रात्रीचे बारा वाजल्याचा ठोका घड्याळात पडला आणि शुभांगीला अचानक तिच्या बेडरूमच्या बाहेर गलका ऐकू आला. ती धडपडून जागी होतेय तोच खोलीतले दिवे लागले आणि दोन्ही पोरं तिच्या गळ्यात पडली. लेकीने कौतुकाने समोर केक आणून ठेवला. नवरा आणि सासू सासरेही कौतुकाने हसत समोर उभे होते.
शुभांगीचा आज चाळीसावा वाढदिवस. आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा पार पडला होता. तिच्या मुलांनी आणि नवऱ्याने मोठ्या कौतुकाने तिचा चाळीसावा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं, आणि त्याची सुरुवात अशी मध्यरात्री शुभांगीला गोड धक्का देऊन झाली होती. "उद्या संध्याकाळी मोठ्ठी पार्टी ठेवली आहे बरं का बाबाने तुझ्या वाढदिवसानिमित्त आई." लेक चिवचिवली.
आपल्या कुटुंबीयांनी आपल्याला आनंद देण्यासाठी घेतलेले कष्ट पाहून सुखावलेली शुभांगी आनंदाने अंथरुणात विसावली. या सगळ्यांना आपल्याला उद्या जे सांगायचय ते कसं सांगायचं या शब्दांची जुळवाजुळव करत करत तिचा डोळा कधी लागला ते तिला समजलं सुद्धा नाही.
शुभांगीच्या वाढदिवसाची सकाळ उजाडली. आज शुभांगीला स्वयंपाकघरातून सुट्टी द्यायची ठरवली होती सगळ्यांनी. लेकीने आणि सासूबाईनी हाक मारल्यावर शुभांगी नाश्ता करायला टेबलवर येऊन बसली. लेकीने नाश्त्याची प्लेट मोठी निगुतीने सजवली होती. सगळे मजेत नाश्ता करत होते, पण योगेशला, शुभांगीच्या नवऱ्याला मात्र तिच्या चेहऱ्यावरची चलबिचल दिसत होती. तो न राहवून तिला म्हणाला, ”काय झालंय तुला? अस्वस्थ दिसते आहेस! काही सांगायचंय का?“
शुभांगीने आता एक दीर्घ श्वास घेतला आणि ती सगळ्यांकडे पहात बोलू लागली. “खूप आभारी आहे मी तुम्हा सगळ्यांची. माझा चाळीसावा वाढदिवस आनंदात जावा म्हणून तुम्ही सगळे किती झटता आहात. पण मला तुम्हा सगळ्याना आज काहीतरी सांगायचंय.”
आता तिथं चिडीचूप शांतता पसरली. शुभांगी पुढे बोलायला लागली, “माझं अर्धं आयुष्य संपलंय आज. इथून पुढचं माझं आयुष्य सुखासमाधानाचं जावं अशी माझी इच्छा आहे. ...आणि त्यासाठी ते आरोग्यपूर्ण असायला हवं.
मला माझ्या शरीरावर चाळीशीतल्या खुणा आता दिसायला लागल्या आहेत. मी प्री डायबेटीक आहे. एवढ्या तेवढ्याने माझी हल्ली रात्रीची झोप उडते. सांधे कुरकुरतात. हे सगळं मला इतक्या लवकर व्ह्यायला नकोय. त्यामुळे मी असं ठरवलंय की आज पासून माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं असेल ते माझं आरोग्य. माझ्या इथून पुढच्या आयुष्यात प्राधान्यक्रम असेल माझ्या तब्येतीला आणि व्यायामाला. म्हणून उद्या पासून मी एक रनिंग ग्रूप जॉइन करायचा ठरवलंय.“
आता सगळे शुभांगीकडे अविश्वासाने पाहू लागले होते. शुभांगी, आणि रनिंग? तिचा व्यायामाशी आणि विशेषत: धावण्यासारख्या व्यायामाशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. तिची मजल फार फार तर चालण्यापर्यंत जायची. जरा भरभर चालली की तिला धाप लागायची. बाकी कुठलाही खेळ ती कधी खेळलेली नव्हती. आणि ती म्हणत होती की मी उद्यापासून धावणार आहे!
“मी चौकशी केली आहे. माझ्या वयाच्या अनेक बायका आहेत या ग्रूपमधे. आणि त्याही अलिकडेच धावायला लागल्या आहेत. त्यांचं आणि तिथल्या कोचचं म्हणणं आहे मला सहज शक्य होईल."
मुलांकडे आणि नवऱ्याकडे पहात ती म्हणाली, “माझं ट्रेनिंग सकाळी सात ते साडेआठ असणार आहे. रोजच्या सारखा गरम गरम ब्रेकफास्ट नाही जमणार इथून पुढे तुम्हाला करून घालायला. पण मी एक बाई शोधून ठेवल्या आहेत. त्या येतील नाश्ता करायला. मी आल्यावर स्वैपाक करीन. पण नेहमीसारखा चारी ठाव स्वैपाकाची अपेक्षा इथून पुढे ठेवू नका. कारण मलाही आवरून ऑफीस असणार आहे. पण प्लीज... मला सहकार्य करा. खूप छान भेट दिली आहे तुम्ही सगळ्यानी मला वाढदिवसाची. पण मला खरंच आनंदी पहायचं असेल तर माझ्यासाठी हा वेळ मला घालवू द्या. त्यासाठी तुम्हाला काही तडजोडी करायला लागतील.”
मग ती सासूबाईंकडे वळून म्हणाली, “मला गरज आहे आई या वेळेची. मला माझी तब्येत उत्तम राखायची आहे. तुमच्या वयाची होईन तेंव्हा तुमच्यासारखी सांधेदुखी नको आहे मला. मी कष्ट करीन, होईल थोडी ओढाताण वेळेची. पण मला स्वत:साठी हे करू द्या”.
हे ऐकून तिथं काही काळ शांतता पसरली. तसं फार काही विशेष मागत नव्हतीच ती. पण तिच्या सतत उपलब्ध असण्याची सवय झालेली होती सगळ्याना, ती मोडायला लागणार होती.
“ठीक आहे. होऊ दे तुझ्या मनासारखं. करू आम्ही मॅनेज”, योगेश म्हणाला. पण त्याच्या आवाजात काहीसा अविश्वास होता. सासूबाईनी आणि मुलांनीही योगेशची री ओढली. आणि शुभांगीच्या आयुष्यातलं एक नवंच ध्यासपर्व सुरू झालं. भल्या पहाटे उठून सरावाला जाणं, येऊन भराभर आवरून ऑफीसला जाणं, परत आल्यावर दुसऱ्या दिवशीची तयारी, मुलांबरोबर वेळ घालवणं, लवकर जेवून लवकर झोपणं, हे सगळं सुरू झालं. घरातले सगळे जेवल्याशिवाय तोंडात घास न घालणारी शुभांगी सगळ्यांच्या आधी जेवून घेऊ लागली. काहीसं अपराधी वाटायचं हे सगळं करताना तिला. पण आपल्या शरीरात, आरोग्यात होणारे बदल तिला सुखावत होते.
आधी चार पाच मिनिटे धावलं तरी कुरकुरणारं तिचं शरीर जणू नवीन जन्म घेत होतं. हळू हळू शरीरावरची चरबी कमी होऊ लागली. बराच वेळ सलग धावता येऊ लागलं. तब्येतीच्या अनेक कुरकुरी लांब पळून गेल्या. पाळीच्या तक्रारी बंद झाल्या. सगळा दिवस आनंदात जाऊ लागला. काम करण्याचा आवाका वाढला, एकाग्रता वाढली. नवऱ्यावर, मुलांवर होणारी चिडचिड बंद झाली. आणि इतक्या उशीरा सुरू करूनही आपण धावू शकतो आहोत या विचाराने एक वेग़ळीच आत्मविश्वासाची झळाळी तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली. या सगळ्यात एक वर्ष कसं गेलं तिला कळलंही नाही.
...आणि तिचा एकेचाळीसावा वाढदिवस उजाडला. आज शुभांगी तिच्या आयुष्यातली पहिली मॅरॅथॉन धावणार होती... दहा किलोमीटरची. सकाळी घरातले सगळे उठायच्या आधी ती तयार होऊन रेसच्या ठिकाणी पोचली. तिथं तिच्या ग्रूपमधली सगळी मित्रमंडळी हजर होती. तिची पहिली मॅरॅथॉन म्हणून सगळे तिला शुभेच्छा देत होते. शुभांगी भांबावलेली होती. “ होईल का हे आपल्याच्याने? धावू शकू ना आपण इतकं?” अश्या विचारांची मनात दाटीवाटी झाली होती.
रेस सुरू झाली. शुभांगी कुणाशीही स्पर्धा न करता शांत चित्ताने धावू लागली. ही रेस धावताना तिच्या डोळ्यासमोरून गेली चाळीस वर्षं, संसाराच्या अठरा वर्षांची कसरत झरझर सरकत होती. त्या कसरतीतून स्वत:ला वेळ देत तू हे केलंस म्हणून ती स्वत:च्याच पाठीवर शाबासकी देत होती. घरातल्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तिचं मन कृतज्ञतेनं भरून गेलं होतं. बाजूच्या हवेतला गारवा आणि वातावरणातला उत्साह पीऊन घेत, ताजीतवानी होत ती कूच करत होती.
हळू हळू अंतर मागे पडलं. आता लांबवर फिनिशिंग लाईन दिसू लागली आणि तिच्यात नवाच उत्साह संचारला. “कम ऑन. तू केलंस स्वत:साठी हे. तू करू शकलीस. अभिनंदन तुझं. आता थांबू नकोस. जात रहा उत्तम आरोग्याच्या दिशेनी अशीच” असं ती स्वत:शीच बोलू लागली. तिच्या मनात, शरीरात एक अनोखा आनंद भरून राह्यला होता. ती फार फार खूश होती. इतका आनंद तिला या आधी कधी झाला होता हे तिला आठवत देखील नव्हतं.
आता तिच्या डोळ्यातून आनंदाने घळाघळा अश्रू वाहू लागले. ते पाणी डोळ्यात घेऊनच तिनं फिनिशिंग लाईन ओलांडली तेंव्हा तिला सगळंच अंधूक दिसायला लागलं होतं. डोळ्यावरचा पाण्याचा पडदा दूर झाला तेंव्हा तिला दिसलं की फिनिशिंग लाईनच्या पलिकडे तिच्या सहकार्यांबरोबर हात हलवत उभी होती तिची मुलं, आणि योगेश. त्यांचे चेहरे अभिमानाने फुलून आलेले होते. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून शुभांगी भरून पावली होती. संसाराची सगळी तारांबळ सांभाळत स्वत:चे सगळे आनंद कुर्बान करण्याची फिनिशिंग लाईन तिनं ओलांडली होती. तिनं कात टाकली होती.
लेखक - अनामिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा