अख्खं रामायण ऐकून कोण विचारेल, ‘रामाची सीता कोण?’
पण सीतामाईला हा प्रश्न पुरूषोत्तमाला विचारावासा वाटू शकतो, ‘खरंच, हम आपके है कौन?’
‘माझ्यासाठी शिवधनुष्य उचलण्याचं दिव्य तुम्ही दाखवलंत, असं काय पाहिलंत माझ्यात? आणि खरंच माझ्याकडे नीट पाहिलं तरी होतंत का?’
जानकी जानकीनाथाचं राहू दे...पण अपर्णाला हा प्रश्न संजीवला अनेकदा विचारावासा वाटला होता. ओठापर्यंत आलेला प्रश्न कधी ओठाबाहेर आला नाही.
अगदी सुखाचा तीस वर्षांचा संसार झाल्यावर आता हा प्रश्न विचारायचा, म्हणजे एका अर्थी रामायणाला परत पहिल्या पासून सुरुवात आणि पहिल्यापासून सुरुवात करायची तर तीस नाही, बत्तीस वर्षांचा कालखंड धरायला हवा…!
धरायचाय काय? तो होताच अपर्णाच्या सोबत. म्हणजे, संजीव धामणकर त्याच्या आई बाबांसोबत तिला बघायला आला, त्या क्षणापासून…
तेव्हा संजीव तेवीस वर्षांचा होता आणि अपर्णा वीस वर्षांची. अपर्णा श्रीखंडे… गोरी गोरी पान, नितळ कांतीची सुबक ठेंगणी. आणि संजीव ताडमाड उंचीचा, आडव्या खांद्याचा पण शरीरयष्टी सडपातळ.
अपर्णाचे डोळे टपोरे होते तर अर्धीवाटी पाणी मावेल इतक्या खोल खळ्या होत्या संजीव च्या गालात. नजर अडखळावी असा हनुवटीला उभा खड्डा होता. दोन क्षणात जितकं बघून घेता येईल, तितकं दोघांनी एकमेकाला बघून घेतलं होतं.
बघण्या-दाखवण्याचा कार्यक्रम दोघंही आयुष्यात प्रथमच अनुभवत होते. आणि मनोमन दोघांनी एकमेकाला पसंतही करून टाकलं होतं. पण…
बघण्याच्या कार्यक्रमातच सगळं फिस्कटलं कारण अपर्णाचं एक अगदी क्षुल्लक व्यंग उघड झालं. त्यावरून वाद झाला. अपर्णाच्या घरच्यानी वाद विकोपाला जाऊ दिला नाही… पण त्यानी संजीवच्या आई वडीलांचा आरोपही मान्य केला नाही.
ते म्हणाले, “एक पाय अर्धा इंच आखूड असणं, हे मुळात व्यंग नाही. वंशपरंपरागत पुढच्या पिढीत येण्याचाही धोका नाही… आणि याउपर मंडळाच्या संचालकांना विचारा. मुलीची माहिती नमूद करताना ही गोष्ट आम्ही अगदी स्पष्ट शब्दात लिहिली होती… म्हणजे फसवून अथवा ही बाब लपवून आम्हाला आमची मुलगी कुणाच्याही गळ्यात मारायची नाही.”
पण तरी संजीवच्या आईनं करायचा तो कांगावा केलाच… आणि स्थळं बघतानाच तशी स्थळं बघण्याचा अनाहूत सल्लाही दिला; जो अपर्णाच्या दादाला आवडला नाही… आणि त्यानं हात जोडून मंडळींना निघायची सूचना केली.
आई आणि बाबा फणकार्यात जायला निघाले… पण संजीवच्या मनात वेगळच होतं, त्याच्या डोळ्यातही वेगळं होतं…
धामणकर बाईंना आपल्या मुलाची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती. धामणकर घरात त्यांची हुकुमत होती. काहीही घेताना-देताना त्यांची निवड अंतिम असायची. मुलांचे दिवाळीचे फटाके सुद्धा त्या निवडायच्या. गणपतीचं मखर सुद्धा त्याच पसंत करून आणायच्या… हे ठरूनच गेलं होतं. त्यामुळं कधी कुणी वेगळा स्वतःचा सूर लावला नव्हता.
…पण आज त्यांच्या मोठ्या लेकानंच बाईंना धक्का दिला. त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना न जुमानता आपला निर्णय सांगितला होता…
“आई, मला अपर्णा मनापासून पसंत आहे. तिला सुद्धा मी आवडलो असेन, तर मला तिच्याशीच लग्न करायचं आहे.”
अपर्णानंही लगेच होकार दिला… पण तरी लग्न पार पडायला दोन वर्षं लागली. कारण धामणकर बाईंचा हटवादी स्वभाव!
पण शेवटी लग्न छान पार पडलं. अगदी घराचं माप ओलांडण्यापासून अपर्णाला वाग्बाण सोसावे लागले…
“अगदी उजव्या पायानंच माप ओलांडायला हवं, असं नाही. जो पाय धड असेल, तो पुढं केलास तरी चालेल!”
इतकं जहाल त्या सहजपणाचा आव आणून बोलल्या. संजीवच्या बोलक्या स्पर्शानं धीर दिला आणि बाहेर पडण्यासाठीच अपर्णाचा गृहप्रवेश झाला.
फक्त धामणकरबाईंचा अंदाज चुकला…
बाईंना वाटलं होतं, आपण सहज या मुलीला हाताला धरून बाहेर काढू… पण तसं झालं नाही. मुलगाच बायकोचा हात धरून घराबाहेर पडला!
पसंतीनं लग्न करून मुलीला घरी आणायची आणि मातृभक्त बनायचं, असा बनेल तो नव्हताच. आपल्या आईचा अहंकारी स्वभाव त्याच्या परिचयाचा होता. अपर्णा जितकी घरात रूळायचा रमायचा प्रयत्न करत होती, तितक्याच धामणकर बाई तिला तांदळातल्या खड्यासारखं वगळून टाकत होत्या.
तिच्या माहेरच्यांना घरात यायची बंदी सुरूवातीपासूनच होती. पण एक मंगळागौर सोडली, तर कोणतेही सणवार बाईंनी घरात होऊ दिले नाहीत.
मंगळागौरीला खेळ खेळताना, आपण कुठंही कमी नाही हे अपर्णानं दाखवून दिलंच… पण बोटं चाटावीत अशी लाजवाब चव तिच्या हाताला आहे, हे सगळ्या नातेवाईकांना कळलं आणि डोक्याला जायफळ उगाळून लावण्याइतका बाईंचा जळफळाट झाला.
पण त्यामुळं बाईंच्या मनातली इर्षा वाढली… संजीवचं बारीक लक्ष होतंच. त्याला आपल्या बायकोचं कौतुक होतं. आई सांगत असलेला एकही अवगुण त्याला आपल्या अपर्णात दिसत नव्हता. उलट एक पाय आखूड असला, तरी त्याला आपली पत्नी परिपूर्ण वाटत होती.
हल्ली संजीवचे बाबा सुद्धा बायकोची तमा न बाळगता आपल्या सूनबाईचं जाहीर कौतुक करत होते…
“कचोरी करावी तर अपर्णानंच! अपर्णाच्या हातचा खमंग आमटी भात असला, तर तोंडी लावायला तिळकुटाचीही गरज नाही…” अशा फुशारक्या ते मारायचे; मग कल्पना करा, बाईंची अवस्था काय होत असेल?
पण बाई पण गप्प बसणाऱ्या नव्हत्या… ‘अपर्णाचं नाव टाकलं’, असं म्हणत त्या अपर्णाला हाक मारताना ‘अपूर्णा’ अशी हाक मारायच्या. अपर्णाच्या फार ते जिव्हारी लागायचं; पण तिने कधी हे संजीव ला सांगितलं नाही.
एकदा त्यानं स्वतःच ते ऐकलं आणि वाद उसळला! वाद विकोपाला गेला… आणि, “बायको तुझी आहे, तर घर माझं आहे!” या व्यावहारिक मुद्द्यावर वाद येऊन थांबला.
वाद थांबला… कारण संजीव अपर्णाचा हात धरून घराबाहेर पडला.
संजीवची नोकरी चांगलीच होती… पण म्हणून लगेच घर घेणं शक्य नव्हतं. एका मित्राच्या ओळखीनं ते कारखानीसांकडे पेईंग गेस्ट राहिले. कारखानीसबाईंचा समुद्राजवळ फूड काॅर्नर होता आणि खूप छान चालत होता. अपर्णासाठी ती पर्वणीच ठरली.
आणि कारखानीस बाईंसोबत अपर्णाचं गुळपीठच जमलं. फार लवकर अपर्णा फूड काॅर्नर च्या सर्व व्यवहारात पारंगत झाली.
संजीवनंही आपल्या नोकरीत खूप प्रगती केली. दोघं स्वतःच्या घरात रहायला गेली. अपर्णा दोन मुलांची आई झाली… पण तिचा फूड काॅर्नर काही सुटला नाही; उलट जास्त व्यापक झाला. खूप प्रसिध्दी पावला. त्यायोगे अपर्णाही प्रसिध्दीच्या झोतात आली… लेखिका झाली, निवेदिका झाली…दोन दोन वाहिन्यांवर तिचे रेसिपीजचे कार्यक्रम लोकप्रिय ठरले.
कुणालाही तिचं चालतानाचं जरासं ठुमकणं खटकलं नाही. फक्त धामणकर बाई म्हणत राहिल्या, “एक लंगडी आली आणि माझं घर लंगड करून गेली!”
पण आता अपर्णा-संजीवही स्थिरावले होते; संसारी झाले होते. दोन मुलांना वाढवण्यात रमून गेले होते. तरी, अपर्णाच्या मनात एक प्रश्न वारंवार उमटायचाच…
‘अर्ध्या तासाच्या भेटीत, तेही गदारोळात… यांनी माझ्यात असं काय पाहिलं, की आईच्या प्रभावाखाली इतकं दबलेलं असताना ते आपल्या होकाराला चिकटून राहिले? दोन वर्ष त्यानी आपला आग्रह सोडला नाही?
‘खरं तर माझ्यातलं न्यून ऐनवेळी त्यांच्या समोर आलं होतं आणि त्यावरून नकार देणं अगदी स्वाभाविक होतं… पण यांनी तर सुरूवातीपासून होकाराचाच राग आळवला! आता त्यांना या बद्दल विचारायचं म्हणजे आपल्याच कमतरतेची उजळणी! दया येऊन लग्न केलं म्हणावं, तर तसे कधीच वागले नाहीत.’
म्हणून लग्नाचा तिसावा वाढदिवस पार पडला आणि अपर्णानं संजीवला समोर बसवलंच. म्हणाली,
“अगदी संपूर्ण रामायण वाचून ‘रामाची सीता कोण?’ हा प्रश्न पडावा असं माझं झालंय. कितीही हास्यास्पद वाटलं, तरी मी प्रामाणिकपणे विचारत असलेल्या प्रश्नाचं अगदी खरं उत्तर द्या.”
संजीवला खरंच हसायला आलं… “अगं, लग्नाला तीस वर्ष झालीत, मोठी सून गृहप्रवेश करायला दाराशी उभी आहे… आणि तुला आपल्या बद्दल प्रश्न पडलाय?”
ती म्हणाली, “प्रश्न कधीच पडला… पण तो लक्षात यायला वेळ लागला. आणि मग विचारायचा ध्यास लागला. खरं सांगा, अर्ध्या-पाऊण तासात वातावरण इतकं तंग असताना, घरच्यांचा पूर्ण नकार असताना तुम्ही तुमच्या होकारावर इतके ठाम कसे होतात?”
तो हळुवारपणे म्हणाला, “तुझाही होकार होताच की!”
ती म्हणाली, “हो, होता… पण मनातल्या मनात. तुम्ही विचारलं नसतंत, तर आवंढ्यासोबत मी निमूट गिळून टाकला असता… पण तुम्ही पुढाकार घेतलात; निर्णय घेतलात… अगदी आई बाबांचा विरोध डावलून. ते तुमचे संस्कार नव्हते, वृत्ती नव्हती आणि… माझ्यासाठी अडून रहावं, अशी आपली ओळखही नव्हती. त्यात मी पायानं अशी लंगडी……”
तत्परतेनं तिच्या ओठांवर हात ठेवत तो म्हणाला, “जेव्हा मला तू आवडून गेलीस, तेव्हा तुझ्या पायात डिफेक्ट आहे, हे कुठं माहीत होतं? आणि शिवाय, आमच्या एक वर्ग शिक्षिका होत्या… कायम गौरीसारख्या नटलेल्या असायच्या. कायम हसतमुख, सदा उत्साही… पण त्या सुद्धा चालताना जरा दुडकत चालायच्या…
“मला आवडायचं ते… मला कधी ते व्यंग वगैरे वाटायचं नाही. तू पहिलीच मुलगी होतीस, जिला मी जीवनसाथी बनवायचं, म्हणून बघायला आलो होतो. मग तुझी काही चूक नसताना, निव्वळ या फालतू कारणासाठी तुला नाकारायची? हे मनाला पटेचना.
“आणखीन एक कारण आहे, हसणार नसशील तर सांगतो...”
“सांगा ना, असं काय...?”
यावर तो उठला. त्यानं कपाटातून त्याच्या खणातून जपून ठेवलेली एक चांदीची डबी काढली.
“हे काय?” तिनं उत्सुकतेनं विचारलं.
तसा तिच्या जवळ बसत म्हणाला, “मी तुला बघायला आलो, ते ऑफिस मधून परस्पर आलो होतो. तुझ्या घराचा एरीया माझ्यासाठी नवा होता. मुलीला पहायला जाण्याचा अनुभव नवा होता. तशी एक गोष्ट अवचीत घडली. तो मला नशिबाचा कौलच वाटला.”
“काय घडलं असं?” तिनं न राहवून विचारलं.
“गोर्या रामापाशी उतरायला सांगितलेलं; मी बरोबर त्या स्टाॅप ला उतरलो. बस पुढं गेल्यावर रस्ता क्रॉस करताना हातातलं तिकीट पाहिलं, तर मला उकळ्याच फुटल्या. कंडक्टरनं चुकून एकाच्या जागी दोन तिकीटं दिली होती.
“मला तो गोर्या रामाने दिलेला कौल वाटला. मग मी आधी रामाला गेलो. गोर्या रामाचं दर्शन घेतलं. त्याचे आशीर्वाद घेऊन मी आलो होतो!” असं म्हणत त्यानं ती डबी अपर्णाच्या हातात दिली.
आणि अनाहूतपणे तिनं त्या डबीतली जपून ठेवलेली बसची तिकीटं कृतज्ञतापूर्वक आपल्या कपाळाला लावली. मनाचं समाधान झालं. मांडलेल्या पसार्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
- चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा