बुधवार, ११ जून, २०२५

1962. सेवा

 माझ्या मित्राची बावीस वर्षांची मुलगी गेले अनेक महिने आजारी आहे.  मधे तर बरेच दिवस बेशुद्ध होती. 
ती फॅमिली अशी एकमेकांत गुंतलेली आहे ना, की तिच्या आजारपणाचं सावट सगळ्या कुटुंबावर आलं. सगळे जण असे खंगून गेले की त्यांना बघून जीव गलबलतो. 
तर, परवा त्या मुलीनं क्षीण आवाजात बाबाला सांगितलं, 
“मला जरा खाली बागेत नेऊन फिरवून आण.”
हाडांचा सापळा झालेली ती मुलगी तिला हाताळताना सुद्धा आपला जीव पिळवटायचा. स्पंजिंग करतानाही ती चारदा कण्हायची. 
त्यात दहाव्या मजल्यावर घर… कसं नेणार तिला? हे खरं की, त्यांच्या काॅलनीची बाग आणि एकुणच परीसर फार रमणीय आहे. 
पण तरी तिची विनंती मान्य करणं शक्य नव्हतं.
हे सांगताना तो आमच्या जवळ रडला. 
असेच दोन दिवस गेले… आणि शिप्राची आई, म्हणजे त्या मुलीची आजी नातीला बघायला आली. तिने ‘ओला’ केली होती आणि तो ड्रायव्हर शिकला सवरलेला सुसंस्कृत होता. 
चर्नीरोड वरून त्या आजीला इथपर्यंत आणताना त्यानं खूप गप्पा मारल्या. 
बोलण्या बोलण्यामधे त्याला मुलीच्या आजारपणाबद्दल कळलं. इमारतीशी पोहोचल्यावर सामान न्यायला कुणी खाली यावं म्हणून आजी फोन करत होती, तर हाच घाई घाई ने आजी ला अडवत म्हणाला,
“कशाला कुणाला बोलावता? मी येतो की सामान घेऊन…” असं म्हणत तो आजीसोबत दहाव्या मजल्यावर मित्राच्या घरी आला.
मित्र म्हणाला की त्याचं एकूण व्यक्तीमत्वच असं होतं की  त्याला बघून आपुलकी आपलेपणाच वाटावा. तो आला बसला…
जरा वेगळं कुणी घरात आलं, याचं प्रत्येकालाच जरा बरं वाटलं. चहा पाणी होताना मित्र नकळत बोलून गेला,
“परवापासून खाली बागेत नेण्याचा हट्ट करतेय… पण कसं नेणार? प्रकृती तोळामासा झालीय!”
चहाचा शेवटचा घोट घशाखाली उतरवत तो म्हणाला,
“मी नेऊन आणतो की…!” 
एक अवघडलेपण वातावरणात पसरलं. 
साॅफिस्टिकेटेड लोकांचा हा मोठा प्राॅब्लेम आहे, ते लगेच अवघडतात. 
पण वातावरण मोकळं करत तो म्हणाला, 
“अहो, माझी आज्जी एकशे तीन वर्षांची आहे. शरीर म्हणजे अवघा पंचवीस तीस किलोंचा मामला… पण बाकी तरतरीत. अजून दोन घास का होईना, पण तिला मटण खावसं वाटतं. बशीभरच चहा पिते, पण तो गरमच लागतो. गुरुवारी दत्ताच्या तसबिरीला हार चढवल्याशिवाय आडवी पडलेली असतानाही ती स्वस्थ बसत नाही आणि बसू देत नाही… 
“तसंच दर दोन दिवसांनी तिला बाहेर न्यावं लागतं. मी ते मुटकुळं अलगद उचलून बाबुलनाथच्या कठड्यावर जाऊन बसतो. मी तिला मांडीवर घेऊन बसतो, हे बघून कुणी हसतं कुणी कौतुकमिश्रित नजरेनं बघतं… 
“पण आम्हाला नाही फरक पडत. आम्ही अर्धा तास बसतो, गप्पा मारतो, खूप हसतो… कधी दंगलीत नाहक मारल्या गेलेल्या माझ्या बाबांची आठवण काढून हुंदके सुद्धा देतो…
“पण घरी येताना दोघंही निवांत असतो. दर दहा दिवसांनी डाॅक्टर आजीला बघायला घरी येतात. तेही सांगतात, ‘तुम्ही नियमित त्याना बाहेर नेता, म्हणून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या अजून वीस वर्षं जगल्या, तरी मला आश्चर्य वाटणार नाही!’”
हे सगळं ऐकल्यावर मित्रानं त्याला आत बेडरूममध्ये नेलं. तोळामासा झालेली ती तरूण मुलगी बघून त्याचाही जीव कळवळला. त्यानं आपली ओळख करून दिली. जरासं बोलून तो समजुतीच्या सुरात म्हणाला,
“तुला खाली बागेत जायचंय ना? मी तुला नेणार आहे. मी तुझा दादाच आहे… त्यामुळं मी तुला उचलून घेतलं, म्हणून संकोच करू नकोस आणि खाली गेल्यावर तू सांगशील तिथं आपण जाऊ…
“पण बसताना मी तुला मांडीवरच घेऊन बसेन… कारण पुन्हा घरी येताना तुला उचलणं सोपं जाईल आणि तुला त्रास कमी होईल!”
त्याचा स्वरच असा उबदार, निस्वार्थी, निर्मळ होता की ती तरूण मुलगी लगेच तयार झाली. 
त्यानं मित्राला आणि त्याच्या बायकोलाही सोबत यायला सांगितलं आणि शेवरीच्या कापसाची उशी अलगद उचलावी तशी तिला उचलली.
मित्र म्हणाला, “मी बाप असून सुद्धा त्याचा हळुवारपणा माझ्या हालचालीत आला नसता.” 
ते लिफ्टमधून बाहेर पडून लाॅबीतून बाहेर आले आणि ती अशक्त झालेली मुलगी लहान मुलीसारखी अत्यानंदानं हसायला लागली.
माझ्या मित्राला आपल्या मुलीला असं आनंदानं हसताना बघून नक्की काय वाटलं असेल, याची मला कल्पना आहे. हुंदका अडवणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे, हे त्याला जाणवलं असेल. 
आपण लोकांना उगीच घाबरतो… कारण परपुरूषाच्या कडेवर तिला बघूनही कुणी नाक मुरडलं नाही, कुणी टाँट मारले नाहीत.
(मालिकांमधे जे चोमडे आगाऊ शेजारी दाखवतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते खरं नाही. ते चांगलंही नाही.) 
सगळे त्या मुलीला भेटले. ‘लवकर बरी हो…’ अशा शुभेच्छा दिल्या. बागेला फेरी मारून तिनं दाखवलेल्या चाफ्याच्या झाडाखाली चौथर्‍यावर तो तिला मांडीवर घेऊन बसला. 
खरंच वातावरण खूप रमणीय होतं. तिला परत घरी आणलं, तेव्हा ती इतकी फ्रेश आणि तरतरीत दिसत होती की माझ्या मित्राला जरा भितीच वाटली. 
पण नाही ! हा प्रयोग एक-दोनदा केल्यावर तिच्या प्रकृतीत खूप सुधारणा दिसायला लागली आणि डाॅक्टर म्हणतायत की आता खूप होप्स आहेत!  
त्या ड्रायव्हरचं नाव मी मुद्दाम सांगणार नाही. कारण मग लगेच त्याच्या मागं जात-धर्म-पंथ-प्रांत चिकटेल आणि आता ज्या अवस्थेत आपण आहोत, त्यावर परिणाम होईल.

- चंद्रशेखर गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...