गुरुवार, १९ जून, २०२५

1999. गोष्टी फुलपाखरांच्या

 आज सकाळी घाईघाईने निघाली. घरून निघताना टिकलीचे स्टिकर नखं काढल्यामुळे लवकर न निघाल्यामुळे तसंच एक कुंकाचं बोट कपाळावर टेकवलं. अन् शाळेत पोहोचली. रोजच्या प्रमाणे गाडी फाटका आत येताच वर्गातील सगळी मुलं भोवताल गोळा झाली . गाडी स्टॅन्ड ला लावता लावता कुणी डब्याची बॅग गाडीवरून उचलली तर कुणी माझ्या गळ्यातली पर्स काढून आपल्या गळ्यात अडकवली. इतक्यात एका मुलीने दुसऱ्या मुलीकडे बोट करून, ओ टीचर ओ टीचर ईन्न का नाही तुमच्यासाठी भजे आणलेचा गलका लावला. 
हे ऐकून दुसरी लगेच म्हणाली, बाई... मीबी आणतो पुरणाची पोळी माह्या घरून टीच्चरलं.
अशी शाळेत पोहचताच दोन मिनिटातच आमची आखाडी साजरी झाली. मी गाडी व्यवस्थित लावली आणि सही करण्यासाठी ऑफिसमध्ये निघाली. त्या आधी ज्या मुलीनं माझी पर्स आपल्या जवळ घेतली होती मी तिला पेन घेण्यासाठी जवळ बोलावलं तसा तिने माझा हात हातात घेऊन मला खाली थोडसं वाकवलं. आणि म्हणाली, 
माय टीचर, तुमच्या नाकावर कुखु सांडलं वं.... ! 
असं म्हणून तिनं नाकावर सांडलेलं कुंकू बोटाच्या चिमटीत पकडून उचललं. पण कुंकाचा रंग नाकावर पसरला असावा कारण तिच्या या कृतीसरशीच दुसरी मुलगी जवळ आली आणि तिने आपला फ्रॉक वर करून माझ्या नाकावरचं कुंकू आपल्या फ्रॉकनं पुसायला सुरुवात केली. पुसतापुसता म्हणाली, 
टीचर नाकावर कूखु सांडण चांगलं असतं बरं का. मपली आज्जी  म्हणते, का नाकावर कुखु सांडलं की नवरा लई जीव लावते....!!! होन्ना वं ओ टीचर... ??? 
असा प्रश्न विचारून तिने माझ्या डोळ्यात पाहिले. मी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा होकारार्थी मान हलवली. 
खरे तर त्यांच्या अशा, हो न्ना वं टीच्चर...? टाईप प्रश्नावर नकारार्थी मान हलवण्याची माझी हिंमतच नाहीये .
औपचारिक शिकवण्याच्या अर्थाने मी भलेही त्यांची टीचर असेल पण अशा अनेक अनोपचारिक गोष्टी शिकवणारे हे सगळे चिमुकले माझे गुरु आहेत. एवढं नक्कीच. मनातल्या मनात हसू आवरत ऑफिसमध्ये सही करण्यासाठी गेली.मनात म्हटलं, 
देवा जगातल्या सगळ्या बायकांच्या नाकावर थेंबभर कुंकू सांडव.
आजचा दिवस एका वेगळ्या समाधानात गेला, हे काय वेगळं सांगावं लागेल....????
आज एवढंच.....

उज्वला सुधीर .
हा क्षण कॅमेरात कैद केल्याबद्दल माझ्या माजी विद्यार्थिनीचे मनापासून धन्यवाद .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...