गुरुवार, १२ जून, २०२५

1967. आदर्श शिक्षक

      विजय शिंदे, बीएससी बीएड झालेला. बीएससी साठी जास्त खर्च नाही पण  बीएड साठी दोन लाख रुपये खर्च आला. ठीक आहे नोकरी तर पक्की होईलच, असे आई-वडिलांना अगोदरच आश्वासन दिली होती. पोरगा एकदा का मास्तर म्हणून चिकटला की आपल्या जीवनाचे त्याला नोकरी मिळाली म्हणून सार्थक झाले अशी आशा ठेवणारे त्याचे आई वडील. बीएडचे कॉलेज घरापासून तसे ४० किलोमीटर दूर. येण्या-जाण्यासाठी दीड तास दीड तास असे तीन तास जायचे. जाण्याच्या रोजचा खर्च कमीत कमी शंभर रुपये. त्याच  चहा पाण्याचा खर्च, मित्रांच्या बरोबर पन्नास रुपये असे मिळून रोजचे दीडशे ते दोनशे रुपये तरी कमीत कमी खर्च व्हायचे, म्हणजे महिन्याभराचे अंदाजे पाच हजार रुपये. अशा रीतीने वर्षभरात पन्नास हजार अधिक बीएड कॉलेजचे दोन लाख आणि पुस्तक व  वह्या यांचे ५० हजार असे मिळून विजयला तीन लाख रुपये खर्च आला. ठीक आहे, आता नोकरी मिळेल, मग एकदा का नोकरी मिळाली की पैसे वसूल होतील, असे विजयचे  नेहमीचे सांगणे. आई-वडिलांचा विजय वरती जास्त  विश्वास. आता दोन पोरींची लग्न झालीच होती. आता एकुलता एक पोरगा आहे, त्याचे शिक्षणावर खर्च केला तर तो आपल्याला सांभाळणार आहे, त्यामुळे आता त्याच्या शिक्षणाकडे, त्याच्या शिक्षणाच्या पैशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे विजयच्या आई-वडिलांची भोळीभावडी आशा. विजय कॉलेजमध्ये अभ्यास करतो की नाही हे कधी पाहण्यासाठी आई-वडील गेलेच नाहीत. कारण शिक्षण त्यांनी कधी घेतलीच नव्हत. नाही तरी त्या गावात शिकलेली म्हातारी माणसे तशी नव्हतीच मुळी. त्यात आपला विजय शिक्षक होतोय  म्हणजे आपल्या गावातला पहिला शिक्षक याचा त्यांना किती अभिमान ! गावात तसा कोणी, मूळ गावातला शिक्षक नव्हताच. त्यामुळे आपल्या विजयला आपल्या गावच्या शाळेत पटकन नोकरी मिळेल असे विजयच्या  आई-वडिलांना नेहमी वाटत असे. 
      एकदाचा विजय बीएड झाला आणि त्याच्या दुर्दैवाने त्याच वर्षी कोरोना सुरू झाला. कोरोना संपता संपता दोन वर्षे गेली. विजयला जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विभागात जास्त काही चकरा मारताच आल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या आल्या किती, गेल्या किती, कोण कोण चिकटले, हे त्याला काही कळलेच नाही, एकदाचा कोरोना तीन वर्षात संपला. आता विजयचे नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले. या आमदाराला भेट, त्या माजी खासदाराला भेट, पंचायत समितीच्या सदस्यांना भेट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना भेट, त्यांच्या चिट्ट्या घ्या आणि मुंबईला चकरा मारा, अशा विजयच्या अनेक चकरा  कोल्हापूर – मुंबई, कोल्हापूर - मुंबई चकरा  सुरू झाल्या आणि त्याच्या या अथक चकराच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि एकदाची त्याला नोकरी मिळाल्याचे पत्र घरी आले. पत्र मिळताच दोन दिवसात कार्यालयात येऊन भेटावे असे शिक्षण अधिकाऱ्यांनी लिहिले होते. विजयला आनंद किती झाला असेल ? त्याचा आनंद किती गगनात मावेनासा  झाला असेल याची आपण तुलनाच न केलेली बरी ! विजय दुसऱ्या दिवशी शिक्षण अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन भेटला. शैक्षणिक अधिकाऱ्यांनी त्याचे सहर्ष स्वागत केले आणि त्याला सांगितले, वैभववाडी तालुक्यातील एका डोंगराच्या गावात तुमची नेमणूक झालेली आहे. गाव तसे खूपच दूर आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा आपल्या मूळ गावी येता येणार नाही. मान्य असेल तर हो म्हणा, नाहीतर मी दुसऱ्या उमेदवाराची निवड करतो. विजय हो म्हणाला आणि मी जायला एका पायावर तयार आहे, मी एक वर्षभर माझ्या मूळ गावी येणार नाही, वाटल्यास मी दिवाळीची सुट्टी सुद्धा घेणार नाही असे विजयने शिक्षण अधिकाऱ्यांना वचन दिले. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याच्या डोळ्यात एकदा निरखून पाहिले आणि विजय खरोखरच निर्धाराने बोलत आहे यावर विश्वास बसला. शिक्षण अधिकाऱ्यांची अडचण अशी होती की त्या गावात कोणी शिक्षक टिकतच नव्हता. त्यामुळे एकदाच कोणत्यातरी उमेदवाराला त्याच्यावरती खूप बंधने टाकून त्या गावी शिक्षक म्हणून रुजू करून घ्यायचे असे शिक्षण अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट होते आणि विजय त्यामध्ये जाऊन बसला. 
     या डोंगरच्या गावामध्ये विजयला आपल्या वडगाव या गावातून येण्यासाठी सहा तास लागले. एसटी गावाच्या जवळ पाच किलोमीटर पर्यंत आली. तिथून पुढे कसे जायचे असे विजयने एसटी स्टँडवर विचारले. तिथला एक किराणा दुकानदार म्हटला, पाहुणे गावाला कशासाठी चाललात. विजय म्हणाला तिथे मला ‘शिक्षक’ म्हणून नोकरी लागलेली आहे. त्यासाठी मी चाललो आहे. अहो, त्या गावात आतापर्यंत कोणी टिकलेच नाही, तुम्ही कशासाठी चाललाय असे तो दुकानदार म्हणाला. विजय म्हणाला हरकत नाही, मी तिथे टिकणार आहे, कसे जायचे ते सांगा. दुकानदार म्हणाला, तिकडे जायचे म्हणजे एक तर कोणाची तरी सायकल मिळाली तर ठीक नाहीतर तुम्हाला चालत जावे लागेल. विजयने विचारले, किती वेळ लागेल. गाव तसं पाच किलोमीटर आहे. रस्ता सुद्धा चांगला नाही, तुम्हाला दोन - अडीच तास नक्कीच लागतील. आता पाच वाजले होते. पावसाळ्याचे दिवस होते. तरीसुद्धा एकदा गावी जाऊया असा विजयने निश्चय केला आणि विजयची गाव पायपीट सुरू झाली. त्याच्या नशिबाने गावी जात असताना पाऊस आला नाही आणि विजयला रस्ता खराब असून सुद्धा साधारणपणे अडीच तासात गावी पोहोचता आले. शिक्षणाधिकाऱ्यांनी अगोदर सांगितले होते की गावात काही सुधारणा झालेल्या नाहीत. गावांमध्ये लाईट खूपच कमी आहे. त्यामुळे संध्याकाळी बऱ्यापैकी अंधार असतो. साडेसात वाजता गावी येणे झाल्यामुळे आता त्याला प्रश्न पडला की गावची शाळा कुठे आहे. त्याने रस्त्यातील एका माणसाला विचारले, पावणे गावची शाळा कुठे आहे ? त्या गावातल्या माणसाने विजयला अगोदर खालीवर निरखून पाहिले आणि तो म्हणाला, तुम्ही कोण ? विजय म्हणाला मी त्या शाळेत शिक्षक म्हणून उद्यापासून काम सुरू करणार आहे. गावकरी हसला आणि म्हणाला, पावने आतापर्यंत कोणीही शिक्षक तिथे दोन-तीन महिन्यापेक्षा जास्त टिकलेला नाही. विषय म्हणाला ठीक आहे मी बघतो. शाळा कुठे आहे. गावकरी म्हणाला, शाळा येथून तीन किलोमीटर आहे. बापरे ! इतका वेळ अडीच तास चालणे  झाले होते आता पुढे तीन किलोमीटर जायचे म्हणजे कमीत कमी एक तास तरी सहज लागणार. कारण जाताना बऱ्यापैकी अंधार होता. विजयने गावकऱ्याला  विचारले मामा आता जायला खूप वेळ लागेल. साधारणपणे नऊ साडेनऊ होतील तर आता माझी सोय काय होऊ शकेल ? गावकरी मामा दयाळू होता. तो म्हणाला बघा माझं घर लय बारीक आहे. त्या घरात तुम्हाला यायला आवडल का ? विजय म्हणाला ठीक आहे, आजची रात्र तुमच्या घरी राहूया. विजय म्हणाला मामा पण मी असं ठरवलं होतं की शाळेत मुक्काम करायचा, म्हणून मी इतर काही आणायचे याचा विचार केलेला नाही. तुमच्या मुलांना काहीतरी खायला घ्यायचे.  कुठे दुकान सुद्धा दिसत नाही. मामा म्हणाले हरकत नाही हो पावन, आम्ही गावाकडची माणसं. असा कधी विचार करत नाही. आपल्या हातन एखाद्याच्या मुखात चार घास पडले की आम्हाला बरं वाटतं. देव आम्हाला पुढ कुठल्या ना कुठल्या कामाला मदत करत असतो. विजयला गावकरी मामाच्या या विचाराचा खूपच आनंद झाला आणि चालत चालत गावकरी मामाच्या घरी आले. घर खूप छोटे होते, घरात चिमणीचाच प्रकाश होता. त्याच घराच्या समोरच गाय, म्हैस, बैल बांधले होते. त्यांच्या शेना - मुताचा वास वाऱ्याचे झुळूकीबरोबर घरात येत होता. गावकरी मामाने घरी आल्यावर आपल्या बायकोला सांगितलं, अगं आपल्या घरी एक शाळा मास्तर आज राहणार आहेत. तर त्यांच्यासाठी जरा चांगल खायला कर. बायकोन मान हलवली. आता चिमणीच्या प्रकाशात गावकरी मामा बरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. गावाकडची माणसं माणुसकीने किती ओतप्रोत भरलेली आहेत याचा विजयला खूपच आनंद झाला. गावकरी मामाच्या बायकोने  पाहुण्यासाठी भजी तळली होती. पोर सारखी म्हणत होती,  आमी तुला चार दिवसापासून म्हणत होतो  आम्हाला खायला काहीतरी चांगलं कर, चांगलं कर, पण तू आयकत  नव्हतीस. बघ पावना आला आणि तू केलंस. आम्ही सांगतोय तरी इतके दिवस तू आयकल नाही. पोरांची आई काहीच बोलत नव्हती. आता संध्याकाळी झोपण्याची वेळ झाली. विजयच्या अंगावर दोन फाटक्या गोधड्या देण्यात आल्या. विजयला वाटले, त्यातून वाराच वाहतोय जसं काय पंख्याचा वारा वाहत असतो. आता हे पांघरून घेण्याशिवाय पर्याय नाही असा विजयने मनाचा निश्चय केला आणि एकदाचे जमिनीवर अंग टाकले. सकाळी उठल्यानंतर विजय मास्तरला आंघोळीसाठी गरम पाणी देण्यात आले. चहा आणि नाश्ता झाला आणि आता विजयने घाई केली. मामा, तुम्ही आजच्या दिवस माझ्याबरोबर शाळेत आला तर बरं होईल. गावकरी मामा, विजय बरोबर शाळेत आले. खरे तर मामांना आज त्यांच्या शेतात जायचे होते पण शेतकरी माणसे प्रत्येकाला मदत करत असतात. त्यावेळेला ते आपली कामे पुढे मागे ढकलतात, मदत करताना ते आपल्या कामांच्या फायद्यातोट्याचा कधीच विचार करत नाहीत, हे विजयला जाणवले. हे गावकरी मामा आणि विजय दोघेजण चालत चालत शाळेत आले. त्यांना दीड तास लागला. शाळेत नऊ वाजता आले, विजयला वाटले शाळा दहा वाजता असेल. आता साडेनऊ वाजल्यापासून मुल यायला सुरुवात होईल, पण बघतो तर काय ? अकरा वाजले तरी शाळेत कोणाचाच पत्ता नव्हता. एकदाचा अकरा वाजता शाळेतला शिपाई आला. चला कोणीतरी आले असे विजयला वाटले. विजयला वाटले, या शाळेतले शिक्षक असावेत म्हणून त्याने त्या शिक्षकांना नमस्कार केला. नमस्कार सर, मी विजय शिंदे. आजपासून शाळेत मी रुजू होणार आहे. त्या सरांनी विजयला हसत असत म्हटले, सर मला खूप आनंद झाला. मी काशिनाथ काळे, मी शिक्षक नाही, मी शिपाई आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा मुख्याध्यापक कधी येतील. तर काशिनाथ काळे म्हणाला, आता ते बारा वाजता येतील बघा. आणि मग मुले केव्हा येतील ? काशिनाथ काळे म्हणाला, पोर बारा,एक वाजता येतील. अरे बापरे! मुख्याध्यापकच जर बारा वाजता येत असतील तर मुले केव्हा येणार ? आणि मुलांच शैक्षणिक भविष्य ते काय असा विचार  मनात चमकून गेला. पण ठीक आहे, आजचा पहिला दिवस आहे, पाहूया काय परिस्थिती आहे,असे विजयला वाटले. त्याच्या नशिबाने मुख्याध्यापक बारा वाजता आले. विजयने त्यांना आपले शिक्षण अधिकाऱ्यांच नोकरीसाठीच पत्र दिले. मुख्याध्यापक शंकर शिंदे यांनी पत्र खालून वरून पुन्हा पुन्हा तीन वेळा वाचले आणि ते म्हणाले, चला बरे झाले. कमीत कमी आपण दोघेजण तरी एक आहोत. विजयने चमकून विचारले, मला कळले नाही सर. अहो, मी शंकर शिंदे. तुम्ही विजय शिंदे, कमीत कमी आपण आडनाव बंधू तरी आहोत, दोघेही गमतीने हसले.
      शंकर शिंदे म्हणाले, बरे झाले आता माझ्या जोडीला तुम्ही आलात पण तुम्ही खरोखरच या शाळेत राहणार आहेत का? शंकर शिंदे सरांनी आपली शंका व्यक्त केली. विजय म्हणाला, सर मला शिक्षणाधिकाऱ्यांनी याबद्दल अगोदरच सांगितले आहे. मी त्यांना आश्वासन दिले आहे की मी दिवाळीच्या सुट्टी सुद्धा माझ्या गावी वडगावला जाणार नाही. काय म्हणताय काय, पण तुमचे आश्वासन हे निवडणुकीतले आश्वासन ठरू नये असे मला वाटते. विजयने विचारले का सर शंकर शिंदे सर म्हणाले, अहो निवडणुकीतील आश्वासने ही फक्त देण्यासाठीच असतात, पूर्ण करण्यासाठी नसतात हे आपण पाहत आहोत ना ? दोघेही मनमुरात हसले. शाळा पहिली ते सातवीपर्यंत होती. साधारणपणे शाळेमध्ये दीडशे मुलांची संख्या होती पण पहिली ते सातवी एकूण उपस्थिती फक्त ५० च्या आसपासच होती. आता उपस्थिती वाढवायला हवी व त्याबरोबर मुलांना शिकवायला हवे असे मुख्याध्यापक व विजय शिंदे यांनी एकमेकात चर्चा केली. शंकर शिंदे सर म्हणाले, हे पहा विजय मी आता म्हातारा झालो आहे. पुढच्या तीन वर्षात मी रिटायर होणार आहे. आता मला मोठ्या वर्गातल्या मुलांच्यासाठी जास्त मोठ्याने बोलता येत नाही म्हणून मी पहिली ते चौथी हे वर्ग घेतो आणि तुम्ही पाचवी ते सातवी हे वर्ग घ्या. तुम्ही तरुण आहात, अंगात सळसळते रक्त आहे, त्यामुळे तुम्ही मोठ्या मुलांना चांगल शिकवू शकाल असे मला वाटते. विजय हो म्हणाला. बर तुमचा बीएससीचा विषय कोणता होता ? विजय म्हणाला सर माझा बीएससी चा विषय केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र होता. ठीक आहे, त्या विषयाला येथे फार काही वाव मिळणार नाही तुम्हाला. सर्वच विषय मुलांना शिकवावे लागतील आणि विजयचे शाळेत शिकवणे सुरू झाले. 
     विजयने पहिल्या दिवसापासून ठरविले होते की मुलांना कधीही मारायचे नाही. त्यांना कठोर शिक्षा करायची नाही. जी मुले अभ्यास करत नव्हती, त्यांच्या घरी जायचे. त्यांच्या आई-वडिलांना या मुलांच्या बद्दल सांगायचे आणि मुलांना दुसरी कामे लावू नका असेही सांगायचे. एक आठवडाभर विजयने मुलांना शिकविले आणि शनिवारी अर्धी शाळा असताना त्याने पाचवी ते सातवी वर्गात प्रत्येक वर्गात विचारले मुलांनो पूजा आपल्याला अर्धी शाळा संपल्यानंतर हनुमानाच्या फोटोची पूजा करायची आहे तर पूजा झाल्यानंतर आपल्याला नारळ वाढवून सर्वांना प्रसाद द्यायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी त्याने विचारले,कोणाकोणाच्या घरी नारळाची झाडे आहेत ? प्रत्येक वर्गातल्या तीन-चार मुलांनी हात वरती केले. आता एक काम करा प्रत्येकाने आपल्या घरचा एक एक नारळ आणा. दुसऱ्या दिवशी विजयने बघितले तर प्रत्येक मुलाने चार-चार नारळ आणले होते. विजयने सर्व वर्ग, शनिवारी अर्धी शाळा झाल्यानंतर मुलांच्याकडून साफ करून घेतले. मुलांच्या कडून वर्ग धुवून घेतले आणि वर्ग कोरडे झाल्यानंतर सर्व मुलांना आपापल्या वर्गात बसायला सांगितले. हनुमानाच्या फोटोची पूजा केली आणि नारळ वाढविले. खोबरे इतके झाले होते की प्रत्येक मुलाला खोबऱ्याचा प्रसाद भरपूर मिळाला. मुलांनी शनिवारची पूजा अशी कधी पाहिलीच नव्हती. ती सुद्धा शाळेत. मुलांना खूपच आनंद झाला. आता मुलांना कळले की प्रत्येक शनिवारी आपल्याला खायला खोबरे मिळणार आहे. मुले तर काय प्रसादासाठी खुशीत असतात नेहमी आणि विजयने त्या दिवशीच मुलांच्या समोर सांगितले, जी मुले रोज शाळेत हजर असतील त्यांनाच प्रसाद मिळेल. बाकीच्यांना प्रसाद मिळणार नाही आणि विजयच्या या गोष्टीचा खूपच चांगला परिणाम झाला. सोमवारपासून मुलांची उपस्थिती वाढायला सुरुवात झाली. सोमवारी काही मुले आली, मंगळवारी काही मुले आली, बुधवारी काही मुले आली. बघता बघता मुलांची उपस्थिती ५० वरून १०० पर्यंत पोहोचली आणि आलेल्या सर्व मुलांना विजयने खोबऱ्याचा प्रसाद दिला. आता त्याला जाणवले की मुलींची पटावरील नावे आहेत पण मुलींची उपस्थिती कमी कमी दिसते. मग विजय शनिवार, रविवार मुलींच्या घरी गेला आणि पालकांना विचारले तर पालकांनी सांगितले की काही ना काहीतरी कामे असतात म्हणून आमच्या पोरी शाळेत येत नाहीत. विजयने त्यांना सांगितले की अहो काकू, अहो काका, तुम्ही शिकला नाहीत म्हणून तुमच्यावरती ही गरिबीची परिस्थिती आहे. तुम्ही जर शिकला असतात तर तुम्ही काहीतरी नोकरी, धंदा केला असता. आपल्या मुलींच्यावर ही पाळी येऊ नये म्हणून काकू, तुम्ही तरी विचार करा. विजयच्या काकू, काकू, या म्हणण्याचा घरातील स्त्रीवर खूपच चांगला परिणाम झाला आणि तिने, प्रत्येकीने, आपल्या नवऱ्याला सांगितले की आता इथून पुढे आपल्या पोरींना घरातली कामे लावायची नाहीत, त्यांना आपण शाळेत पाठवूया. 
     सोमवारपासून शाळेतील मुलींची उपस्थिती वाढायला सुरुवात झाली. दुपारच्या वेळेत मुले लघवीसाठी इकडे तिकडे कुठेतरी जात होती. मुलींच्या या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करणे भाग होते आणि विजयने शंकर शिंदे सरांच्या मदतीने चार खड्डे खोदले. त्याच्याभोवती गावातील दहा-पंधरा महिलांच्या फाटक्या साड्या गुंडाळल्या आणि मुलींच्या बाथरूमची सोय केली. आता मुली बिनधास्तपणे शाळेत येऊ लागल्या होत्या. विजयचा उत्साह वाढला होता. शाळेच्या मैदानावर क्रीडा प्रकारात विजय मुलांना विविध खेळ शिकवत होता पण मुलांनी प्रॅक्टिकल करावे, प्रॅक्टिकल पाहावे अशी त्याची मनात खूपच मोठी इच्छा होती. शाळेमध्ये तर प्रयोगशाळा नव्हती. त्यामुळे मुलांना प्रयोग करणे शक्य नव्हते. फक्त पुस्तक वाचून दाखवायचे आणि मुलांनी ते तोंडपाठ करायचे, याच्यापेक्षा आपण वेगळे काहीतरी करूया असा विचार विजयच्या मनात आला. काय करायचे, काय करायचे, असा विजय रात्रभर विचार करत होता आणि त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. त्यान विचार केला, प्राचीन काळापासून आपल्या खेडेगावात बारा बलुतेदार पद्धत राबवली जात होती. पूर्वी पैसे नव्हते, शेतकरी लोक शेतात धान्य पिकवत होते. ज्यांना शेती नव्हती ते छोट्या मोठ्या सेवा करत होते आणि या सेवा म्हणजे लाकडाची कामे करणारे सुतार, लोखंडाची कामे करणारे लोहार, शेतात फुले पिकवणारे माळी, देवाची - देवीची पूजा करणारे म्हणजे गुरव, शेंगदाणा - करडई अशा तेलबिया पासून तेल काढणारे ते तेली, कपडे शिवणारे ते शिंपी, माणसांचे केस कापणारे आणि दाढी करणारे ते न्हावी, मातीची मडके, रांजण किंवा मातीची खेळणी करणारे ते कुंभार. आता खेडेगावातील बलुतेदार पद्धत कमी कमी होत चालली होती. विजय शिंदे मुख्याध्यापक शंकर शिंदे यांना म्हणाले सर नाही तरी शनिवारी दुपारची शाळा संपल्यानंतर मुले एक सर शेतीत जातात किंवा घरात बसून आपल्या आईला त्रास देतात. त्यापेक्षा त्यांना लोहार, सुतार, कुंभार, तेली, हे कशा प्रकारची कामे करतात, कामे करताना किती कष्ट असतात, याची लहानपणापासूनच जाणीव झाली तर त्यांची कष्टाप्रती ओढ वाढेल. कष्टाला ते हीन समजणार नाहीत असे मला वाटते. शंकर शिंदे सरांच्या डोक्यात ही कल्पना अनेक वर्षांपासून होती पण एकुलता एक शिक्षक असल्यामुळे इच्छा असूनही त्यांना अशा काही नवीन कल्पना राबवत्या आल्या नाहीत. सरांनी  विचारले सुरुवात कशी करणार ? विजय शिंदे म्हणाले, सुरुवातीला आपण पाचवी ते सातवी या मुलांना नेऊया. त्यानंतर छोट्या वर्गाचे नियोजन करूया. ठीक आहे, मुख्याध्यापक म्हणाले. आता विजयने दोन शनिवारी व रविवारी गावातील कुंभार, लोहार, सुतार, तेली, माळी, हे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या भेटी घेतल्या. त्यांना आपली कल्पना समजावून सांगितली. त्यांना कल्पना काही विशेष कळली नाही पण आपण काय करतो हे बघायला शाळेतली पोरे येणार आहेत एवढे त्यांना कळले.
       आता विजय शिंदे सरांनी शुक्रवारी शेवटच्या तासाला पाचवी ते सातवी या वर्गातील मुलांना सांगितले, उद्या शनिवारी अर्धी शाळा संपल्यानंतर तुम्ही घरी जायचे नाही. नेहमीप्रमाणे आपला दुपारचा डबा आणायचा आणि दुपारचा डबा खाल्ल्यानंतर आपण गावातील एक सहल करणार आहोत. ‘सहल’ हा शब्द मुलांनी पहिल्यांदाच ऐकला होता. एका मुलीने विचारले सहल म्हणजे काय असते सर ? विजय शिंदे सर म्हणाले, सहल म्हणजे नवीन ठिकाणी जाणे, नवीन ठिकाण पाहणे. या नवीन ठिकाणांचा ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक अभ्यास करणे, या ठिकाणी जाऊन शाळेचा अभ्यास करायचा नसतो तर आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा, वातावरणाचा अभ्यास करायचा असतो. मुलांना इतर काही समजले नाही पण उद्या सहलीमध्ये शाळेतला अभ्यास करायचा नसतो हे त्यांना कळले. मुलांना खूपच आनंद झाला. आता पहिली सहल ठरली होती ती लोहाराकडे. लोहार नाना म्हात्रे यांचे वय ७०  वर्षे होते. त्यांचा नातू सुहास शाळेत शिकत होता. तो सातवीला होता, आपल्या घरी शाळेचे मुख्याध्यापक तसेच दुसरे सर विजय शिंदे येणार आहेत याचा त्याला खूपच आनंद झाला. त्याने आईला सांगून आपल्या घरासमोरचे अंगण आदल्या दिवशी स्वच्छ करून घेतले होते. साधारणपणे ५० मुले येणार होती. मुले आल्या आल्या सर्वांना बसण्यासाठी घोंगडी देण्यात आली. मुले सुरुवातीला दंगामस्ती करत होते. विजय शिंदे सर म्हणाले, मुलांनो मीच तुम्हाला दंगामस्ती केल्यास शिक्षा करणार आहे आणि ती फार भयानक असेल. त्यामुळे सर्वांनी शांत बसावे. शिक्षा म्हटल्यानंतर मुले घाबरली व चिडीचूप बसली. आता मुलांच्या समोर नाना म्हात्रे आले आणि विजय शिंदे सरांनी लोहार काय काय कामे करतात ते तुम्ही सांगावे असे नाना म्हात्रे या लोहारांना विनंती केली. 
     नाना म्हात्रे लोहारांना खूपच आनंद झाला. आपल्याला कोणीतरी शिकवायला सांगतोय असे त्यांना वाटले. ते म्हणाले या गावात आमची लोहाराची पाच घरे आहेत .पण दिवसेंदिवस धंदा कमी होत चालला आहे, म्हणून आता मी एकटेच लोहाराचे काम करतो. खुरपे, विळे, बैलगाडीच्या चाकाची लोखंडी धाव, अशा प्रकारच्या लोखंडी वस्तूंची कामे करतो. बाजारातून आम्ही मोठे मोठे लोखंडी पत्रे आणतो, त्याला कापून हवा तसा आकार देतो आणि आम्ही भट्टीमध्ये ते गरम करतो. भट्टीमध्ये लाकड टाकतो, त्यांना पेटवतो, त्यांचा जाळ करतो आणि तो जाळ कायम राहावा म्हणून भाता हलवत असतो. त्यांनी सांगितले दहा - दहा मुलांचा एक गट करा म्हणजे लोखंडी भाता कसा चालतो ते मी तुम्हाला दाखवतो. खरोखरच मुले खूपच शांत होती. सुरुवातीला दहा-दहा मुलांचे चार गट झाले. त्यांनी भाता कसा चालतो ते बघितले, भाता चालवून बघितला. नंतर बारा मुलींचा एक गट झाला. त्यांनी तर अधिक वेळ निरीक्षण केले. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आता येऊन दोन तास झाले होते. नाना म्हात्रे यांच्या पत्नीने सर्व मुलांना सरबत करून दिले. त्यामुळे तर मुले खूपच खुश झालीत. मुले पहात असताना विजय शिंदे सरांनी आपल्या मोबाईल मध्ये मुलांचे फोटो काढले आणि प्रत्येकी चार चार मिनिटांचे व्हिडिओ शूट केले. ते व्हिडिओ, ते मुलांना दाखवत होते, मुलांना खूपच आनंद होत होता. 
       आता पुढच्या शनिवारी, सुतार यांच्याकडे जायचे ठरले. गुरुवार - शुक्रवार हे दोन दिवस अगोदरच विजय शिंदे सर सुतार यांच्याकडे गेले होते. गेल्या शनिवारचा सहलीचा अनुभव मुलांना खूपच आनंद देऊन गेला होता. त्यामुळे शनिवार दुपारचे केव्हा येते असे पाचवी ते सातवीच्या मुलांना झाले होते. नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्गात हनुमानाच्या फोटोची पूजा झाली आणि सर्व मुलांना प्रसाद म्हणून खोबरे देण्यात आले. पहिली ते चौथीची मुल घरी गेली. पाचवी ते सातवीची मुले वर्गातच थांबलेत. आता आज आपल्याला सुतार कोणते कोणते उद्योग करतात हे पाहायचे आहे असे विजय शिंदे सर मुलांना म्हणाले. आज केरबा काळे या सुतारांच्याकडे जायचे ठरले होते. त्यांची नात गुणवंती सातवीला होती. तिला आपल्या घरी आपल्या सर्व मैत्रिणी एकाच वेळेला येत आहेत याचा खूप आनंद झाला. गेल्या वेळेला जसे लोहारांच्या घराच्या बाहेर छान पैकी स्वच्छता करून सर्व मुलांना बसण्याची सोय केली होती तसे गुणवंतीने आपल्या आईला अगोदर सांगितले होते. त्या दिवशी शेतात जायचे नाही असेही सांगितले होते. आई घरातच होती. सर्व मुले, मुली दुपारी दोन वाजता त्यांच्या घरी आलीत. घराच्या बाहेर अंगण मुलांना बसण्यासाठी होते. मुले शांतपणे बसली.
        केरबा काळे यांचे वय साधारणपणे ४५ वर्षे. गेल्यावर्षी त्यांचे वडील देवा घरी गेले होते आणि वडिलांच्या नंतर त्यांनी या उद्योगात पूर्णपणे वाहून घेतले होते. सर्व मुलांना त्यांनी नमस्कार केला आणि सांगितले की लाकडाच्या वस्तू जसे दारे, खिडक्या, चौकटी, बैलगाडीची चाके, बैलगाडीचा लाकडी हौद, बैलासाठी लागणारे जू, नांगर, कुळव, इत्यादी लाकडी सामान सुतार करतात. विजय शिंदे सरांनी मुलांना विचारले तुम्ही क्रिकेट खेळता, क्रिकेटचे स्टंप कुठून आणता ? मुले म्हणाली आम्ही शहरातून आणतो. शिंदे सर म्हणाले आता इथून पुढे शहरातून महागड्या लाकडी वस्तू आणायच्या नाहीत. क्रिकेटचे स्टंप तर खूपच महाग असतात. आपण ते स्टंप आपल्या गावातच केरबा काळे या सुतार काकांच्या कडून करून घेऊया. केरबा काळे म्हणाले, अहो गुरुजी मी असल्या वस्तू कधी केल्या नाहीत. सर म्हणाले काळजी करू नका, मी त्या वस्तू कशा करायच्या त्याचे डिझाईन म्हणजे चित्र, आकृती, तुम्हाला देतो. तुम्हाला समजावून सांगतो, काही अडचण आली तर मी मदत करतो. केळवा काळे म्हणाले, तुम्ही जर मला शिकवणार असाल तर मी तुम्हाला तुम्ही काय म्हणतात ते स्टम्प का काय करून देतो. सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. सर म्हणाले, मुलांनो मी तुम्हाला रविवारी क्रिकेट खेळायला शिकवत जाईन, कुणाकुणाला आवडेल ? सर्व मुलांनी हात वरती केले, दोन मुलींनी सुद्धा हात वरती केला.  सरांना खूप आनंद झाला, त्यांनी मुलांना विचारले सध्या कोण कोण क्रिकेट खेळत आहेत ? कुणाकडे बॅट. स्टम्प. बॉल आहेत ? सरपंचाचा मुलगा उभा राहिला. दोन मुले म्हणाली, सर तो आऊट असला तरी तीन तीनदा बॅटिंग करतो. आम्हाला खेळायला मिळत नाही. सर म्हणाले, आता उद्यापासून असे होणार नाही. काय गणेश तुला पटते का तुला ? गणेश हो म्हणाला. 
      दुसऱ्या दिवशी रविवारी मुलांचा उत्साह खूपच वाढला होता. ५० मुलांच्या पैकी ३० मुले, ४ मुली मैदानावर उपस्थित होत्या. आता विजय सरांनी मुलांचे दोन गट केले. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, कसे करायचे त्याचे प्रॅक्टिकल सुरुवातीला अर्धा तास करून दाखवले. आता प्रत्येकी १७ – १७  मुलांचे ज्यामध्ये प्रत्येकी दोन मुली होत्या, दोन गट झाले. सर्व मुलांनी आपले डबे आणले होते. सकाळी 11 ते १ पहिल्या गटाची बॅटिंग, नंतर एक ते दोन दुपारचे जेवण व दोन ते चार दुसऱ्या गटाची बॅटिंग असे ठरले. त्यापूर्वी सकाळी सर्व मुलांनी शाळेत आठ वाजता येऊन मैदानाची साफसफाई करायची असेही ठरले. साफसफाई करण्यासाठी मुलांनी चार मोठे झाडू ,कचरा गोळा करण्यासाठी सहा घमेले, तसेच मैदानावर पाणी मारण्यासाठी चार बादल्या आणायच्या असे ठरले. कोणी कोणते सामान आणायचे ते पक्के झाले. 
     दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी आठ ऐवजी सात वाजताच मुले यायला सुरुवात झाली. बघता बघता पाचवी ते सातवी  मुले आलीच.तसेच पहिली ते चौथी चाळीस मुले क्रिकेट पाहण्यासाठी आली. गावातील सात तरुण मुले क्रिकेट पाहण्यासाठी आली. क्रिकेटच्या टीम मध्ये 11 खेळाडू असतात, त्यामुळे बाकीच्या सहा  मुलांना खेळायला कसे मिळणार असे मुलांनी विचारले ? सर म्हणाले त्याची तुम्ही काळजी करू नका आणि अकरा वाजता पहिल्या टीमची बॅटिंग सुरू झाली. सरांना वाटले, मुले बॅटिंग खूप चांगली करतील पण एका तासातच सर्व मुले आउट झाली होती. आता उरलेले सहा जण खेळायला आले. त्यांनी बॅटिंग केली, पहिला टीमचा स्कोर १७० झाला होता. आता दुपारी एक ते दोन मुलांची जेवणासाठीची पंगत बसली. शाळेच्या मैदानाच्या एका बाजूला सर्व ३० मुले गोल रिंगण करून बसलेत. सरांनी सांगितले की प्रत्येक पाच मुलांच्या गटाने आपल्याबरोबर जे खायला आणले आहे ते इतर चार मुलांना द्यायचे म्हणजे प्रत्येकाला विविध अन्न खायला मिळेल, चाखायला मिळेल. मुलांचे जेवण  संपले. आता दुपार दोन वाजता आपली बॅटिंग केव्हा सुरू होते याची दुसऱ्या टीमला खूपच उत्सुकता होती. दुसऱ्या टीमची बॅटिंग सुरू झाली 35 ओव्हर देण्यात आले होते. दुसरी टीम खूपच जबरदस्त बॅटिंग करत होती. त्यांनी तीस ओव्हरमध्येच तीन आउट १७५ रन केले, दुसऱ्या टीमच्या मुलांनी मॅच जिंकली. पुढच्या वेळेला आपण प्रत्येकी चार टीम करून दोन - दोन मॅचेस खेळू असे विजय शिंदे सरांनी घोषित केले. त्यावेळी मात्र प्रत्येक टीम मध्ये अकरा मुले असतील असेही सांगितले.
       पुढील चार दिवसात शिंदे सर केरबा सुतार यांना भेटले. स्टंप कसे करायचे ते सांगितले आणि बारा स्टंप करून घेतले. सहा स्टंप मी शाळेसाठी घेतो व सहा स्टंप तुमच्याकडे असू द्या, दर महिन्याच्या जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये मी स्टंप करणारे आमच्याकडे सुतार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला स्टम्प मिळतील, त्यामुळे तुम्हाला स्टंपच्या ऑर्डर मिळायला सुरुवात होईल, असेही सांगितले. प्रत्येक स्टंपचे चारशे रुपये देण्याचे ठरले. बाजारात हे स्टंप पंधराशे रुपये मिळतात. त्यापेक्षा खूपच कमी किमतीत आपल्याला मिळणार आहेत, असे त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितले मुख्याध्यापक पैसे देण्यास तयार झाले. आता पुढच्या आठवड्यात कोणाकडे जायचे असे सरांनी मुलांना विचारले. मुलांना अगोदर काही कळले नाही, सरांनी विचाराले,तेली, माळी, शिंपी, कोण कोण आहेत ? तेली म्हटल्यावर दोन मुलांनी हात वरती केले. माळी म्हटल्यावर चार मुलांनी हात वरती केले. शिंपी म्हटल्यावर पाच मुलांनी हात वरती केले. सरांनी विचारले कोणाच्या घरी तेलाचा घाणा आहे ? एका मुलाने हात वरती केला. आता तेली यांच्या घरी जायचे ठरले. 
      पांडुरंग जाधव हे तेली होते. गावातील बरेचसे लोक आता पॅकेट मधील तेल वापरत होते. खरे तर घाण्यावर काढलेले तेल, हे पॅकेट मधील तेलापेक्षा अधिक पौष्टिक असते हे सरांना माहीत होते. याबद्दलची माहिती त्यांनी मुलांना सांगितली. आता पांडुरंग जाधव यांच्या तेलाच्या घाण्यावर आपली या आठवड्यात सहल असेल असेही सांगितले. गावातील गावकऱ्यांना, आता विजय शिंदे सरांच्या सहलीची माहिती त्यांच्या मुलांच्या कडून - मुलींच्या कडून कळाली होती. या सहलीच्या वेळेला गावातील सरपंच व दोन पंच उपस्थित होते. विजय शिंदे सरांची मुलांच्या बद्दल असलेली अस्मिता, त्यांची आत्मीयता, त्यांना खूपच आवडली. सरपंचांनी विजय शिंदे सरांच्या या सहल उपक्रमाचे खूपच कौतुक केले. सरपंचांनी असेही सांगितले की दर महिन्याला जी ग्रामसभा होत असते त्यामध्ये मी प्रत्येकाने पांडुरंग जाधव यांच्या घाण्यामधील काढलेले तेल वापरावे अशी विनंती करेन असे सांगितले. रविवारी ठरल्याप्रमाणे मुलांच्या चार टीम होऊन त्यामध्ये प्रत्येक टीमने पस्तीस-पस्तीस ओवरचा एक एक सामना खेळला. मुलांच्या बरोबर दोन दोन मुली सुद्धा खेळल्या. आता दर रविवारी क्रिकेटचे सामने व्हायला सुरुवात झाली. शाळेचा हा उपक्रम विजय शिंदे सर व मुख्याध्यापक शिंदे सर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या बरोबर जी मीटिंग झाली त्यामध्ये सर्व मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांना सांगितला. सर्व मुख्याध्यापकांची अडचण अशी होती की क्रिकेटचे स्टंप, बॅट व बॉल महाग असतात. विजय शिंदे सर म्हणाले, तुम्ही फक्त बॉल आणा, मी तुम्हाला अत्यंत कमी किमतीत स्टंप व बॅट मिळतील अशी सोय करून देतो. विजय शिंदे सरांनी  बॅट आणि स्टंपच्या  किमती सांगितल्या, त्यापेक्षा बाजारात यांच्या किमती खूपच महाग होत्या. सर्व मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांना ही कल्पना आवडली. त्याच मीटिंगमध्ये साधारण १००  स्टॅम्प व २० बॅटच्या ऑर्डर मिळाल्या. त्यासाठी आडवांस म्हणून साधारणपणे दहा हजार रुपये मिळाले. हे दहा हजार रुपये विजय शिंदे सरांनी व शंकर शिंदे सरांनी केरबा काळे या सुतार दादांना दिले. त्यांना तर खूपच आनंद झाला. महिन्याभरातच सर्व स्टम्प व बॅट पूर्ण झाले. हे सर्व स्टॅम्प व बॅट एका तीन चाकी टेम्पोमध्ये भरून पुढच्या वेळेला शिक्षण अधिकाऱ्यांच्या बरोबर जी मीटिंग होती त्यामध्ये नेण्याचे ठरले. त्यासाठी उरलेले पैसे प्रत्येक मुख्याध्यापकाने जाणीवपूर्वक आणावे असे विजय शिंदे सरांनी प्रत्येक मुख्याध्यापकाला अगोदर फोन करून कळवले होते. प्रत्येक मुख्याध्यापकाने याला चांगला प्रतिसाद दिला आणि खरोखरच सर्वांचे पैसे वेळेत आले. त्याच मीटिंगमध्ये अजून तीनशे स्टंप व साधारणपणे ५० बॅट याच्या ऑर्डर दुसऱ्या शाळांनी दिल्या. त्यासाठीचे आडवांस म्हणून पंचवीस हजार रुपये देण्यात आले. अशा रीतीने केरबा काळे या सुतार दादांचा सुताराचा उद्योग व्यवस्थित सुरू झाला. 
        आता पुढच्या आठवड्यात माळी यांच्या शेतात जायचे ठरले. विजय शिंदे सरांनी मुलांना अगोदरच बजावले होते की कोणतेही फुल तोडायचे नाही, ना नासधूस करायची. जे कोणी करेल त्याच्याकडून जबर दंड वसूल करण्यात येईल.  पुढच्या वेळी दिनकर भुजबळ यांच्या  फुलांच्या शेतात मुलांची सहल काढण्यात आली. त्यांच्या शेतात गुलाब, जाई, जुई आणि मोगरा यांची फुल शेती होती. फुले पाहून तर मुले खूपच आनंदी झाली. शेतातच मुलांनी विविध फुलांच्या विषयी माहिती समजून घेतली. फुलांची लागवड, त्यांच्या शेतीमध्ये काय काय करावे लागते, फुलांची तोडणी कसे करतात, फुलांच्या माध्यमातून विविध हार कसे केले जातात, याची माहिती दिनकर भुजबळ यांनी मुलांना समजावून दिली. ते समजावत असताना मुलांचे व्हिडिओ काढण्यात आले.  यानंतर मुलांच्या सहली शिंपी, कोष्टी, कुंभार, यांच्या घरी नेण्यात आल्या. आता पाचवी ते सातवीच्या मुलांच्या सहली झाल्या होत्या. पहिली ते चौथीची मुले म्हणाली, आमच्या सहली केव्हा नेणार असे आमचे आई-वडील विचारत आहेत. काही आई-वडिलांनी मुलांच्या बरोबर चिठ्ठ्या पाठविल्या. आपल्या सहलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा मुख्याध्यापक व विजय शिंदे सर यांना खूपच आनंद झाला. त्यांनी आता पहिली ते चौथी या मुलांच्या सहली विविध असे व्यवसाय करणारे, त्यांच्याकडे नेल्या. त्यांनी मुलांच्या सहलीचे काढलेले व्हिडिओ शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविले. दिवाळी जवळ आली होती. आता विजय शिंदे सरांना शाळेत येऊन चार महिने झाले होते. दिवाळीमध्ये आपल्या गावी जायचे नाही, असे सरांनी ठरविले होते. त्यांनी सरपंचांना आपला मनोदय सांगितला. सरपंचांना ते आवडले. आता सरपंचांनी वेगळी कल्पना मांडली. त्यांनी तातडीची ग्रामसभा बोलावली व ग्रामसभेमध्ये सर्व गावकऱ्यांना कल्पना मांडली की आता विजय शिंदे सर दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी मुक्काम करणार आहेत आणि दररोज ते मुलांना घेऊन प्रत्येक पाच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मुलांच्या कडून शेतीची कामे करून घेणार आहेत. गावकऱ्यांना ही कल्पना फारच आवडली. दिवाळीची भाऊबीज झाल्यानंतर या सहली सुरू करायच्या असे ठरले. आता शेतीमधील कामासाठी जी मजुरी होणार आहे त्याच्या निम्मी मजुरी प्रत्येक शेतकऱ्याने द्यावी असेही ठरले. ही जी सर्व मजुरी मिळेल ती शाळेतील मुलांसाठी लागणारे विविध क्रीडा साहित्य घेण्यासाठी वापरली जाईल व मुलांना शाळेच्या विविध उपक्रमात भाग घ्यावा लागतो जसे वक्तृत्व, स्पर्धा क्रीडा स्पर्धा, नाट्य स्पर्धा, त्यासाठी जो खर्च येतो तो या मजुरीच्या माध्यमातून खर्च केला जाईल असेही सांगितले. शेतकऱ्यांना ही कल्पना खूपच आवडली. दिवाळीची पंधरा दिवसाची सुट्टी मुलांना खूपच आनंद देऊन गेली. याचे व्हिडिओ मुख्याध्यापक व विजय शिंदे सरांनी शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवले. 
      आता जवळच्या गावातील गावकरी, पुढच्या वर्षी जूनमध्ये आमच्या मुलांना या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी जानेवारीपासूनच मुख्याध्यापकांच्याकडे चौकशी करण्यासाठी आलेत. मुख्याध्यापकांना आनंद झाला. त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे आपली बाजू मांडली आणि शाळेला दोन खोल्या व दोन अधिक शिक्षक द्यावे अशी विनंती केली. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी मान्य केली. आता जून नंतर दोन खोल्यांची असणारी शाळा आता चार खोल्यांची झाली होती. आता विजय शिंदे सरांना या गावी येऊन तीन वर्षे झाली होती. सुरुवातीला दोन खोल्यांची असणारी शाळा आता पहिली ते सातवी या प्रत्येक वर्गासाठी एक खोली याप्रमाणे सात खोल्यांची झाली होती, तसेच मुलांसाठी व मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृह बांधण्यात आले होते. 
गेले तीन वर्षात गावात काय काय सुधारणा झाल्या तर
ग्रामसभेने ठराव मंजूर केला 
सर्व लोखंड अवजारे लोहारांच्या कडून घेण्यात आली.
सर्व लाकडी साहित्य फक्त सुतार यांच्याकडून घेण्यात आले. 
घरात वापरले जाणारे तेल फक्त तेली लोकांच्याकडून घाण्यावर काढून घेण्यात आले. तसेच तेल काढल्यानंतर उरलेली पेंड जनावरांना वापरण्यासाठी देण्यात आली. 
गावात सर्व शिवले जाणारे कपडे गावातील शिंपी लोकांच्याकडूनच शिवावे असे ग्रामसभेने ठरविले. त्यासाठी शिंपी लोकांनी विशेष ट्रेनिंग घेतले. 
गावातील विविध उत्सवासाठी लागणारे फुले जसे की देवाला, जत्रेला आणि विविध कार्यक्रमासाठी लागणारे  हार तुरे गावातील माळी लोकांच्याकडून घेण्यात आले. 
आपल्या पायात वापरले जाणारे चप्पल फक्त चर्मकार लोकांनी करून द्यावे असे ग्रामसभेने ठरविले. 
गावातील देवळांची पूजा करण्यासाठी गुरव लोकांना नेमण्यात आले. ग्रामपंचायत तर्फे त्यांना महिन्याला विशिष्ट वेतन दिले. 
गावातील पैसा गावातच राहिल्यामुळे, गावातील लोकांची देवाण-घेवाण वाढली आणि त्यामुळे स्टेट बँकेने गावात शाळेजवळ शाखा सुरु केली.
एस टी शाळेपर्यंत आली.
आणि यावर्षी विजय शिंदे सरांची उत्कृष्ट शिक्षक म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे घोषणा करण्यात आली. ते केवळ शिक्षकच नाहीत तर ‘उद्योगी शिक्षक’ आहेत असे नमूद करण्यात आले. त्यांनी राबविलेले विविध उपक्रम, त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व शाळांमध्ये दाखविण्यात आले. त्यांनी गावातील विविध उद्योजक जसे की लोहार, सुतार, तेली, माळी यांना ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांच्या कडून कसे उद्योग देण्यात आले तेही सांगितले गेले.

 दिलीप पाटील पिंपरी पुणे – ९८२२०६९०१५ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...