महाभारताच्या अफाट पटावर स्त्रीपात्रांच्या अनेक छटा दिसतात. कुठे अन्यायावर धगधगणारी ज्वाला, कुठे निःशब्द सहनशीलतेची सावली, तर कुठे नियतीशी शांतपणे दोन हात करणारी वृत्ती. या सगळ्यांमध्ये एक व्यक्तीरेखा अलगद उभी राहते, चित्रांगदा.
ती न गाजणारी, न स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडणारी; पण तरीही आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारी. तिच्या आयुष्यात मोठमोठे संघर्ष आहेत, पण त्यांची मांडणी आक्रोशात नाही, तर एक अंतर्मुख स्थैर्यात आहे. चित्रांगदा म्हणजे एक प्रवास आहे, प्रेम आणि स्वत्व यांच्यात समतोल साधण्याचा. ती नियतीला एक प्रश्नही विचारते, स्त्रीचं प्रेम म्हणजे स्वतःचं विसर्जन असतं का? आणि तिचं आयुष्य शांतपणे उत्तर देतं, प्रेमात हरवणं शक्य आहे, पण स्वतःला गमावणं अपरिहार्य नाही.
मणिपूरच्या हिरव्यागार भूमीत, जिथे निसर्ग स्वतः मुक्तहस्ताने उधळण करतो, डोंगर आणि दऱ्या, पाऊस आणि ऊन अगदी सगळंच मखमली. तिथेच चित्रांगदा वाढली. राजा चित्रवहनाला पुत्र नव्हता, पण त्याने त्या आभावाला दु:ख मानलं नाही. उलट त्याने आपल्या कन्येलाच पुत्रासारखं घडवलं. त्याचीही छान कथा महाभारतात येते. तिच्या पूर्वजांमध्ये प्रभंजन नावाचे एक राजा होऊन गेले. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला; परंतु त्यासोबतच अशी अटही घातली की प्रत्येक पिढीत केवळ एकच अपत्य जन्माला येईल. त्या वरदानामुळेच चित्रवाहन यांना झालेलं अपत्य कन्या, चित्रांगदा होती. म्हणून चित्रवाहन राजाने आपल्या मुलीला राजकुमाराप्रमाणेच वाढवले. चित्रांगदा हातात तलवार घेते तेव्हा ती योद्धा असते, आणि प्रजेची काळजी घेते तेव्हा ती ममतेने भरलेली राणी असते. तिच्यात कोमलता आहे, पण ती कमकुवत नाही; तिच्यात सामर्थ्य आहे, पण ते आक्रमक नाही. चित्रांगदा केवळ राजकन्या नव्हती, तर एक पराक्रमी योद्धाही होती. तिला धनुर्विद्या, शास्त्रज्ञान आणि राजकारण यांचं उत्तम शिक्षण मिळालं होतं. तिच्या व्यक्तिमत्त्वात धैर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम दिसून येतो. चित्रांगदा तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, तिच्या आयुष्यात अर्जुनाचा प्रवेश होतो. अर्जुन त्या काळात ब्रह्मचर्य व्रतात असतो आणि फिरत फिरत मणिपूरमध्ये येतो. चित्रांगदाच्या आयुष्यात हा क्षण जणू नव्या जन्मासारखा ठरतो. तिच्या हृदयात प्रेमाची एक तीव्र, अनपेक्षित भावना जागृत होते. परंतु अर्जुनासाठी ही पहिली भेट तितकी प्रभावी ठरत नाही.
त्याने चित्रांगदा आणि तिच्या शूर सैनिकांकडे पाहून त्यांची तुलना जणू काही लहान मुलांच्या समूहाशी केली, ज्यांना आईच्या कुशीत असायला हवं. त्याच्या नजरेत चित्रांगदाचं शौर्य त्या क्षणी प्रभावी ठरलं नाही. परंतु, जेव्हा मणिपूरच्या अरण्यात निर्वासित अवस्थेत असलेल्या अर्जुनाशी चित्रांगदाची प्रत्यक्ष भेट होते, तेव्हा तिच्या अंतर्मनात एक नवा भाव जागतो, स्त्रीत्वाचा, प्रेमाचा. ही जणू पहिल्याच नजरेतील प्रेमाची अनुभूती असते. अर्जुनाला पाहून ती पूर्णपणे मोहित होते. आपल्या प्रेमाचा आणि समर्पणाचा सगळा खजिना ती त्याच्या चरणी अर्पण करते आणि त्याच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवते. परंतु अर्जुन त्या प्रस्तावाला नकार देतो आणि याच नकारातून पुढे चित्रांगदेच्या आयुष्यातील एक नवा, अधिक गहन प्रवास सुरू होतो.
आता मात्र प्रेमाच्या अमृतात न्हालेली चित्रांगदा अर्जुनाचे मन जिंकण्यासाठी आतुर झाली होती. आपल्या अंतःकरणातील तीव्र ओढ पूर्ण करण्यासाठी तिने प्रेमदेव मदनाची आराधना केली आणि त्याचे वरदान स्वीकारले आणि आपल्याला परिवर्तित केले, एक अप्रतिम, मोहक सौंदर्य धारण केले. त्या नव्या, निर्दोष रूपाच्या तेजात न्हाऊन निघालेली राजकन्या जणू एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे झळाळत होती. तिच्या सौंदर्याची प्रभा इतकी विलक्षण होती की दीप, सुवर्ण, रौप्य, अगदी स्वर्गीय उर्वशीचे दिव्य रूपही तिच्या तेजासमोर फिके भासत होते. या अलौकिक रूपाने मोहित होऊन अर्जुन तिच्याकडे आकृष्ट झाला आणि तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाने चित्रांगदाच्या आयुष्यात आनंदाचा अथांग सागर उसळला. प्रेम, समाधान आणि परिपूर्णतेची अनुभूती तिच्या जीवनात भरून राहिली. आता चित्रांगदेच्या जीवनात प्रेमाची ही गोड वाटचालही निर्विघ्नपणे पुढे सरकत होती. पण नियतीने तिच्यासाठी साधा-सरळ-सोपा मार्ग लिहीला नव्हता.
अर्जुनाच्या प्रेमासाठी चित्रांगदा आपल्या राज्याबाहेर गेली असताना, मणिपूरमध्ये काही आक्रमकांनी लुटमारीच्या उद्देशाने प्रवेश केला. राजकन्येच्या अनुपस्थितीत सामान्य जनता भयभीत झाली. त्यांना आपल्या रक्षणकर्त्या राजकन्येची आठवण येऊ लागली. त्यांना याक्षणी आपली चित्रांगदा परत यावी असेच वाटत होते. मणिपूरच्या जनतेसाठी चित्रांगदा एकाच वेळी दोन रूपांमध्ये होती, एकीकडे कोमल, ममतेने ओथंबलेली, आईसारखी जपणूक करणारी स्त्री; आणि दुसरीकडे सिंहासनावर विराजमान झाल्यावर देवी दुर्गेसारखी भासणारी, निर्भय आणि पराक्रमी योद्धा. दरम्यान, काळाच्या ओघात प्रेमाचा प्रारंभीचा उन्माद ओसरू लागला आणि अर्जुनाची उत्सुकता चित्रांगदाच्या बाह्य सौंदर्यापलीकडे जाऊ लागली. त्याला त्या पराक्रमी योद्धा राजकन्येबद्दल जाणून घेण्याची ओढ निर्माण झाली, जिच्या शौर्याच्या असंख्य कथा त्याने ऐकल्या होत्या.
जिज्ञासेने प्रेरित होऊन अर्जुनाने आपल्या प्रिय चित्रांगदेलाच त्या योद्धा राजकन्येबद्दल विचारले. या प्रसंगात प्रेमाची एक विलक्षण गुंफण आणि कुतूहलाची एक सूक्ष्म जादू दिसून येते. अर्जुनाला त्या योद्धा रूपाबद्दल आकर्षण आहे, हे जाणून चित्रांगदाच्या हृदयात प्रेमाची एक नवी कळी उमलते, जणू वसंतात फुलं अलगद बहरतात तशी. तरीही, जेव्हा अर्जुन त्या योद्धा राजकन्येबद्दल विचारतो, तेव्हा चित्रांगदा स्वतःचं खरं रूप लपवते. ती त्याला सांगते की ती योद्धा राजकन्या म्हणजे जणू एखादं कुरूप बदकाचं पिल्लू आहे, ज्यात आकर्षक सौंदर्याचा लवलेशही नाही. या शब्दांमध्ये तिच्या मनातील द्वंद्व दडलेलं दिसतं, स्वतःच्या खर्या रूपाची भीती आणि प्रेम गमावण्याची अनामिक धास्ती. जेव्हा अर्जुन तिची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा त्या योद्धा राजकन्येसाठी त्याची आतुरता चित्रांगदाच्या आयुष्यात एक चिरंतन आनंदाचा झरा उघडते. तिचं हृदय एक अनामिक परमानंदाने भरून येतं. त्या क्षणी चित्रांगदा अर्जुनाला शांत, पण ठाम स्वरात म्हणते, “मी वचन देते, आज या अमावस्येच्या रात्रीचा शेवट होताच आणि उद्याच्या नववर्षाच्या पहाटेसोबत, तुम्हाला चित्रांगदा तिच्या खऱ्या, संपूर्ण आणि स्वाभाविक रूपात दिसेल.”
आणि मग, नव्या पहाटेच्या तेजस्वी प्रकाशात चित्रांगदा तिच्या वास्तविक स्वरूपात प्रकट होते. त्या रूपात ना अलंकारांची आभा असते, ना कृत्रिम सौंदर्याची झळाळी, ते असतं तिचं खरं अस्तित्व. अर्जुन त्या रूपाला पाहून तिच्यावर मोहित होतो आणि तिला विवाहाची मागणी घालतो. चित्रांगदा अर्जुनावर प्रेम नक्कीच करते पण ती प्रेमभोळी नसते. त्या प्रस्तावाला उत्तर देताना चित्रांगदाचे शब्द त्या काळासाठी विलक्षण धाडसी आणि अर्थपूर्ण ठरतात. ती अर्जुनाला म्हणते,
“मी चित्रांगदा आहे, राजकन्या. मी ना देवी आहे, ना एखादी सामान्य स्त्री. माझी पूजा करून मला उंच स्थानावर ठेवणं, हे मला मान्य नाही; आणि मला दुर्लक्षित करून मागे टाकणं, हेही मला मान्य नाही. जर तुम्ही मला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखात सोबत ठेवाल, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक संघर्षात माझ्यासोबत उभं राहू द्याल, तरच तुम्ही मला खऱ्या अर्थाने जाणू शकाल. आज माझी एवढीच विनंती आहे, मी चित्रांगदा आहे, एक राजकन्या.”
अर्जुनालाही ही जाणीव होते, वसंत ऋतू ओसरल्यावर फुलांची शोभा जशी हरवते, तसंच शारीरिक सौंदर्यही काळाच्या प्रवाहात विरघळून जातं. आणि म्हणूनच तो चित्रांगदेला केवळ तिच्या रूपासाठी नव्हे, तर तिच्या संपूर्ण अस्तित्वासाठी, तिच्या आत्मिक सौंदर्यासाठी स्वीकारतो. प्रेम इथे एका नव्या उंचीवर पोहोचतं, जिथे देहाची वसने विरघळून जातात आणि मानांचे मिलन सहज होते. सौंदर्याला एक नवं परिमाण मिळतं, निराकार, निर्लेप आणि शाश्वत. बाह्य रूप हे जणू एक देणं ठरतं, पण अंतःकरणातील प्रेम हे अमरत्वाची ओळख बनतं. चित्रांगदाचं आयुष्यही असंच, तिने स्वतःचं कर्तव्य ओळखलं, आणि त्यालाच आपलं धर्म मानलं. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत न अडकता, तिने स्वतःची चौकट स्वतः तयार केली.
अर्जुन-चित्रांगदाला कालांतराने एक मुलगा होतो, बभ्रुवाहन, त्याचे नावं ठेवले गेले. काही वर्षे चित्रांगदा बरोबर घालवून अर्जुन पुढे निघून जातो. अनेक स्त्रियांसाठी हा क्षण आयुष्याचा अंत वाटला असता; पण चित्रांगदासाठी तो एक नवा आरंभ ठरतो. ती एकटी उरते, पण रिकामी नाही. ती आपल्या पुत्राला, बभ्रुवाहनाला घडवते. त्याला केवळ शस्त्रविद्या नाही, तर मूल्यांची शिकवण देते. आई म्हणून तिचं रूप इथे अधिक गहिरं होतांना जाणवत. ती त्याला केवळ एवढंच सांगत नाही की तुझा पिता महान आहे; तर ती त्याला शिकवते, तू स्वतः महान होऊ शकतोस. अर्जुन निघण्यापूर्वी चित्रांगदेला म्हणाला की पुढील काळात युधिष्ठिर राजसूय यज्ञ करतील, तेव्हा तीने आपल्या पित्याबरोबर इंद्रप्रस्थला यावे. तेथे तिचा परिचय अर्जुनाच्या सर्व नातेवाईकांबरोबर होईल. पुढे चित्रांगदाच्या जीवनात एक क्षण असा येतो, जेव्हा चित्रांगदाला स्वतःची खरी परीक्षा द्यावी लागते. बभ्रुवाहन आणि अर्जुन, पुत्र आणि पती यांच्यात युद्ध होतं. एकीकडे मातृत्व, दुसरीकडे पतीवरील प्रेम, दोन्ही समान आणि दोन्ही तितकेच तीव्र. पण चित्रांगदा कोणत्याही एका भावनेत वाहून जात नाही.
पांडवांच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा मणिपूर नगरीत प्रवेश करता झाला. अर्जुन त्यावेळी बरोबर होता. बभ्रुवाहनाने आपला पिता आला म्हणून त्याचे यथोचित स्वागत करण्यासाठी त्याला राजधर्माप्रमाणे सामोरे गेला, त्याचे आदरपूर्वक स्वागत केले. परंतु अर्जुनाला हे क्षत्रियधर्माला शोभणारे वाटले नाही आणि तो संतप्त झाला. त्याने स्वतःच्या पुत्रालाच युद्धासाठी ललकारले. त्या वेळी अर्जुनाची दुसरी पत्नी उलूपी हिनेही आपल्या सावत्र पुत्र बभ्रुवाहनाला युद्धासाठी प्रवृत्त केले. या युद्धात बभ्रुवाहनाच्या हातून अर्जुनाचा मृत्यू झाला. हे पाहून चित्रांगदा अत्यंत दुःखी झाली आणि तिने उलूपीजवळ आपले दुःख व्यक्त केले. त्यानंतर उलूपीने संजीवनी मणीच्या साहाय्याने अर्जुनाला पुन्हा जिवंत केले. उलूपीने यामागील रहस्य सांगितले, एकदा ती गंगेच्या तीरावर गेली असता तिने वसु नामक देवतांचा गंगेशी संवाद ऐकला होता. त्या वेळी त्यांनी असा शाप दिला होता की गंगापुत्र भीष्माला शिखंडीच्या आडून मारल्यामुळे अर्जुनाला आपल्या पुत्राच्या हातून पराभूत होऊन मृत्यू पत्करावा लागेल, तेव्हाच तो त्या पापातून मुक्त होईल. याच कारणामुळे उलूपीने बभ्रुवाहनाला युद्धासाठी प्रवृत्त केले होते. पुढे सगळे एकत्रित राजसूय यज्ञासाठी हस्तिनापुरात येतात.
रवींद्रनाथ टागोरांनी चित्रांगदेवर एक सूंदर नाटक लिहिले आहे. पुराणातील तिची व्यक्तिरेखा टागोरांनी आपल्या सशक्त लेखणीतून कलियुगात आणली. त्या नाटकातून आजची चित्रांगदा त्यांनी आपल्या समोर उभी केली. खरं सौंदर्य बाह्य रूपात नसून, ते अंतर्मनात दडलेलं असतं. बाह्य आकर्षण क्षणभंगुर असतं, काळाच्या ओघात ते विरून जातं; परंतु अंतःकरणातील प्रेम आणि आत्मिक सौंदर्य हे चिरंतन असतं. अर्जुन आणि चित्रांगदाचं नातं हे परंपरागत प्रेमकथांपेक्षा वेगळं आहे. इथे स्त्री पुरुषाच्या मागे उभी राहत नाही, तर त्याच्या बरोबरीने चालते. ती अर्जुनावर प्रेम करते, त्याच्यासोबत आयुष्याचे काही क्षण जगते, पण तिचं संपूर्ण अस्तित्व त्याच्यात विलीन होत नाही. तिचं प्रेम हे तिच्या स्वत्वाला कमी करत नाही, उलट अधिक दृढ करतं. चित्रांगदाने सुखातही आणि दुःखातही आपली समज कायम ठेवली. म्हणूनच ती कोसळली नाही.
आजच्या काळात स्त्री अनेक भूमिका निभावत आहे, करिअर, कुटुंब, नातेसंबंध, स्वतःची स्वप्नं. या सगळ्यात तिचं स्वतःचं अस्तित्व अनेकदा हरवतं. चित्रांगदा आपल्या गोष्टीतून सहज सांगते, की प्रेम भरभरून करा, पण स्वतःला हरवू नका. जबाबदाऱ्या सांभाळणारी स्त्री अधिक सूंदर, सशक्त असते, पण स्वतःच्या स्वप्नांना विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकटेपणाला घाबरू नका, त्याला सामर्थ्य बनवा. बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात
“जगणे म्हणजे शोध घेणे
अंतरीच्या गूढ ठावाचा।”
चित्रांगदाचं संपूर्ण आयुष्य हाच शोध आहे, स्वतःच्या अस्तित्वाचा.
© सोनाली तेलंग

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा