मंगळवार, १७ जून, २०२५

1985. ग्रामीण महाराष्ट्र जुगाराच्या विळख्यात

     संतोष, एका खेडेगावातील आयटीआय पदवीधर. छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीमध्ये नोकरीला लागला. मेहनतीने त्याने प्रगती केली. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले. त्याने प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले. काही वर्षांतच तो नोकरीत कायम झाला. पगारही चांगला वाढला. अल्पभूधारक, दुष्काळग्रस्त शेतकरी आई-वडिलांसाठी आपला मुलगा संतोष स्थिरस्थावर होताना पाहणे हे जणू आभाळ ठेंगणे होण्यासारखेच होते. पण एक दिवस तो चक्री या ऑनलाइन जुगाराच्या व्यसनात अडकला. सुरुवातीला जिंकला, नंतर हरू लागला. कर्जबाजारी झाला. घर, दागिने गहाण पडले, घरातील शांतता भंग पावली. सामाजिक प्रतिष्ठा गेली. आर्थिक आणि मानसिक तणावामुळे तो दारूच्या आहारी गेला. आज त्याची पत्नी घर चालविण्यासाठी काम करते आहे. मुलांची फी थकली आहे. संतोषला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. संतोषचे हे उदाहरण प्रातिनिधिक आहे; आपल्या आजूबाजूला असे अनेक संतोष नकळतपणे या विनाशकारी चक्रात अडकत आहेत. जगात जुगार फार जुना आहे, अगदी महाभारतातही त्याचा उल्लेख आहे जिथे युधिष्ठिर द्युतात सर्वस्व गमावतो. ऋग्वेदातही जुगाराच्या व्यसनाचे वर्णन आहे. कालांतराने जुगाराचे स्वरूप बदलले असले तरी त्याची ओढ आणि व्यसन अजूनही तीव्र आहे. वैदिक काळापासून ते आजच्या ऑनलाइन युगापर्यंत, जुगारामुळे सर्वस्व गमावण्याच्या घटना सारख्याच आहेत. हा खेळ नसून, व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर खोलवर परिणाम करणारा हानिकारक व्यवहार आहे. आज जुगाराचे व्यसन ही गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. आर्थिक अस्थिरता, रोजगाराची चिंता आणि सहज उपलब्ध असलेल्या डिजिटल माध्यमांमुळे झटपट पैसे कमवण्याच्या आशेने लोक जुगाराकडे वळतात. तरुण, तसेच कमी उत्पन्न असलेले आणि मानसिक तणावात असलेले लोक याला सहज बळी पडतात.

कायदेशीर जुगार
आधुनिक भारतात कायदेशीर जुगार मर्यादित आहे. काही राज्यांत लॉटरी, घोड्यांच्या शर्यती, रमी व कॅसिनो आहेत. परंतु अवैध जुगाराचा मोठा बाजार असून क्रिकेटवर मोठा सट्टा लावला जातो. पूर्वी जुगार अड्ड्यावर जायला लागायचे, आता मोबाईल व इंटरनेटपुळे घरात बघून चुगार खेळता येतो, त्यामुळे अवैध

ऑनलाइन
ग्रामीण भागात तंत्रज्ञानामुळे नव्या रूपात अवतरलेल्या जुगारामुळे सध्या उच्छाद मांडला आहे. स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटमुळे जुगाराचे व्यसन एका क्लिवर उपलब्ध झाले आहे. ऑनलाइन गेमिंग, फँटसी स्पोर्ट्स, वेबसाइट्स व अॅप्लिकेशन्स यांचा सुळसुळाट झाला आहे. विविध प्रकारच्या जुगारांचे व्यसन आणि अति जोखमीचे शेअर मार्केट ट्रेडिंग यामुळे मानसिक आरोग्याची समस्या गंभीर झाली आहे. अनेक कुटुंबे आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि तणावामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. दिवसेंदिवस अक्राळविक्राळ होत चाललेल्या या समस्येचा घेतलेला हा आढावा.
जुगारावर कायदेशीर स्पष्टता नाही, ज्याचा अनेक प्लॅटफॉर्म फायदा घेतात. 'कौशल्याचा खेळ' विरुद्ध 'नशिबाचा खेळ' या वादाचा वापर करून, अनेक अॅप्स फँटसी स्पोर्ट्सच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन देतात. ड्रीम११ सारखे अॅप्स लोकप्रिय आहेत, पण ते प्रवेश शुल्क घेतात, तसेच त्यामुळे व्यसन लागू शकते. क्रिकेट स्पर्धांच्या वेळी या खेळांची लोकप्रियता वाढते, अनेक सेलिब्रिटी त्यांचा प्रचार करतात. 'कौशल्याचा खेळ' म्हणत असले, तरी यात नशिबाचा भाग जास्त असतो आणि ते आर्थिक, मानसिक नुकसान करू शकतात.

ग्रामीण भागात शिरकाव
फँटसी स्पोर्ट्सच्या पलीकडे जाऊन, आजकाल अनेक साधे पण तितकेच धोकादायक जुगाराचे अॅप्स आपल्या ग्रामीण भागातील तरुणाईला लक्ष्य करत आहेत. स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटमुळे हे अॅप्स थेट प्रत्येकाच्या हातात पोहोचले आहेत. यात 'चक्री' नावाचा एक खेळ (जिथे एका फिरणाऱ्या चक्रावर पैसे लावले जातात आणि नशिबावर हार-जीत ठरते), 'एव्हिएटर' (Aviator) सारखे क्रॅश गेम्स (जिथे एक वाढणारा आलेख अचानक कधी 'क्रॅश' होईल यावर पैसे लावले जातात आणि तो क्रॅश व्हायच्या आधी पैसे काढायचे असतात (हा खेळ अत्यंत वेगाने व्यसन लावतो), तसेच पारंपरिक वाटणारे, पण पैशांची बाजी लावून खेळले जाणारे रमी, तीन पत्ती आणि लुडो यांसारख्या खेळांचे ऑनलाइन स्वरूप यांचा समावेश आहे. हे खेळ दिसायला साधे आणि आकर्षक असले, तरी त्यांच्या व्यसनाधीनतेची क्षमता खूप जास्त आहे.

यातील बहुतेक अॅप्सची रचना अशी असते की सुरुवातीला अगदी कमी पैशात (उदा. १०-२० रुपये) खेळता येते. कधी कधी मुद्दामहून सुरुवातीला काही डाव जिंकायलाही दिले जातात, ज्यामुळे खेळणाऱ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला 'आपण सहज जिंकू शकतो' असा भ्रम निर्माण होतो. पण हळूहळू तो अधिक पैसे लावायला लागतो आणि नुकसानीच्या चक्रात अडकतो. ग्रामीण भागातील तरुण, ज्यांच्याकडे मर्यादित उत्पन्न असते किंवा जे शेतीवर अवलंबून असतात, ते अशा झटपट पैशाच्या मोहाला सहज बळी पडतात. त्यांच्यासाठी याचे परिणाम अधिक गंभीर असतात. शेतीतून मिळालेले किंवा इतर कामातून कमावलेले थोडेफार पैसे या अॅप्समध्ये गमावले जातात. पैसे संपले की उसनवारी आणि प्रसंगी घरातील वस्तू, दागिने गहाण ठेवण्याची किंवा विकण्याची वेळ येते. काही जण तर स्थानिक सावकारांकडून मोठ्या रक्कमा व्याजाने कर्ज घेतात आणि कर्जाच्या कधीही न फिटणाऱ्या विळख्यात अडकतात. याचा थेट परिणाम त्यांच्या शेतीच्या कामांवर, मुलांच्या शिक्षणावर आणि कुटुंबाच्या रोजच्या गरजांवर होतो. हे खेळ इतके आकर्षक असतात की तरुण मुले त्यात तासन् तास गुंतून राहतात. शेतीची कामे, शिक्षण किंवा इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यांचे भविष्य अंधारात ढकलले जाते. सतत पैसे हरल्यामुळे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे प्रचंड मानसिक ताण येतो, चिडचिड वाढते, नैराश्य येते. घरात रोज भांडणं होतात, नात्यांमध्ये कटुता येते आणि कुटुंबाची शांतता भंग पावते. काही टोकाच्या प्रकरणांमध्ये आत्महत्येसारखे विचारही मनात येऊ लागतात. गावात किंवा समाजात 'जुगारी' म्हणून ओळख निर्माण झाल्यास सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. लोक विश्वासाने वागत नाहीत.
      थोडक्यात, हे वरवर सोपे आणि आकर्षक वाटणारे जुगारी एप्स ग्रामीण भागातील तरुणाईला आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत करत आहेत. त्यांची सहज उपलब्धता आणि आक्रमक जाहिरातबाजी यामुळे हा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. 

विदेशी वेबसाइट्स आणि ऍप्लिकेशन 
जॅकपॉट
अनेक विदेशी जुगार वेबसाइट्स व ऍप्लिकेशन  भारतीय लोकांना लक्ष्य करतात आणि कायद्याच्या कचाट्यात न सापडता सहजपणे पैसे कमावतात. टॅक्स हेव्हनमधून चालवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जाते. ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांवर थेट कारवाई होत नसली तरी अड्डे चालवणाऱ्यांवर कारवाईचा प्रयत्न होतो. यूपीआय/ई-वॉलेट्समुळे पैसे भरणे-काढणे सोपे झाल्याने मनी लॉन्ड्रिंग व कर चुकवेगिरी होते. बंदी घातली तरी नवीन नावाने असे प्लॅटफॉर्म पुन्हा येतात. हे ॲप्स वापरकर्त्याला अधिकाधिक वेळ गुंतवून ठेवतात व क्षणिक आनंदाची भावना निर्माण करतात. लहान बक्षिसे, ऑफर्स, सवलती किंवा फसवे संदेश (डार्क पॅटर्न्स) दाखवून डोपामिनद्वारे आनंद देतात. खरं तर यशासाठी आणि श्रीमंतीसाठी शॉर्टकट नाही. जुगार आणि बेटिंग कंपन्या कमी कष्टात मोठे यश मिळविण्याचे खोटे प्रलोभन देतात. तरुणांनी मोबाइल वापराचे नियंत्रण ठेवणे आणि अशा प्रलोभनांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. झटपट श्रीमंत होण्याची लालसा तरुणांना ऑनलाइन जुगाराच्या जाळ्यात अडकवते आहे.

मानसिक आरोग्यावर परिणाम
जुगाराचे व्यसन आणि अति जोखमीचे शेअर मार्केट ट्रेडिंग मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. ऑनलाइन गेमिंग, फँटसी स्पोर्ट्समुळे तरुणांमध्ये मानसिक समस्या वाढल्या आहेत. अनेक कुटुंबं आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि तणावामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. ऑनलाइन गेमिंग व शेअर बाजारातील आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या झाल्याची प्रकरणे नोंदविली गेली आहेत. व्यसनग्रस्तांसाठी समुपदेशन व उपचार सुविधा आणि प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत. क्षणिक मोहापायी जुगार किंवा अति जोखमीच्या शेअर मार्केट ट्रेडिंगकडे वळण्याऐवजी कौशल्ये विकसित करणे श्रेयस्कर आहे. जुगाराचे व्यसन गंभीर असून, त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार महत्त्वाचे आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्ती उपचार उपलब्ध असून, गरज वाटल्यास मोफत समुपदेशन आणि मदत घेता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...