पहाटे चार वाजता नेहमीप्रमाणे तो पळायला गेला. विटकरी रंगाच्या ट्रॅक वर पाऊल टाकताच त्याच्या अंगात वीज संचारली. कमावलेलं शरीर वाऱ्याच्या वेगाने धावत राहिलं. इतकं की धावताना मनाचा आणि शरीराचा वेग एकरूप झाला. एकापाठोपाठ एक स्पर्धा जिंकताना शरीर नश्वर हेच तो विसरून गेला. प्रतिस्पर्ध्याचा अंदाज आला की बस. त्यानंतर तो हरत नसे. अनेक सुवर्णपदकं मिळाली. प्रसिद्धी आणि पैसा मिळाला. सारं जग पायाशी लोळण घेत आहे असं वाटत होतं.
काही काळ गेला. आजकाल तो हरल्याच्या बातम्या येऊ लागल्या. गुडघे, घोटे, पाठ असहकार पुकारू लागले तरी त्यांना चुचकारून तो धावत राहिला. एक दिवस साऱ्या शरीरानेच असहकार पुकारला. वयाची जाणीव करून दिली. तो डगमगला. तो झगडला पण शेवटी त्याला शरीरापुढे माघार घ्यावी लागली. बघता बघता सत्कार सोहळे, कौतुक, पैसा, प्रसिद्धी नव्या तरूण शरीरांकडे धावले. तो एकटा मागे राहिला. त्याने ही परिस्थिती स्वीकारली. दुसरा काही पर्याय नव्हता. पण आता काय करायचं हा मोठ्ठा प्रश्न होता. आजवर धावण्याशिवाय दुसरं काहीच केलं नव्हतं. ना कधी नाती गोती सांभाळली. ना कधी कुठल्या लग्न कार्याला गेला. ना कधी कुणाची चौकशी केली.
“तू कधीच घरात नसशील तर त्याला घर का म्हणायचं?” त्याच्याकडे उत्तर नव्हतं. एक दिवस ती घर सोडून निघून गेली. तिच्या आठवणीने डोळ्यात आलेलं पाणी ट्रॅकवर पडून मिसळून जात असे.
एक दिवस एक तरूण मुलगा ट्रॅकवर धावताना दिसला. अगदी त्याच्यासारखाच.
“सर, मला मार्गदर्शन कराल?” तो दिसताच त्याने विचारले.
“मी तुला हेच अंतर अजून चार दशांश सेकंद कमी करून कसं पार पाडायचं दाखवतो” त्याने धावून दाखवले.
मुलाला समजले. तो सांगेल ते बदल करत, मुलगा धावू लागला. मोठी स्पर्धा सुरू झाली. त्याने मुलाला डोळ्यांनी आश्वासन दिले. मुलगा उत्तम धावला आणि स्पर्धा जिंकला. गळ्यात सुवर्णपदक घालून तो पळत समोर बसलेल्या आईकडे गेला.. तो तिला मिठी मारताना ॲथलिटला तिचा चेहरा दिसला. तेच ते लांबट काळे डोळे. कुरळे केस. तिनं त्याला बघितलं. मुलाचा हात हातात घेऊन ती ॲथलिट जवळ आली.
“बाबांना नमस्कार कर !” मुलाला म्हणाली आणि मुलगा व ॲथलिट दोघंही चमकले.
“मी घर सोडून गेले तेव्हा तीन महिने झाले होते.” तिच्या आवाजात वेदना होती.
त्याने मुलाला जवळ घेतले. त्याच्या मस्तकावरून हात फिरवत तो बोलला,
”स्पर्धा जिंकताना नाती विसरू नको. आपल्या जवळच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे लक्ष दे! चार लोकांची चौकशी करत जा. आणि स्पर्धा जिंकताना लक्षात ठेव - वय हा तुझा असा प्रतिस्पर्धी आहे ज्याला तू कधीच हरवणार नाहीस. यशस्वी हो.”
तिच्याकडे वळून बघत त्याने हात जोडले.
“मला माफ कर ! पूर्वी झालेल्या चुका मी बदलू शकत नाही पण आता मला एक संधी दे.”
“विचार करून सांगते.” तिनं नाही म्हटलं नाही या खुषीत ॲथलिट बाहेर पडला.
“ट्रॅक वर भेटू” त्याने मुलाला सांगितले आणि
“तुझ्या उत्तराची वाट बघतो.” म्हणत तो धुक्यात दिसेनासा झाला.
©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा