पिल्लूच्या रडण्याने तिला जाग आली. सवयीने झटकन उठून तिने शेजारी पाहिलं तर तो हाताने तिला थांब अशी खूण करत होता. एकीकडे पिल्लूला खांद्यावर घेऊन हलवून त्याने पुन्हा त्याला शांत केलं. दोन पाच मिनिटात ते इवलसं फुलपाखरू झोपी गेलं. थोडा वेळ त्याला तसंच ठेऊन त्याने मग अलगद त्याला मांडीवर ठेवलं आणि तिला झोपायची खूण करून पुन्हा डोकं मागे भिंतीवर टेकवून डोळे मिटून बसला. ती सगळं बघत होती. आज पिल्लूला सकाळपासून ताप होता. डॉक्टरकडे नेऊन औषध आणलं होतं. तापही उतरला होता पण दीड वर्षाचा पिटुकला जीव तो! तापाने पार कोमेजून गेला होता. लहान मुलांना काय होतंय सांगता येत नाही आणि नवीन आई बाबांना कळत नाही ! त्यामुळे गेले दोन दिवस त्याने नक्की का जागवलं ते दोघांनाही कळत नव्हतं. आज सकाळी मात्र ताप म्हणल्यावर डॉक्टरकडे जाऊन आले. काळजीचं कारण नसलं तरी आपल्या पिल्लाला काही झालंय म्हणल्यावर आई-बापाचा जीव कसा राहील ! दोन्ही रात्री पहाटे पाचपर्यंत ती त्याला सतत मांडीवर घेऊन होती. खाली रहात नव्हता अजिबात.
बाबाला दिसत होतं. पण ऑफिसमधे नेमकं क्लोजिंग असल्याने त्याला ना सुट्टी घेता येत होती ना काम ठेवून बाळाकडे बघता येत होतं. तरी वर्क फ्रॉम होममुळे निदान तिला, तो घरात आहे एवढा तरी आधार होता. तेवढा आधारही अशावेळी खूप असतो ! त्यामुळे आज संपूर्ण रात्र तो पिल्लूला बघत होता. एरवीही जमेल ती सगळी मदत करायचा. अजून लहान असताना पिल्लू रात्री सारखं सारखं उठायचं. दोघांची झोप पूर्ण व्हायची नाही. तरीही सकाळी तिच्या आधी उठून तिला गरम खीर करून द्यायचा. यू ट्यूब कृपा. आधी फक्त चहा येत होता स्वयंपाकघरात ! पण जसं बाळराजांचं आगमन झालं तसा नवर्याचा एका रात्रीत बाबा झाला.
पिल्लूला कुठे ठेवू आणि कुठे नको अस झालं होतं त्याला. नर्सने पहिल्यांदा हातात दिलं तेव्हा तो लोण्याचा गोळा अक्षरशः त्याच्या अश्रूंच्या अभिषेकात भिजत होता. इतकं छोटं पिल्लू आयुष्यात पहिल्यांदाच हातात घेतलेलं त्याने. तेही त्याचं.. त्याचा अंश.. प्रेगा न्यूज वरच्या दोन रेषा पाहून अक्षरशः आनंदाने नाचला होता. त्याची प्रतिक्रिया पाहून तिला डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसायला आलं. पोटात असताना तिच्या पोटावर हात, कधी कान ठेवून, कधी ओठ टेकवून, रोज भरपूर गप्पा मारणाऱ्या, किक मारली की एक्साईटमेंटने तिला पुन्हा पुन्हा सांगणार्या त्याला, आज त्याच पिल्लाला हातात घेतल्यावर तोंडून शब्द फुटत नव्हते. त्या दिवसापासून सगळं आयुष्य आता अगदी पिल्लूच्या भोवती फिरत होतं. आधी खाण्या-पिण्याचे, कपड्याचे, सगळ्याचे प्रचंड नखरे असलेला तो आता 180° अंशात बदललेला बाबा झाला होता. सगळं आयुष्य बदलून गेलं होतं.
आता बाळाला काय आवडेल आणि त्याच्या सोयीने जे जसं असेल, ते त्याने आनंदाने स्वीकारलं होतं. कोणतीही भाजी, स्वैपाकाच्या मावशींच्या हातची असेल ती चव, वेळ मिळेल तेव्हा चहा, तिच्या भुकेच्या वेळा सांभाळून मग जेवण, सगळंच त्याने आहे तसं मान्य केलं होतं. पिल्लू लहान असताना तिला पोस्ट पार्टम डिप्रेशनचा खूप त्रास झाला. मूड स्विंगज् व्हायचे. सतत बसून पाठ-कंबर भरून यायची. उगाच चिडचिड व्हायची. कधी मधेच खूप रडायला यायच. पण तो सगळं समजून घेत होता, सहन करत होता. तिचे सगळे डोहाळे जसे आनंदाने, हौसेने पुरवले तसंच आता बाळंतपणही आनंदाने करत होता. आजवर तिचा लहान मुलगा असल्याप्रमाणे हट्टी असलेला तो, आता जणू तिचाही बाबा झाला होता. आधी वाटेल तशा वस्तू फेकणारा, धाडधाड दारं-खिडक्या लावणारा तो, आता अगदी हळूच बाळ उठणार नाही ना, हे पाहून सगळं करत होता. जमेल ते सगळं जागच्या जागी ठेवत होता. रात्री जागत होता. पिल्लूची शी-शू प्रेमाने स्वच्छ करत होता. दुधाच्या बाटल्या काळजीपूर्वक स्टर्लाइज करत होता. त्याला खेळवत होता, झोपवत होता. पिल्लू रडला की हाच इतका हायपर व्हायचा की आता हाच त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात रडतो की काय असं वाटायचं तिला. ती त्याच्या शेजारी आडवी पडलेली असली तरी तिला झोप लागतच नव्हती. त्याच्या शांत चेहर्यावरचे भाव बघत एकीकडे गेल्या दीड-दोन वर्षाचा काळ तिच्या डोळ्यापुढून झरझर पुढे सरकला. आधीचा हेकेखोर आणि नखरेल असलेला हाच का तो आपला नवरा?? असा प्रश्न तिला पडत होता. त्याच्यातले हे सगळे बदल पुन्हा पुन्हा जाणवून डोळ्यातून पाणी वहायला लागलं. तीन दिवसापूर्वी फादर्स डे होऊन गेला. त्याला तर माहितही नव्हतं. पण तिने लक्षात ठेवून त्याला केव्हाचं हवं असलेलं एक स्मार्ट वॉच ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. पण पिल्लूला बरं नाही म्हणून तो विषयच बाजूला पडला होता. त्याला उद्या ते गिफ्ट द्यावं असा विचार करताना एकीकडे तिने त्यावर लिहायला ड्राफ्टमधे एक नोट सेव्ह केली -
- "For other, some special day is fathers day but for us, its indeed everyday. A wonderful transformation of a man to a husbands to a lovely, caring, sensible kind, responsible father. Let it be about the changing the dipper, washing the bottles, sleepless nights, singing a little boy or let be anything and anytime. A great helping hand. Your fatherhood really amazing me dear. Each baby is blessed with loving mother but our lucky one is blessed with our lovely and loving father to. To the world, you are daddy but for us you are the world.
इतरांसाठी, काही खास दिवस म्हणजे फादर्स डे असतो पण आपल्यासाठी, तो खरोखरच दररोजचा दिवस असतो. एका पुरूषाचे पतीपासून एका प्रेमळ, काळजी घेणारे, समजूतदार, जबाबदार वडिलांपर्यंतचे एक अद्भुत बदल. ते डायपर बदलणे, बाटल्या धुणे, झोप न येणे, लहान मुलाला गाणे किंवा काहीही आणि कधीही असो. एक उत्तम मदतीचा हात. तुमचे पितृत्व खरोखरच अद्भुत आहे प्रिये. प्रत्येक बाळाला प्रेमळ आईचे आशीर्वाद असते पण आपल्या भाग्यवान मुलाला आपले प्रेमळ आणि प्रेमळ वडील मिळतात. जगासाठी, तुम्ही बाबा आहात पण आमच्यासाठी तुम्ही जग आहात.
बाप-माणूस!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा