बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3172. घरोंदा

     आज सकाळपासूनच सविता चिडलेली होती. एकतर पहाटेपासून लाईट गेलेली. त्यात पावसाची रिपरिप. वैतागून ती उठली आणि किचनमध्ये चहा करायला आली. अजून डोळ्यावरची झापड तशीच होती आणि त्यामुळंच की काय कधी नव्हे ती डायनिंग टेबलच्या पायाला अडखळून जोरात ठेचकाळली.
"आई ग..." सविता मोठ्याने ओरडली. वन बीएचकेच्या फ्लॅटमधल्या दहा बाय दहाच्या त्या किचनमध्ये डायनिंग टेबलसकट सगळ्या वस्तू ओटा, फ्रीज, भांडी ठेवायची रॅकस..त्या एवढ्याशा जागेत एडजेस्ट केलेल्या होत्या.
"काय झालं..?" किरण अर्धवट झोपेत जागा होऊन बेडरूममधून  धावत आला.
"काय झालं काय. बघ डायनिंग टेबलचा पाय किती जोरात लागलाय." खुर्चीवर बसून पायाचा अंगठा बोटाने दाबत ती म्हणाली.
"आणि  या एवढ्याशा किचनमध्ये लागणार नाही तर काय होणार. वर्ष झालं मी सांगतेय मोठा फ्लॅट घे म्हणून. किरण मी तुला आताच सांगते मला आजच्या आज आपला टू  बी एच के घेण्याबद्दलचा निर्णय हवाय. आज मी  तुझं काहीही ऐकून घेणार नाही. आज जर टू बीएचके बुक करायचं ठरवलं नाहीस तर मी या फ्लॅटमध्ये राहणार नाही. सांगून ठेवते."
"सविता प्लीज तू जरा शांत हो. रक्त तर येत नाही ना? " किरण तिच्या लागलेल्या अंगठ्याकडे पहात म्हणाला.
"मी चहा करतो तुझ्यासाठी. "
" काहीं नको मला चहा बिहा..! मला आधी फ्लॅटचं काय करणार ते सांग.." सविता फणकारली.
    मागची दिड दोन वर्षे सविता आणि किरण यांच्यात या विषयावरून नेहमीच वादावादी आणि किरकोळ भांडण होत होती. पण आज पहिल्यांदाच सवितानं घर सोडण्याची भाषा केली होती. सविता आणि किरणचं लग्न होऊन तीन वर्षे झाली होती. किरण एका छोट्याश्या कंपनीत इंजिनिअर होता आणि लग्न झाल्यावर, तिथं मिळणाऱ्या जेमतेम पगारात बॅंकेचं कर्ज काढून त्यानं हा वन बीएचके फ्लॅट घेतला होता. नव्या नवलाईचं पहिलं वर्ष कसं आनंदात गेलं कळलं नाही आणि मग सविताची फ्लॅट लहान आहे मोठा घेऊयात ही किरणच्या मागे भुणभुण सुरु झाली. असा एकही महिना गेला नसेल की त्यावरून त्या दोघांमध्ये वाद विवाद झाला नाही. कधी कधी तर ती चिडून रात्री न जेवताचं बेडरूम मध्ये निघून जायची..! आणि आज सकाळी सकाळीच पुन्हा  एकदा तिच्या पायाला लागल्यामुळे ही वादावादी सुरू झाली होती.
 "सविता..अग ह्या विषयावर आपण सारखं सारखं कितीवेळा वाद घालायचे." किरण समजावणीच्या सुरात म्हणाला.. 
"मला टू बीएचके घ्यायला नको वाटत का? पण आधीच  वन बीएचकेचा इ एम आय भरता भरता आपण मेटाकुटीला आलोय आणि  मग टू बीएचके चा वाढणारा हप्ता आपणं कोठून भरायचा? "
 "किरण मी तुला मार्ग सांगितलाय. तू गावाकडचं आपलं मोठं घर विक. पैशाचा प्रॉब्लेम लगेच सुटेल. आईबाबांची आपण दुसरीकडे व्यवस्था करू..! "
"हे बघ सविता. स्वतःच घर विकून मी आईबाबांना काहीही झालं तरी भाड्याच्या घरात ठेवणार नाही..!"  किरणनं निक्षून सांगितलं
"ओके. हे तुझं फायनल ठरलं असेल तर मी आज घर सोडतेय. मला या खुराड्यात रहायची आणि पाय तोडून घ्यायची अजिबात इच्छा नाही. तुझा निर्णय जर बदललास तर मला फोन कर. आय एम गोईंग नाऊ..! "
सवितानं बेडरुममध्ये जाऊन आपली सॅक भरली आणि किरण काहीं बोलायच्या आत मेन डोअर उघडून ती बाहेर पडली. किरण सुन्न होऊन तिच्याकडे पहात राहिला..!
     सविता बाहेर पडलीय खरी. पण कुठे जायचं हे तिनं निश्चित ठरवलं नव्हतं. कोल्हापूरला आई बाबाकडे ती जाणार होती पण ते बद्रिनाथ केदारनाथ यात्रेला गेले होते आणि आणखी तीन दिवसानी परत येणार होती. त्यामुळं दोन तीन दिवस दुसरीकडे कुठेतरी राहणं भाग होतं. मोठा भाऊ अविनाश पुण्यातच रहात होता पण आज त्याच्याकडे जायची तिची इच्छा नव्हती. ह्याआधी दोन वेळा ती भावाकडे रहायला गेली होती पण तिचं मनापासून स्वागत झालं नव्हतं. प्रत्येक वेळी तिची जागेबद्दलची तक्रार अविनाशला काहीं फारशी आवडली नव्हती आणि तिला अचानक स्वानंदी पुण्यात आहे याची आठवण झाली. स्वानंदी...! तिची शाळेतली जिवाभावाची मैत्रीण..! दोघीही सिनीयर केजी ते दहावीपर्यंत एकाच शाळेत एकाच वर्गात शिकलेल्या. असं असलं तरी दोघींमध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. स्वानंदी शांत समाधानी तर सविता बंडखोर चिडक्या स्वभावाची. सविताचे बाबा माध्यमिक शाळेत शिक्षक तर स्वानंदीचे पप्पा एका कॉर्पोरेट हाऊसचे एमडी..! पण त्या दोघींना गाण्यानं संगीतानं एकत्र आणलं होती. दोघींनी मिळून शाळेत गाण्याच्या अनेक स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवली होती. अख्खी शाळा त्या दोघींना 'सिता और गिता म्हणून चिडवायची..! 
     शाळा संपली आणि दोघींचे रस्ते वेगवेगळे झाले. मार्ग बदलले. सविताचे बाबा कोल्हापूरला स्थायिक झाले तर स्वानंदीनं आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध एका संगीत शिक्षकाशी प्रेमविवाह केला आणि ती पुण्याला गेली आणि स्वानंदीच्या चिडलेल्या वडिलांनी तिच्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले होते..! लग्नानंतर दोघींचे तसे कॉंन्टॅक्ट राहिले नव्हते. सवितानं  आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिच्याकडून स्वानंदीचा पत्ता  मिळवला आणि ती तिच्या घरी पोहोचली..!  स्वानंदीचा फ्लॅट शनिवार पेठेतल्या एका जुन्या अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर होता.  एका करोडपतीच्या मुलीला लग्नानंतर एका रंग उडालेल्या जुन्या अपार्टमेंटमध्ये रहाण्याची वेळ आली होती. लिफ्ट नसल्यामुळे जिन्याने वर चढता चढता सविताच्या मनात विचार येऊन गेला. सवितानं दारावरची बेल दाबली आणि स्वानंदीनं दार उघडलं.
"कोण सवी..! हाऊ सरप्राइजींग..!! आणि अशी अचानक कशी काय आलीस.." स्वानंदीनं तिला मिठी मारत म्हटलं. "ये ना आत ये.." स्वानंदी प्रसन्नपणे म्हणाली. 
  आपल्या अतिश्रीमंत वडिलांच्या सहा बेडरूमच्या बंगल्यातला ऐष आराम सोडून लहानशा जुनाट फ्लॅटमध्ये राहणाऱ्या स्वानंदीच्या चेहऱ्यावरची ती प्रसन्नता पाहून सविताला मनातल्या मनात आश्चर्य वाटलं..! स्वानंदीनं तिचा हात हातात घेऊन हॉलमधल्या एका खुर्चीवर बसवलं.
"आले हं पाणी आणते एक मिनिटात " असं म्हणून ती आत गेली.    
     सवितानं आपली नजर सगळीकडे फिरवली. बाहेर दिसलेला जुनाटपणा आणि कळकटपणाचा आत कुठेही मागमूस नव्हता. छोट्याशा सेंटर टेबलावर ठेवलेल्या बाऊलमधल्या मोगऱ्याच्या सौम्य सुगंधानं घरातल्या वातावरणात प्रसन्नता आलेली होती आणि आकाशी आणि माईल्ड सिल्व्हर कलरची रंगसंगती त्या छोट्याशा हॉलची सात्विकता वाढवत होती. भारतीय बैठक आणि लोडवर तशाच रंगाचे स्वच्छ कव्हर आणि समोरच्या कोपऱ्यात उभी  केलेली सतार ह्यामुळे त्या  हॉलमध्ये एक वेगळाच फील जाणवत होता. सविताला आपल्या हॉलमधला सेंटर टेबल आठवला. मागचे तीन महिने तो हॉलच्या उजव्या कोपऱ्यात पडला होता आणि तीन महिन्यापुर्वी त्यावर घातलेला टेबलक्लॉथ धुळकट होऊन पडलेला होता. मनातल्या मनात तिला काहींस ओशाळ वाटलं. इतक्यात पाणी आणि चहाचे मग घेऊन स्वानंद आली.
 "घर छान ठेवलयं ग." सवितानं कौतुक केलं. 
 पण वडिलांच्या सहा बेडरूमच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहणारी तू. आता एवढ्या लहान फ्लॅट तुला अडचण नाही वाटत?" चहाचा घोट घेता घेता सविता म्हणाली.
 "अडचण..! कसली अडचण? अडचण आपल्या मनात असते. घरात नसते..! 
अग. सहा बेडरूमचं असलं तरी ते पप्पांचा घर होतं. हे माझं घर आहे आणि कोणतीही गोष्ट आपली म्हणून मनापासून स्विकारली की  त्यातला उणेपणा जाणवेनासा होतो आणि  त्याचा  आनंद घेता येतो आणि तो कसा घ्यायचा हे आपल्या हातात असतं. मग ती गोष्ट लहान असो की मोठी..!!" 
"सप्तसुरात जेवढं महत्त्व वरच्या 'सा'च आहे तेवढंच खालच्या 'सा'च पण आहे किंबहुना जास्तचं आणि एकदा खालचा 'सा' नीट लागला की बाकीचे सूर आपोआप जमायला लागतात..!
स्वानंदीनं एक वेगळंच लॉजिक तिला आज सांगितलं होतं.
"चल तुला घर दाखवते." आणि सविताचा हात धरून तिला उठवलं.
      तसा सविताच्या फ्लॅट एवढाच तो फ्लॅट होता. थोडासा लहानही असेल. पण प्रत्येक वस्तूची आकर्षक मांडणी आणि स्वच्छता यामुळं त्या छोट्या खोल्याही मोठ्या वाटत होत्या. 
"बेडरूम लहान आहे ना. म्हणून मग मी मुद्दाम सोफा कम बेड घेतलाय त्यामुळं दुपारी किंवा इतरवेळी ती जागा वापरता येते."
"आणि सवि.. आज माझ्याकडेच रहायचंय.. आत्ताच नवऱ्याला सांगून टाक उद्या येते म्हणून.."
"अग.. पण तुझं बेडरुम...."
" मला माहीत आहे तू काय म्हणणार ते." स्वानंदीनं तिचं वाक्य तोडत म्हणाली.
"काहीं काळजी करू नकोस. माझा नवरा आणि छोटी मिनल बेडवर झोपतील. आपण मस्तपैकी  गाद्या टाकून हॉलमध्ये  झोपूयात. रात्री निवांत गप्पा मारता येतील..!" 
   स्वानंदीच्या बोलण्यातून उत्साह आणि आनंद ओसंडत होता..! आठ बाय आठच्या मास्टरबेडवर झोपणारी स्वानंदी जमिनीवर झोपण्यात आनंद मानत होती आणि आपण किरणला बेडवरच्या असलेली नवीन गादी काढून 'स्लीपवेल'ची महागडी गादी घ्यायला लावली होती. सविताला आता त्याचं वैषम्य वाटायला लागलं होतं. आपल्या वागण्यातला, विचारातला पोकळपणा दांभिकपणा तिला तीव्रतेने जाणवायला लागला होता. तिच्या मनावरची जळमट गळून पडली होती..! आणि तिला स्वानंदीचं मघाचं वाक्य आठवलं. अडचण ही मनात असते घरात नाही ! 
झटक्यात ती उठली आणि लागूनच असलेल्या छोट्या बाल्कनीत जाऊन तिनं किरणला फोन लावला..
"किरण.. सॉरी.. रिअली सॉरी. सकाळी रागारागाने तुला न सांगताच मी निघून आले..माझं चुकलं. मी तसं करायला नको होतं.. मी इकडे माझ्या मैत्रीणीकडे. स्वानंदीकडे आलेय. सकाळी येते..परत एकदा सॉरी..आय लव्ह यु..!" 
      सकाळी सवितानं आपल्या दारावरची बेल वाजवली. किरणनं दार उघडलं. क्षणभरच ती त्याला बिलगली आणि घरात घुसली. तिनं समोरच्या बाल्कनीचं दार उघडलं आणि वाऱ्याबरोबर घरात आलेला बाहेरच्या पारिजाताचा सुवास तिला आज पहिल्यांदाच जाणवला. तिचा 'संखेडा' चा देखणा सोफा तिला आज जास्तच सुंदर दिसायला लागला..!! कोपऱ्यात गेलेलं सेंटर टेबल तिन मध्ये आणलं आणि वरचा टेबलक्लॉथ काढून टाकला.
    आश्चर्यानं तिच्या कडे पहात उभ्या असलेल्या किरणचा हात हातात घेऊन ती सोफ्यावर बसली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवुन तिनं आपल्या इतका वेळ आवरलेल्या  अश्रूंना  वाट करून दिली..!!

 कृष्णकेशव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...