वनिता भाजी चिरत होती. तिचा मोबाईल वाजला म्हणूंन ती उठली आणि टेबलावरचा मोबाईल तिने कानाला लावला.
'काय ग चिमने? लगीन केलंस म्हणूंन मला इसरलीस हव्य? मी न्हाय इसरलो.
वनिता घाबरली.. आजूबाजूला कोण नाही हे पाहून म्हणाली
"मला इथे फोन करायची तुझी हिम्मत? आता माझं लग्न झालाय माहित आहे ना?
"म्हाईत हाय की... मला फशिवलंस. माज पिरेम पायाखाली घातलंस? मी तुज्या गावात आलोया.. बऱ्या बोलान संभाजी पार्क मदी ये.. न्हायतर.
"न्हाई तर... काय करशील रे? काय करशील?
"तुज्या नवऱ्याचा सुयश पत्की न्हवं त्यो... तेचा नंबर हाय माज्यापाशी.. तेला फोन लावणार आणि सांगणार..ह्या वनिताच पिरेम हाय माज्यावर.. माज तिच्यावर हाय.. तुमी बाजूला व्हता की नाय बोला.. नायतर तुमचा काटा काढतो बघा.. वनिता घाबरली.. यान खोटंनाट सुयशला सांगितलं तर,? मग सुयशाची आई.. बाबा.. काय किमत राहील माझी.. लग्न होऊन जेमतेम तीन महिने झाले नाही तोच... ही पीडा आली मागोमाग..
वनिताला आठवले.. बाबांनी लग्नाच्या आधल्या दिवशी आपल्याला सांगितले होते...'वनिता.
ही चंद्याची ब्याद आपण तात्पुरती दूर केली.. पण कायमची नाही.. त्याचा कितीही बंदोबस्त केला तरी तुला त्रास दयायला तो येणार... त्यावेळी सुयशला. तूझ्या नवऱ्याला, खरं काय ते सांग..
वनिताने ठरवलं.. सुयशला सर्व सांगायला हवे.. तो विश्वास ठेवणार की नाही कोण जाणे.. पण बाबा म्हणाले तसे.. नवऱ्यापासून लपवायचं नाही..
रात्र होईपर्यंत ती सुयशला कसे सांगायचे.. याची मनातल्या मनात उजळणी करू लागली.
काळोख पडता पडता सुयश ऑफिसमधून आला.. मग सुयशची आई, बाबा आणि सुयश यांच्या गप्पा सुरुझाल्या.. वनिताने सर्वाना चहा दिला..मग पुढच्या आठवड्यात येणाऱ्या गणपती उत्सवाबद्दल बोलणी सुरु होती. सुयश आईला सांगत होता.. वनिताच्या बाबांनी गणपतीला त्याच्याकडे बोलावलय.
आपल्या कडील दिढ दिवसाचा गणपती पोचवला की त्याच्याकडे जाऊ. सुयशची आई म्हणाली.. गणपतीला तिच्या मोठया भावाकडे जाऊ.. दिवाळीला वनिताच्या माहेरी जाऊ.
वनिता आतमधून सर्व ऐकत होती.
तिला माहिती होते.. शेवटी सासूबाई काय म्हणतात तसेच होईल. कारण या घराची सर्व सूत्रे त्यांच्याच हातात होती.
वनिताचे कशात लक्ष नव्हते.. तिला चंद्याने सकाळी केलेल्या फोनची चिंता होती... नवऱ्याला कसे सांगावे आणि त्याला ते पटेल काय याची काळजी होती.
रात्री सुयश झोपायला खोलीत आला तेंव्हा ती त्याला म्हणाली..
"मला काही सांगायचे होते..
"काय?'
'लग्नाआधी मी एका संकटात सापडले होते..
'कसले संकट?
'मला सर्व सांगावे लागेल.. मी फायनल इयरला असताना स्कुटी घेऊन कॉलेजला जात असे.. माझ्या मैत्रिणीपण अशाच गाड्या घेऊन कॉलेजला येत... एकदा माझी गाडी वाटेत बंद पडली... मी ढकलत ढकलत गाडी एका ग्यारेज कडे आणली.. ग्यारेज मालकाने गाडी पाहिली आणि दोन दिवसांनी फोन करतो.. मग घेऊन जा. असे सांगितले. मी त्याला माझा नंबर दिला. दोन दिवसांनी त्याचा फोन आला.. तशी मी गाडी घेऊन आले.
'
मग?
त्यानंतर त्या ग्यारेजवाल्याने मला परत फोन लावला..
'वनिता.. तू मला लई आवडलीस.. माझ्याशी शादी कर..
मी चिडले आणि मला येत होत्या तेवढ्या शिव्या घातल्या.
पण पुन्हा त्याचा फोन आला.. शेवटी मी बाबांना कल्पना दिली. बाबा जाऊन त्या चंद्याशी वाद घालून आलेआणि परत माझ्या मुलीला फोन लावलास तर पोलीस तक्रार करणार हे त्यानी त्याला सांगितले.
मग? तूझ्या बाबांनी पोलीस तक्रार दिली काय?
"त्या आधी तो मला आणि बाबांना त्रास द्यायला लागला.. मी कॉलेजात जाताना माझा पाठलाग करू लागला.
मला घाणेरडे मेसेज पाठवू लागला.. त्याला कंटाळून मी माझा मोबाईल नंबर बदलला.माझ्या बाबांच्या स्कुटर चा पुढील टायर त्याने गुपचूप पंक्चर करून ठेवला, बाबांना याची कल्पना नसल्याने ते बेसावध राहिले आणि चालत्या स्कुटरवरुन पडले. हात मोडला.. हे सर्व चंद्यानेच मुद्दाम त्रास देण्यासाठी केले हे आमच्या लक्षात आले.
आम्ही पोलीसात तक्रार दिली. त्यावेळी आमच्या भागात पोलीसएनीस्पेक्टर होते जयंत इनामदार.
कोण जयंत इनामदार? सध्या सांगलीत आहेत ते?
"तेच असतील कदाचित..
"त्यांनी त्याला उचलून नेले आणि हाडे मोडून ठेवली.. केस उभी राहिली पण फारसे पुरावे नव्हते..जेमतेम चार महिने चंद्या आत गेला.. पण धमकी देऊन गेला..
"वनिते.. तुला सोडणार नाही.. तू कुठ असशील तिथून तुला पळवून नेणार..
बोलता बोलता वनिता रडू लागली.. 'काही कारण नसताना माझ्यामागे हे शुक्लकाष्ट लागलं.. मी मनात म्हणते..'अरे बाबा.. जगात एवढ्या सुंदर मुली असताना तू माझ्यामागे का लागतोस? मी काय तुझं घोड मारलं?
मग?
"तो पर्यत मी ग्रॅज्युएट झाले आणि आईबाबा माझ्यासाठी स्थळ बघू लागले. दुसरच स्थळ तुमच आलं.. आणि सर्वाना पसंत पडले.. मग तुमच्या आईबाबांनी पण मला पसंत केल आणि आपलं लग्न झाले.. मला चांगला नवरा मिळाला.. प्रेमळ सासुसासरे मिळाले म्हणून मी खूश होते.. पण?
"पण काय?
", आज त्या चंद्याचा परत फोन आला.. मला त्याने संभाजीपार्क मध्ये भेटायला बोलावलंय.. मी बदललेला फोन नंबर त्याला कसा मिळतो कोण जाणे? काय करू मी सुयश?
सुयश विचारात पडला. आपल्याला वाटले होते.. एक चांगली, चांगल्या वर्तनाची बायको आपल्याला मिळाली.. पण.. हे असले तिला फोन येणे.. आणि एवढ्या मुली असताना याच मुलीला का फोन येत होते? आजूबाजूला मुली बहकलेल्या आपण पहातो.. आणि मग चूक झाली की कुणाला तरी माळ घालतात.. वनिता त्यातलीच तर नव्हे? आता सतीसावित्री वाटतं असली तरी कॉलेजात असताना.. त्या वयात असल्या चुका होतातच.. मग सावरासावर करायची.. आणि तिच्या आईवडिलांनी लग्नाआधी का नाही कल्पना दिली? आता रडून काय उपयोग?
हुंदके देऊन रडणाऱ्या वनिताकडे दुर्लक्ष करून सुयश कुशीवर वळला आणि विचार करू लागला. वनिता म्हणते ते खरे असेल तर त्या चंद्याचा आपल्याला फोन येईल आणि घाणेरडेघाणेरडे तो वनिताबद्दल बोलेल.. ते फक्त ऐकून घ्यायचे की.. काय करायचे नेमके?
वनिता कुशीवर वळून रडत होती आणि सुयश आपल्या नशिबाला दोष देत तडफडत होता.
रात्रभर दोघांनाही झोप आली नाही.. तशीच वनिता उठली आणि खालच्या मानेने सुयशचा डबा बनवू लागली.. मग तिने आणि तिच्या सासूने मिळून नाश्ता बनवला आणि सर्वांनी मिळून खाल्ला.तिचे लक्ष नवऱ्याकडे होते.. तो आज फारसा गप्पात सामील होत नव्हता.. गप्प गप्प होता..
वनिताचा दिवस काळजीत गेला.. बाबा म्हणाले -नवऱ्यपासून काही लपवू नकोस.. आपण चंद्याचा त्रास सांगितला.. पण त्याला माझ्याबद्दल गैरसमज झाला तर.. चंदयाने फोन करून भलतेसलते सुयोगला सांगितले तर? लग्न होऊन जेमतेम तीन महिने झालेत आपल्या..
दुसऱ्या रात्रीही सुयश गप्प होता.. पाठ करून झोपला. मध्यरात्री तिला जाग आली तेंव्हा तो ग्यालरीत उभा होता.थोडया वेळाने दरवाजा उघडून बाहेत गेला. मग त्याचा आणि त्याच्या आईचा बोलण्याचा आवाज तिला ऐकू येत होता..
वनिता घाबरली.. आपली सासू म्हणजे निवृत्त हेडमास्तर... कडक स्वभावाची.. तिच्या शाळेत तिने शिस्त राबवली.. तिने सुनेला शिक्षा दिली तर.. मग आपले काय होणार?
दुसऱ्या दिवशी तिच्या व्हाट्सअपवर चंद्याचा मेसेज आला.. " शनिवरी चार वाजता संभाजीपार्क मध्ये भेट.. नायतर तुज्या घरी येतो.. म्हणून.
वनिताचा थरकाप झाला..चंद्यासारखे गुंड घरी येऊन सासू सासऱ्यांना भेटले तर? आपली सासू विश्वास ठेवील आपल्यावर..
दिवसभर ती गप्पगप्प होती.
तिची सासू तिला काहीकाही सांगत होती.. पण तिचे लक्षच नव्हते.
रात्री सुयश खोलीत आला तेंव्हा भितभीत तिने चंद्याचा मेसेज दाखविला. सुयशने मेसेज वाचला आणि शांतपणे म्हणाला..
'संभाजीपार्क मध्ये बोलावतोय ना तुला.. जाऊ.. आपण दोघेही जाऊ..
"सुयश.., तुम्ही. तुम्ही येणार? नको नको.. तो हलकट माणूस आहे.. तुम्हाला नाही नाही ते ऐकावे लागेल. त्याला लाज ना शरम.. त्याला मला त्रास दयायचा आहे..
"मग काय माझ्या बायकोला एकटी पाठवू? तो पळवून सुद्धा नेईल तुला.. त्यासाठीच तो तुझा नंबर मिळवून या गावात आलाय.. काळजी करू नकोस.. मी येतो आहे तुझ्यासोबत..
वनिताला आनंद झाला.. आपल्या नवऱ्याने आपला काहीतरी विचार केला शेवटी.
शनिवारी सुयश लवकर आला ऑफिस मधून.. आईबाबांना सिनेमाला जातो असे सांगून ती दोघे बाहेर पडली. संभाजीपार्कच्या बाहेर सुयशने आपली गाडी लावली. त्याने वनिताला पुढे चालायला सांगितले आणि तिच्यापाठोपाठ तो होता. वडाच्या झाडाखाली विडी फुकत चंद्या उभा होता.. वनिता आपल्या दिशेने येत आहे हे पाहून त्याने विडी खाली टाकली.. आणि पुढे येऊन वनिताचा हात पकडला.. दुसऱ्या क्षणी सुयोगची लाथ त्याच्या बरगडीत बसली... चंद्या कोलमडला.. पुन्हा उठू पहात होता.. सुयोगचा ठोसा त्याच्या दातावर बसला.. चंदयाच्या तोंडातून रक्त येऊ लागले.. तरी उसना राग आणत तो ओरडला..
"ए....., का मारतोस..
आता सुयोगने त्याच्यापेक्षा मोठया शिव्या देत ओरडला
"माझ्या बायकोचा हात पकडतोस?
चंद्या आता खवळाला", अरे. तुजी बायकू असली तरी माजी लव्हर हाय ती..
"मला म्हायती हाय.. तुज प्रेम हाये वनितावर.. तू फोन केल्लास ते ऐकलं मी.. तू मला फोन करणार व्हतास.. का नाही केला फोन?
"हिच्या सगळ्या भानगडी सांगणार जगाला..
त्याच क्षणी सुयोग चांदयावर तुटून पडला.. त्याला मार मार मारला.. चंद्या ओरडू लागला.. सुयोग उभा राहिला आणि त्याने इन्स्पेक्टर जयंत इनामदारला व्हिडीओकॉल लावला.
'जयंत.. हा बघ चंद्या.. तुला काय म्हंटल होत ना.. या शहरात आलाय माझ्या बायकोला त्रास दयायला..
मोबाईल मधून जयंत इनामदार बोलू लागला"चंद्या.. एकदा तुला मी मोडून ठेवला.. परत त्या वनिताच्या मागे आलास.. अरे वनिताचा नवरा सुयोग हा माझा आतेभाऊ.. म्हणजे वनिता ही माझी वहिनी.. तिचा हात पकडलास तू.. परत सांगतो.. परत तिला त्रास दिलास तर तुझा एनकोउंटर करेन.. कुणाला हाड सुद्धा मिळणार नाही तुझं... चल. फूट इथून..
चंद्या घाबरला.. वनिताचा नवरा इनामदार एन्स्पेक्टरचा पाहुणा म्हंटल्यावर त्याची पाचावर धारण बसली. वनिताच्या नवऱ्याने मार पण तसाच दिला होता.. गायवया करत, हात जोडत तो पळाला.
मघापासून हात तोंडावर घेऊन वनिता सुयोगने चंदयाला दिलेला मार पहात होती.. हिंदी सिनेमा जणू तिच्या पुढ्यात घडतं होता. आपला नवरा नियमित व्यायामशाळेत जातो हे तिने पाहिले होते पण त्याच्या अंगातली ताकद तिने आत्ताच पाहिली होती.. शिवाय चंद्याला मार देणारा इन्स्पेक्टर जयंत इनामदार हा आपल्या नवऱ्याचा नातेवाईक हे पण तिला आत्ताच कळले.
वनिताचा हात पकडून सुयश संभाजी पार्क मधून बाहेर पडला.. वनिताचे डोळे अश्रूनी डबडबले होते. तिला आपल्या नवऱ्याचा अभिमान वाटतं होता. गाडीत बसल्या बसल्या वनिता नवऱ्याला म्हणाली..
"सुयश.. थँक्स.. कसे आभार मानू मी.. मला काही सुचत नाही..
"वनिता.. आभार मानायचे तर माझ्या आईचे मान..
"तुमच्या आईचे? म्हणजे?
"वनिता.. तू जेंव्हा या चंद्याबद्दल सांगितलंस.. तेंव्हा मी विचलित झालो होतो.. माझ्या मनात येत होते.. एवढ्या मुली त्या रस्त्याने जात असताना चंदयाने तुलाच का फोन करायला सुरवात केली? म्हणजे तुझा पण यात सहभाग होता की काय? दुसरे म्हणजे लग्नाआधी तू किंवा तूझ्या आईवडिलांनी याची कल्पना का दिली नाही?
असे अनेक प्रश्न मला पडले आणि मी नर्व्हस झालो.. वाटले नेमकी अशीच बायको माझ्या वाट्याला का आली.. आता मी कुणावर विश्वास ठेऊ?
दोन दिवस मी विचलित होतो.. मग माझी पहिली गुरु आणि जन्मदात्री माझी आई.. तिला सर्व सांगितले. ती एक आदर्श शिक्षिका आणि हेडमास्तर म्हणून निवृत्त झालेली. तिला असे अनुभव अनेक. माझी आई मला म्हणाली..
"सुयश.. वनिता ही या घरची सून आहे.. ती लग्न करून या घरात आली आहे.. पहिली गोष्ट म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवायला हवा.. ती खरेच बोलत असणारं.. मी शिक्षिका म्हणून इतकी वर्षे नोकरी केली.. कोण खरे आणि कोण खोटे हे मला नजरेतून कळते. तिच्या आईवडिलांना तुम्ही का कल्पना दिली नाही म्हणून विचारू नकोस.
मग मी विचारलं 'मग आई, मी काय करू?
"तो चंद्या तिला बोलावतोय ना संभाजीपार्कमध्ये.. तिला एकटी पाठवू नकोस.. तो काहीही करेल.. तू जा तिच्याबरोबर. आणि त्याला अद्दल घडव.. व्यायामशाळेत जातोस ना इतकी वर्षे.. मग तुझा हिसका दाखव त्याला. आणि तुला शंका असेल तर जयंतला फोन कर.. तो असेच सांगणार. वनिता ही चांगली मुलगी आहे आणि चंद्या हा गावगुण्ड तिला त्रास देत आलाय. आणि वनिता.. मी आई म्हणाली तसे वागलो.. मी जयंतला फोन लावला.. त्याने चंद्याचा सर्व इतिहास सांगितला. तेंव्हा तुला थँक्स म्हणायचे असतील तर मला नको तूझ्या सासूला म्हण.
वनिताचे डोळे अश्रूनी वहात होते..नाटकसिनेमांत सासूला व्हीलन दाखवतात.. असतीलही तश्या...पण माझी सासू? ही सासू की दुसरी आई? आपल्या सुनेवर विश्वास ठेवणारी ही तर देवी.
सुयशची गाडी घरी पोचली.. दरवाजा उघडून वनिता धावत धावत सासूच्या मिठीत शिरली..
"आई.. केवढा विश्वास ठेवलात तुम्ही माझ्यावर? कसे उपकार फेडू मी.. एका स्त्रीच्या चरित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.. तिचा नवरा भांबवला होता.. तेंव्हा...
तिला पुढे न बोलू देता तिच्या सासूबाई म्हणाल्या.."अग, त्यात विशेष काही नाही.. आयुष्यभर मास्तरकी केली.. नजरेत पाहून कोण दोषी हे समजत मला.. तू तर माझी सून.. या हेंदमास्टरनीची सून. तुला पहायला गेलो माझ्या मुलासाठी. तेंव्हाच तू निष्पाप आहेस हे माझ्या लक्षात आले होते. असल्या चंद्या सारखे समाजकन्टक जागोजागी दिसतात. मानसिक रुग्ण हे. साधी सरळ मुलगी दिसली की तिला सतावतात. शाळेत असताना पण असे प्रसंग आलेले काही मुलीवर. मी हेड शिक्षिका म्हणून खंबीर होते. प्रत्येक वेळी त्याना बाहेर काढले. तू तर माझी लाडकी सून.
***********
लेखक -प्रदीप केळुस्कर
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा