सकाळी सकाळी फोन वाजला. सोनल ने बघितले तर मोठी बहिण मिनलचा फोन होता. स्वैयंपाक करणा-या
मावशींना डब्यावर काय काय द्यायचे सांगून चहाचा कप घेऊन ती हॉलमध्ये आली.
'हॅलो, ताई...'
'अगं सोनू तु सायंकाळी लवकर येशील का गं घरी?'
'का गं काय झाले?'
'अगं आज आपल्या अनूला बघायला मुलाकडील मंडळी येणार आहे.'
'काय सांगतेस. कोण आहे?' सोनल ने एकामागून एक प्रश्न विचारले. मिनल ने तिला सगळं सविस्तर सांगितले.
'मावशी, लवकर येशील गं,' मागून अन्वयी ने ही पुकारा लावला.
'हो रे बाळा नक्की येते. ताई काही आणू का गं?'
'नको गं हे आणणार आहेत. तु फक्त लवकर ये. मला तर आत्ताच धडधडायला होतंय.'
'ताई, काळजी करू नकोस मी पोहचते लवकर.'
'आई काय झाले इतकी एक्हाईटेड दिसतेस. कुणाचा फोन होता.' डायनिंग टेबल वर बसत करण बोलला.
'अरे बडी मम्मीचा फोन होता. आज अनुला बघायला पाहुणे येणार आहेत म्हणाली ताई.' ब्रेड ऑमलेटची प्लेट त्याच्या पुढे ठेवत सोनल बोलली.
'रिअली... वॉव म्हणजे लवकरच बॅंड, बाजा वाजणार. आई आम्ही ठरवलंय लग्नात काय काय करायचे ते.'
'अरे बाबा अगोदर लग्न तर जमू दे मग काय करायचे ते करा.'
'अगं ते तर होईलच माझ्या बहिणीला कोण पसंत नाही करणार.'
'पसंत करणे ना करण्यासाठी पहिली स्टेप एकमेकांना बघणे गरजेचे आहे की नाही.'
'येस यु आर करेक्ट.'
'तर तीच पहिली स्टेप आज सायंकाळी होणार आहे. पप्पा घरी नाहीत तेव्हा तु लवकर येशील का घरी बडी मम्मी ने लवकर बोलावलंय.'
ठीक आहे. तसंही आज कॉलेजला जास्त पिरियड्स नाहीत. मी पोहचतो चार पर्यंत.' म्हणत तो तयारी करायला गेला.
चहा नाश्ता आटोपून दोघेही आपापल्या मार्गाने निघाली.गाडी चालवताना ती विचार करत होती की मुलं किती पटकन मोठी होतात कळत सुद्धा नाही. कालची पिटुकली आज लग्नाची झाली आहे. आज लवकर निघायचे म्हणून तिने कामाला हात घातला.
मिनल व सोनल दोघी बहिणी. मिनल मोठी तर सोनल लहान. दोघींनीही शिक्षणात चांगली मजल मारली. मिनल ने गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले तर सोनलने पॉलिटीकल सायन्स मध्ये एम ए केले. लग्नाअगोदर दोघीही नोकरीला लागल्या. लग्नानंतर मिनल ने मुलींसाठी नोकरी सोडली तर सोनल ने आपली नोकरी कायम ठेवली. मिनल ला दोन मुली. अन्वयी आणि मृण्मयी. अन्वयी ला नुकतीच नोकरी लागलेली तर मृण्मयी शिकतेय. सोनलला एकच मुलगा करण. तो फायनल इयरला शिकतोय.
दोघी तासाभराच्या अंतरावर रहात त्यामुळे दोघींचे अध्येमध्ये एकमेकांकडे येणे जाणे असायचे. गेल्या काही वर्षांपासून भाऊजी मिनलला सर्वांसमोर तुला काही येतं नाही, तुला यातले काही समजणार नाही तु आपली स्वैयंपाकच कर, तुला काही जमणार नाही असे सहजपणे बोलून जात. सोनलला त्यांचं बोलणे खटकायचे. ती त्यांना टोकायची पण ते हम नहीं सुधरेंगे पठडीतले. त्यांच्या या बोलण्याचा परिणाम सोनलवर हळूहळू जाणवायला लागला. एकेकाळी प्रचंड आत्मविश्वासाची धनी असलेली सोनल अलीकडे थोड्या थोड्या प्रसंगातही घाबरायला लागली. आज अन्वयीला बघायला पाहुणे येणार ऐकूनच तिला घाबरायला झाले. अलिकडे कुठलाही निर्णय घेतांना तिला भिती वाटते, कोणी जो-यात जरी बोलले तरी डोळ्यात पाणी येतं तिच्या.आज तिचा आत्मविश्वास नष्ट झाल्यात जमा झालाय. घरासाठी तीने नोकरी सोडली नसती तर आज ती एखाद्या मोठ्या पदावर राहिली असती. पद, पैसा, सन्मान मिळवला असता. पण तिने घरासाठी केलेल्या त्यागाची, समर्पणाची किंमत तिच्या नव-याला नाही याचे तिला खूप वाईट वाटायचे. सायंकाळी ती आणि करण मिनल कडे पोहचले. दारात पोहचताच तिला भाऊजींचा आवाज ऐकू आला.
'तुला कळत नाही या टीपॉयमधली फुलं बदलायला पाहिजे म्हणून.'
'हो बदलणारच होते आता,' मिनल घाबरलेल्या आवाजात बोलली. तिला दारात उभी बघताच भाऊजी बोलले,' बरं झाले सोनल तु आलीस लवकर ते नाहीतर हिच्या ने काही बरोबर होणार नाही.' म्हणत ते बाहेर निघून गेले. सोनलला राग तर खूप आला पण ही वेळ बोलायची नव्हती म्हणून ती चुपचाप मिनलची मदत करायला लागली.
सात वाजता पाहूणे आले. चहा नाश्ता झाल्यावर. मुलाच्या वडिलांनी म्हटले की मुलीला नोकरी करणे गरजेचे आहे का? आमच्याकडे घर, गाडी, शेती सगळं आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून नोकरी करणे आम्हाला पटत नाही.'
यावर मिनल चे पती बोलले, बरोबर आहे तुमचं म्हणण. शेवटी स्त्रियांनी घराची काळजी घेणेच गरजेचे असते.' त्यांचे बोलणे ऐकून अन्वयी अस्वस्थ झाल्याचे सोनलच्या नजरेने टिपले. आमच्याकडे काय काय आहे याचे वारंवार पारायण करून आम्हाला नोकरी करणारी सून नको आहे हे सांगून पाहूणे निघून गेले. मुलाकडच्या श्रीमंतीने दिपकराव भारावून गेले होते.
'अनू आवडला की नाही मुलगा?' दिपकराव बोलले तशी आतापर्यंत ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेली अन्वयी म्हणाली, 'बाबा, त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना नोकरी करणारी सून नकोय आणि मी काही नोकरी सोडणार नाही.'
'हे बघ मुलगा, त्याचा परिवार सगळ्या दृष्टीने चांगला आहे. तु नोकरी नाही केलीस तरी काही फरक पडणार नाही.' दिपकराव तिला समजावत म्हणाले.
'बाबा, मी जर आईसारखी नोकरी सोडून घरी बसली तर मला पण तिच्या सारखेच रोज ऐकावे लागेल तुला काय येतं, तुला अक्कल आहे का, एक काम बरोबर करता येत नाही.'
ती बोलली तसा पिन ड्रॉप सायलेन्स पसरला खोलीत.
'बाबा, आईने गणितात मास्टर्स केलंय. ती लग्ना अगोदर नोकरी करायची. आज नोकरीत असती तर चांगल्या मोठ्या पदावर असती पण आमच्यासाठी तीने नोकरी सोडली. आम्हा दोघींना तिच्यामुळेच गणित आणि सायन्स मध्ये कितीतरी मेडल मिळाली. तुम्ही तिचे कौतुक तर करत नाही उलट तिलाच तुला हे जमत नाही ते जमत नाही म्हणत असता. तिने नोकरी सोडून जी चूक केलीय ती मला अजिबात करायची नाही आहे त्यामुळे हा मुलगा कितीही श्रीमंत का नाही असेल पण मला याच्याशी लग्न करायचे नाही म्हणजे नाही.'
तीचे ऐकून मिनलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सोनलने तर तिला आपल्या कवेतच घेतले. मृण्मयी आणि करण ने टाळ्या वाजवल्या तसे दिपकराव भानावर आले. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसून आला. ते उठले आणि त्यांनी मिनलचा हात हातात घेतला आणि म्हणाले, सॉरी, मिनल आज माझ्या सोनुलीने माझे डोळे उघडले. यापुढे मी असे कधीच बोलणार नाही. मी तुला खूप दुखावले गं मला क्षमा कर,' त्यांनी मिनलला कुशीत घेतले. चार जणांच्या टाळ्यांचा गजर घरात निनादू लागला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा