बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3109. चांगलं सिरप?

 “डॉक्टर,घरात एक कफ सिरप पडलेलं होतं..ते घेतलं पण खोकला काही राहिला नाही मग एक आयुर्वेदिक प्रिपरेशन घेतलं,त्यानंही आराम मिळाला नाही आता एक मस्तपैकी ‘चांगलं’ कफ सिरप लिहून पाठवा ना..” फोनच्या पलीकडून आलेली ही विनंती ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो..
चांगलं सिरप? पण वाईट सिरप कोण बनवतो? यांना रामबाण औषध हवंय..अच्छा..
‘चांगलं सिरप’ ही मागणी झाली का?मी ठरवलं तरी वाईट-बिनकामाचं सिरप देणारंय का? बरं मी ठरवलं तसं द्यायचं तरी कुणी ते बनवारंय का? 
त्याआधी सांगायला हवं,”खोकला कसा आहे?”
आणि त्याही आधी,”मुळात खोकला का आहे?”
कारण खोकला म्हणजे निदान नसतं; ते फक्त लक्षण असतं.
जसं “ताप आहे” हे निदान नाही तसंच “खोकला आहे” हेही निदान नाही..
खोकला म्हणजे शरीराचा ‘सिक्युरिटी अलार्म’ आपल्या श्वसनमार्गात धूळ, धूर, श्लेष्मा, परकीय कण किंवा काही त्रासदायक घटक आले की शरीर त्यांना बाहेर काढण्यासाठी खोकल्याचा रिफ्लेक्स वापरतं म्हणजेच खोकला हा अनेक वेळा शरीराचा शत्रू नसतो तो तर शरीराचा सफाई कर्मचारी असतो.
मग प्रश्न असा की, ”सफाई कर्मचारी काम करतोय” म्हणून त्याला लगेच निलंबित करायचं का? तसंच प्रत्येक खोकला लगेच ‘बंद’ करणं आवश्यक नसते.
मग “कोरडा खोकलाय” एवढं सांगून उपचार ठरतो का?
अजिबात नाही.
खोकला कोरडा आहे की कफासह आहे हा फक्त एक भाग. डॉक्टरला अजून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी असतात जसं खोकला किती दिवसांपासून आहे?
अचानक सुरू झाला की हळूहळू?
रात्री वाढतो का?
झोपल्यावर वाढतो का?
थंड हवा, धूर,धूळ किंवा परफ्यूमनं वाढतो का?
कफ आहे का?
कफाचा रंग आणि प्रमाण कसं आहे?
ताप आहे का?
घसा दुखतोय का?
नाक वाहतंय का?
श्वास घेताना घरघरतेय का?
छातीत दुखतंय का?
अॅसिडिटी किंवा आंबट ढेकरांचा त्रास आहे का?
धूम्रपानाची सवय आहे का?
काही नवीन औषध सुरू केलं आहे का?
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 
श्वास घेण्यास त्रास तर होत नाही ना?
ही सगळी माहिती मिळाल्यावरच ‘खोकल्याचं औषध’ हा प्रश्न खऱ्या अर्थानं सुरू होतो.
माणसागणिक खोकल्याचेही अनेक चेहरे असतात. सर्दी, घसा खवखवणं, अंगदुखी, सौम्य ताप आणि त्यानंतर खोकला अशा परिस्थितीत अनेकदा कारण व्हायरल असतं.
प्रत्येक वेळी अँटिबायोटिक किंवा शक्तिशाली कफ सिरपची गरज असतेच असं नाही.
कधी शरीराला वेळ देणं,पुरेसं पाणी घेणं आणि योग्य लक्षणजन्य औषध हेच पुरेसं असतं. अनेकदा तर मी ते ही देत नाही. पेशंटच आग्रह धरतात.
जीपीत एक गमतीशीर वाक्यंय ”औषध घेतली तर तुम्ही आठ दिवसात बरे व्हाल आणि नाही घेतली तर बरं व्हायला तब्बल आठवडाभर लागेल.” तरी लोकं औषधं घेतात.
“कफ नाही पण सतत घसा खाकरावा लागतो.”
“सकाळी उठल्यावर खोकला…”
“नाकातून पाणी येतं…”
“धूळ लागली की खोकला…”
इथे फक्त कफ सिरप देऊन समस्या कायमची सुटेलच असं नाही कारण खोकल्यामागं नाक-घशातील अॅलर्जिक समस्या असू शकते म्हणजे खोकल्यावर औषध देण्यापेक्षा त्याचा उगम शोधावा लागतो.
“सर्दी झाली की खोकला आठवडाभर जात नाही.”
“रात्री खोकला वाढतो.”
“थंड हवेत किंवा धावताना खोकला येतो.”
“श्वास घेताना शीळ वाजते.”
इथे फक्त कफ दाबणारं सिरप देत राहिलं तर मूळ समस्या हातातून निसटू शकते कारण प्रश्न खोकला थांबवण्याचा नसून श्वसनमार्गातील समस्या ओळखण्याचा असतो. काही लोकांचा खोकला फुफ्फुसापेक्षा पोटाशी जास्त संबंधित असतो.
“रात्री झोपल्यावर खोकला वाढतो.”
“आंबटपणा…”
“छातीत जळजळ…”
“घशात काहीतरी अडकल्यासारखं…”
अशा वेळी “कफ सिरप आणखी चांगलं कोणतं?” हा प्रश्न भलत्याच दिशेनं जाणारा असू शकतो.
कधी कधी खोकला औषधांच्या कमतरतेमुळं नसतो.
तो धुराच्या अतिरेकामुळं असतो; दिवसभर सिगारेट ओढायची,धूळ-धूर सहन करायचा आणि रात्री “डॉक्टर, कफ सिरप भारी द्या” म्हणायचं. हे म्हणजे ब्रेक न लावता गाडीचा हॉर्न बंद करण्यासारखंय.
‘कफ सिरप’ हा एकच औषधप्रकार नाही.वेगवेगळ्या सिरपमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधे किंवा घटक असतात..
उदाहरणार्थ काही औषधे खोकल्याची तीव्रता कमी करण्यासाठी,काही कफ पातळ/सैल करण्यासाठी,काही नाकातील लक्षणांसाठी तर काही विशिष्ट परिस्थितीत श्वसनमार्गातील आकुंचन कमी करण्यासाठी वापरली जातात..
काही द्रावणामध्ये एकापेक्षा जास्त औषधे एकत्र असतात आणि इथंच सुरू होते खरी गडबड..
एकाच बाटलीत अनेक औषधे असली म्हणजे ती “जास्त चांगली” असतीलच असं नाही,कधी कधी ती अनावश्यक असतात.कधी दुसऱ्या घेत असलेल्या औषधांशी इंटरॅक्शन होऊ शकते..
कधी झोप येणं-चक्कर येणं-तोंड कोरडं पडणं किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात आणि मुलांच्या बाबतीत तर वय, वजन आणि फॅार्म्यूलेशन यांचा विचार न करता घरातली मोठ्यांची कफ सिरप देणं विशेषतः धोकादायक ठरू शकतं..
“मागच्या वेळी हेच सिरप घेतलं होतं हा ओपीडीमधला आणखी एक प्रसिद्ध संवाद.
“मागच्या वेळी हेच दिलं होतं.” पण मागच्या वेळीचा खोकला आणि आजचा खोकला एकच आहे याची खात्री कोण देणार?
मागच्या वेळी विषाणूजन्य असेल.
यावेळी ॲलर्जी असू शकते.
मागच्या वेळी कफ असेल.
यावेळी रिफ्लक्स असू शकतो.
मागच्या वेळी साधा खोकला असेल.
यावेळी अस्थमा-न्युमोनिया किंवा दुसरी कारणं तपासण्याची गरज असू शकते..
म्हणून वैद्यकीय उपचारांमध्ये “मला मागच्या वेळी हेच बरं पडलं होतं” हा इतिहास महत्त्वाचा आहे;पण तो आजच्या उपचाराचा भाग नसतो..
औषधाचं नाव कळलं म्हणजे उपचार संपला असं नाही.
डोस किती?
दिवसातून किती वेळा?
जेवणाआधी की नंतर?
किती दिवस?
कधी बंद करायचं?
हे सगळं औषधाच्या घटकांवर,रुग्णाच्या वयावर, वजनावर,इतर आजारांवर,इतर औषधांवर आणि निदानावर अवलंबून असू शकतं..
म्हणून “एक चमचा घेऊ का?” हा प्रश्नही प्रत्येक सिरपसाठी सारखा उत्तर देण्यासारखा नसतो.औषध बाटलीत एकच द्रव दिसत असलं तरी त्यामागचं विज्ञान  एकच नसतं.
कफाचा रंग पाहूनच जीवाणूजन्य संसर्ग ठरवणं योग्य नाही.हिरवा किंवा पिवळा कफ दिसला म्हणून प्रत्येक वेळी अँटिबायोटिक आवश्यक असतंच असं नाही..
त्याचप्रमाणे कफ पारदर्शक आहे म्हणून आजार किरकोळच आहे असंही नाही..
रुग्णाचं संपूर्ण ‘क्लिनिकल पिक्चर’ महत्त्वाचं. म्हणून “कफचा रंग कोणता?” हा प्रश्न आवश्यक असला तरी तो अंतिम निदान नाही.
साधारणपणे खोकल्याचा कालावधीही निदानाचा एक महत्त्वाचा धागा असतो.अचानक सुरू झालेला खोकला आणि अनेक आठवडे टिकून राहिलेला खोकला यांच्याकडे एकाच नजरेनं पाहता येत नाही..
दीर्घकाळ टिकणाऱ्या खोकल्यामागं कारण शोधणं महत्त्वाचं असतं अशा वेळी फक्त एकामागून एक कफ सिरप बदलत राहणं म्हणजे अलार्मचा आवाज बंद करून आग कुठं लागलीये हे पाहण्यासारखंय..
खोकल्यासोबत श्वास लागणे,छातीत तीव्र दुखणे,
रक्तमिश्रित कफ,सतत किंवा जास्त ताप,ऑक्सिजन कमी होणं,गोंधळ/अतिशय अशक्तपणा,गिळण्यास त्रास किंवा रुग्णाची प्रकृती झपाट्यानं खालावणं अशी लक्षणं असतील तर स्वतःहून कफ सिरप निवडण्यापेक्षा किंवा डॅाक्टरांना तसा आग्रह करण्यापेक्षा वैद्यकीय तपासणीला प्राधान्य द्यावं..
विशेषतः लहान मुलं,वृद्ध व्यक्ती,गर्भवती स्त्री किंवा गंभीर सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये स्वतःहून औषध घेण्याबाबत अधिक काळजी आवश्यकंय..
म्हणून “चांगलं कफ सिरप” म्हणजे काय? या प्रश्नाचं एक सार्वत्रिक उत्तर नाही..
चांगलं औषध तेच,जे योग्य रुग्णाला,योग्य कारणासाठी, योग्य वेळी,योग्य डोसमध्ये आणि योग्य कालावधीसाठी दिलं जातं..
कधी cough suppressant योग्य ठरेल.
कधी expectorant/mucolyticची गरज असेल.
कधी allergy किंवा post-nasal dripवर उपचार करावा लागेल..
कधी asthmaची चिकित्सा आवश्यक असेल.
कधी refluxकडे लक्ष द्यावं लागेल.
कधी फक्त supportive care पुरेशी असेल.
आणि कधी सिरपची बाटली उघडण्याआधी स्टेथोस्कोप लावणं जास्त महत्त्वाचं असेल..
“मग डॉक्टर,कोणतं सिरप घेऊ?”
या प्रश्नाचं सर्वात प्रामाणिक उत्तरंय,”पहिल्यांदा मला तुमचा खोकला समजून घेऊ द्या.”
कारण डॉक्टर औषधाचं नाव ऐकून रुग्णाचा खोकला ठरवत नाही.तो खोकल्यामागचं कारण शोधतो..
खोकला हा फक्त आवाज नाही; तो शरीरानं दिलेला संदेश आहे.तो संदेश ऐकून न घेता फक्त त्याचा आवाज बंद करणं म्हणजे समस्या सोडवणं नव्हे.
आणि म्हणूनच खोकला आहे म्हणून कफ सिरप” ही उपचारपद्धती नाही.”खोकला का आहे?” हा प्रश्न विचारून योग्य उपचार निवडणं “ही खरी चिकित्सा आहे.
बाटलीवरचं लेबल वाचण्यापेक्षा रुग्णाचं क्लिनिकल चित्र वाचणं अधिक महत्त्वाचं असतं !

#Doctors_Diary

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...