दारावरची बेल वाजली. वत्सलाबाईने उठून दार उघडल. वसुधाने लगबगीने आत येता येता वत्सलाबाईना विचारल..
"वरुण झोपला...?"
"हो ताई, आताच दहा मिनिट झाली .. तुमची वाट पाहुन पाहुन झोपला." वत्सलाबाई..
"जेवला का हो..?" वसुधाने काळजीने विचारल.
"विशेष नाही, पण अर्धी पोळी अणि वरण भात खाल्ला.." वत्सलाबाई म्हणाल्या
हातातल सामान ठेवून वसुधा वरुणच्या रूम मध्ये गेली.
वरुण गाढ़ झोपला होता त्याच्या कपाळावरुन डोक्यावरून हाथ फिरवला .... त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले... त्याला छातीवर थोडस थापडल, तसा त्याने झोपेतच तिचा हाथ आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवला... तिला गहिवरुन आल.. पाच मिनिटाने आपला हाथ हळूच सोडवुन घेत त्याची झोपमोड़ न होता ती बाहेर आली.
तेवढ्यात केशवही आला...आल्या आल्या त्यानेही वरुणची चौकशी केली...
वसुधाने केशवला विचारल,
"तू काही खाणार आहेस? मला भूक नाही, माझ उशीर होणार म्हणून ऑफिस केन्टीन मध्ये खाण झालय.." .
"नाही माझ झालय खाण बाहेर.." केशवने मोघम उत्तर दिल.
"केशव, तू आज पण ड्रिंक घेतलस?" वसुधा चिडून म्हणाली.
"अग बॉस आणि क्लायंट होता बरोबर .."
"अरे पण आजकाल तुझ रोजचच सुरु झालय..."
"रोजच कुठे ?काही बडबडु नको...जाव लागत..."
दोघेही वाद घालत आपल्या रूम मध्ये निघुन गेले.
वत्सलाबाईंनी सामान आवरल.. उरलेले अन्न फ्रिज मध्ये ठेवले आणि त्या झोपायला आपल्या रुम कड़े निघाल्या.. केशव आणि वसुधाच्या रूममधून वादाचे मोठ्याने आवाज येतच होते..
वत्सलाबाईंना हे रोजचेच होते... गावाकडून त्या ख़ास वरुणला सांभाळायला आल्या होत्या.
सकाळी वत्सलाबाई उठल्या त्यांनी वरुणला उठवल..
उठल्या उठल्या त्याचा नेहमीचा प्रश्न त्याने विचारला 'आई बाबा आले...'
'हो आलेत आता येतील बाहेर तू आटप लवकर स्कुलबस येईलच आता.. उगाच उशीर नको..'
तेवढ्यात वसुधा बाहेर आली..तिने वरुणला जवळ घेतल त्याच दूध केल आणि आंघोळीला पाठवल.
केशवही उठला... 'बाबा, आज मला सोडा ना शाळेत; तुमच्या कार मधून त्याने हट्ट लावला..'
तस केशवाने त्याला जवळ घेत म्हंटल, 'आज नको बाळा, आज तू बसने जा पुढच्या आठवड्यात नक्की सोडेन, तूला उशीर होईल आटप लवकर..'
जो तो लगबगीने आपआपल्या कामाला लागला.
केशव आवरून गेलाही... वरुणच आवरून त्याच खायच प्यायच करुन, त्याचा डबा देवून, त्याला वत्सलाबाई बरोबर स्कुलबससाठी खाली पाठवल.
जाता जाता तो आज पुन्हा कळवळून म्हणाला
"मम्मा आज तरी लवकर ये ग.. खुप बोर होत मला दुपारी घरात...."
त्याला जवळ घेत " प्रयत्न करते हा बाळा " अस म्हणून तिने त्याला निरोप दिला.
आई आजही उशिराच येणार हे वरुणला पक्क ठाऊक होत तरी तो तिला रोज म्हणायचाच...
तो गेला आणि तिने आपल आवरायला घेतल.. तिलाही पुढच्या अर्ध्या तासात निघाव लागणार होत ऑफिसला..
वरुण वत्सलाबाई बरोबर खाली आला... त्याच्याच सोसायटीत राहणारी त्याच्याच शाळेतली श्रीया त्याला दिसली... ती तिच्या बाबांच्या कडेवरवर होती, तिची आणि तिच्या बाबांची चांगली दंगा मस्ती सुरु होती...
श्रीयाला तिच्या बाबांनी गाडीत बसवल आणि ते तिला घेवून स्कुलकड़े त्याच्या समोरून रवाना झाले.
वरुण त्यांचे नीट निरिक्षण करत होता.
त्याने वत्सलाबाईंना विचारले, मला का नाही सोडत माझे बाबा असे शाळेत... मलाही जायचय श्रीया सारख बाबांच्या कडेवर.
वत्सलाबाई काय उत्तर द्यावे या पेचात पडल्या, तेवढ्यात बस आली आणि त्याला बसमध्ये बसवत त्यांनी आपली सुटका करून घेतली.
हे अस या घरात रोज चालायच... दुपारी वरुण आला की वत्सलाबाई त्याला काहीतरी खाऊपिऊ घालून थोडावेळ झोपवायच्या की मग ट्यूशनला पाठवायच्या.. तिथून आल की खेळायला बागेत... थोडस टीवी, मग कसबस त्याला नादी लावत जेवण खाऊ घालायच की बळच झोपवायच.
तसे दिवसभर त्याच्या आई बाबांचे फ़ोन यायचे त्यांच्या सवडीने...कित्येकदा तो उचलायचा आणि बोलायच्या ऐवजी फोन बाजूला ठेवून द्यायचा.
दिवसा मागून दिवस जात होते...
आणि एक दिवस वरुणच्या शाळेतन फोन गेला; वसुधा आणि केशवच्या फोनवर ,
'आताच्या आता शाळेत या...नाहीतर वरुणाला उद्यापासून शाळेत पाठवू नका..'
दोघही धावतपळत शाळेत पोहोचले..प्रिंसिपलबाईंनी त्यांना आपल्या केबिन मध्ये बोलावले.
त्यांच्या समोर काही पेपर ठेवले आणि म्हणाल्या हे वाचा.
आज मुलांना 'आई बाबा' या विषयावर लिहायला सांगितल तर तुमच्या वरुणने काय लिहिल ते पहा.
ते वाचायला लागले.
' मला आई बाबा आहेत...ते ऑफिसात दिवसभर काम करतात... मी घरी एकटा असतो..मला देवाने चुकीचे आई बाबा दिले आहेत... बाप्पा, मला माझे आई बाबा बदलून दे...मला माझ्या आईच्या हाताने दुपारी जेवायचे आहे...तिच्या कुशीत दुपारी झोपायचे आहे...तिचा मला गोड पापा घ्यायचा आहे..मला तिच्या बरोबर खेळायचे आहे... बाबांच्या कडेवर बसायचे आहे...त्यांच्याशी दंगा मस्ती करायची आहे.
बाप्पा मला माझे आई बाबा बदलून दे...तुलाही वेळ नसेल तर मी येतो तुझ्याकडे आणि मला नविन आई बाबा दे.
वरुण.
पत्र वाचता वाचता दोघांच्याही डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहु लागल.
प्रिंसिपल म्हणाले 'हा काय प्रकार आहे...? तुमचा वरुण सारखा एकटा एकटा असतो, कोणाशी बोलत नाही.. मुलांमध्ये मिसळत नाही... बोलत नाही... ही लक्षण ठीक नाहीत... आणि त्यात आज हे...तुम्ही काहीतरी केल पाहिजे.."
दोघेही सुन्न झाले होते... त्यांना शब्द फुटेना.. दोन मिनिट शांत झाल्यावर वसुधाच म्हणाली..
मॅडम मला ज़रा कागद आणि एक पेन देता..
मॅडम नि कागद पेन दिले आणि तिने एक पत्र लिहायला सुरुवात केली...
त्यावर तिने मथळ्यावर पहिला शब्द लिहिला...
"Resignation letter......राजीनामा पत्र....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा