बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3183. पंखा

     रजनी बाजारातून घरी आली. रणरणत्या उन्हातून आणि प्रचंड गर्दीतून बाहेर पडल्यावर तिनं मोकळा श्वास घेतला. दोन मिनिटं हॅाल मधील कोचावर बसली. कोचावर मान मागे टाकताच तिला छतावरील पंखा दिसला.  याच पंख्यानं तिचं आयुष्य भकास करून टाकलं होतं. तिनं टिपॅाय वर ठेवलेला कॅंडल होल्डर तिरमिरीनं पंख्याकडे भिरकावला. टणाण टण असा आवाज करत कॅंडल होल्डर पंख्याला आपटून खाली पडला. त्या आवाजाने अन्वय धावत बाहेर आला व त्याने आईला मिठी मारली. बाबा गेल्यापासून आठ वर्षांचा अन्वय अचानक प्रौढ झाला होता. अमोल असं काही करेल हे तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. ॲाफिसच्या कामाचा खूप ताण होता पण त्याची त्याला सवय झाली आहे असं वाटलं होतं. लग्नाला दहा वर्षं झाली होती. लग्न छान मुरलं होतं. अन्वय सारखा गोड मुलगा होता. एकंदरीत संसार ठीक चालला होता. पण एक दिवस ती कामाहून घरी आली आणि समोरचं दृश्य बघून जागच्या जागीच थिजून गेली. गेले सहा महिने ती त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. सांत्वनाला आलेले लोक जखमेवर मलम न लावता ती खोल करून जात होते. 
तुला काहीच कल्पना नव्हती का? 
डिप्रेशन होतं का?
बाहेर काही..
काय देणार उत्तरं या प्रश्नांची? 
आपण रोज ज्याच्याबरोबर राहिलो त्याच्या डोक्यातील वादळ आपल्याला दिसलं नाही याचा आधीच पश्चाताप होता. आपलं व अन्वयचं पुढे काय होईल हा विचार त्यानं केला नाही हा राग होता.
अन्वयनं पंखा लावला. 
वाऱ्याने क्षणभर बरं वाटलं पण तो नतद्रष्ट पंखा बंद करून ती उठली. 
घोटभर पाणी पिऊन अन्वय जवळ बसली. 
दोन दिवसांनी तिची जिवलग मैत्रीण अनु येणार होती. अनुचा भरलेला संसार बघून आपल्याला त्रास होईल पण तो दाखवायचा नाही याची तिनं स्वतःला आठवण करून दिली. अनु आली व येताच तिनं तिला घट्ट मिठी मारली. तिला खूप बरं वाटलं. गोरीपान व स्थूल चण असलेली अनु छान दिसत होती. किती नशीबवान असतात काही लोकं..हे मनात येऊन गेलच. तिचा लेक, विनय, फार्मसी करत होता. नवरा, सतीश, डॅाक्टर होता व अनु शिक्षिका होती. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व अनुनं विषयाला हात घातला..
“काय कारण होतं अमोलचं असं करण्याचं? कळलं काही?”
रजनीने नकारार्थी मान हलवली. “हे झालं त्यापूर्वी महिनाभर तो फार गप्प गप्प आहे हे जाणवत होतं. विचारलं की काही नाही.. कामाचं टेंशन आहे.. एवढचं म्हणायचा.
“तू कशी आहेस?”
“मी ठीक. माझं जाऊदे. अमोल जाऊन सहा महिने होऊन गेलेत. का झालं, कसं झालं याचा कितीही विचार केलास तरी तो परत येणार नाही. पण रजनी जगात कित्येक लोक आहेत जे आयुष्याचं ओझं न पेलल्यामुळे याच मार्गाकडे जात आहेत. त्यांना कोणाच्यातरी मदतीची जरूर आहे. नाते संबंधात आलेली दरार, परीक्षेतील अपयश, प्रेमभंग अशा कित्येक प्रसंगी माणसं कोलमडून पडतात. त्यांना आधार हवा असतो. अशा अनेक व्यक्तींना मदत करूनच तुझं दु:ख हलकं होईल.. 
आमच्या “धैर्य” या केंद्राला तुझी गरज आहे.
“अनु, नाही मला करायचं कुणाचं कल्याण. माझ्या आयुष्याचं मातेरं झालंय आणि आता मी दुसऱ्यांची आयुष्य सुधारू? कुठून आणू ही शक्ती? तुझं सगळं उत्तम चाललंय म्हणून तुला समाजसेवा सुचतेय.“ रजनी हातातील रूमालाचा पीळ वाढवत खाली बघू लागली.
“रजनी, आपण एकटेच दु:खात आहोत आणि सारं जग कसं आनंदात लोळतय असं माणसाला नेहमीच वाटतं. खरंतर बोलणार नव्हते पण हे बघ.
तिनं अत्यंत हडकुळ्या झालेल्या विनयचा फोटो दाखवला. बारावीत मार्क पडले नाहीत. मेडिकल हुकलं. फार्मसीला ॲडमिशन मिळाली पण एवढं डिप्रेशन आलं. त्यात अमली पदार्थ व नशेची सवय लागली. आम्हाला पत्ता लागू दिला नाही त्यानं सुरवातीस. आता ट्रिटमेंट सुरू आहे.”अनुच्या हातातील फोटो बघून रजनी चपापली.
“अग, मुलाकडे लक्ष द्यायचं सोडून मला मदत करायला का आली आहेस? एवढं होईपर्यंत कळलं नाही?” तिनं जीभ चावली. नाही कळत इतरांच्या मनातील वादळं. कळलं असतं तर अमोल.
“चल मला विनयकडे घेऊन चल. तरणाताठा मुलगा. असं हात पाय गाळून कसं चालेल? रजनी मावशीचं सगळं ऐकतो तो. मी बोलेन त्याच्याशी.” तिनं पर्स उचलली.
“जाणारा निघून जातो रजनी. पण ज्या दु:खानं त्याला हे टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं ते दु:ख जगातून जात नाही. ते नवीन सावज शोधत हिंडत राहतं. तू बोल विनयशी. कदाचित ऐकेल तुझं !” अनुनं पर्स उचलली. 
रजनीनं विनयचा फोटो पुन्हा हातात घेतला. त्या हडकुळ्या चेहऱ्यात एकदम तिला अमोल दिसला. मदतीची हाक देण्याआधीच खुर्चीवर चढलेला, पंख्याला दोर बांधलेला अमोल. आणि त्याच्यासमोर उभी असलेली, काहीच न ओळखणारी स्वतःची प्रतिमा.
तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
“चल अनु... विनयला भेटूया.”
रजनी पदर खोचून उठली.
दारातून बाहेर पडताना तिची नजर पुन्हा छतावरील पंख्याकडे गेली. सहा महिन्यांपासून ज्याच्याकडे पाहिलं की तिच्या मनात रागाची ठिणगी पडत होती, त्याच पंख्याकडे आज ती शांतपणे पाहत होती. पंख्याची काय चूक होती? दोष त्या वादळाचा होता, जे तिला कधी दिसलं नाही. दिसलं असतं तर भगीरथ प्रयत्न करून तिनं ते शमवण्याचा प्रयत्न केला असता. तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि ती अनुबरोबर बाहेर पडली. गाडीत बसताच अनुनं तिच्या खांद्यावर थोपटलं..
“रजनी..गौतम बुद्धांकडे एक बाई रडत आली. तिचा आठ वर्षांचा मुलगा अचानक गेला. त्याचं कलेवर घेऊन ती रडत, ओरडत, भेलकांडत बुध्दांसमोर येऊन बसली व म्हणाली, 
“माझ्या मुलाला जिवंत करा. नाहीतर स्वतःला बुध्द म्हणवून घेऊ नका..”
बुध्द म्हणाले, “करतो पण प्रथम तू मला मुठभर तांदूळ आणून दे अशा घरातून जिथं आजवर मृत्यू झालेला नाही. मग मी त्याला जिवंत करेन.”
ती दारोदार भटकत राहिली पण मृत्यू न झालेले एकही घर तिला सापडले नाही. ती हताश होऊन बुध्दांसमोर येऊन बसली. बुध्दांनी आपले अर्धोन्मिलित नेत्र उघडले व ते बोलले,
”आता  गावातील एखादा आठ वर्षांचा मुलगा शोध जो आईविना एकटा आहे व त्याला आईचं प्रेम दे म्हणजे तुला तुझा मुलगा मिळेल !”
अनु बोलायची थांबली. 
रजनीने डोळे पुसत होकारार्थी मान हलवली..
स्वत:ला माफ करत..
पंख्याला माफ करत..
इतर मनातील वादळं शमविण्यासाठी ती पदर खोचून सज्ज झाली.
अमोलला शोधण्यासाठी !

©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved.
☘️*आपल्या परिचयातील सर्वांना नक्कीच फॉरवर्ड करा*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...