बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3195. बायको माहेरी जाते..!

     रात्रीचे आठ वाजत आले होते. सकाळपासून तीन महत्त्वाच्या मिटींग अटेंड करून प्रशांत थकून गेला होता.  समोरच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर  त्यानं परत एकदा  नजर फिरवली आणि तो स्वीच ऑफ केला. लंच बॉक्स सॅकमध्ये टाकून त्यानं खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि निघायच्या आधी शेवटचं एकदा वॉटस्अपचे मेसेज चेक करायला सुरवात केली  आणि तो  उडालाच..! शेवटचा मेसेज सविताचा, त्याच्या बायकोचा होता..!
"मी दुपारपासून फोन लावतेय. पण तो ' आउट ऑफ कव्हरेज एरिया' येत होता. कुठल्या एरियात होतास? शेवटी कंपनीच्या लँडलाईन वर फोन लावला तेंव्हा तू मिटींगमध्ये आहेस अस समजलं. बर ते जाऊ दे. आईच अचानक अपेंडिक्सचं ऑपरेशन झाल्यामुळे मी औरंगाबादला  जात आहे. कधी येईन हे आत्ताच सांगू शकत नाही. तर मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव. 
 टेबलवर रात्रीच ताट वाढून ठेवलं आहे. ते जेवायचं. बायको नाही म्हणून लगेच बाहेर चरायला जायची गरज नाही..! गॅसवर दूध तापवून ठेवलं आहे ते रात्री फ्रीजमध्ये टाक. आणि महत्वाचं म्हणजे लवकर झोप. टीव्हीवर रात्रभर नको ते चॅनेल बघत बसू नकोस..! मी सकाळी पुन्हा फोन  करतेय.. "
       आता बायकोच माहेरी जाणं म्हणजे त्यात जगावेगळं ते काय. किंबहुना माहेरी न जाणं हे मात्र आश्चर्याचं असू शकतं. नाहीतरी आजकालच्या मुली दिवसातून चारवेळा तरी आईशी मोबाईलवरून अर्धा अर्धा तास बोलत असल्यामुळे माहेरी असल्यासारखचं असतात. पण प्रशांतच्या बाबतीत 'अगा जे घडलेचि नाही' ते   आज घडलं होतं..!  लग्न झाल्यापासून कधीही माहेरी न गेलेली सविता आज पहिल्यांदाच एकटी माहेरी गेली होती.  तशी ह्यापूर्वीही ती माहेरी गेली होती पण प्रत्येक वेळी तो बरोबर असायचा..!  प्रशांतनं तो मेसेज सविताचाच आहे ना याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली आणि मोबाईल बंद करून खिशामध्ये सरकवला. अचानक त्याला आता मोकळ मोकळं वाटायला लागलं होत..! कमीतकमी दोन दिवस तरी तो आता आकाशातला 'उडता पंछी'  होता.! ऑफीसमधून यायला उशीर का झाला हे त्याला आता कुणी विचारणार नव्हतं की शेजारच्या मराठे मॅडमशी इतका वेळ गप्पा मारण्याची काय गरज होती असं  कुणी खडसवणार नव्हतं आणि मुख्य म्हणजे कित्येक महिन्यानंतर  सद्या आणि पाटल्या  या जिगरी मित्रांबरोबर त्याला दोन दिवस जिवाची मुंबई नाही पण निदान 'जिवाचं पुणं' करता येणार होतं.  सद्या आणि पाटल्या ( सदाशिव तावरे आणि महेश पाटील या सरळसोट नावाचं 'लंगोटी रूप' !) म्हणजे प्रशांतचे जिगरी दोस्त. लहानपणापासूनचे मित्र पण सविताच्या दृष्टीनं 'टोळभैरव'..! त्यात पाटल्या 'हैद्राबादी बिर्याणी' बनवण्यात स्पेशालिस्ट..!
"पाटल्या. उद्या सद्याला घेऊन  घरी ये. उद्या तुझ्या हातची हैद्राबादी बिर्यानी खायची आहे. खूप दिवस झाले. सविता पहिल्यांदाच माहेरी गेलीय. उद्या फुल डे एंजॉय करू..!.. नो एक्सक्यूज..!" 
प्रशांतनं पाटल्याला फोनवरूनच ऑर्डर कम सुचना दिली आणि फोन बंद केला. बाहेर येऊन त्यानं गाडी स्टार्ट केली आणि तो घरी निघाला. रस्त्यावरची ट्रॅफिक आज त्याला वैताग आणत नव्हती की 
"येता येता मंडईतून मेथीची पेंडीं  न विसरता घेऊन या" अशा बायकोनं दिलेल्या ऑर्डरचं डोक्याला टेंशन नव्हतं.. मनाचं स्वातंत्र्य म्हणजे काय याचा तो आज सुखद अनुभव घेत होता..! चौकातल्या पानठेल्यावर बऱ्याच दिवसानंतर तो थांबला आणि कधी नव्हे ते त्यानं आख्खं सिगारेटच पाकिट विकत घेतलं..! तशी तो सिगारेट  मित्रांबरोबर कधीतरीच सिगारेट ओढायचा  पण सवितानं 'सिगारेट जवळ तर मी लांब' अशी तंबी दिल्यापासून त्यानं तीही बंद करून टाकली होती..! 
  प्रशांत घरी पोहचला. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. त्याला फारशी भूक नव्हती. पण बायकोनं मेसेज ठेवल्यामुळ त्यानं टेबलावरच  ताट कसबसं संपवलं आणि तो बेडरुममध्ये आला. सवितानं रात्र भर टीव्ही बघत बसू नका अस बजावलं होतं पण तोच दिवसभराच्या मिटींगमुळे कंटाळला होता त्यामुळं  दोन मिनिट  त्यानं न्यूज बघितल्या आणि टीव्ही बंद करुन टाकला. रोज वॉर्डरोब मधून काढून त्याची पांघरायची रजई बेडच्या पायथ्याशी ठेवलेली असायची आणि साइडटेबलवर पाण्याचा मग भरून ठेवलेला असायचा पण तो आज तिथं नव्हता. चडफडत फ्रीजचं दार उघडून त्यानं गार पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि उद्या नऊ वाजता कामवाली येईपर्यंत मस्त ताणून द्यायची अस ठरवून तो झोपी गेला..!
    सकाळचे सात वाजून गेले होते..! पहाटेच्या स्वप्नात तो अजून मश्गुल होता तेवढ्यात  दारावरची बेल वाजली. जो कुणी असेल ते असेल, उठायच नाही म्हणून त्यानं पांघरूण डोक्यावरून ओढून घेतलं.. पण बेल वाजतच राहिली.. शेवटी वैतागून तो उठला आणि त्यानं दार उघडलं. समोर त्यांची कामवाली शलाका उभी होती. तस तिच मुळ नाव शकू होत पण तिनं त्या नावाचं शलाका अस 'मॉडर्नायझेशन' केलं होतं.!      
   "मॅडमचा रात्री फोन आला होता. रोजच्या कामाबरोबर आजपासून सकाळचा चहा आणि पोळीभाजी  करायची म्हणून. त्यामुळे मी लवकर आलेय.. येऊ ना आत..?"  
" ये.. ये ना..!"     
     आज हैद्राबादी बिर्यानीची पार्टी असल्याने आता या शलाका आणि पोळीभाजीचं काय करायचं हा त्याला प्रश्न पडला..!
"हे बघ.. आज नुसता चहाच कर.. पोळीभाजी उद्या पासून.. आज मला बाहेर जेवायला जायचयं.." 
ओके.. मग ब्रेकफास्टला नूडल्स करू का..?  मला माहित आहे तुम्हाला नुडल्स आणतात ते..!" आपल्या आवडीनिवडी हिला कशा काय माहित..! तो काहीं बोलणार इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.  तो  सविताचा कॉल होता.. 
" सविता डीअर..कशी आहेस. आईंची तब्येत काय म्हणते. अचानक काय झालं..? प्रशांतनं प्रेमानं चौकशी केली...
 "आई ठीक आहे पण मला सांग ती कामवाली शलाका आली का? मी तिला रोज  पोळीभाजी करायला सांगितलं आहे. कणकेचा डबा मोठ्या शेल्फवर खाली डाव्या बाजूला आहे.. कणिक मोजून दे. ह्या बायका फार वेस्ट करतात..!" 
अग पण मी आज  सद्दया आणि पाटल्याला घरी जेवायला बोलावलय पार्टी आहे. पोळीभाजीची काय गरज आहे?मला वाटलंच तू तुझ्या टोळभैरवांना बोलावणार म्हणून..! आणि तो पाटील हैद्राबादी बिर्यानी करणार असणार.. बायको नाही म्हटलं की उनाडक्या सुरू..! आजच्या पुरत ठीक आहे.. पण उद्यापासून बाहेरच खायचं नाही आणि फालतू पैसे खर्च करायचे नाहीत..शलाका करून देत जाईल..! आणि हो. काम झालं की तिला दुसरी काम सांगायची नाहीत. जाऊ द्यायचं.. ती जरा आगाऊच आहे..! (तसा तिचा 'आगाऊपणा' मघाशी त्याला दिसलाच होता..!)
आणि सांगायचं राहिलचं. अंघोळ झाली की न विसरता गिझरच बटन बंद करायच. मागे बायको नाहीय. बटन बंद करायला..! 
      'हमास'च्या रॉकेटसारखे एकामागून एक बॉम्बगोळे त्याच्यावर पडत होते पण निदान आजच्या बिर्यानी पार्टीचा 'खिमा' तरी झाला नाही याच त्याला हायसं वाटलं. 
 "ओके डिअर..सगळ मान्य.. अ‍ॅग्रीड..! पण सवि.. खरचं तुझी उणीव फार जाणवतीय..!" 
 "काहीं नाही नुसत गोड बोलायचं आणि करायच तेच करायचं.." सवितानं फोन कट केला.
    ठरल्याप्रमाणे सद्या आणि पाटल्या वेळेवर आले. पाटल्या सगळी तयारी करुन आला होता. झणझणीत हैद्राबादी बिर्यानीवर तिघांनी  यथेच्छ ताव मारला आणि सविता परत येण्याच्या आत एखाद्या फार्म हाऊसवर 'ओली' पार्टी करण्याचं फायनल करून ते निघून  गेले. जाता जाता सद्यानं 'सिगारेट पिणं आरोग्याला  हानिकारक आहे' याची प्रशांतला  आठवण करून देत  सिगारेटच राहिलेलं  पाकिट आपल्या खिशात घातलं..! 
      चार वाजत आले होते.. आता दोन तास मस्तपैकी 'आडव' व्हायचं असा विचार करतोय तोपर्यंत पुन्हा मोबाईलची रिंग वाजली.
"गेले का एकदाचे टोळभैरव का पडलेत लोळत..! सविताची सरबत्ती सुरू झाली.. 
"उद्या शलाका आली की डायनिंग आणि किचन कट्टा  दोनवेळा धुऊन घ्यायचा आणि परत असलं काहीं घरात करायचं नाही सांगून ठेवते. बरं. तुझी शुगरची गोळी  कुठे असते माहित आहे का.?" 
 कुठे? प्रशांतनं ओशाळून विचारलं. प्रशांतनं आजपर्यंत कधी शुगरची गोळी स्वत:च्या हाताने घेतली नव्हती. जेवणं झालं की शुगरची टॅब्लेट  आणि पाण्याचा ग्लास त्याच्यासाठी तयार असायचा.!
"बेडच्या डाव्या साईडटेबलच्या ड्रॉवरमध्ये असते. आता लगेच  घे आणि रोज घ्यायची लक्षात ठेव."      
प्रशांतनं थँक्स म्हटलं आणि  आता मी थोडावेळ झोपणार आहे असं सांगून फोन ठेवून दिला.    
सहा वाजता झोपेतून उठे पर्यंत वॉटस्अपवर सविताचे आणखी तीन चार मेसेज येऊन पडले होते.. 
 'तुला चहा करता येत नाही मला माहित आहे..शेजारच्या शोभाताईंना मी सांगितलं आहे त्या पाठवून देतील 
(तू जायची गरज नाही.!)' 
'चौकातल्या 'पेशवाई डायनिंग'कडे मी रात्री नऊ वाजताची खिचडी आणि दही याची ऑनलाईन ऑर्डर दिली आहे त्यांच्या कडे 'होम डिलिव्हरी' ची सोय आहे. कुलूप लावून भटकायला जाऊ नकोस..!'
उद्या ऑफिसला जातानाच्या कपड्याची जोड तुझ्या कपाटात वरच्या बाजूला आहे. सगळ उचकत बसू नकोस आणि माझ्या कपाटाला अजिबात हात लावायचा नाही.. ' 
तिच्या प्रत्येक वाक्यात दमदाटीचा आणि अवखळपणाचा अविर्भाव असला तरी प्रशांतला आता तिच्या शब्दा शब्दातून त्याच्याबद्दल वाटणारी काळजी आणि ओसंडणार प्रेम जाणवायला लागलं होतं. तिच्यावाचून आपण शून्य आहोत असं आता त्याला वाटायला लागलं होतं.
      रात्री कंपनीतल्या सुहासबरोबर एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये  इंग्रजी मुव्ही बघायला जायचं त्यानं सकाळी ठरवलं होत पण सवितानं रात्रीचं जेवण बुक केल्यामुळे त्याला ते कॅन्सल करावं लागलं. रात्र झाली होती. त्याला आता कंटाळा यायला लागला होता. आज वर्ल्ड कँपमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच आहे हे त्याला आठवलं आणि त्यानं टिव्ही ऑन केला. पण मॅचमध्ये त्याच लक्ष फारसं लागत नव्हतं. तो मॅच बघत असला की कांदे पोहे आणि वाफाळलेला चहाचा कप न सांगता समोर यायचा. एक एक आठवणं त्याला  आणखी बेचैन करत होती. शेवटी समोरची मॅच रंगात आलेली असतानाही त्यानं टीव्ही ऑफ करून टाकला.   
  बरोबर नऊ वाजता जेवण आलं. थोडा वेळ इकडे तिकडे करून त्यानं जेवणं आटोपलं आणि कपाटातले एक पुस्तक चाळत तो बेडवर आडवा पडला. दहा वाजून गेले होते.. शेजारी सविता नव्हती. कंटाळून त्यानं पुस्तक बंद केल. उठून कपाटातलं पांघरूण काढण्याचही त्याच्या जिवावर आलं होतं. झोपायचं म्हणून त्यानं लाईट स्वीच ऑफ केली आणि एवढ्यात मोबाईलवर मेसेजचा बीप वाजला. सविताचा मेसेज होता.. 
"झोप येत नाही का..? औषधाच्या डब्यात झोपेची गोळी आहे ती घे.." आणि पुढे एक छानसा स्माइलिंग मोजो टाकला होता..! 
प्रशांतनं मोबाईल उचलला आणि टाईप केलं.
" माझी झोपेची गोळी औरंगाबादला गेली आहे..उद्या ती गोळी घेण्यासाठी  औरंगाबादला येतोय..!
 इलू.. इलू..!!"

कृष्णकेशव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...