मंगळवार, १७ जून, २०२५

1983. मनोधैर्य

    रस्त्याच्या टोकाला एक छानसा टुमदार बंगला, सभोवती वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं, फुलझाड नीनाने बंगला सजवला होताच निसर्गरम्य सदा झाडा-झुडुपांनी बहरलेला. त्यांचं लहानसं कुटुंब नवरा शेखर,  मुलगा, सून अन दोन नातवंड. सुख भरभरून नांदत होतं. अन् अचानक दृष्ट लागल्या सारखी नीना देवाघरी निघून गेली. नीना गेल्यापासून शेखरला अजिबात करमत नव्हतं. हल्लीच तो व्यवसायाची जबाबदारी मुलावर सोपवून मुक्त झाला होता.
नीना असताना संध्याकाळी फिरायला जाणं, देवळात जाणं तरी होत होतं. आताशा ते सुद्धा करावसं वाटत नव्हतं. हळूहळू तब्येत ढासळू लागली. 
डॉक्टर कडील फेऱ्या वाढू लागल्या...
आजाराचे निदान झाले अन् संसर्गजन्य आजार असल्याचे कळले. मुलाने बंगल्यातील खालची बेडरूम बाबासाठी तयार करून दिली व स्वतः वरील आई-वडिलांच्या खोलीत शिफ्ट झाला. आताशा सुनबाई खुश होत्या, कित्येक दिवसांचे तिचे स्वप्न पूर्ण झाले.
बाबांच्या मदतीसाठी गावावरून गंगारामला आणले, गंगाराम त्यांचे औषध पथ्य पाणी सर्व पाहू लागला. हळूहळू नातवंडांचे येणं कणी झालं. इतरांना आपल्या आजाराचा त्रास होऊ नये म्हणून शेखर मागील बागेतच फेऱ्या मारी. आज शेखरला खूप कंटाळा आला म्हणून तो सहज पुढील अंगणात आला, अन् त्याच्या कानावर सुनेचे व मुलाचे बोलणे पडले.
सून आपल्या नवऱ्याला सांगत होती, "बाबा अधून मधून मुलाबरोबर गप्पा मारतात हल्ली, उद्या आपल्या मुलांना आजार झाला तर ? आपण त्यांना एका चांगल्या वृद्धाश्रमात ठेवू या."
मुलगा म्हणाला," मी उद्या बोलतो बाबांशी."
दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर लवकर उठून आवरून मुलाची वाट पहात बसला. अपेक्षेप्रमाणे मुलगा आलाच.
शेखरने त्याला विचारले, "अरे, आज सकाळीच आलास काही विशेष. पण बर झालं तू आलास मला बोलायचेच होते तुझ्याशी."
मुलगा म्हणाला, "बाबा, मलाही जर बोलायचे होते तुमच्याशी. तुम्ही सांगा आधी तुम्हाला काय सांगावयाचे ते, नंतर मी बोलेन."
शेखरने दोन मिनिटे श्वास घेतला व शांतपणे बोलू लागला.
"हल्ली माझी तब्येत जास्त खराब झालीय, त्याचा इतराना त्रास होऊ शकतो, म्हणून मी निर्णय घेतला आहे की मी यापुढे वृद्धाश्रमात राहायचे, म्हणजे माझ्या सारखेच जे आजारी आहेत, असहाय्य आहेत त्यांच्या सोबत रहायचं."
शेखर पुन्हा थांबला व मुलाच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेऊ लागला. मुलाच्या मनावरचे, डोक्यावरचे केवढे मोठे संकट टळले होते. त्याचा चेहरा प्रसन्न झाला. म्हणजे आता आपण बाबांना काही सांगण्याचा प्रश्नच नाही. बाबांनीच निर्णय घेतला आहे, तरी उसने अवसान आणून तो म्हणाला, "हे काय बाबा, कशाला अस म्हणता ?"
शेखर म्हणला, "अरे, मलाही हा निर्णय घेणं फार जड जातंय, परंतु मी ठरविले आहे, तू आता मी सुरू केलेला आपला व्यवसाय सांभाळू शकतोस. माझ्या आधाराची व मदतीची तुला आता गरज नाही."
मुलगा म्हणाला, "हो बाबा आता तुम्ही व्यवसाया बाबतीत निश्चित रहा, मला आपण सर्व गोष्टी छान शिकविल्या आहेत."
शेखर म्हणाला,"मी व्यवसाय व ऑफिस तुझ्या नावावर केलेच आहे, बंगला तेवढा माझ्या नावावर आहे. मी आता माझ्या या बंगल्यातच वृद्धाश्रम सुरू करीत आहे, म्हणजे मला माझ्यासारखेच असहाय्य व वृद्ध सोबतीला मिळतील, एकटे वाटणार नाही व त्यांनाही आधार मिळेल."
एवढे बोलेपर्यंत शेखरला दम लागला. तो पुढे म्हणाला, "तुम्हाला आता अश्या मोठया बंगल्यात रहायची सवय झाली आहे. त्यामुळे आता तू लवकरच तूझ्या बायको व मुलांसाठी एखादी चांगली जागा शोध, आणि हो तुला काही बोलायचे होते ना माझ्याशी."
खोलीत निशब्द शांतता पसरली...
आयुष्यात असे मनोधैर्य खंबीरपणे आणावेच लागते....!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...