नववीतलं पोरगं, सायकलवरून आंबे घ्यायला बाजारात निघालं होतं. मे महिन्याचा शेवट. आभाळ भरून आलं होतं. विजा कडाडत होत्या, आणि वाऱ्याचा खेळ सुरू झाला होता.
आई-बापानं ४०० रुपये हातावर ठेवले. हे घे. पण बघ, चांगले हापूसच घ्यायचे. आणि तुझे-तुझे पैसै वाचवून घ्यायचे. व्यवहार शिक. भाव करायला शीक. असं म्हणून पाठवलं.
पोरगं धडपडलं. कधी एका हातगाडीवर, कधी दुसऱ्या दुकानात. पण कुणीच ४०० च्या खाली एक डझन आंबे द्यायला तयार नव्हतं. कुणी म्हणे ५००, कुणी ४८०. डोळ्यात थोडं नाराजीनं पाणी आलं.
पण मागे फिरणार नव्हता. आईचं बोलणं आठवत होतं, हुशारी म्हणजे फक्त पुस्तकात नाही, व्यवहारात पण शहाणपण लागतं.
अशात एका कोपऱ्यावर, जुन्या साडीमध्ये बसलेली साठ - पासस्ट वय असणारी एक बाई दिसली. डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर अनुभवांचे सुरकुतलेले भाव आणि मनानं मोठी असेल अशी ती बाई शांतपणे पावसात आंब्यांचं टोपलं झाकत होती.
पोरगं गेल. दर विचारला.
पाचशे रूपये डझन. घरचे पिकवलेले हापूस. एक नंबर गोड.
पोराने भाव करायला सुरुवात केली. साडेतीनशे द्या नां मावशी.
बाई हसली, नाही रे राजा. लै झालं तर ४५०.
पोरगं आता हुशारीनं बोलायला लागलं. तिथं ₹. ४८० ला डझन देत होते.
अरे पण आंबे छोटे होते.
इकडं बघ, आंब्यांची चकाकी बघ.
पण घरून ५०० दिलेत आणि चारशेत घेऊन शंभर माघारी मागितले आहेत, मला काही सांगू नका, पण ४०० ला कसही करून जमवा नां मावशी,
बाईने पाहिलं, थोडं विचारात गेली. ठीक आहे बाळा फक्त तुझ्याकडं बघून स्वभाव मोकळेपणाचा वाटला म्हणून. दे ४०० रूपये...
पोराने हुशारीन, बारकाईनं १२ मोठे, सुंदर आंबे निवडले. तेवढ्यात पाऊस सुरु झाला. बाईने गडबडीत शंभरची घडी घातलेली नोट त्याला दिली.
पोरगं ही गडबडीत खिशात टाकून सायकलवरून निघून गेलं.
धो-धो पावसात घरी पोहोचला.
आई-बाप खुश. आंब्यांची चकाकी पाहून थक्क. एक नंबर व्यवहार केलास खूप कौतुक झालं.
खिशातून नोट काढली. शंभरच्या घडीच्या आत एक पन्नासची नोट.
पोरगं बावरलं. म्हणजे बाईनं चुकून ५० रुपये जास्त दिले की.
घरचे खुश झाले. बघ, तुझं नशीबच भारी. आंबे साडे तीनशेला पडले.
पण पोरगं गप्प. त्याला हसू आलं नाही. बाईचं ते पावसात बसलेलं गरीबीतल कष्टमय रूप आठवलं.
कष्टाची फळं विकणारी ती बाई, तिचे हात, तिचा चेहरा, तिचा नम्रपणा.
त्या रात्री आमरस झाला. पण दोन आंबे खराब निघाले. घरच्यांनी ओरड सुरू केली, फसवलं रे त्या बाईनं.. पोरगं गप्प. म्हणालं, अगं मी स्वत;च निवडले होते सगळे आंबे.
घरच्यांनी म्हटलं, पैसे देऊ नकोस. आता फिटंफाट झाली.
पण पोरगं काही ऐकायला तयार नव्हतं. त्याच्या मनात ‘योग्य तेच’ करायचं होतं.
दुसऱ्या दिवशी पुन्हा सायकलवर जाऊन त्यानं ती गरीब बाई शोधून काढली. बाजाराच्या टोकाला, झाडाखाली तीच बसलेली.
पोरगं गेला. अहो मावशी, तुमच्याकडून काल मला चुकून पन्नासची नोट जास्त आली.
तिला काही क्षण समजलं नाही. मग चेहरा खुलला. राजा, तुझ्यासारखे खरं बोलणारे कुठं सापडतात हल्ली ? बघ ना, पावसात बसते, उन्हात भाजते. पण असा एक माणूस भेटला तरी वाटतं मेहनतीचं चीज झालं.
बाईने चार-पाच मोठे आंबे उचलले. हे घे. माझ्याकडून तुला बक्षीस. तुझ्या प्रामाणिकपणाचं..
पोराने नकार दिला.
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
घे रे राजा. ह्याचं काही मोल नाही. याचे पैसे नाही घेणार मी. हे माझ्याकडून मी तुला देतेय.
हे तुला तुझ्या माऊलीच्या हातून दिल्यासारखं मान आणि हो बाळा आयुष्यभर असाच प्रामाणिक रहा. जगात अशी तुझ्यासारखी खरी माणसं टिकून राहिली पाहिजेत.
पोरगं घरी परत आलं. सगळा किस्सा सांगितला. घरच्यांच्या डोळ्यांत पश्चात्तापाचा ओलावा होता. आई म्हणाली, आपणच चुकलो. पोरगं शिकतंय तेच खरं आहे.
शेवटी पोराने मनातल्या मनात सगळ्याची गोळा-बेरीज केली.
व्यवहार केलाय, सवलत मिळवलीय, पन्नासची नोट परत केलीय. आणि त्याबदल्यात - मनःशांती, प्रेम, आईचा आशीर्वाद, आणि सगळ्यात मोठं, प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळालंय.
प्रामाणिकपणा गमावलेलं दुपटीनं परत देतो, हेच खरं आयुष्याचं गणित.
ही गोष्ट नववीतल्या पोराची नाही. तर उद्याच्या समाजासाठी घडवलेल्या एका जबाबदार माणसाची आहे. पैशाने मोजता येणार नाही असं मूल्य, फक्त प्रामाणिक मनातच उगम पावू शकतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा