सोमवार, २३ जून, २०२५

2009. बाळ तुझं पण आहे ना !

"अनु उगी राह ना राजा.  मी घेतले ना तुला.  काय होतंय तुला ! आज का रडतोस सारखा."
नुकतीच ऑफिस मधून आलेल्या सायलीने हात पाय धुऊन तिच्या आठ महिन्यांच्या अनयला  जवळ घेतलं होतं.  त्याचं काय  बिनसलं होतं कुणास ठाऊक पण तो अजिबात गप्प रहत नव्हता.  सायलीला ऑफिसमध्ये पंधरा दिवसांपूर्वीच प्रमोशन मिळालं होतं त्यामुळे कामाचं खूपच प्रेशर होतं.  सकाळी साडेआठला ऑफिसला निघेपर्यंत ती अनय भोवती रेंगाळत असायची.  संध्याकाळी तिला कधी साडेसहा सात व्हायचेच.  आल्यावर पण ती अनयच्या मागे असायची.  बिचारी निवांतपणे चहा पण घ्यायची नाही.  
सायली आणि समीरचा सहा वर्षांपूर्वीच
प्रेमविवाह झाला होता.  खरंतर लग्नानंतर एक वर्ष सायली समीरच्या एकत्र कुटुंबात राहिली होती.  दोघांच्या ऑफिसच्या दृष्टीने त्यांना तिथून ये जा करणं खूपच त्रासदायक होत होतं म्हणून समीरने मुलुंडला एक टू बीएचके फ्लॅट घेतला होता.  दोघांनाही तिथून ऑफिसला जाणे सोयीस्कर होतं.  सुरुवातीला ते दोघेच मुलुंडला शिफ्ट झाले.  अधून मधून समीरचे आई-बाबा, दादा वहिनी, ताई असे येत जात होते.  त्याचप्रमाणे सायलीची पण माहेरची मंडळी अधून मधून येत होती. सगळ्यांचे परस्परांशी खूपच चांगले संबंध होते.  समीर पण स्वभावाने खूपच चांगला होता सर्वांशी मिळून मिसळून वागणारा. सायली तिच्या नावाप्रमाणे सगळ्यांशी खूप मृदू वागायची.  ती कधीच समोरच्याला वाईट वाटेल असं काही बोलली नाही.  इतकंच काय ती समीरला पण खूप सांभाळून घ्यायची.  समीर स्वभावाने जरी चांगला असला तरी त्याचा लहरी खटला होता.  कधी तो सायलीला घरकामात मदत करत असे तर कधी नुसताच बसून राही.  खासकरून सायलीला जेव्हा उशीर झालेला असेल तेव्हा सायलीला वाटायचं की त्याने आपल्याला थोडी मदत करावी पण ती स्वतःहून कधीच त्याला काही सांगायची नाही आणि हा  पठ्ठ्या सांगितल्याशिवाय कधी काही करायचा नाही.
एकंदरीत सायली आणि समीरच्या संसाराची गाडी सुरळीतपणे चालू होती.  लग्नाला तीन वर्षे झाल्यावर सायलीला बाळाची चाहूल लागली. दोन्ही घरी हे कळताच आनंदाला उधाण आलं.  सायलीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना होऊन गेलं होतं. समीरच्या घरी पुष्पाताई नावाच्या त्यांच्याच गावच्या एक विनापाश बाई राहायला होत्या.  समीरला, त्याच्या ताई आणि दादाला लहानपणापासून त्यांनीच सांभाळले होते.  समीरच्या घरी त्यांना अगदी घरच्यासारखी वागणूक मिळत असायची.  सायलीची गोड बातमी कळल्यावर समीरच्या आईने पुष्पाताईंना समीरच्या नवीन घरी पाठवलं.  त्यांना अगदी निक्षून सांगितलं की सायलीची खूप काळजी घ्यायची.  अधून मधून त्या स्वतः पण यायच्या.
   यथावकाश बाळाचा जन्म झाला आणि त्याचं नाव अनय ठेवलं.  सायलीने सुरुवातीला सहा महिन्याची बाळंतपणाची रजा वापरली त्यानंतर तिने स्वतःची रजा वापरत अजून एक महिना अनयच्या निगराणीत काढले.  नंतर मात्र सायलीला ऑफिसला जावंच लागलं. दिवसभर पुष्पाताई अनयला खूप मायेने सांभाळत असत.  परंतु सायली आल्यावर मात्र अनय सायलीकडेच राहायचा.  आठ महिन्याच्या बाळाला आईचा स्पर्श, आवाज ओळखू येतो. अनय खेळत असताना सायली आणि समीर दोघं मिळून त्याला खेळवायचे.  पण तो रडायला लागला की समीर म्हणायचा,
"सायली तूच त्याला गप्प कर बाई तुझ्याकडेच तो शांत होतो."
सुरुवातीला सायलीला पण ते कौतुकाचं वाटायचं.  नंतर तिला सगळं सांभाळताना खूप तारेवरची कसरत करायला लागत होती.  अशातच पंधरा दिवसापूर्वी तीला प्रमोशन मिळालं आणि कामाचा भार खूप वाढला.  सायली घरात आली की जेमतेम कशीबशी चहा घ्यायची आणि अनयच्या मागेच असायची.  पुष्पाताई घरातील इतर काम सांभाळायच्या.  त्यामुळे सायलीचा भार थोडा तरी हलका होई. संध्याकाळी कधी त्या देवळात  जायच्या, कधी पाय मोकळे करायला जायच्या. कधी कधी एखाद्या दिवशी अनय खूपच त्रास द्यायचा, रडायचा.  अशावेळी सायलीला वाटायचं की समीरने थोडा वेळ त्याला घ्यावं, शांत करावं म्हणजे आपल्याला थोडा मोकळेपणा मिळेल.  पण अनय किती रडत असला तरी समीर मख्खपणे हॉलमध्ये टीव्ही बघत बसायचा.  त्याला वाटायचं लहान मुल आहे, आई आहे म्हणून रडतोय.  एक-दोन वेळा पुष्पाताई समीरला मावशीच्या अधिकारवाणीने म्हणाल्या,
"अरे समीर जरा अनयला घे त्याला जरा बाहेर एक राउंड मारून आण.  बघ तो कधीचा रडतोय. सायलीने अजून चहा पण नाही घेतला."
"मावशी अनय कधी कधी रडतो बाकी तसा तो शांतच असतो. एखाद्या दिवशी रडला म्हणून त्याच्या आईला काही त्रास होणार आहे का."
कितीतरी वेळा सायली आणि समीर जेवत असताना अनय आईकडे यायचा तेव्हा त्याचा डायपर भरलेला आढळलं तर तीच बदलायची समीर काहीही मदत करायचा नाही.  सायलीचे जेवण थंडगार होऊन जायचं.  बरं असंही नव्हतं की समीर लवकर जेवून अनयला घेईल. तो आपला जेवायला त्याला हवा तेवढा वेळ घ्यायचा. मध्येच टीव्ही बघत, मध्येच मोबाईल बघत अगदी ३०/३५ मिनिटे कुठेच गेली नाहीत. पुष्पाताईंना हे सर्व पाहून समीरचा खूप राग यायचा.  त्यांना वाटायचं ह्याला आपण इतकं प्रेमाने सांभाळलं तरी पण स्वतःच्या बाळा विषयी त्याच्या मनात अजून तितकं प्रेम निर्माण झालं नाही.  एक दिवस असंच झालं सायलीला यायला रात्रीचे आठ वाजले.  तिला लंच टाईम मध्ये डबा खायला सुद्धा वेळ मिळाला नाही त्यामुळे घरी आल्यावर तिला खूपच भूक लागली होती.  तिचा चेहरा खूपच मलुल झाला होता.  तरी पण आल्याबरोबर तिने अनयला घेतलं.  उशीर झाल्याबद्दल त्याला बोबड्या स्वरात सॉरी बोलली.  पुष्पा ताईंनी सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्या तीला म्हणाल्या,
"सायली तू आज दिवसभर काही खाल्लं नाहीस का चेहरा बघ कसा झालाय.  तू हात पाय धुऊन घे मी तुला गरम गरम जेवायला वाढते. समीरला पण बोलावते." अनय सायलीला सोडतच नव्हता.  समीर सायलीला म्हणाला,
"अनय तुला सोडत नाही तर मी पटकन जेवून घेतो आणि मग अनयला खेळवतो.  नंतर तू शांतचित्ताने जेव." सायलीच्या मनात आले समीरला जेवायला तीस-पस्तीस मिनिटे तरी लागणार त्यापेक्षा मी पटकन पाच दहा मिनिटात जेवून घेतलं असतं.  तिच्या मनात सुद्धा आलं की समीरला सांगावं की मी आधी जेवते आज तू नंतर जेव परंतु तिच्या स्वभावानुसार ती काहीच बोलली नाही आणि निमुटपणे अनयला घेऊन बेडरूम मध्ये गेली.  आज मात्र पुष्पाताईंना अगदी रहावलं नाही. त्या समीरला म्हणाल्या,
"समीर तू सायलीचा चेहरा पाहिलास का किती मलुल झाला होता.  आज तिला डबा खायला सुद्धा वेळ मिळाला नाही.  मी तिच्या बॅगेतून आत्ताच भरलेला डबा काढला."
"हो का.  सायली ना एकदम वेडी आहे.  कामामध्ये स्वतःला एवढा गुंतवून घेते. डबा पटकन खाऊन घ्यायला हवा होता ना तिने."
"हो पण तिने नाही खाल्ला ना.  समीर बाळ व्हायच्या आधी तुम्ही दोघांनी मिळून कितीतरी स्वप्नरंजन केलं असेल नाही का.  सगळेच आई-बाबा तसंच करतात.  मूल जन्माला यायच्या आधी आपल्या बायकोला फुलासारखं जपतात. तिला सांगतात की आपण दोघं मिळून बाळाला सांभाळायचं.  रात्रभर तू एकटीने जागं राहण्याची गरज नाही.  मध्ये मी पण उठत जाईन. बाळाचं डायपर बदलणं असं सगळं मी आवडीने करेन.  बाळ रडायला लागल्यावर त्याला शांत करायची जबाबदारी माझी सुद्धा असणारच. आपला नवरा असा बोलतो तेव्हा त्या बाईला खरंच वाटतं की आपण आई झाल्यावर दोघं मिळून बाळाची जबाबदारी वाटून घेऊ.  जसं बाळ खेळत असतं तेव्हा दोघं मिळून बाळाशी खेळतो  आणि जेव्हा बाळ रडतं तेव्हा त्याच्या बाबांनी सुद्धा त्याला प्रेमाने सांभाळायला हवं.  पण प्रत्यक्षात होतं काय एकदा बाळ झाल्यावर नवरे आपले नवऱ्यासारखे जगायला मोकळे होतात आणि स्त्रिया मात्र सतत आईपणाची जबाबदारी सांभाळत बसतात.  हो समीर, पण सगळेच नवरे असे नसतात. काही काही नवरे तर बाळाची काळजी आई पेक्षा पण जास्त घेतात.  त्याला त्यांच्या पत्नीची खूप काळजी वाटते.  ती ऑफिस वरून आल्यावर तिला चहा करून देतात.  तिला काही त्रास होत असेल तर आस्थेने विचारपूस करतात.  स्त्रीला यात सुद्धा खूप समाधान असतं समीर."
"अग पण मावशी हे सगळं तू मला का सांगतेस.  मी पण अनयला खेळवतो ना कधी कधी."
"अरे कधी कधी तो खेळत असताना खेळवणं ही वेगळी गोष्ट आहे.  रडत असताना त्याला सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे.  दिवसभर तो माझ्याकडे खूप छान राहतो पण तुम्ही दोघं आलात की त्याला आई-बाबाच हवे असतात.  दिवसभर तो तुम्हाला पाहत नाही त्यामुळे त्याला तुम्हाला सोडायचं नसतं.  अशावेळी तू सायलीला खूप सांभाळून घ्यायला हवं.  ती पण तुझ्या एवढीच दमते याचा विचार करायला हवा.  आज खरं तर तू स्वतःहून तिला म्हणायला हवं होतं की सायली तू आधी जेव मी नंतर बसतो.  बाळ एकट्या सायलीचा आहे का रे.  बाळ तुझं पण आहे ना. बाळाची तुझी पण तितकीच जबाबदारी आहे समीर."
"मावशी खरंच ग.  सायली कधीच स्वतःहून काही सांगत नाही अर्थात तो तिचा स्वभावच नाही.  पण काही गोष्टी मला न सांगता कळायला हव्यात.  तिने सांगण्याची मी वाट का बघावी.  आज तू बोललीस म्हणून मला याची जाणीव तरी झाली."
"समीर तुझ्यावर माझा आईसारखाच हक्क आहे म्हणून मी तुला हे सांगू शकते.  आता तरी जरा मोबाईल आणि टीव्ही न बघता जेवण पटकन संपव आणि सायलीला जेवायला पाठव."
"हो मावशी आता लगेचच संपवतो."
आज पुष्पा ताईंनी समजवल्यामुळे समीरच्या डोक्यात प्रकाश पडला.  पण अजूनही काही ठिकाणी बाळ म्हणजे स्त्रीची एकटीची जबाबदारी अशा रीतीने बाळाचे बाबा वागतात.  अर्थात सगळीकडेच हे असं नसतं बरं का.  काही ठिकाणी बाळ आणि बाबांमध्ये एक अतूट बंधन बघायला मिळतं जिथे बाळाला सगळीकडे बाबाच लागतो.  पूर्वीच्या काळी ठीक होतं की स्त्रिया नोकरी करत नसत म्हणून त्या घरी राहून बाळाची जबाबदारी व्यवस्थितपणे निभवायच्या आणि पुरुष अर्थार्जन आणि बाहेरची इतर कामे करायचा.  आता काळ बदलला आहे. दोघेही नोकरी करणारे, घराबाहेर असतात.  अशावेळी दोघांनी समजूतदारपणा दाखवून एकमेकांना साथ दिली तर बाळाची निकोप वाढ आणि विकास नक्कीच होईल, नाही का !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...