काहीतरी वेगळ काम जिथे चालत तिथे आवर्जून मी जातो. हे माहित असलेल्या सौ. दिपाली पांढरे यांनी एकदा आग्रह धरला आणि त्या मला पुण्यातील कोथरूडच्या अंध शाळेत घेवून गेल्या. सोबत परम मित्र मुकुंद उत्पात देखील होते. सुमारे दोन अडीच तास तिथे होतो. आणि त्या अनुभवानंतर खरेच सांगतो, माझेच डोळे उघडले.
डोळस माणसे देखील जे काम सहजतेने करू शकणार नाहीत अशी अनेक कामे तिथल्या अंध मुली एका फटक्यात करत होत्या. शिलाई मशीनवर कपडे शिवणारी मुलगी पाहून तर थक्क झालो. मुद्दाम मी तिला दोन तीन वेळा "सुई" ओवून दाखवशील का विचारले तर तिनेही हसून सहजतेने मशीनमधल्या सुईमध्ये दोरा ओवून दाखवला. कपडे शिलाईची हि थरारक कला पाहून पुढे जातोय तर अजून सुखद धक्का बसला. प्लास्टिक वायरच्या सुरेख पिशव्या विणणे तिथे सुरु होते. दोन आडवे तीन उभे असे धागे विणत भराभर पिशव्या तयार होत होत्या. त्यापलीकडे हातमाग युनिट पाहिले. हे काम खरेच खूप अवघड असते. मला माहित आहे. पण तिथेही एक मुलगा सहजतेने मागावर वस्त्र विणत होता. कापडी पिशव्या, लोकरीचे विणकाम, पुस्तके बाइंडीग अशी किती कामे सांगू ? सगळी इथे सहजतेने होताना पाहून माझेच डोळे उघडले. कारण "आपण काहीतरी विशेष करतोय" हा भाव तिथे कुठेच आढळला नाही. किंवा "हम भी कुछ कम नही" असेही तिथे कुणी म्हणाले नाही. हे खरे मोठेपण पाहून मला माझेच छोटेपण अधिक जाणवले.
आणि शेवटी तर एका मुलीने चक्क डोळ्यात पाणी आणले (अर्थात आनंदाश्रू होते ते)
ती म्हणाली कि, "मी गाणे म्हणून दाखवू ?"
मी "हो" म्हटल्यावर लगेच तिने सुरु केले "तू जहा जहा चलेगा, मेरा साया साथ होगा"
इतक्या सुरात गात होती कि बास !! सगळे जग विसरलो भोवतीचे !!
नंतर टाळ्या वाजवायचे पण विसरून गेलो !
हळूच तिच्या शेजारी बसलो. तिला तेही कळले लगेच ! तिला शाबासकी दिली. आणि विचारलं कि "काय गिफ्ट देऊ?"
तर तिने जी मागणी केली ती ऐकून पुन्हा गहिवरलो !
म्हणाली, "असेच येत जा अधून मधून वेळ काढून. बास "
**
मी निशब्द ! किती साधी मागणी न !!
नाहीतर आपण किती मागण्या सतत करत असतो समोरच्यांकडून आणि नाही पूर्ण झाल्या कि निराश होतो.
असो !
अर्थात नंतरहि मी जात राहिलो तिथे अनेकदा !! हा भाग वेगळा !!
*
डॉ. डीडी क्लास : आपण किती छोट्या छोट्या गोष्टीवरून टिंग्या मारतो न !! कि मी अमुक केले, तमुक मिळाले ! (मलाही कधी कधी तसे वाटायचे आधी) पण आता बदल करतोय त्यात ! त्यामुळे खूप समाधानी आहे !
मात्र सारे काही मिळूनही आपण अनेकदा त्यात खुश नसतो. पण तिथे त्या अंध शाळेत निसर्गाने दृष्टी हिरावून घेवूनही त्यांनी त्यांची सृष्टी पुन्हा सजवली होती.
तिथे सलाम करण्यापलीकडे मी काय करू शकत होतो?
मित्र मैत्रिणिनो,
आपल्याला खरेतर सगळे काही आहे पण तरी आपण साधे हसणे देखील विसरून गेलोय. छान जगणे तर फार दूर राहिले. एक काम करा, जेव्हा कधी निराश व्हाल तेव्हा जवळच्या एखाद्या अंध शाळेत जरूर जा. तिथे जी एनर्जी मिळेल त्यातून कदाचित पुन्हा तुम्हीही फ्रेश होऊन जीवनात रंग भरू शकाल !!
**
Ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)
dd @ blind school, gandhi bhavan, kothrud, pune
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा