"एक तास जरी तू हिच्यासोबत राहिलास आणि व्यवस्थित घालवलास नां, तरी मी तुला मानेन."
तावातावाने ' तो ' आपल्या भावाला सांगत होता. आणि ' तो ' जिच्याबद्दल बोलत होता. ती मात्र गलितगात्र, शून्यात नजर लावून बसलेली, थकलेली. तिची ती असहाय अवस्था पाहून त्या ऐकणाऱ्या भावाचा जीव गलबलून जातो. काय बोलावं तेच त्याला सुचत नाही. 'माझी आई अशी कधीच नव्हती.ती तर कणखर स्वभावाची होती.स्वतः गाडी चालवत मुलांना शाळेत नेणारी,तरणतलावात मुलांबरोबर पोहणारी, एकट्याने दहा बारा जणांचा स्वयंपाक करणारी. आज काय तिची अवस्था झालीय. पोटचा मुलगा तिच्याबद्दल एवढ्या तिरस्काराने बोलतोय आणि ती. ती चूपचाप बसून ऐकतेयं.' तो अस्वस्थ होतो. आणि आईला आपल्या सोबत घेऊन भावाकडून बाहेर पडतो.
तिला घरी आणल्यावर तो आपल्या डाॅक्टर मित्राकडून तिची पूर्ण शारीरिक तपासणी करून घेतो आणि त्याला दुसरा धक्का बसतो. मित्र सांगतो, आईं कंपवात ,डिमेन्शिया आणि अल्झायमरची शिकार झालीयं. ते ऐकून तर तो हबकून जातो. पण पुढे डाॅक्टर मित्र या रोगांना औषधच नाही हे सांगतो तेव्हा तर त्याच्या पायाखालची वाळूच सरकते. असं कसं औषध नाही? रोगावर औषध नाही असं कसं होऊ शकतं? मग बाकीचं आयुष्य आईने असंच घालवायचं. अस्संच विस्मरणाच्या गर्तेत? हे तर मग जिवंतपणीच मरणं झालं !
नाही.मी माझ्या आईला असं जगू देणार नाही. मी तिला बरं करेन.वाट्टेल ते करावं लागलं तरी. कितीही वेळ लागो,कितीही पैसा लागो. माझा हा जो हाॅटेल व्यवसाय आहे ना,तो थोडे दिवस बाजूला ठेवीन.पण आईला बरं करीनच!
तो ठाम निश्चय करतो आणि मग सुरू होते एका मुलाची आईला व्याधींतून मुक्त करणारी लढाई.
यातील ' तो ' आहे सुप्रसिद्ध हॉटेलियर विठ्ठल कामत आणि जिच्यासाठी ते जीवाची बाजी लावत आहे ती आहे त्यांची आई इंदिरा व्यंकटेश कामत.
आणि या आपल्या लढ्याची अनोखी कहाणी सांगितली आहे विठ्ठल कामतांनी आपल्या ' यश, अपयश आणि मी ' या 📖पुस्तकात.
अल्झायमर, डिमेंशिया आणि कंपवात यांच्याशी कामतांची लढाई सुरू झाली तेव्हा कामतांचं वय होतं ६५ तर आईचं वय होतं ८५.
काय असतो हा रोग ?
मेंदूच्या काही पेशी काम करेनाशा झाल्या की मेंदूची कार्यक्षमता कमी कमी होत जाते आणि स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो.अल्झायमरची सुरुवात असते ती. घरातल्यांच्या ती लक्षात येते. ती व्यक्ती रोजची आपली दिनचर्या करायला विसरते किंवा ती केल्यानंतर पण पुन्हा करू पाहते.
माणूस एकाकी पडू लागला की तो स्वतःशीच मग बोलू लागतो विचारांमधली सुसूत्रता हरवते. हा डिमेन्शिया झाल्याचा परिणाम असतो.
कंपवात झाला की कोणतीही वस्तू घेण्यासाठी हात पुढे केला की तो थरथरू लागतो.
कामत आपल्या आईंना त्यांच्या पार्ले येथील विमानतळाच्या बाजूला असलेल्या पंचतारांकित ' हाॅटेल ऑर्कीड ' येथे आणतात. त्यांना बरं करायचंय म्हणजे आईंच्या सोबत राहणं आवश्यक असतं. ते त्यांच्या सोबत राहण्याचं ठरवतात आणि पुढील दोन वर्षे त्या हाॅटेलमधील ' रूम नंबर ५२४ ' त्या मायलेकरांच सेकंड होम बनतं.
ही लढाई सोपी नसते. त्यासाठी कामत आईंना झालेल्या रोगांच्या कारणांचा शोध घेतात. त्यांच्या बोलण्यातून कळतं, की त्यांच्या मानसन्मानाला ठेच पोहचली आहे.ज्यांच्यासाठी आपलं जीवन वेचलं त्यांच्याकडूनच अवहेलना झाली आहे. या दु:खाची बोच त्यांना एवढी अस्वस्थ करतेयं , की त्या कामतांना आपण आत्महत्या करणार आहोत म्हणून सांगतात. त्या आत्महत्येच्या कड्यापर्यंत पोहचलेल्या असतात. पण कामत एक विश्वास देऊन त्या टोकापासून त्यांना परत आणतात. त्यांच्या सोबत सतत राहून त्यांचं वागणं,बोलणं यांचा अभ्यास करतात. त्यांच्या डोळ्यातील ओळख कधी विझते,कधी फुलते ते निरखतात. आईंना जुन्या गोष्टी आठवत असतात,पण आज घडलेल्या गोष्टी मात्र त्या विसरत असतात. बोलण्यात सूसूत्रता नसते. ही सारी डिमेन्शिया आणि अल्झायमरची लक्षणं त्यांच्या ध्यानात येतात. सोबत कंपवातही असतो. लहान मुलासारखा त्या लहरी झालेल्या असतात.भास होत असतात. पंतप्रधान मोदींना आपल्या हातचं जेवण आवडतं असं त्या कामतांना सांगतात.
या साऱ्या निरिक्षणातून कामत काही निष्कर्षांपर्यंत येतात.एखाद्या कुशल मानसोपचारतज्ज्ञाप्रमाणे ते आईंशी वागतात. पायरीपायरीने, टप्प्याटप्प्याने त्यांच्या त्रासांच्या कारणांच्या मूळापर्यंत पोहचतात. हे सारं करताना ते आपणाला स्वतःच्या जीवनात आलेल्या अनुभवांतील शहाणपणाचा उपयोग आईंच्या रोगांशी भिडताना करतात.
या रोगांचा अभ्यास करताना त्यांनाही कळून येतं की फक्त औषधोपचारांनी बरे होणारे हे रोग नाहीत. तर थोडक्यात त्यासाठी आईंमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांची मानसिकता बदलणे हे महत्त्वाचं आहे. मग कामत आईंचा आत्मविश्वास जागृत करण्यामागे लागतात. ' तू कुठलंही काम करू शकतेस ' हा विश्वास त्यांच्यात निर्माण करतात.अनुकंपेपेक्षा सहअनुभुतीची गरज त्यांना जास्त आहे हे ते ताडतात. त्यांना जाणवतं, की जुन्या अप्रिय गोष्टीं आठवल्या की आईंना अधिक त्रास होतो. तेव्हा कामत आईंना जुन्या गोष्टी विसरायला लावतात. त्यांच्या मनात आपल्याला त्रास देणाऱ्यांचा सूड घेण्याची जी प्रबळ भावना निर्माण झालेली असते, ती घालवतात. त्याचवेळी त्यांच्या स्मृतींची खंडित झालेली साखळी जोडण्यासाठी नवनवीन उपाय शोधतात. कधी कधी त्या कामतांना, तू कोण असं विचारतात.तर कधी नीट संभाषण करतात.चहा प्यालेला असताना चहा प्यायलाच नाही असं सांगतात. विस्मरणाचे झटके असे अधूनमधून येत असतात.त्याला आवर घालणं सोपं नसतं.पण हळूहळू ते त्यांची स्मृती जागृत करण्यात यशस्वी होतात. त्यांची स्मरणशक्ती वाढवताना ते अधूनमधून वस्तू लपवून त्यांची चाचणी घेतात. त्यात ती यशस्वी झाली, की मग ते लहान मुलाने एखादी गोष्ट केली की आपण कसं कौतुक करतो तसं त्यांचं कौतुक करतात. हाॅटेलमधील त्यांच्या सेवेस असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तसंच वागावं म्हणून तशा सूचना देऊन ठेवतात. हळूहळू त्या पूर्वीसारखा अंदाज वर्तवू लागतात.ही स्मृती परत येत असल्याची खूण असते. जे परिचित भेटायला यायचे त्यांनाही त्या ओळखू लागतात. कंपवात कमी करण्यासाठी साधा ग्लास पकडताना होणाऱ्या त्यांच्या हातांची थरथर प्रयत्नपूर्वक थांबवण्यास त्यांना उद्युक्त करतात.
या रोगांचा सामना करायचा तर त्यासाठी प्रकृतीही चांगली असणं गरजेचं असतं. पण रक्तदाब, मधुमेह नसलेल्या आईं खाणेपिणे टाळत असतात, त्यांच्यात कामत ती खाण्याची आवड पुन्हा निर्माण करतात.चक्क त्यांच्या मनात बियरची आवड निर्माण करतात.
त्यांच्या प्रकृतीला आराम पडण्यासाठी त्यांना शांत झोप मिळणं, त्यांची अस्वस्थता, अवेळची बडबड घालवणं महत्वाचं असतं. ते आईंना टीव्हीवर विनोदी कार्यक्रम बघायला लावतात. कामतांना पर्यावरणाची भारी आवड. पक्षांसाठी त्यांनी हाॅटेल परिसरात पक्षांसाठी फिडर लावलेले असतात. मनोरंजनासाठी ते त्यांचं लक्ष त्याकडे वळवतात. मग त्यांनाही त्याची गोडी लागते.पक्षांचं निरीक्षण करण्यात त्यांचा चांगलाच वेळ जातो.तसाच वेळ शेजारी असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीवरील विमान पाहण्यात जातो. अप्रिय गोष्टी विसरण्यास त्याचा फायदा होतो.त्यांचं मन सतत आनंदी राहतं.कामतांना जाणवतं,की नुसतं हाॅटेलात राहून त्या कंटाळत असतील.त्यासाठी त्यांना बाहेर फिरवून आणायला हवं. मग ते त्यांना हाॅटेलबाहेर काढून जबरदस्तीने कार्यक्रमांना नेतात.प्रवासाला नेतात. हाॅटेलला दोन दशक झाल्याच्या निमित्ताने होणाऱ्या समारंभासाठी कामत त्यांना आग्रहाने घेऊन जातात. त्या कार्यक्रमास हजर राहण्यास तयार नसणाऱ्या त्या कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत थांबतात. कार्यक्रमात आनंदाने सहभागीही होतात. त्यानंतर दोन महिन्यांनी कामतांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन असतं,तर त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची तयारी त्या दिवसापासून करू लागतात .' मला जगायचं नाही ' असं सांगणाऱ्या इंदिराबाई दोन महिन्यांनी होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी आतापासूनच करू लागतात ही कामतांच्या दृष्टीने किती मोठी घटना असते !
ही लढाई जिंकताना कामतांना जे अनुभव आले ते त्यांनी या पुस्तकात वाचकांपुढे मांडले आहेत.अशा रोग्यांसाठी कुठल्या उपाययोजना कराव्यात,त्यांच्याशी कसं वागावं यांच्या टीप्स दिल्या आहेत.
अल्झायमरच्या पेशंटना स्वतः:चीच काळजी वाटते.पूर्वीच्या अनिष्ट घटनांची पुनरावृत्ती होईल अशी भीतीही वाटते.आईंची तिचं स्थिती होती. कामत सांगतात, रोग्याला एकटं ठेवू नये. एकाकीपणा नसावा. शुभम् करोती, पाढे,गायत्री मंत्र यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता वाढते, बुद्धीला चालना मिळते. मेंदूला खाद्य देत राहिलात तर माणूस अल्झायमरला चार हात दूर ठेऊ शकतो.मेंदू कार्यप्रवण असणं, ठेवणं हे या पेशंटच्या बाबतीत फायदेशीर ठरतं.
हे पुस्तक ज्येष्ठांनी तर वाचलं पाहिजेच पण त्यांच्या मुलामुलींनीही वाचलं पाहिजे की ज्यामुळे अनेक जीव या रोगांच्या तावडीतून सुरुवातीलाच सुटतील. या पुस्तकाच्या वाचनाने घरातील ज्येष्ठांना जेव्हा केव्हा या रोगांची लक्षणे जाणवतील तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता तो आजार गंभीर होऊ नये म्हणून ते काळजी घेऊ शकतील. म्हणतात ना उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. त्यामुळे त्या व्यक्तीचं स्वास्थ्य तर चांगलं राहील आणि कुटुंबाचंही. तरुणांना पण हे पुस्तक या वयातच वाचण्याची गरज आहे. या पुस्तकातून कळेल की जीवनात काही तरी छंद असावा ज्यामुळे तुमचं मन गुंतून राहील. सतत कार्यरत राहणं हा रोगाला दूर ठेवण्याचा एक मार्ग आहे. ते तरुणांना सल्ला देतात की आपल्या पालकांची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. लहानपणी त्यांनी आपलं पालनपोषण केलं.आज भूमिका बदलली आहे, मग तुम्ही हे करणे अनिवार्य नाही का ?
आपणं कितीही मोठं झालो तरी आईला आपण लहानच वाटत असतो. त्याचा एक हृद्य प्रसंग या पुस्तकात आहे.एकदा रात्री कामंतांनी पोट साफ करण्याचं औषध घेतलेलं असतं. केव्हातरी त्यांची झोप चाळवली जाते.म्हणून ते टाॅयलेटला जायला उठतात. त्या चाहूलीने त्यांची आईही जागी होते व का उठलास म्हणून चौकशी करते. काही कारण नाही, जाग आली म्हणून जाऊन येतो असं सांगून ते टाॅयलेटमध्ये जातात. काही वेळाने त्या बाहेरून विचारतात," का रे ठीक आहेस ना? " असं एक दोन वेळा विचारल्यावर बाहेरून " शू..शू..शू.." असं आवाज यायला लागतो. ते आतूनच विचारतात, " अग, आवाज का करतेस? " तर त्या म्हणतात, " काही नाही.तुला व्यवस्थित (लघवी) व्हावी म्हणून.लहानपणी नाही का असंच करत होते."
कामत लिहितात, ' काहीही म्हणा, आई आईच असते."
एकदा ते रात्री आईंच्या शेजारी झोपण्याचा हट्ट धरतात. पण आई त्यास नकार देतात. म्हणतात," मला इतकी वर्षे एकटी झोपायची सवय आहे. साधा कोणाचा स्पर्शही झाला तरी झोप येत नाही." कामत खट्टू होतात आणि आपल्या बिछान्यावर जातात.रात्री केव्हातरी त्यांना जाग येते.कोणीतरी आपल्या बाजूला झोपल्याचा भास होतो. आपल्या अंगावर पडलेला आईंचा हात ते ओळखतात. याच हातांनी नाही का आपल्याला वाढवलं. म्हणून तर आज येथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
हे वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं का?
शेवटी काय ! आई आईच असते.
प्रदीप राऊत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा