बुधवार, ११ जून, २०२५

1949. रघुनाथ केटरर्स

 (एक भिक्षुक ते एका प्रसिद्ध केटरर्स :थक्क करणारा जीवन प्रवास)
***********
"तु गायत्री मंत्राचा जप करतोस " अण्णांनी विचारलं.
"नाही" रघु उत्तरला.
"मग जेवायला का गेला?"
रघुला उत्तर सुचेना.श्राध्दाच्या जेवणाला जाण्याचा रघुचा उद्देश एकच होता..एक वेळेचं जेवण सुटतं.पण अण्णांना हे सांगणार कसं?ही गोष्ट अशी होती की कुणालाच कळायला नको. परीस्थितीच असं करायला भाग पाडत होती.पगारच पुरत नव्हता त्याला तो तरी काय करणार?
एका बाईंडरच्या दुकानात रघु काम करायचा.पानं जुळवणं. पानांवर नंबराचे ठसे मारणं अशी फुटकळ कामं. दहावी नंतर शिक्षण नाही. अशीच छोटीमोठी कामं करत रघुचं तारुण्य गेलं.गरीबाघरच्या मुलीशी लग्नही झालं.ती पण बिचारी चार घरची सैपाकाची कामं करायची.
म्हणुन मग रघु अलीकडे काय करायचा..तर थोडीफार भिक्षुकी करायचा.त्यात तो फारसं शिकला पण नव्हता.पण बऱ्याच वेळा मोठ्या पुजांसाठी अनेक भटजी लागतात.. अशावेळी रघु जायचा.जाऊन जाऊन त्यांचे अनेक मंत्रही पाठ झाले होते.. आणि जेवायला जायचा..श्राध्दाला लागतात असे बारा तेरा ब्राह्मण.जेवण..आणि वर दक्षिणा.
श्राध्दाचं जेवण करायचं, म्हणजे गायत्री जप करणं आलं..ते काही रघुच्याने होत नव्हतं.. म्हणुन अण्णांनी त्याला फैलावर घेतलं.अण्णा त्याच्या वडिलांचे मित्र.
"नको जाऊस जेवायला..त्रास होतो त्याचा मुलाबाळांना..तुला पैसे पुरत नाही ना!थांब जरा..बघतो मी काय करायचं ते."
रघुची बायको स्वयंपाकाची कामं करते हे अण्णांना माहीत होतं.एका संध्याकाळी अण्णांनी रघुला घरी बोलावलं.. येताना बायकोलाही घेऊन ये सांगितलं.
कुठला तरी एक नामसप्ताह आयोजित केला जाणार होता.आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम.. किर्तनकार.. प्रवचनकार.. असे पन्नास जणांचं रोजचं जेवण.. आणि ते काम रघुनी आणि त्याच्या बायकोने करायचं.. दोनवेळा जेवण.. चहा.. नाश्ता.रघुला वाटलं..जमेल की नाही..काम घ्यावं का नाही? अनुभव नाही..
पण त्यानं काम घेतलं.. व्यवस्थित पुर्ण केलं..अशाच छोट्या छोट्या मोठ्या ऑर्डर मिळत गेल्या..
------------------------------
या गोष्टीला पंचवीस वर्षे झाली.. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.. नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजताच टेम्पो आला होता..मोठी मोठी पातेली टेम्पोत चढवली जाते होती..त्या पातेल्यांवर पातळ प्लॅस्टिक ताणुन बसवलं होतं..मग एक मोठा ट्रे आणला..त्यात कणकेचा भिजवलेला गोळा होता..हे सगळं आणि ने करण्याचं काम दहा बारा बायका करत होत्या.. वेगवेगळ्या भाज्यांची पातेली झाली.. कोशिंबीरीचा वाडगा आला..आत व्यवस्थित रचुन झालं..मग आडवी गॅसची शेगडी आणली.. त्यापाठोपाठ सिलींडर.. टेम्पो जवळपास पुर्ण भरला.. राहीलेल्या जागेत चार पाच बायका कशाबशा उभ्या राहिल्या.. ड्रायव्हरने गाडी चालु केली..
गाडी मंगल कार्यालयाकडे गेली..मग दुसरी गाडी आली..त्यात खुर्च्या..टेबल..पाण्याचे जार भरले.. लोखंडी फ्रेम मध्ये बसवलेला एक बोर्ड पण गाडीत ठेवला..त्यावर ठसठशीतपणे लिहीलं होतं..
'रघुनाथ केटरर्स'
हो..तोच रघु..आता रघुशेठ झाला होता..छोटी छोटी कामं घेत आता तो शहरातील नामांकित केटरर झाला होता.. माझ्या घराजवळच त्याने एक जागा घेतली होती.. तेथे त्याचं कायमस्वरूपी गोडावुन होतं..तो काय करायचं.. बहुतेक पदार्थ तिथेच बनवुन घ्यायचा..भात.. भाज्या.. कोशिंबीर वगैरे.. आणि मग प्रत्यक्ष मंगल कार्यालयात पुर्या..पापड वगैरे तळण करायचा..कारण ते पदार्थ गरम गरम सर्व्ह करायला लागतात.
आज संध्याकाळी वाटलं.. जावं रघुशी गप्पा मारायला..खुप दिवसांत गप्पा झाल्या नव्हत्या..तसा मला वेळ असतो..पण रघु कायम बिझी.. त्याच्या त्या गोडावुन मध्ये गेलो तर निवांत बसला होता..ते गोडावुन म्हणजे त्याचं ऑफिस..
मी त्याच्यासमोर जाऊन बसलो.. टेबलावर वह्यांचे गठ्ठे.. ऑर्डर नोंदवण्यासाठी वह्या.. सामानाच्या याद्या..असा खुप पसारा.. आजुबाजुला बायका बसलेल्या..कोणी भाजी चिरत होतं..कोणी लाडु बांधत होतं..
"काय रघोबा..आज निवांत?"
"कसला निवांतपणा मिळतो रे आम्हाला? उद्या ह्या तीन ऑर्डर आहेत..ओ सिंधुताई.. पाणी द्या यांना."
भाजी चिरत बसलेल्या सिंधुताई उठल्या.. एका पेल्यात त्यांनी पाणी आणुन दिले.. आमच्या गप्पा सुरु झाल्या."
"रघु.. सॉलिड बिझनेस वाढवला रे तु."
"कष्ट पण फार आहेत रे..तु बघितलं ना.. सुरुवातीला कसे दिवस काढले ते".
"म्हणुनच कौतुक वाटतं तुझं..आज केवढा मोठा कारभार आहे तुझा.. कौस्तुभची पण मदत होत असेल ना आता?"
कौस्तुभ म्हणजे रघुचा मुलगा..तिशीतला.. लग्न झालेला..
"हो..आता मी फारसं बघत नाही..हॉलवर तर जातही नाही.. इथलं सगळं बघतो..या बायकांकडुन कामं करुन घेतो.. गाडी पाठवली की माझं काम झालं.. कौस्तुभ तर हजार हजार लोकांच्या ऑर्डर घेतो..परवाच आम्ही संगमनेरला एक ऑर्डर घेतली."
"बाहेरगावच्या पण ऑर्डर घेतो आता तु?"
"हो.. नेहमीचं कस्टमर होतं..दोन‌दिवस कार्य होतं..दोन‌ दिवसांत तीन हजार लोकांचा स्वयंपाक करायचा होता.."
रघुच्या मुलानं आता कागदोपत्री वेगळी फर्म टाकली आहे.. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून.. एकंदरीत रघु आता खुप समाधानी दिसला..
"काय खाणार तु?"
रघुनाथ नेहमीचा प्रश्न आला.. रघु कडे गेल्यावर तो काहीतरी घेतल्याशिवाय जाऊ देत नाही..रघुकडची आळुची भाजी आणि मसालेभात मला खुप आवडतो..पण त्या दिवशी ती ऑर्डर नव्हती.. आणि आज मी डबा न्यायचाही विसरलो होतो..मग रघुने लाडु वळत असलेल्या बाईला आवाज दिला..तीनं वाटीत मोतीचुराचे दोन लाडु आणुन माझ्यापुढे ठेवले..
"तु हे पुडी बांधुन दे ना..मी घरी जाऊन खाईन."
"तु हे खा..घरी मी वेगळे देतोय.."
रघुच्या हाताला वेगळीच चव..उगीच नाही त्याचा व्यवसाय एवढा वाढलेला..साजुक तुपातला..बारीक कळीदार बुंदीचा तो लाडु खाऊन मन तृप्त झाले.. जाताना त्यानं प्लॅस्टिकच्या पिशवीत चार लाडु पॅक करुन दिले..
"रघोबा.. किती द्यायचे याचे?"
रघु त्यावर मोठ्यानं हसला..
"तुम्हा लोकांना आवडतात ना माझ्या हातचे पदार्थ..बस्स..हिच त्यांची किंमत..हिच आमची बक्षिसी.‌त्याचे वेगळे पैसे नको."
रघुचा हात हा असा सढळ..‌म्हणुन त्याच्यावर अन्नपूर्णा.. आणि हो लक्ष्मीही प्रसन्न आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...