचे

 मी पुरुष आहे  म्हणून सासू–सून नातं हा माझा वैयक्तिक विषय नाही. पण घरात, नात्यात, समाजात चार पिढ्यांच्या स्त्रिया एकमेकांशी कशा प्रकारे वागत आल्या आहेत, हे मी जवळून पाहिलं आहे. त्या प्रत्येक नात्याचा- थेट नव्हे, पण सूक्ष्म असा परिणाम माझ्यावरही झाला आहे. म्हणूनच, या विषयावर मत मांडण्याचा मला एक छोटासा अधिकार आहे, असं वाटतं.
खरं तर हा विषय फार मोठा आहे पण तो प्रत्येक घरात आहे.
तो प्रत्येक घरात वेगळा दिसतो, पण त्याचं मूळ सगळीकडे एकच - भावना आणि भूमिका !
सून जेव्हा नव्या घरात पाऊल ठेवते,
तेव्हा तिच्या मनात असतात आशा, नव्या आयुष्याची स्वप्नं, आणि थोडीशी भीतीही…
आणि तिच्यासमोर उभ्या असतात सासूबाई — अनुभव, शिस्त आणि काळजाचं प्रेम अंगावर घेतलेल्या.
मग इथेच सुरू होतो अदृश्य संघर्ष.
सासूचं मुलावरचं मातृत्व बऱ्याचदा सुनेसाठी ताण बनतं…
आणि सुनेचं स्वतःचं अस्तित्व सासूबाईंसाठी सत्ता गेल्याची जाणीव ठरू लागतं.
सासूबाईंचा अनुभव शिकवतो – संयम, त्याग, आणि मोठ्यांचं ऐकणं
सूनबाईचा दृष्टिकोन सांगतो– स्वतंत्रता, विचारमंथन आणि समान वागणूक
हे दोन प्रवाह एकत्र आले, की संस्कार आणि आधुनिकतेत टकराव होतोच.
मग संवाद तुटतो… आणि जेव्हा संवाद हरवतो, तेव्हा शब्द शस्त्र बनतात.
एकमेकांवर उघड बोलणं, कधी अबोला, कधी टोमणे…
आणि मध्ये उभा राहतो मुलगा — दोघींचा आपलेपणा ओढून दोन्ही बाजूंना पुरता थकलेला.
आईला गमावू नये, आणि बायकोला दुखवू नये.
या दोन ध्रुवांमध्ये तो "फरफटणारा सेतू" होतो.
खरं पाहिलं, तर दोघींचा हेतू चांगलाच असतो.
फक्त त्याच्या अभिव्यक्तीच्या भाषा वेगळ्या असतात.
या नात्याला केवळ समजूत नव्हे,
तर सन्मान, थोडं विसरणं आणि मनापासून ऐकणं लागतं.
मानसशास्त्र सांगतं - सासू–सून हे नातं जिंकायचं नसतं, जोपासायचं असतं.
आणि त्यासाठी हवा असतो — खरा संवाद, थोड्या अपेक्षा आणि मनाचा समतोल.
जर सासूबाई थोडा पाय मागे घेतील,
आणि सून थोडा हात पुढे करेल -
तर दोघींचं नातं साखर आणि दूध होऊ शकतं…
कारण गोडवा त्याचाच टिकतो,
जो समजुतीच्या मंद आचेवर हलकेच शिजतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...