बुधवार, ११ जून, २०२५

1965. ब्रेन डेड ते पुनर्जन्म

  "संध्या ताई, तुमच्या मिस्टरांचा ब्रेन डेड झालाय. थोडक्यात कोमात गेलेत. तुमची संमती असेल तर आपण त्यांचे अवयव दान करून त्यांचा पुनर्जन्म करू शकतो. बघा ,काय करता?"
  संध्याबाई नि:शब्द होत्या. आपल्याच विचारात मग्न...काय करावं काहीच कळत नव्हतं. आपण या जागी असतो तर?  त्यांना कल्पनाच करवत नव्हती.सगळं कसं अनपेक्षित होतं.
      शिवाजीराव त्यांचे पती-घरचे कर्ते. घरची परिस्थिती यथातथाच ! पण जिद्द आणि कष्टाच्या जोरावर छोटी मोठी कामे करत करत ते एका ओळखीने बडोद्याला आले. त्यांच्याच ओळखीने एका भांड्याच्या दुकानात कामाला लागले.संध्याबाईंशी लग्न झाल्यावर मग अजून एक जबाबदारी वाढली आणि त्यांनी स्वतःचेच एक छोटेसे दुकान सुरू केले. अनुभव आणि सुस्वभावाने दुकानाचा जम चांगलाच बसला. मग लहान भावांची लग्न लावून दिली. एकाला बडोद्यातच मदतीला बोलावून घेतलं आणि एकाला गावावरच ठेवलं. कामाचा पसारा, व्याप वाढत राहिला. भांड्याची एक म्हणता तीन चार दुकान  झाली. यातच मग स्वतःची दोन मुलं,भावांची मुलंबाळं सर्वांची शिक्षण लग्न सर्वकाही अगदी जिथल्या तिथं झालं होतं. एकेदिवशी शिवाजीरावानी पत्नीस सांगितलं, "गेले पंचवीस तीस वर्षे मी धकाधकीचे जीवन जगलो, गावापासून लांब आलो.आता आपण आपल्या मातीत गावी जाऊन राहू. उरलेले दिवस देव धर्म आणि शांतपणे आपल्या माणसात व्यतीत करू. बडोद्यात नडी आडीलाच येऊ. इथलं सगळं व्यवस्थित आहे आणि तसं पण आपण आयुष्यभर तर कुणाला साथ देऊ शकणार नाही. प्रत्येकाने त्यांच्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर पुढं जावे." 
     संध्याबाई पण या निर्णयाने खुश झाल्या. त्याना पण आजपर्यंत माहेरात जास्त जाता येता आलं नव्हतं. निवांत रहाता आलं नव्हतं. आई आता थकली होती. तिकडे निवांत चार आठ दिवस रहाता येणार होते. एकूण निवृत्तीच जीवन दोघेही शांततेत जगणार होते.पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट आपण ठरवली तरी विधाता आपल्याबाबतीत जे ठरवेल तेच माणसाला स्वीकारावे लागते. गावाकडं येऊन सहाच महिने झाले असतील. सगळं कसं नीट सुरळीत चालू होतं पण एके दिवशी कच्च्या रस्त्याने गाडीवरून जाताना खड्यावर गाडी घसरली आणि तोल जाऊन शिवाजीराव दणकन रस्त्यावर आदळले. कुठेही जखम नव्हती पण बराच वेळ तिथं पडून राहिल्याने मेंदू मध्ये रक्त साचून गुठळ्या झाल्या नि कोमात गेले.
"आई ,काय झाला तुझा निर्णय?"
"आपण पपाना घरी नेऊया "
"काय? अग त्यांचा मृत्यू कधीही होऊ शकतो. तसेही ब्रेन डेड म्हणजे ते नाहीतच आपल्यात. नुसती धुगधुगी तर आहे, मग घरी नेऊन काय करायचे?"
 "मला सगळं माहीत आहे पण ज्या माणसाने इतकं मोठं विश्व निर्माण केलं त्याला त्याचे स्वतःचे श्वास घेऊ द्यायचे नाहीत का? लगेच त्यांचे अवयव दान करून मोकळं व्हायचं? जोपर्यंत त्यांचे श्वास चालू रहातील, मी त्यांची सेवा करेन. दगडातील देव,मूर्तीतला देव आपण पूजतोच ना? तो कुठं आपल्याशी बोलतो प्रतिसाद देतो? तरीही त्याचं अस्तित्व आपण मान्य करतोच आणि त्याची पूजा करतोच. मीही अशीच पूजा करेन त्यांची. मला माहित आहे. ते काही दिवसांचे किंवा तासांचे सुद्धा सोबती नसतील तरीही माझं काम मी करणारच." संध्याबाई आपल्या निर्णयावर ठाम होत्या.
"पण आई तुला माहितीय बडोद्यातील आपलं  व्याप किती मोठ्ठ आहे आम्हाला इथं थांबणं अशक्य आहे ."
"अरे, पण तुम्ही कुणी नका ना थांबू , मी बघेन सर्व ; तुम्ही जा आपापल्या मार्गाने."
 त्यादिवशी शिवाजीरावांना घरी आणले. जो तो चुकचुकत आपापल्या वाटे निघून गेला. संध्याबाईंना खूप एकट एकट उदास वाटू लागलं पण त्यांनी स्वतःस सावरलं. शेतावरील गड्याला आणि त्याच्या बायकोला सोबतीला घरी बोलावून घेतलं आणि त्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली. पै पाहुणे शेवटची भेट घ्यायला आले गेले. कोण काही म्हणायचे कोण काही म्हणायचे. तात्पुरत मन विचलित व्हायचं. वाईट वाटायचं पण पुन्हा त्या स्वतःस सावरायच्या.
       दुसऱ्या दिवशी त्यांनी बेडरूमच्या खिडकीशी पेशंटचा बेड ओढून लावला आणि आयुष्याच्या एका नव्या पर्वाला सुरुवात केली. कुठल्याही क्षणी निष्प्राण होणाऱ्या त्या जिवंत प्रेताची शेवटच्या क्षणापर्यंत पूजा करायचीच, असा निर्धार करून.जगाच्या दृष्टीने मृत असलेला तिचा पती तिच्यासाठी जिवंतच होता. बोलायला हलायला येत नसले म्हणून काय झाले? जीव तर होताच की ! 
  नित्यक्रम सुरू झाला. सकाळी उठलं की पहिलं पहायचं, 'श्वास चालू आहे ना?' मग आनंदाची सूक्ष्म लकेर त्यांच्या सर्वांगातून फिरायची. झटकन उठून त्या पेशंटचे आवरायच्या, नारळ पाण्याचे कधी खीर कधी सुपचे चार दोन चमचे पाजून स्वतःचे आवरायच्या. देवपूजा करून बेडजवळ  जाऊन थोडा वेळ मोठ्या आवाजात धार्मिक पुस्तक  वाचत बसायच्या. हरिविजय,भागवत गीता, काशिखंड, शिवलीलामृत आणि अश्याच बऱ्याच  ग्रंथांची पारायणे केली. गप्पाही छान रंगायच्या.
"ऐकलं का ,आपली भाची शामल वकील झाली बरं का! "
 "आज आपल्या विनूचा फोन आलता बरं का ,सगळं कुशल आहे बडोद्यात, धंदा व्यवस्थित चालू आहे ."कधी लग्नाचा अलबम काढून प्रत्येक फोटोचं वर्णन करायच्या." काय हो, तुमच्या घरातील पावडर त्यादिवशी संपलीवती का?" आणि स्वतःच खुदकन हसायच्या.
कधी कधी मुलांना नातवंडाना व्हिडीओ कॉल करून मोठमोठ्याने बोलायच्या.भावकीतल्या बायका नावं ठेवायच्या," मढ घरात घिऊन बसल्या नव्ह का !" कोण म्हणायचं," बिचारी,नवऱ्याच असं झाल्यावर वेडी झालीय.."एक ना दोन. पण संध्याबाईंच्यात काही फरक पडत नव्हता. सकाळ दुपार संध्याकाळ  पेशंटचे हवे नको पहाणे, त्याच्याशी गप्पा मारणे चालूच राहिले. नव्हे, त्यांच्या रोजच्या जीवनातला तो एक अविभाज्य भाग होता.
    दिवस पुढं चालत होते. बघता बघता सहा महिने उलटले. एकेदिवशी नेहमीप्रमाणेच देवाचं पुस्तक वाचत असतानाच त्यांना पेशंटच्या हाताच्या बोटांची हालचाल झालेली दिसली. भास असेल म्हणून पुन्हा त्या एकाग्र होऊन वाचू लागल्या. पान उलटताना पुन्हा एकदा तशीच हालचाल जाणवली आणि एक अनामिक गोड. आश्चर्यकारक लहर सर्वांगातून फिरली. त्यांनी ग्रंथाच्या पानात खुणेचा कागद ठेवला आणि धावतच बाहेर आल्या.
" सदा ss सदा ss कुठायस तू ? ...अरे पळ पळ ...त्याना काय करू न काय बोलू कळेना .सदा धावतच आला ,
" सदा पळ पैलवानाची टॅक्सी भाड्याला सांग,तुझ्या मालकांना दवाखान्यात न्यायचेय ..."
सदा लगबगीने टॅक्सी घेऊन आला.संध्याबाईंनी देवाला हात जोडले आणि शिवाजीरावाना सगळ्यांच्या मदतीने गाडीत घातले. संध्याबाईंनी शिवाजीरावांचा हात घट्ट धरला आणि अंतर्मनातून आणि नजरेतून आक्रन्दून विचारले,
"का हो ,जन्मोजन्मी सोबत रहाण्याच वचन दिलं होतं ना? मग इतक्या लवकर कसे चालला होतात मला सोडून?अजून खूप जगायचंय सोबत आपल्याला आणि खूप फिरायचंय. सगळा जन्म सगळ्यांच्या जीवनाची घडी बसवण्यात गेला. आता आपल्या दोघांचं. फक्त दोघांचं जीवन जगायचंय..."
 गाडी सांगलीच्या दिशेने पळू लागली. वाटेतच त्यांनी मुलांना बातमी सांगितली. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता. कधी एकदा दवाखाना येतोय असे झाले होते ! गाडीत त्यांचं सगळं लक्ष मालकाच्या चेहऱ्याकडे होतं. त्यांनी नवऱ्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. आजपर्यंत त्यांच्या सोबत घालवलेले सुख-दुःखाचे क्षण. गेले सहा महिने त्यांच्यासोबत असूनही सोसलेले एकटेपण, हॉस्पिटल ते घर आणि काय होणार? याची लागलेली चिंता, बरेचदा त्यांच्या मृत्यूची पडलेली भयानक स्वप्ने,रात्रभर मग त्यांचा हात हाती घेऊन जागून तारवटलेले डोळे, भय कंपित दोलायमान मन अन भेसूर रात्री. सगळं आठवत होतं आणि डोळे संतत धार  वहात होते.
     एकदाचा दवाखाना आला. स्ट्रेचरवरून पेशंट लगबगीने icu त नेले. उपचार सुरू झाले. संध्याकाळपासून उपचाराला प्रतिसाद येऊ लागला. संध्याबाईंचं लक्ष सहज भिंतीवर गेलं. कॅलेंडरची पाने फडफडत होती. ८ ऑक्टोबर -त्यांच्या साखरपुड्याची तारीख. त्यांनी दरवजाच्या काचेतून नवऱ्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला.सगळं व्यवस्थित होतं.
      पंधरा दिवस उलटले.सगळे नातेवाईक हळू हळू येऊ जाऊ लागले. कालपर्यंत तिला उलटसुलट काही बाही बोलणारे, "धीराची बाई..नशीबवाली हाय बघा ..खरंच ग,त्वा म्हणून समदं केलंस.." कोण काय कोण काय बोलत होते पण संध्याबाईंचा जीव आतुरतेने नवऱ्याच्या हाकेची वाट पहात होता.इतक्यात "संध्या पाटील कोण आहेत?डॉक्टर तुम्हाला बोलवत आहेत.." सिस्टर लगबगीने सांगून गेली.
   "संध्याताई खरंच तुम्ही जादू केलीत. तुम्ही ग्रेटच आहात. तुमच्या  पेशंटचा पुनर्जन्म झालाय ,जा. ते तुम्हाला बोलवत आहेत." डॉक्टरांचे बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच त्या पेशंटकडे धावल्या. पुन्हा एकदा त्यांनी त्यांचा हात गच्च पकडला. पेशंटने डोळे उघडले आणि हळुवार हाक मारली. 'संध्या...'"
    तिन्ही सांज झाली होती. खिडकीतून लालभडक तेजाचा गोळा आता विसावत होता उद्या खात्रीने चैतन्य फुलवण्यासाठी. संधीप्रकाशाच्या वेगवेगळ्या छटांनी आकाशाला शोभा आणली होती आणि संध्याबाईंच्या जीवनात पुन्हा एकदा सप्तरंगाची उधळण झाली होती. क्षितिजावर धरतीचा तेजोमय मिलन सोहळा नुकताच रंगात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...