काही महत्त्वाची कामं उरकून ती डेक्कनहून घरी, कोथरुडला निघाली होती. संध्याकाळची वेळ. कर्वेरोडला जाम ट्रॅफिक होतं. वाहनं जणू इंचा-इंचांनी पुढं सरकत होती. अन् त्यात वैताग म्हणजे अचानक आलेला हा पाऊस !
घरातून निघताना किती छान ऊन पडलं होतं. पावसाची काही चिन्हच नव्हती. त्यामुळं सोबत रेनकोट, जर्किन काहीही नाही! चांगला ड्रेस भिजला होता, त्यावर शेजारून जाणार्या गाड्यांमुळं चिखल उडत होता. अक्षरश वैतागली ती.
त्यात समोरच्या टू-व्हीलरवाल्यानं अगदी अचानकच ब्रेक दाबला अन् तो जागीच थांबला. बहुधा त्याच्याही पुढच्यानं तेच केलं असावं. कशी कुणास ठाऊक, नेमकी त्याच क्षणाला ती काहीशी बेसावध असल्यासारखी. तिची गाडी समोरच्या गाडीवर जोरात आदळली. तोल सावरता आला नाही अन् काही कळायच्या आतच ती गाडीसकट रस्त्यावर चिखलात पडली.
क्षणात सगळं घडलं. वाहनांची गर्दी, ट्रॅफिक, पाऊस, चिखल. त्यात पटकन कुणी पुढंही येईना. तिला उचलायला, मदतीला. ती मात्र इतकी भांबावलेली की, आपण पडलोय, चिखलानंं माखलोय, काही कळेना !
तेवढ्यात कुणीतरी हळुवारपणे तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवला. तिला वर उठायला मदत करू लागलं. तिला नीटपणे पकडून शेजारच्या बसस्टॉपवरच्या बेंचवर आणून बसवलं. अन् नंतर त्याच व्यक्तीनं आपल्या जवळच्या पाण्याच्या बाटलीतल्या पाण्यानं आधी तिचा चेहरा स्वच्छ केला. तो पुसला. बाटलीत थोडं पाणी राखून तिला ते प्यायला दिलं. मघापासूनच्या या अनपेक्षित मदतीनं आता जरा ती सावरली, भानावर आली. समोर पाहिलं तर, तिची गाडी उचलून कुणीतरी कडेला लावून ठेवली होती. पुढल्या बाजूला उभं केलेलं अन आता चिखलानं बरबटलेलं पिशवीतलं सामान तिच्या शेजारी आणून ठेवलं होतं. अन तिला मदत करणारी ती व्यक्ती अजूनही तिथंच होती. तिच्यासोबत. अजूनही तिचे खांदे घट्ट धरून ! तिनं आभारासाठी त्या व्यक्तीकडे पाहिलं अन् ती चमकलीच… त्या व्यक्तीला तिनं क्षणात ओळखलं ! ती तीच तर होती… आता विसरेन कशी?
परवाचीच तर गोष्ट.
सगळी कामं उरकून दुपारी कामवाली बाई घरी गेली अन् जाताना अंगणातलं मुख्य गेट लावायलाच विसरली. मी फोनवर बोलत-बोलत हॉलच्या खिडकीपाशी आले, अन् पाहिलं. गेट तर उघडंच होतं. पण मोकळं गेट पाहून एक बाई दबकत, इकडे-तिकडे पाहत आत येत होती. तिचा एकंदरीतच कळकट्ट अवतार, पाठीवरचं भलंमोठ्ठं तितकंच कळकट्ट पोतं अन सावध नजर ! हातातलं पोतं जरा खाली ठेवलं अन ती बागेतल्या नळाच्या दिशेला वळाली. नेमकं काय करत होती, ते मागनं काही कळत नव्हतं. नक्कीच तो पितळी नळ चोरण्याचा तिचा विचार चालू असावा. आता मी बाहेर पोर्चमध्ये येऊन जोरात तिच्यावर ओरडले. ती दचकली. माझ्या रागावण्यासमोर तिच्या तोंडून शब्दही फुटेनात !
“ताई, मी नळ न्हायी ओ. ते फकस्त घोटभर पानी.”
हातातली कळकटलेली प्लॅस्टिकची बाटली मला दाखवत ती बोलत होती. नव्हे बोलण्याचा प्रयत्न करत होती. अन मी मात्र, तिचं काहीच न ऐकता तिला हाकलून देत होते. हाकललंच !
आज मला मदत करणारी ती तीच होती. काचपत्रं गोळा करणारी बाई.; ती माझ्या बागेतला नळ चोरून नेणारी चोर समजले जिला; ती बाई. घोटभर पाण्यासाठी माझ्या दारात आलेली तीच ती गरीब बाई.
आज गर्दीनं आणि माणसांनी भरलेल्या रस्त्यावर फक्त जिनं माणुसकी दाखवली, ती तीच बाई.
मला मदत करताना, माझ्यासोबत तिचेही हात, कपडे चिखलानं माखले. पण त्याची जराही पर्वा न करता मला स्वतःजवळच घोटभर पाणी पाजणारी ती गरीब बाई. आज श्रीमंत अन दिलदार ठरली होती !
माझ्या चेहऱ्यावरचा चिखल स्वच्छ करताना, माझ्या अंतरातम्यावर किती चिखल लागलाय, याची नकळत जाणीव करून देणारी ती. कळकट्ट, पण मनानं स्वच्छ बाई !
या घोटभर पाण्याचे उपकार आता कधीही विसरता येणार नाहीत, हे मनोमन जाणून गेली ती !
नकळत तिचे डोळे भरून आले. मन गहिवरलं अन् या भरल्या डोळ्यांनी व गहिवरलेल्या मनानं तिनं त्या काचपत्रवाल्या गरीब बाईकडे पाहिलं अन् नकळत तिचे हात जोडले गेले. माफीसाठी की आभारासाठी तिचं तिलाच ठाऊक !
— डॉ. विद्या दिगंबर निकाळजे (विदिनी), पुणे.
(आजकालच्या आपल्या आयुष्यामध्ये सुरक्षितता खूप महत्त्वाची झालीय…विशेषतः शहरी भागात! Alert राहावंच. आपण सगळेच राहतो… पण हे करताना आपण खरंच माणुसकी सोडत तर नाहीये ना, असंही वाटतं कधी कधी.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा