विक्रांत मोरेचा (नाव बदललेले), माझ्या माजी विद्यार्थ्याचा फोन आला होता. "बाई, लग्नाची पत्रिका द्यायची आहे, जरा पत्ता पाठवता का?"
मी म्हटलं, "अरे, मी पुण्यातल्या घरी आहे. तू फोनवर आमंत्रण दे."
"नाही, मी घरी येऊनच पत्रिका देणार आहे. तुमचा पत्ता एसएमएस करा," हे त्याचे उत्तर ऐकून मी त्याला खूप समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. दुसरा विषय संध्याकाळी येतो असं सांगून त्यांनी फोन ठेवून दिला.
दुसऱ्या दिवशी आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन तो आला. कितीतरी वर्षाने मी त्याला बघत होते. गोरापान, सुंदर, फॅन्सी ड्रेसमध्ये पूजा सांगणारा गुरुजी झालेला विक्रांत माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्याला पाहणारे सगळेच म्हणायचे, "काय सुंदर दिसतो ! कोणाचीही दृष्ट लागेल." खरंच, पळी पंचपात्र घेऊन पूजा सांगणारा हा गोड मुलगा सर्वांचाच लाडका होता. अत्यंत हुशार. पहिला दुसरा नंबर त्याने कधीच सोडला नाही. आता सीए झालेला माझा हा गुणी विद्यार्थी लग्नाचे आमंत्रण घेऊन, मुंबईहून इतक्या लांब केवळ आमंत्रण करण्यासाठी आला होता.
त्याची होणारी बायकोसुद्धा शिक्षिकाच होती. आमच्या दोघांचे सूर लगेच जुळले. खूप वर्षांनी भेटत असल्यामुळे त्याचा आतापर्यंतचा प्रवास याविषयी, तसेच त्याच्या आई-बाबांविषयी खूप गप्पा झाल्या.
त्याची बायको खूपच समंजस वाटली. दिसायलातर सुंदर होतीच, पण वागण्या बोलण्यातून नम्रता दिसून येत होती.
गप्पांच्या नादात रात्रीच्या दहा कधी वाजले कळलंच नाही. त्याला म्हटलं, "अरे, मुंबईत एक काम निघालं आहे. मला उद्या मुंबईला घरी जायचं आहे."
विक्रांत लगेच म्हणाला, "मी आज कोथरूडलाच वस्तीला आहे. आणि उद्या मीही सकाळी मुंबईला जाणार आहे. तुम्हाला किती वाजता घ्यायला येऊ ? ते सांगा."
त्याला म्हटलं, "अरे, कोथरूडपासून डीएसके विश्व खूपच लांब आहे. तू उगाच उलटा कशाला येतोस ?"
"बाई, तुमच्या लेकाची गाडी आहे. थोडं उलटं यायला लागलं तर काय होतं ? फक्त तुम्ही वेळ सांगा. मी तुम्हाला घ्यायला येतो."
कितीही समजावलं तरी तो ऐकेचना. त्याची बायकोही म्हणाली, "हा तुमचा हक्क आहे, बाई. तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मुलं मानता ना ? मग मुलांचं आणि सुनांचं ऐकायचं असतं."
म्हटलं, "विचार करून सांगते."
रात्री अकरा वाजता विक्रांतच्या आईचा फोन ! "सकाळची तुमची वेळ सांगा, आम्ही सगळेच तुम्हाला घ्यायला येतोय. आधी गोरेगावच्या आपल्या नवीन घरी यायचं, तिथे जेवायचं आणि मग सर्वेश तुम्हाला घरी सोडायला येईल."
नाईलाजाने मला वेळ सांगावी लागली कारण त्या काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. सकाळी बरोबर नऊ वाजता गाडी घेऊन विक्रांत दारात उभा होता.
गाडीत त्याच्या आईच्या आणि माझ्या गप्पा रंगल्या. "मुलं तुम्हाला लक्षात ठेवून मुद्दाम घरी पत्रिका द्यायला येतात कारण तुम्ही त्यांच्यावर केलेलं प्रेम, संस्कार ते विसरली नाहीयेत. आमच्या घरात कायम तुमच्या आठवणी निघते. खरंच, माझी मुलं खूप भाग्यवान आहेत, त्यांना तुमच्यासारख्या शिक्षिका लाभल्या."
असं त्यांनी म्हटल्यावर मी म्हटलं, "आम्ही जास्त भाग्यवान. मला असे विद्यार्थी आणि असे पालक लाभले."
गप्पांमध्ये गोरेगाव कधी आलं कळलंच नाही. विक्रांतनी नवीन थ्री बीएचके फ्लॅट घेतला होता. नुकतीच वास्तुशांत झाली होती. त्याच्या घरी जेवण झाल्यावर मी म्हटलं, "चला आता मी जाईन घरी."
पण माझे काहीही न ऐकता त्याने गाडी काढली. त्याची आई म्हणाली, "बाई, डोअर टू डोअर सेवा आहे, त्याचा आनंद घ्या."
खरंच, किती प्रेम करतात ही मुलं !
इतकी वर्ष झाली, तरीही प्राथमिकच्या बाईंना विसरली नाहीत.
हीच आमची खरी कमाई आणि हाच आमचा कधीही कमी न होणारा बँक बॅलन्स !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा