बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3104. रक्ताचं नाही... ऋणानुबंधाचं नातं

      मेहेंदळे कुटुंबाचं घर त्या दिवसांत आनंदाने फुलून गेलं होतं. अंगणात रांगोळ्या उमटत होत्या, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लग्नाच्या तयारीची लगबग दिसत होती. कुठे पाहुण्यांची व्यवस्था सुरू होती, कुठे खरेदीची धावपळ होती, तर कुठे लग्नाच्या पदार्थांचा सुगंध दरवळत होता. कारण घरची लेक मोनिकाचं लग्न होतं. या सगळ्या आनंदाच्या सोहळ्याची एक मजबूत धुरा मात्र एक मुलगी शांतपणे सांभाळत होती. कधी मेहंदीवाल्याला सूचना देत होती, कधी संगीताच्या कार्यक्रमाची तयारी पाहत होती, कधी सजावटीकडे लक्ष देत होती, तर कधी ताईच्या कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट तपासत होती. ती होती मोहिनी.
      नात्याने ती मोनिकाची चुलत बहीण होती, पण मनाने तिची सख्खी बहीण होती. या घरात "चुलत" आणि "सख्खं" यामध्ये कधी फरक केला गेला नव्हता. कारण या घरात नाती रक्ताने नाही, तर प्रेमाने मोठी होत होती. मोहिनी कितीही मोठी झाली, कितीही शिकली, नोकरीला लागली तरी मोनिकासाठी ती अजूनही तीच लहानशी मोहिनी होती. ताईचं लग्न म्हणजे तिच्यासाठी स्वप्न होतं. मेहंदीचा रंग ताईच्या हातावर खुलावा, संगीताची संध्याकाळ आठवणीत राहावी, सजावट पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद यावा, मेनूपासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट सुंदर असावी, यासाठी ती मनापासून प्रयत्न करत होती. लग्नाच्या सामानाच्या प्रत्येक बॅगवर आत काय आहे याची यादी लावलेली होती. कारण लग्नाच्या गडबडीत कुणालाही काही शोधताना त्रास होऊ नये, ही तिची काळजी होती. आत्या, मावशी, काका, मामा, दादा, वहिनी — सगळ्यांना तिने कामं वाटून दिली होती. सगळ्यांसाठी ती लग्नाची जबाबदार मुलगी होती, पण मोनिकासाठी ती फक्त तिची हक्काची छोटी बहीण होती.
     मोनिका सासरी जाणार होती, ही कल्पना मोहिनीच्या मनाला हळवं करून जायची. म्हणूनच तिने ताईच्या सासरी जाऊन तिथलं घर, तिथली माणसं आणि वातावरण समजून घेतलं. तिला फक्त लग्न पार पाडायचं नव्हतं, तर तिची ताई तिथे सुखी राहील याची खात्री करायची होती.
अंबाबाईसमोर हात जोडून ती मनात म्हणाली, 
"आई, माझी ताई खूप सहनशील आहे, खूप प्रेमळ आहे. तिने आयुष्यभर सगळ्यांना जपलं आहे. आता तिच्या वाट्याला प्रेमाची सावली दे."
       पण प्रत्येक आनंदाच्या सोहळ्यात एक सावली येतेच. लग्नाच्या तयारीत थोरल्या आत्याबाई आल्या. नात्याने त्या घरच्याच होत्या, म्हणून सगळे त्यांचा मान ठेवत होते. पण त्यांचा स्वभाव थोडा वेगळा होता. प्रत्येक गोष्टीत उणिवा शोधणं, जुन्या काळाशी तुलना करणं आणि दुसऱ्यांच्या आनंदातही काहीतरी कमी शोधणं हा त्यांचा स्वभाव होता. मोहिनीने केलेली तयारी पाहूनही त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द आले नाहीत. "एवढा खर्च कशाला?", "आमच्या वेळी असं काही नव्हतं", "आजकालच्या मुलींच्या हौशीच वेगळ्या," असे शब्द त्या बोलून जायच्या.आत्याबाईंच्या मनातला त्रास फक्त लग्नाच्या तयारीपुरता नव्हता. मोहिनीचं वाढतं सौंदर्य, तिचं शिक्षण, तिचा आत्मविश्वास आणि या घरात तिला मिळणारं प्रेम त्यांना सतत टोचत होतं.
त्यांच्या मनात एक प्रश्न होता - "आपलं लेकरू नसताना हे लोक मोहिनीला एवढं का जपतात?"
या प्रश्नामागे एक मोठं सत्य दडलं होतं.
       मोहिनी माधुरी आई आणि माधव बाबांची जन्मलेली मुलगी नव्हती. ती त्यांच्या जिवलग मित्राची मुलगी होती. नियतीच्या एका कठोर आघातात तिचे जन्मदाते आई-वडील गेले आणि अवघ्या दोन वर्षांच्या त्या चिमुकल्या जीवाला माधुरी आणि माधव यांनी आपल्या कुशीत घेतलं. लग्नाच्या गडबडीत काही दागिने राहिले म्हणून आत्याबाईंनी मोहिनीला घरी पाठवलं. तिच्यासोबत सतीश होता. तो आत्याबाईंचा मुलगा होता, पण त्याच्या मनात आईसारखा मत्सर नव्हता. त्याला सत्य माहिती होतं आणि मोहिनीला दुखापत होऊ नये असंच त्याला वाटत होतं. लॉकर उघडताना मोहिनीच्या हाताला एक जुना कागद लागला. तिने तो उघडला आणि तिच्या डोळ्यांसमोरचं जग काही क्षणांसाठी थांबलं. ते तिचं जन्मप्रमाणपत्र होतं. क्षणभर तिच्या मनात वादळ उठलं.
"मग मी कोण?" "माझं खरं घर कोणतं?"
पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात माधुरी आईचा प्रेमळ स्पर्श आला, माधव बाबांचा आधार आठवला. तिच्या आजारपणात जागलेल्या रात्री, तिच्या छोट्या यशात आनंदाने भरून आलेले त्यांचे डोळे - सगळं तिच्या डोळ्यांसमोर आलं आणि तिला उत्तर मिळालं.
जन्म देणं ही एक गोष्ट आहे, पण आयुष्यभर प्रेमाने घडवणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे.
जसं कृष्ण देवकीचा पुत्र होता, पण यशोदेच्या मायेने त्याचं बालपण फुललं होतं. तसंच काही नाती रक्ताने नाही, तर सहवासाने आणि प्रेमाने मोठी होतात. मोहिनीने डोळे पुसले आणि मनाशी ठरवलं - हे सत्य ती आई-बाबांना कधीच कळू देणार नाही. कारण ज्यांनी तिला आयुष्यभर मुलीसारखं प्रेम दिलं, त्यांच्या मनाला कधीही दुःख द्यायचं नव्हतं. 
      त्या दिवसानंतर मोहिनी बदलली. पूर्वीची लाडकी, हट्टी, रुसणारी मोहिनी आता शांत, समजूतदार आणि जबाबदार झाली. ती माधुरी आई आणि माधव बाबांसारखीच विचार करू लागली. चांगल्या कंपनीत नोकरी असल्यामुळे तिचा पगारही चांगला होता. पूर्वी मैत्रिणींसोबत फिरणं, शॉपिंग करणं, स्वतःच्या आवडींसाठी खर्च करणारी मोहिनी आता बचत करू लागली.तिने स्वतःच्या भविष्यासाठी तर बचत केलीच, पण कुणालाही न सांगता घरातील प्रत्येकासाठी एफडी करून ठेवल्या. माधुरी आई, माधव बाबा, काका-काकू, ताई-वहिनी - प्रत्येकासाठी तिच्या मनात एक प्रेमाची छोटीशी ठेव होती. ती एफडी म्हणजे फक्त पैसा नव्हता. ती तिच्या मनातील कृतज्ञता होती. तिला माहीत होतं की या घराचं ऋण कधीच फेडता येणार नाही. पण या घराने दिलेल्या प्रेमाची सावली आयुष्यभर जपता येईल. तिच्या हातातील पदार्थांमध्येही आता माधुरी आई, काकू, ताई आणि वहिनींच्या हातचीच चव उतरली होती. कारण चव फक्त मसाल्यांची नसते; ती प्रेमाची आणि संस्कारांची असते.
ज्या घरात आपण प्रेमाने वाढतो, त्या घराची ओळख आपल्या प्रत्येक कृतीत उतरते.
आणि म्हणूनच मोहिनी आता फक्त माधुरी आणि माधव यांची मुलगी नव्हती.
ती त्यांच्या प्रेमाची ओळख झाली होती.
आत्याबाईंनी एका क्षणाच्या मत्सरातून एक सत्य बाहेर आणलं होतं. पण त्या सत्याने मोहिनी तुटली नाही. उलट ती आणखी मजबूत झाली. तिने आत्याबाईंना हरवलं नाही. तिने त्यांना आपल्या प्रेमाने, संयमाने आणि संस्कारांनी जिंकलं. कारण शेवटी.
रक्ताची नाती जन्म देतात, पण ऋणानुबंधाची नाती आयुष्य घडवतात.


मानसी दत्त्ता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...