माई ! दोन वाट्यांचा भात आणि एकच वाटीचे वरण टाकू न...
नेहमी प्रमाणे आई म्हणजे अलकाच्या सासूबाई त्यांच्या सासूबाईना म्हणजे माईना विचारायला गेल्या.
अलकाला नवल वाटे रोज काय विचारायचे. हे करू का आणि ते करू का. असे करू की तसे करु.
एकतर माईना ऐकायला येतं नाही. आईना का बोलायचे असते त्यांच्याशी कुणास ठाऊक. कुठलीही गोष्ट त्यांना कळेपर्यंत सांगत बसतात. नाहीच कळली तर लिहून सांगतात पण सांगतात.
माई म्हणजे अलकाच्या आज्जेसासूबाई अतिशय हुशार त्या काळातल्या ग्रॅज्युएट. वय वर्ष एक्क्यांशी.
आता लवकरच सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा होणार आहे त्यांचा.
आणि आई म्हणजे अलकाच्या सासूबाई.
घरात अशा दोन सासवा पण अलकाला सासुरवास अजिबात नव्हता.ती उलट मजेत असायची. कारण आई काही म्हणाल्याचं अलकाला तर लगेच माई तिची बाजू घ्यायच्या. आणि माई ओरडल्या तर आई सावरायला असायच्याच. घरातले तिघे ही पुरुष म्हणजे आम्हा तिघींचे नवरे तसे मितभाषीच. आधी घरात पिढीजात सावकारी आणि नंतर बाबा आणि आशीषची नोकरी त्यामुळे बंगला गाडी आणि बाकी सगळीच सुबत्ता होती. तीन पिढ्या घरात आनंदाने नांदत होत्या. अलकाची मात्र बरेचदा या विचारणे प्रकारावरून चिडचिड व्हायची. कारण तिच्या घरी ना तिला विचारायची सवय होती ना सांगायची.
त्यामुळे एकदा तर अलकाने म्हटलेच" आई! रोज रोज काय विचारायचे?
मला कळत ना किती लागेल तुम्हालाही कळतं च की "
त्यावर आईंनी दिलेलं उत्तर... तिला निरुत्तर करून गेले...
त्या म्हणाल्या "कळत नाही म्हणून नाहीच विचारायचे. या विचारण्यातून किंवा त्यांना सांगण्यातून आपण त्यांच्या अस्तित्वाची दखल घेत असतो. हाच भाव ठेवला की मग आपुलकीनी विचारू लागतो आपण आणि त्याही खुश होतात."
आशिषची आणि तिची पहिली भेट. त्यात त्याने अलकाला घातलेली पहिली अट. आपल्याला एकत्र राहायचं आहे. आजी आबा आई बाबा आणि आपण. आशिष आणि अजय दोघे भाऊ. अजय लहान. त्यामुळे घरात सात माणसे.
अलकाच्या सासूबाई पूर्वी बँकेत नौकरी करायच्या पन्नाशी नंतर VRS घेतली. स्वयंपाकात अगदी अन्नपूर्णा. घर अगदी चित्रासारखे लावलेले... स्वछता टापटीप... सगळंच जिथल्या तिथे. शिवाय त्यांचे बाहेरच विश्व.. मैत्रिणी... भिसी... भजनी मंडळ... काय काय चालू असे. एकंदरीत बाहेर आणि नातेवाइकांमध्ये खुप कौतुक होते. पण माई मात्र कायम आईचे गार्हाणे करायच्या. अगदी सगळ्यांजवळ. आईच्या मैत्रिणी असो वा घरी येणारे नातेवाईक असो.
त्यावरूनही अलका एकदा म्हणाली "तुम्ही एव्हढ्या माई माई करतात पण माई सतत तुमची गाऱ्हाणी सांगत असतात... "
त्यावर ही त्यांचे ऊत्तर...
"अगं गार्हाणी करून मन मोकळं होतं त्यांचं. उलट मी तर माझ्या जवळच्या मैत्रीणीना सांगूनच ठेवलय. बघा माझी सासू काय सांगतेय. त्यांच्या मनातले निघून जात. बोलून त्यांना बरं वाटतं. मग काय हरकत आहे. त्यांनी वाईट म्हंटले म्हणून मी वाईट होतं नाही."
आठवड्यातून एकदा दोघींचे भांडण म्हणजे वाद ठरलेले. घर आवरायला काढले की माईंचे ठरलेले. माझ्या वस्तू फेकू नका भांडी डबे चमचा. काहीही चालायचे त्यांना. हे दिसत नाही ते दिसत नाही म्हणून आरडाओरड ही करायच्या. आई पण माई ना ऐकायला येतं नसले तरी त्यांना समजेपर्यंत आई ऐकवत राहणार. वस्तू नेवून नेवून दाखवणार. अलकाला वाटे आता संपले सारे, आता काही या दोघी बोलायच्या नाहीत. पण कसले काय. पुन्हा एक दीड तासात घरातले वातावरण बदललेले. माई आणि आईंच्या चहाच्या टेबलवर नाहितर जेवण झाल्यावर गप्पा रंगलेल्या. मग अलका म्हणायची, "तुमचे काही कळतच नाही मला."
त्यावर आई म्हणायच्या "अगं दोघी एकाच संसारावर हक्क सांगतो ना..मग भांड्याला भांडे लागणारच. "
अगं वस्तू हाताळली ना की आपली होते आणि आपलेपणातून प्रेम येतं ना तसे हक्क सुद्धा येतो.
आत्ताशी तुला वर्ष होतंय.. तू अजून पूर्ण संसारात आली नाहीयेस रमली नाहीयेस... म्हणून बोलतेस...."
माईंचे तेच तेच सांगणं ही आई पहिल्यांदा ऐकल्यासारखे करायच्या.
अलका म्हणायची "आई ! तुम्हाला बोअर नाही होतं का?"
त्यावर त्यांचे उत्तर मात्र अलकाला अंतर्बाहय बदलवून गेले..
त्या म्हणाल्या....
"अगं होतं ना..पण अभिनय करायचा. आपली भूमिका आपण रोज निभवायची. नाटकाचे इतके प्रयोग होतात. पात्र तेच तेच तर बोलत असतात. नाटकातील कलाकार जर बोअर झाले तर सगळं नाटक नीरस होईल. आपले जीवन जगताना आपण ही रंगमंचावर असतो. आपली भूमिका निभावत असतो. मी भूमिका निवडलीय. घेतलीय किंवा मिळालीय म्हण.
"मधली ची भूमिका "
अगं मेन रोल हाच आहे असे म्हणत आई दिलखुलास हसलेल्या.
अलका म्हणाली.... "मधली ची भूमिका.... ?"
तशा आई भावूक झाल्या म्हणाल्या
"माहेरी माझ्या आईला "मधली" झालेलं रोजच पाहिलेय मी आणि आवडलीच मला ही भूमिका. बघ ना लग्न होऊन घरात आले तेंव्हापासून "मधली" झाले. कधी 'हे' आणि आई यांच्या मध्ये तर कधी सासू सासरे तर कधी दोन मुलांमध्ये तर कधी मुलं आणि त्यांचे बाबा कधी जाऊबाई आणि माई यांच्यामध्ये तर आता तुझ्या आणि माई मध्ये
मधलीची भूमिका घडवते तुम्हाला. कारण मधलीची पहिला रोल असतो तो ऐकण्याचा. माईंच्या सांगण्यातूनच मी घडले ना. रोजचा स्वयंपाक असो वा व्यवहार त्यांनी खूप शिकवलंय मला. माझ्या मुलांना सांभाळलय. अलका तू जेंव्हा लग्न करून आली तेंव्हा तुला सांगितलेलं आठवतंय ना. माझ्या दोघी मुलांना आशिष आणि अजय ला जे सांगितलं तेच तुलाही सांगते माईना ऐकायला येतं नाही म्हणून त्यांना काही सांगायचे नाही असे करायचे नाही. एकवेळ माझ्या बोलावण्याला उशीरा 'ओ ' दिलीस तरी चालेल पण माईंनी आवाज दिला की त्यांच्या समोर जाऊन उभे राहायचे कारणं त्यांना ऐकायला येत नाही. माईंना ऐकायला आले असते तर आज माई खूप वेगळ्या असत्या.
हे मी "मधली" झाले म्हणून मला समजलंय म्हणत आईनी डोळे पुसले. चल चार दिवसांवर आलाय माईंचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. तयारीला लागायला हवं. म्हणत त्या माईंच्या खोलीकडे जायला निघाल्या आणि अलकाच्या मनात आले.
माईंचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होतोच आहे तर आईंची एकसष्टी ही साजरी करता येईल. ती लगेचच आशिष म्हणाली मग काय घरातल्या सगळ्यांनीच अलकाचे कौतुक करीत सोहळा कार्य मनावर घेतले आणि एकंदरीतच कार्यक्रम खूप छान झाला.
कार्यक्रमाची क्षणचित्रे पाहताना अलकाच्या मनात आले. बघता बघता आईंनी किती सहजपणे आपली "मधली भूमिका" मला देऊ केली. अलकाचे डोळे पाणावले. आशिष लगेच म्हणाला. काय गं काय झालं. अलकाला जाणवले. माझी मधलीची भूमिका. आमच्या दोघांमधलेही नाते ही किती छान फुलवतेय.
"सहजच" म्हणत अलका हसली. आनंदाश्रू आनंदाने गालावर ओघळलेच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा