बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3158. तो

 आमच्या ग्रुपमध्ये एक जण होता. आज त्याचं नाव सांगितलं तरी फारसा फरक पडणार नाही. कारण त्याचं नाव महत्त्वाचं नव्हतंच. महत्त्वाची होती त्याची विचार करण्याची पद्धत. पहिल्यांदा पाहिलं, तर तो अगदी साधाच वाटायचा. फिकट निळा शर्ट, काळी पँट, हातात जुनं घड्याळ, चेहऱ्यावर कायम हलकंसं हसू. गर्दीत दोन मिनिटं उभा राहिला तरी पुन्हा ओळखू येणार नाही असा. 
ना मोठा आवाज, ना self-promotion, ना "मीच शहाणा" असा भाव.
पण त्याच्याबरोबर दहा मिनिटं बोललात, की तुमच्या स्वतःच्या विचारांबद्दल शंका यायला लागायची.
आम्ही त्याला कधीच "हुशार" म्हणालो नाही.
कारण सुरुवातीला तो तसा वाटतच नव्हता. उलट, तो थोडासा वेगळा, थोडासा अजब आणि थोडासा जास्त शांत वाटायचा. कोणत्याही चर्चेत तो पहिला बोलायचा नाही. वादात पडायचा नाही. समोरचा चुकीचं बोलत असला तरी मध्येच तोडायचा नाही. आणि सर्वात आश्चर्य म्हणजे, त्याच्याकडे कधीच ready-made उत्तर नसायचं.
एकदा कट्ट्यावर चर्चा रंगली होती. विषय होता - "आजकालची पिढी."
गण्या नेहमीप्रमाणे पेटलेला."आजच्या मुलांना संयम नाही. कष्ट करायची तयारी नाही. मोबाईलने सगळं बिघडवलं," तो जोरात बोलत होता. आम्ही मान डोलावत होतो. खरं तर आम्ही ऐकत नव्हतो; फक्त शिष्टाचार पाळत होतो.
तो मात्र शांतपणे चहा पीत होता.
शेवटी मीच विचारलं, "तुझं काय मत?"
तो म्हणाला, "गण्याचं बरोबर आहे."
गण्या फुलला.
तो पुढे म्हणाला, "पण एक प्रश्न पडला."
"काय?"
"प्रत्येक पिढीला पुढची पिढी वाईटच का वाटते?"
कट्ट्यावर शांतता पसरली.
तो म्हणाला, "आपण आपल्या तरुणपणाची तुलना त्यांच्या तरुणपणाशी करतो. आपल्या म्हातारपणाची नाही."
क्षणभर थांबून तो गण्याकडे वळला.
"गण्या, तुझ्या वडिलांनाही तू हट्टी वाटत होतास. त्यांच्या वडिलांनाही तेच वाटत होतं. आणि पन्नास वर्षांनी. तुझा नातूही तुला हाच संवाद ऐकवेल."
कट्ट्यावर एकदम हशा पिकला. गण्याही हसला.
पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली.
तो गण्याशी वाद घालत नव्हता.
तो गण्याने उभं केलेलं चित्र मोठं करत होता.
आम्ही एका चौकटीतून बघत होतो.
तो वरून बघत होता.
त्या दिवशी घरी जाताना माझ्या डोक्यात एकच प्रश्न फिरत होता.
हा माणूस नेमकं वेगळं काय करतो?
एकदा आम्ही सगळे लोकलने दादरला जात होतो. नेहमीची गर्दी, धक्काबुक्की, आणि मुंबईची पारंपरिक "माणसं कमी, कोडी जास्त" अशी परिस्थिती.
दारात उभा असलेला एक मुलगा सतत मोबाईलमध्ये बघत होता.
समोर बसलेले काका वैतागून म्हणाले,
"आजकालची पोरं मोबाईलशिवाय जगूच शकत नाहीत."
आम्हीही सहज मान डोलावली. तो मात्र खिडकीबाहेर पाहत होता.
काही क्षणांनी तो म्हणाला,
"काका, एक विचारू?"
"विचार."
"तुम्ही रोज पेपर वाचता?"
"हो."
"का?"
काका म्हणाले, "वेळ जातो. माहिती मिळते."
तो हसला.
"त्याचंही तेच असेल."
काका काही बोलले नाहीत.
तो पुढे म्हणाला,
"आपण जे करतो त्याला सवय म्हणतो. दुसरा तेच करतो, त्याला व्यसन."
क्षणभर डब्यात शांतता पसरली. त्या वेळी मला त्याचं वाक्य पूर्ण समजलं नाही. पण त्या रात्री मी स्वतःला पाहिलं. घरी गेल्यावर मीही टीव्हीसमोर बसलो. रिमोट हातात. चॅनेल बदलत राहिलो. अर्धा तास गेला. काहीच निवडलं गेलं नाही. अचानक तो आठवला. माझा रिमोट आणि त्या मुलाचा मोबाईल.
फरक नेमका किती होता?
फक्त स्क्रीनचा.
एकदा मी त्याला थेट विचारलं,
"तुला लोकांच्या चुका इतक्या पटकन कशा दिसतात?"
तो लगेच म्हणाला, "मला चुका दिसत नाहीत."
"मग?"
"गृहितकं दिसतात."
मी काहीच बोललो नाही.
तो म्हणाला,
"प्रत्येक माणूस बोलताना काही गोष्टी न बोलताही गृहीत धरतो. मी त्या शोधतो."
"उदाहरण?"
तो हसला.
"तू आत्ताच म्हणालास, 'लोकांच्या चुका.' त्यात तू गृहीत धरलंस की ते चुकत आहेत. कदाचित त्यांच्याकडे तुला माहिती नसलेली माहिती असेल."
मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. एका साध्या वाक्यात त्याने माझ्या प्रश्नाचाच पाया हलवला होता.
त्या दिवसापासून तो भेटला, की मी मुद्दाम एखादा प्रश्न विचारायचो.
उत्तरासाठी नाही.
तो प्रश्न कसा उलगडतो, हे पाहण्यासाठी.
एकदा मी विचारलं,
"बुद्धिमान माणूस आणि विद्वान माणूस यात फरक काय?"
तो हसला..."खूप."
"विद्वान माणसाकडे उत्तरं जास्त असतात."
"आणि बुद्धिमान?"
"त्याच्याकडे प्रश्न जास्त असतात."
"म्हणजे?"
"उत्तर मिळालं, की प्रवास संपतो. पण चांगला प्रश्न नवीन प्रवास सुरू करतो."
मी पुन्हा विचारलं, "मग शाळा-कॉलेजमध्ये आपल्याला उत्तरं का शिकवतात?"
तो म्हणाला,
"कारण उत्तर तपासणं सोपं असतं. प्रश्न तपासता येत नाही."
त्या दिवशी पहिल्यांदाच मला तो फक्त माणूस वाटला नाही.
तो विचार करण्याची एक वेगळी पद्धत वाटू लागला.
एकदा कुणीतरी त्याला एक अवघड प्रश्न विचारला.
आम्हाला खात्री होती, आता याच्याकडून एखादं भन्नाट उत्तर येणार.
तो शांतपणे म्हणाला, "मला माहिती नाही."
क्षणभर आम्ही सगळे त्याच्याकडे पाहत राहिलो.
मी विचारलं, "तुला माहिती नाही????"
तो हसला.
"का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असलंच पाहिजे का?"
कोणीच बोललं नाही.
तो पुढे म्हणाला,
"नसलेलं ज्ञान दाखवण्यापेक्षा. नसलेलं मान्य करणं स्वस्त पडतं."
पुन्हा थोडा थांबला.
"लोकांना अज्ञानाची भीती वाटते. मला चुकीच्या खात्रीची."
त्या दिवशी मला जाणवलं..
'मला माहिती नाही' हे वाक्य अज्ञानाचं नसतं.
ते प्रामाणिकपणाचं असतं.
तो जगाला उत्तरांनी समजावून घेत नव्हता.
तो प्रश्न बदलून समजून घेत होता.
एक गोष्ट मात्र मला त्याच्याबद्दल कधीच पूर्ण समजली नाही.
तो कोणतंही पुस्तक वाचायचा - इतिहास, विज्ञान, कादंबऱ्या, अर्थशास्त्र, अगदी मुलांच्या गोष्टींची पुस्तकंसुद्धा.
पण कधीच कोणत्याही लेखकाचा भक्त झाला नाही.
एकदा मी विचारलंच,
"तुझा आवडता लेखक कोण?"
तो म्हणाला,
"जो माझ्याशी असहमत असतो."
मी हसलो.
"अरे, आवडता लेखक म्हणजे ज्याचं लिखाण आवडतं तो."
तो म्हणाला,
"म्हणूनच, जो माझ्या विचारांशी कायम सहमत असतो, तो मला काही नवीन देत नाही."
दुसऱ्या दिवशी आम्ही एका पुस्तक प्रदर्शनात गेलो. मी एका स्टॉलवर बराच वेळ पुस्तकं चाळत उभा होतो.
तो मागून म्हणाला,
"घे."
मी म्हणालो, "अजून कुठलं ते ठरवलं नाही."
तो हसला.
"तू पुस्तक निवडत नाही आहेस."
"मग?"
"तू स्वतःचं मत पक्कं करणारा लेखक शोधतो आहेस."
मी दचकून त्याच्याकडे पाहिलं. खरंच... मी ज्या पुस्तकांकडे हात नेत होतो, ती सगळी माझ्या आधीपासूनच्या विचारांना मान्यता देणारी होती. विरोधी मत असलेली पुस्तकं मी उचलतच नव्हतो.
तो म्हणाला,
"आरसा उपयोगाचा असतो. पण खिडकी जास्त उपयोगाची असते."
"म्हणजे?"
"आरशात तू स्वतःला पाहतोस. खिडकीतून जग."
ते वाक्य तेव्हाही लक्षात राहिलं.
आजही आहे.
एकदा मी त्याला जुन्या विषयावर छेडलं.
"अरे, मागच्या वर्षी तर तू याच्या अगदी उलट बोलत होतास."
तो अगदी सहज म्हणाला,
"हो."
"म्हणजे मत बदललं?"
"नवीन माहिती मिळाली म्हणून." तो म्हणाला 
मी काही बोलणार, तोच पुढे म्हणाला,
"मत बदललं नाही तर माहिती शिकायची कशाला?" आणि हसत म्हणाला,
"लोकांना सातत्य आवडतं. मला बरोबर असणं जास्त आवडतं."
एकदा मी त्याला विचारलं,
"तू इतका खात्रीने कसं बोलतोस?"
तो एकदम थांबला.
माझ्याकडे वळून म्हणाला,
"मी?"
"मी तर उलट... कमी खात्रीने बोलतो."
मी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं.
तो म्हणाला, "लोकांना माझी उत्तरं दिसतात. माझ्या शंका दिसत नाहीत. मी बोलायच्या आधी माझ्या डोक्यात माझ्याशीच दहा वेळा वाद झालेला असतो."
मी विचारलं,
"म्हणजे तू स्वतःलाच विरोध करतोस?"
तो हसला...."रोजच."
"का?"
"कारण माझ्या विचारांचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसतो. मीच असतो.
जर मी स्वतःलाच प्रश्न विचारले नाहीत, तर जगाला माझी चूक दाखवण्याची वाट पाहावी लागेल."
त्या दिवशी मला त्याचं सर्वात मोठं रहस्य समजलं.
तो इतरांपेक्षा जास्त हुशार नव्हता.
तो स्वतःच्या विचारांवर सर्वात कमी विश्वास ठेवायचा.
आणि कदाचित खरी बुद्धिमत्ता तिथूनच सुरू होत असावी.
काळ पुढे सरकत गेला.
कट्टा तसाच राहिला. पण आम्ही बदलत गेलो.
कुणाच्या मुलाचं लग्न झालं. कुणी व्यवसायात अडकलं. कुणी शहर सोडलं. भेटी कमी होत गेल्या.
आणि एक दिवस लक्षात आलं. 
तोही बरेच दिवस दिसला नव्हता. मी शोधायचा प्रयत्न केला.
गण्याला विचारलं. अज्याला विचारलं.
कोणालाच ठाऊक नव्हतं.
कुठे गेला...का गेला...
काहीच माहिती नव्हतं.
आश्चर्य म्हणजे मला त्याचं वाईट वाटलं नाही.
कारण तो माणूस हरवला नव्हता.
तो आमच्या विचारात राहिला होता.
परवा ऑफिसमध्ये एक मुलगा आला. घाबरलेला.
त्याच्याकडून मोठी चूक झाली होती.
तो बोलायच्या आधीच माझ्या डोक्यात उत्तर तयार झालं होतं.
"बेजबाबदार आहे."
इतक्यात कुठूनतरी त्याचा आवाज कानात आला.
"पहिला विचार. हा बहुतेक वेळा सवयीचा असतो."
मी काही क्षण काहीच बोललो नाही.
मग त्या मुलाला विचारलं,
"नेमकं काय झालं?"
दहा मिनिटांनी सगळं चित्र बदललं. चूक त्याची नव्हती. सूचना अपुऱ्या होत्या.
मी खुर्चीत रेलून बसलो. नकळत हसू आलं.
मनात एकच विचार आला...
"अरे...आज मी त्याच्यासारखा विचार केला."
घरी येताना अचानक लक्षात आलं. इतकी वर्षं मी समजत होतो, तो मला उत्तरं शिकवत होता. पण खरं तसं नव्हतंच. तो मला उत्तरं देत नव्हता. तो माझ्या डोक्यातल्या घाईला ब्रेक लावत होता.
तो शिकवत होता. प्रत्येक उत्तराच्या आधी एक चांगला प्रश्न असतो.
आणि प्रत्येक प्रश्नाच्या आधी एक गृहितक.
ते गृहितक तपासलं की अनेक प्रश्न विरघळून जातात.
आणि गंमत म्हणजे बहुतेक वेळा उत्तर तिथेच सापडतं.
तो माझ्या आयुष्यातला सर्वात हुशार माणूस होता का? मला माहिती नाही.
पण इतकं नक्की ‌‌त्याने कधीच काय विचार करायचं ते शिकवलं नाही.
कसा विचार करायचा, ते शिकवलं. आणि माणूस जेव्हा स्वतः विचार करायला शिकतो तेव्हा 
त्याला गुरूची गरज राहत नाही पण गुरू आयुष्यभर आठवत राहतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...