आई बाबा आमच्या लहानपणीच गेले होते. मी आणि माझा मोठा भाऊ दोघेच होतो. दादा स्वतः उपाशी राहीला, पण मला कधीही काही कमी पडू दिलं नाही. रात्रं दिवस कष्ट करून दादाने सर्व संभाळून घेतलं होत. स्वतःही शिकला आणि मला ही शिकवलं. नातेवाईक होते, पण फक्त नावापूरते, अधुन मधुन जगाच्या लाजे खातर भेटायला ही यायचे. पण मला आणि दादाला कधीच कोणाची गरज नाही लागली. दोघांचच पण छान होतं आमचं घर.
काही दिवसांनी आमच्या एका नातेवाईकानी दादासाठी एक स्थळ आणलं. दादा लग्नासाठी तयार नव्हता. त्याला भीती वाटायची लग्न झालं की, त्याचं माझ्याकडे दुर्लक्ष होईल याची. पण माझा माझ्या दादावर खूप विश्वास होता, काहीही झालं, तरी त्याचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार. मी दादाला खूप समजावलं, निदान माझ्या लग्नापर्यंत तरी मला वहिणीचं सुख घेऊ दे. तुझी होणारी बायको माझ्यावर आई सारखं प्रेम करेल. थोडे दिवस तरी मला आईच्या मायेखाली जगुदे. आणि तुझ्या हक्काचं माणूस घरात आल्यावर मलाही तुला सोडुन जाणं जड नाही जाणार आणि म्हणुनच जोवर तुझं लग्न नाही, होणार तोवर मीही लग्न नाही करणार.
दादाला माझं म्हणणं पटलं. तो लग्नाला तयार झाला. दादाचे लग्न झाले, वहिणी अगदी कोणालाही हवीशी वाटेल अशी होती. का माहीत नाही... पण मला तिचा चेहरा आई सारखाच वाटायचा. स्वभावाने तर फार प्रेमळ होती. खूप पटकन आमच्यात मिसळुन गेली. ती आल्यापासुन तिने कधी झाडू ही मारू दिला नाही मला. बोलायची "सासरी जाऊन हेच सर्व करायचे आहे. आता फक्त अभ्यास करा.
परीक्षेच्या दिवसात तर कधी-कधी जेवण ही चारायची ती मला. जोवर मी अभ्यास करायची, तोवर तीही जागी राहायची. खूप छान नातं होतं तिचं आणि माझं.
नातं नणंद- भावजयचं, नातं माय-लेकीचं, नातं बहिणी- बहीणींचं आणि नातं मैत्रिणींच. आजू-बाजूच्या लोकांनी खूपदा आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला पण आमच्या नात्यात काहीही फरक पडला नाही. उलट दिवसें-दिवस आमचं नातं आणखीनच घट्ट होत गेलं. खूप प्रेम दिलं तीने मला. एवढं प्रेम तर माझ्या आईनेही केलं नसतं माझ्यावर. खरंच आई वडीलांचेच आशिर्वाद असतील तेव्हा इतकी छान भावजय मिळाली मला. कीतीही कामे पडली, तरी नेहमी हसत असायची ती. तीला कधी थकवा नाही, राग नाही, द्वेष नाही. तिच्याकडे बघुन मलाही वाटायचे, मी ही माझं घर असंच संभाळॆन.
आता मला दादाला सोडुन जायची जराही भीती वाटत नव्हती. माझे b.com पुर्ण झाले. मलाही स्थळं येऊ लागली. माझ्या लग्नाचा विषय जरी निघाला, तरी ती खूप रडायची. माझ्यापासून दूर जाणं तिला आता असह्य होऊ लागलं होतं. तीला खूप काळजी वाटायची. बीन आई-बापाची पोर... कसं घर मिळॆल, माणसं कशी असतील. स्थळा बदद्ल जराही शंका आली की सरळ नाही म्हणून सांगायची. मी तीला सतवायला दादाला मुद्दाम बोलायचे दादा ही काही माझे लग्न होऊ देणार नाही.
पुढे वहिणीला दिवस गेले, तेव्हाही नऊ महीने पूर्ण झाल्यावरच माहेरी गेली आणि सव्वा महिना झाला की लगेच परत आली ही. आमच्या दोघांच्या काळजीने माहेरी एक रात्र काढनंही तीला जड जायचं. कधीकधी मलाच प्रश्न पडायचा कूठुन आणते ही एवढा चांगुलपणा. का करते ती इतकं आमच्यासाठी. तिच्या स्वतःच्या मूला पेक्षाही तिने मला जास्त महत्व दिले. बाळ रडत असेल, आणि मी आवाज दिला, तर माझ्याकडे आधी धावत यायची. हातातली सर्व कामे टाकून. पण हे किती दिवस चालणार स्वतःसाठी कधी जगणार ती, मी इथे असे पर्यंत तर ते शक्य नव्हते. शेवटी मीच लग्न करून इथुन जाण्याचा निर्णय घेतला.
त्याच दरम्यान एक स्थळ आले. मी माझा होकार सांगितला. वहीणी तेव्हा ही बोलली वन्सं... आणखी वेळ घ्या याहून चांगलं स्थळ बघू, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिली. दादा वहिणी लग्नाला तयार झाले. माझं लग्न खूप थाटात केलं दोघांनी. ऎन वेळी ठरलेल्या लग्नामुळे पैश्यांची जुळवा जुळव करणं कठीण होतं, तरीही ती डगमगली नाही. तिने तिच्या आईने तीला लग्नात घातलेले दागीने मोडुुन मला दागीने बनवले. एखादी आई करेल ती सर्व कर्तव्य तीने आनंदाने पार पाडली. लग्न ठरल्या पासुन चोरुन चोरुन एकटीच रडायची. दादाला आणि मला वाईट वाटेल म्हणून कधी मोकळे पणाने रडली ही नाही.
लग्न झालं. माझ्या घरातला माझा पहीलाच दिवस. लग्न घर असल्याने घरात खूप माणसे होती. तरीही मला दादा वहीणीची खूप आठवण येत होती. मला ठाऊक आहे, दादा वहीणीला ही माझी खूप आठवण येत असणार. वहीणी तर अजुन रडत बसली असेल. या सगळ्याचा विचार आला की मला ही रडू यायचे. माझ्या घरात सासूबाई सासरे आणि दोघे दिर आणि आम्ही दोघे एवढं कूटुंब होतं घरात मीच मोठी होते, माझे हे एका सॉफ्टवेअर कंपनी मधे चांगल्या पोस्ट वर होते. सासू बाई थोड्या जुन्या विचारांच्या होत्या, पण मला त्यांच्या मर्जीत रहाणं फार काही जड गेलं नाही.
घरात मीच मोठी असल्याने घराची सगळी जबाबदारी सासूबाईंनी माझ्यावर टाकली. काम खूप असायचं, पण कधी कंटाला आला की, वहीणीला आठवायचे की पुन्हा कामाला उत्साह यायचा.
लग्नाच्या पहिल्या वर्षातले सगळे सण रीती भाती रीतसर केले वहीणीने माझे. अगदी आम्ही दोघे गेल्यावर पाय धुऊण पदराने पुसे पर्यंत सर्व काही करायची ती. माझ्या सासरच्यांनाही खूप हेवा वाटायचा तिचा. लग्नाच्या तिस-या महिण्यातच मला दिवस गेले. माझं ओटी भरणं ही खूप थाटात केलं तिने. अठरा दुर्ड्या भरुन पदार्थ आणि फळे आणली होती तीने. ओटी भरण झालं, की मला घेऊन गेली. माझं बाळंतपणही तिनेच केलं. दोन महिणे खाटे वरुन खाली उतरु दिले नाही तिने मला. बाळाची अंघोळ मला शेक-माक खूप आवडीने करायची. कधी कधी वाटायचं तिला घट्ट मिठी मारून सांगावं, ती आल्यापासून मला आई नसल्याची कधीही जाणीव झाली नाही. पण हिंमतच व्हायची नाही.
पुढे माझ्या बाळाचे बारसे, पहिला वाढदिवस सारं काही तिने इतक्याच उत्साहाने केलं. माझ्या मुलालाही ती फार आवडायची तो तीला मामी आई बोलायचा. तीही त्याला आई सारखच प्रेम करायची.
मी इकडे माझ्या संसारात छान रमलेली. सर्व छान चालू असताना अचानक माझ्या यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात ते गेले. माझ्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आता फक्त मुलासाठी जगायचं, म्हणून जगत होते. त्यानंतर दादा-वहिणी खूपदा मला घेऊन जायला आले. पण मी सासरी रहाण्याचा निर्णय घेतला. माझ्या आणि माझ्या नव-याचा सहवास फार तर सहा वर्षांचा होता, पण सासूबाईंनी त्यांना तीस वर्ष संभाळल होतं. त्यांच्या दुःखाची मला जाण होती. म्हणूनच मला माझ्या मूलाला त्यांच्यापासून दूर होऊ द्यायचं नव्हतं.
पुढे दोन्ही दिरांची ही लग्नं झाली. त्यांना मुले झाली. सासूबाईंचं जरा दूर्लक्षच होऊ लागलं. आमच्याकडे नवीन आलेल्या जावा तर मला कामवाली पॆक्षा जास्त काही समजायच्या नाहीत. तरीही मी निमूटपणे दिवस काढत होते, पण पुढे पुढे तर आमचे खाण्यापिण्याचेही हाल होऊ लागले. माझ्या सास-यांचा खूप जिव तूटायचा आमच्यासाठी, पण त्यांचे ही हाल काही वेगळे नव्हते आमच्यापेक्षा.
एक दिवस त्यांनी न राहून दादा वहिणीला सर्व हकीकत सांगितली. दादा वहिणी लगेच येऊन आम्हा दोघांना घेऊन गेले. वहिणीने मला खूप धीर दिला. गेल्या काही दिवसांत माझं हसू हरवलं होतं, वहिणीने मला खूप हसवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यात काहीही बदल होत नव्हता. घराच्या एखाद्या कोप-यात मी शांत बसून असायचे. मुलाचं ही सर्व वहिणीच करायची.
एक दिवस अचानक सगळं बदललं. वहिणी माझ्या सोबत खराब वागू लागली, सतत तन तन करू लागली, कामे जास्त पडली की आदळ-आपट करू लागली, आमचं खाणं-पीणं काढू लागली. दादाच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने वहिणीला समजावण्याचा प्रयत्नही केला. पण तिच्यात काहीही फरक नाही पडला. दिवसें-दिवस ती आणखीनच खराब वागू लागली.
हळु हळु माझ्यामुळे त्या दोघांच्यात भांडणे होऊ लागली. एक दिवस तर दादाने वहिणीवर हात ही उचलला. तेव्हा ती स्पष्ट बोलली. किती दिवस दुनियादारी करायची आपल्याला आपल आयुष्य नाही का? घर चालवते अनाथाश्रम नाही. या घरात एक तर वन्स रहातील, नाहीतर मी. दादाने तिला "तू निघ" असे स्पष्ट सांगितले. वहीणीचे मला हे ही रुप पहायला मिळेल असे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते.
शेवटी विचार केला, माझे घर तर तूटलेच आहे. दादाचे नको तूटायला म्हणून मीच तिथुन निघण्याचा निर्णय घेतला. मी निघताना दादा खूप रडत होता. त्याने मला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. पण एवढं सगळं झाल्यावर तिथे थांबण मला अशक्य होतं.
घर सोडून गेल्यावर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. दादाने मला नकळत माझ्या पर्स मधे गुपचूप पन्नास हजार ठेवले होते, तेच पैसे मला नवीन घराच्या डीपॉझिटला कामास आले. कसं बसं घरातलं सामान भरलं. मैत्रिणीने ही खूप मदत केली. थोडा त्रास झाला, पण आता स्वतःच्या हक्काच्या घरात होते याचं समाधान होतं. आता कोणीही मला इथुन निघून जायला सांगणार नाही.
दादा अधून-मधून मला भेटायला यायचा. घरात सामान सूमान भरुन द्यायचा. दादाच्याच ओळखीने मला एका प्राइव्हेट बँकेत नोकरी मिळाली. माझं आणि माझ्या मुलाचं भागून सेव्हिंग ही व्हायची. आता मला कोणाच्याही आधाराची गरज नव्हती. मी ठरवलं होतं, आता मी कधीही त्या नाटकी वहिणीच्या दारात पाऊलही ठेवणार नाही.
एक दिवस अचानक दादा-वहीणी माझ्या घरी आले. तिला समोर बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी तिच्याकडे पाहिले ही नाही. तितक्यात माझा मुलगा बाहेरुन आला त्याने तिला बघितल्या बघितल्या तिला मामी आई म्हणून घट्ट मिठी मारली. मी तसाच त्याला मागे खेचला. त्यावर ती म्हणाली वन्स लहाण आहे तो. माझं आधीच डोक फिरलं होतं. मी तिला ताड ताड बोलू लागले. त्या दिवशी घरातून हाकलताना नाही कळालं का लहान आहे तो. तुझी नाटक बंद कर आता मी तुला चांगलच ओळखलं आहे. तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मी तुला माझ्या आईच्या जागी ठेवलं, आणि तू कैकईलाही लाजवशील अशी वागलीस.
ती शांतपणे सगळं ऐकुन घेत होती. दादाने एक दोनदा मधे बोलण्याचा प्रयत्नही केला, पण तिने त्याला अडवलं. मी बोलतच होते, शेवटी रक्ताची नातीच खरी असतात. त्यादिवशी घर सोडताना दादाने माझ्या पर्स मधे पैसे ठेवले नसते, तर काय केल असतं मी? कुठे गेली असते? तेव्हा दादा म्हणाला, "कसले पैसे? कोणी ठेवले? मी नाही ठेवले."
मी आश्चर्याने वहिणीकडे पाहीले. ती खाली मान घालून रडत होती. ती दादाला म्हणाली, ते कागदपत्र द्या वन्सं कडे आणि चला इथून अजून काही वेळ थांबले तर माझा जीव जाईल. माझ्या लक्षात आलं, ते पैसे तिनेच माझ्या पर्स मधे ठेवले होते. मला आणखीनच राग आला. मी तिला विचारले "म्हणजे ते पैसे तु ठेवले होतेस का, कशासाठी?" मला तुझ्या उपकाराची जराही गरज नाही. मी तुझे पैसे व्याजा सकट तुला परत करेन.
दादा भडकला, आणि म्हणाला, काय काय परत करशील हिचे? अगं, फक्त तिचं दुध पाजलं नाही तुला तिने. नाहीतर एखादी आई करेल, ते सर्व केलं तिने तुझ्यासाठी. ती जे काही वागली ते फक्त तुझ्यासाठी. तू स्वतःच्या पायावर उभी रहावीस म्हणून, तूझ्यातला स्वाभिमान जागावा म्हणून, आपली पिढी एकमेकांना समजुन घेणारी होती, या पुढची पिढी अशी नसेल कदाचित. तिच्या येणा-या सूनेने तुला अश्रिता सारखी वागणूक दिलेली तिला सहन नाही होणार म्हणून. आणलेले कागदपत्र त्याने माझ्या हातात दिले आणि म्हणाला हे घे !
हे काय आहे माहीत आहे का?आमच्या रहात्या घराची कागदपत्रं. हिने हट्ट करून घर तुझ्या नावावर करायला सांगितले. मी तुझ्या रक्ताचा भाऊ आहे ना? मला ही प्रश्न पडला घर तुझ्या नावावर करताना की, आमचं काय? पण ही काय म्हणाली माहीत आहे? तुमचं मन म्हणजे माझं घर. मला विश्वास आहे, तुम्ही मला फार वेळ भाड्याच्या घरात नाही राहू देणार. आपण दोघेही मेहनत करू आणि दुसरं घर घेऊ, पण वन्संना भाड्याच्या घरात नका राहू देऊ, त्या एकटया काय काय करतील.
हे सर्व ऎकल्यावर मला तिच्याशी नजर मिळवण्याचीही लाज वाटत होती. मी सरळ जाऊन तिचे पाय धरले, आणि तिची माफी मागितली. तिने मला उठवलं, आणि म्हणाली हे काय करताय वन्स... आणि तिने मला तिच्या मिठीत घेतले. इतके दिवस मी माझ्या मनात ठेवलेली गोष्ट आज अखेर तिला बोलले. वहीणी खरं सांगू? तू घरात आल्यापासून मला कधीही आई नसल्याची जाणीव झाली नाही गं. वहीणी नाही आईच आहेस तु माझी. या जन्मी नाही झालीस, पण इथून पुढच्या प्रत्येक जन्मी मला तुझ्याच पोटी जन्माला यायचं आहे.
ऋणानुबंध तुझ्या वात्सल्याचे विसरु कसे मी सांग मला.
सदैव होतीस माझ्या सोबत याची न्हवती जान मला
चूक माझी सुधारण्यासाठी हवी आहे आता साथ तुझी
देशील ना ग सांग मला तू नवा जन्म हा तुझ्या ऊरी......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा