रागाने कॉल कट केला आणि बडबड करत अजय आतल्या खोलीमधे निघून गेला. जाता जाता त्याने रूमचा दरवाजा जोराचा आदळला. स्वयंपाकघरात काम करत असणाऱ्या कल्याणीच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचला आणि क्षणभरासाठी चालणारे आपले हात थांबवून तिने वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. काहीवेळ बंद दरवाज्याकडे ती बघत राहिली आणि दीर्घ श्वास घेऊन पुन्हा तिने आपल्या कामाला सुरुवात केली. आत गेलेल्या अजयने कपाटातून व्हिस्की ची बॉटल काढली. तिथेच असलेला ग्लास घेतला. एक पेग बनविला आणि गटकन घश्याखाली उतरवला. “लहान मुलाच्या वर चाललंय यांच. मनाला जराही शांती लागून देत नाहीत. एकदा येऊन जा, भेटून जा. सतत तेच ते. कंपनी काय माझ्या घरची आहे काय? पाहिजे तेव्हा सुट्टी मिळायला. तिकडे बॉस रोज मिरी वाटतोय डोक्यावर. कामाचं प्रेशर रोज वाढत चाललंय आणि हे म्हणतात ये नारे ये नारे. वेळच्या वेळी पैसे पाठवतो, गरजेच्या साऱ्या गोष्टी करून दिल्यात. अजून काय करावं यांच्यासाठी. कष्टात दिवस काढले, कुडाच्या घरात आयुष्य घालवले म्हणून चांगला बंगला बांधून ठेवलाय पण यांचं समाधानच होईना, आणि धडपडणाऱ्या पोराचं जरास कौतुकही वाटेना.”
अजयची बडबड कल्याणी ऐकत होती. त्याचं बोलणं तिला पटत नसलं तरी ती या बाबतीत त्याला काहीच बोलू शकत नव्हती. उगाच त्याची चिडचिड होईल आणि मग मुलांसमोर दोघात झालेली तू तू मैं मैं वातावरण अजूनच बिघडवून टाकेल म्हणून आज काल शांतच राहणे योग्य असे ती स्वतःला समजावत असते. गावावरून तिच्या सासू सासऱ्यांचा कॉल आला आणि अजयचा पारा चढू लागला तेव्हाच तिने मुलांना खेळायला बाहेर पाठवले होते. पहिल्या पाठोपाठ अजयने दुसरा पेग ही रीचवला आणि आपल्या बडबडीचा आवेग अजूनच वाढवून टाकला. त्याची जीभ हळूहळू त्याच्या ताब्यातून जाऊ लागली.
“अख्ख्या भावकीत कुणाकडे जेवढ्या सुख सुविधा नाहीत एवढ्या यांच्या पायाशी आणून ठेवल्यात तरी रोजच रडणं यांना थांबत नाही. हे झालं, येतोय का रे? ते झालं येतोय का रे? तेवढीच कामं राहिलीत मला. घरात सर्वात मोठे पण लहान मुलांच्या वर यांचा हट्ट वाढतोय. नाही म्हणलं तरी यांना समजत नाही. राहून राहून तोच विषय आज बरं वाटेना, उद्या ताप वाढतोय, परवा जेवणच जाईना? तक्रारी थांबता थांबत नाहीत. डॉक्टरकडे जायचे सोडून सतत माझ्याच मागे लागत राहतात.” अजयची ही बडबड बराच वेळ सुरू होती. रात्री उशिरा अजयचा राग उतरला तोपर्यंत मुले जेवण करून झोपी गेली होती. त्याने आणि कल्याणी ने ही जेवण करून घेतले. पुन्हा घरून कॉल येईल म्हणून त्याने मोबाईल केव्हाच फ्लाईट मोड वर केला होता.
सकाळी उठून सारी आवरा आवर करुन अजय ऑफिस ला जायला निघाला. त्याने मोबााईल हाती घेतला आणि फ्लाईट मोड काढून टाकला. मोबाईल सुरू झाल्याझाल्या मॅसेजच्या नोटोफिकेशन यायला सुरू झाली. काही वेळा नंतर मॅसेज येणे बंद झाले. Missed कॉल च्या notification मधे गावाकडचा नंबर नसलेला पाहून त्याला काहीसं बरं वाटलं. बाहेर पडण्यापूर्वी त्याने काही विचार केला आणि वडिलांचा नंबर ब्लॉक केला. शेजारी उभ्या असणाऱ्या कल्याणीला हे खटकलं पण ती गप्पच राहिली. तिच्या हातातील डब्याची पिशवी अजयने घेतली आणि तो बाहेर पडला. कल्याणी ही त्याच्या पाठोपाठ दरवाज्यापाशी आली. त्याने मागे वळून हसत बाय केले. तिनेही अगदी तसेच प्रतिउत्तर दिले. तो जायला वळला तसा तिने त्याला आवाज दिला. त्याने मागे पाहिले. तेव्हा अतिशय सौम्य आणि समजावण्याचा स्वरात ती त्याला म्हणाली,
“पैसाच हा सगळीकडे उत्तर असू शकत नाही.”
तिच्या बोलण्याचा रोख अजयच्या लक्षात आला. तिच्या या शब्दांनी त्याचा नुर पालटायच्या आत “ लवकर या वाट पाहतेय !” असे म्हणाली आणि एक flying kiss तिने दिला आणि दरवाजा बंद केला.
संध्याकाळी दारावरची बेल वाजली. कल्याणीने दरवाजा उघडला. समोर अजय दिसला. तो आत आला. खांद्यावरची बॅग काढून त्याने सोफ्यावर भिरकावली आणि बसला. कल्याणीने पाण्याचा ग्लास समोर धरला. त्याने पाणी पिऊन दमलेल्या जीवाला शांत केलं. कल्याणी निघून गेली. दोन्ही मुलं समोर काहीतरी ठेऊन त्यात पाहण्यात गुंग होऊन गेली होती. पायातला socks काढून सोफ्याला टेकून अजयने डोळे मिटले तोवर चिमुकली आर्या त्याच्या पायाला येऊन बिलगली.
“ ए पप्पा हे तुझ्या हाताला आणि गालाला काय झालंय रे”
अजयने डोळे उघडले. आर्याच्या हातात जुन्या फोटोंचा अल्बम होता. त्यातल्या एका फोटोवर बोट ठेऊन आर्या त्याला प्रश्न विचारीत होती. हलकस हास्य करत अल्बम सहित त्याने आर्याला उचलून मांडीवर घेतलं. तो अजयचा लहानपणीचा फोटो होता. ज्यात त्याच्या हाताला प्लास्टर होते आणि त्याचा गालही काळानिळा झालेला होता. तो फोटो पाहता क्षणीच अजय भूतकाळात शिरला.
ते उन्हाळ्याचे दिवस होते. साऱ्या मुलांच्या शाळा संपून सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. तहान भूक हरपून मिळालेल्या सुट्यांचा मुलं आनंद घेत होती. एके दिवशी अजय न इतर मुले मळ्यातील आंब्याच्या झाडावर आंबे काढायला चढली होती. अजय झाडावर बराच वर चढला असताना झाडावर असणाऱ्या घरट्यात कसली तरी खुस्फुस झाली आणि भेदरलेल्या अजयचा पाय घसरला. पडता पडता त्याने फांदीला धरायचा प्रयत्न केला त्यात त्याचा चेहरा फांदीवर घासला गेला आणि पकड निसटलेला अजय धाडकन जमिनीवर येऊन आदळला.
कोणीतरी ही गोष्ट अजयच्या वडिलांना सांगितली आणि वडिलांनी अजय कडे धाव घेतली. व्हीवळत पडलेल्या अजयला त्यांनी एका क्षणात खांद्यावर घेतले आणि ते सुसाट गावाकडे धावत सुटले. त्यावेळी त्यांच्या पायात चप्पल ही नव्हती हे अजयला आठवले. दवाखान्यात गेल्यावर उपचार घेणाऱ्या अजयची त्याच्या वडिलांच्या पायावर नजर गेली. त्यांच्या पायाच्या अंगठ्याचे नख ठेच लागून पूर्ण उकलले होते. ती गोष्ट फोटो पाहणाऱ्या अजयला आठवली आणि वडिलांच्या त्या जखमेची कळ त्याला जाणवली आणि त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले. पुढे त्याला आजारी असताना तहानभूक विसरून आपली उठाठेव करणारी आई आठवली. ती कशी दिवसदिवस आपल्या बाजूला बसून असायची. हे त्याला आठवू लागलं.
दवाखान्यात ऍडमिट असताना आपले वडील कसे दिवसभर रानात काम करून दवाखान्यात रात्रभर आपल्या काळजीपोटी जागे असायचे हेही त्याला आठवलं आपला हात जरी हलला तरी ‘काय झाले’ म्हणून दचकणारे वडील त्याला डोळ्यासमोर दिसू लागले आणि त्याला अपराध्यासारखे वाटू लागले. अजयने काढलेले socks परत पायावर चढवले आणि कल्याणीला त्याने आवाज दिला आणि तिला तो म्हणाला” दहा मिनिटात आवर आपण गावाला निघतोय” तो आतल्या रूम मध्ये गेला आणि आपले काही ड्रेस त्याने बॅगेत कोंबले आणि बाहेर आला.
“जास्त उशीर लावू नकोस. मी गाडी काढतोय. लगेच खाली या” असे तो म्हणाला आणि बाहेर पडलाही.
“ अहो मुलांची शाळा” कल्याणीने विचारले
“ शिक्षकांना मॅसेज टाक की, मुले 2-3 दिवस शाळेत येऊ शकणार नाहीत “ अजय
“आणि तुमचं ऑफिस ?“ कल्यानीच्या या प्रश्नात मात्र प्रेमळ टोमणा होता. तो अजयला समजलाही आणि तो म्हणाला
“ आयुष्यात केवळ ऑफिस एवढीच जबाबदारी नाही त्यासोबत इतरही जबाबदाऱ्या आहेत ज्या वेळेत पूर्ण करायला पाहिजेत. नाहीतर वेळ निघून गेल्यावर वाट्याला केवळ पश्र्चाताप यायचा.”
अजयच्या या उत्तरावर दारातून डोकावणारी कल्याणी मिश्किल पणें हसत मान हलवत अजयला चिडवत होती. रात्री १० वाजता गाडी गावातल्या घरासमोर येऊन थांबली आणि कोण आलं म्हणून अजयची आई दरवाज्यात आली. तोपर्यंत दोन्ही मुलं आज्जी आज्जी करत त्यांना जाऊन बिलगली. त्या साऱ्यांना पाहून तिला अतिशय आनंद झाला. तिने सर्वांना बाहेरच थांबायला सांगितले. पटकन ती आत गेली आणि पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर आली. तिने भाकरीचा तुकडा सर्वांवरून उतरून टाकला. अजय आणि कल्याणी आईच्या पाया पडले आईने दोघांच्या गालावरून मायेनं हात फिरविला.
“आबा कुठं आहेत?” या अजयच्या प्रश्नावर “ हाईत की आतल्या खुलीत “ असे त्याच्या आईने उत्तर दिले.
“आबा “ असा आवाज दिल्यावर बिछान्यावर झोपलेल्या आबांनी अजयकडे पाहिले. त्यांच्या गालावरून ओघळणारे अश्रू अजयच्या नजरेतून सुटले नाहीत.
“तुझा फोन बंद लागतूय असं सांगितल्यापासून तुझ्या काळजीने राहून राहून डोळ्यातून पाणी काढत बस्त्यात सांग बाबा आता तूच “ अजयची आई बोलू लागली.
“चार दिवस झालं. त्या दिशी रानातून आलं आणि अंथरूण धरलं. दवाखान्यातून आणलं तरी काय ताप उतरत न्हाय.”
अजयने आबांच्या अंगाला हात लावून पाहिला. अंग भट्टी सारखं तापलं होतं. त्यांच्या हालचालींवरून अंगात अशक्तपणा आहे हेही जाणवत होतं.
“दोन दिस झालं काय खायना पण झाल्यात” असं बोलता बोलता आईच्या डोळ्यातून पाणी आले आणि तिचा आवाज एकदम कापरा झाला.
कल्याणी लगेच स्वयंपाक घरात गेली. आबांसाठी तिने ताट करून आणले आणि अजयच्या हातात दिले.
“आबा जेवण करून घ्या “ असे अजय म्हणाला परंतु आबांनी मान फिरवली. अजयने भाकरीचा तुकडा करून घास बनविला आणि आबांच्या तोंडाजवळ धरला. आबांनी तो घास घेतला तसा अजयच्या आईने डोळ्याला पदर लावला. घास खाता खाता आबांनी अजयचा हात हातात घेतला. दोन्ही पोरांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि सूनबाईकडे पाहून अबोलपणे तिला कशी आहेस? अशी विचारणा केली. सकाळी उठल्या उठल्या अजय आबांच्या खोलीकडे गेला तर आबा तिथे नव्हते. तो बाहेर आला तर आबा अंघोळ आवरून चहा घेत बसले होते. अजय त्यांच्या जवळ गेला तोपर्यंत कल्याणी ने त्याच्या हातात चहाचा कप आणून दिला. तो घे तो आबांपाशी जाऊन बसला आणि त्यांना म्हणाला,
“कसं वाटतंय आबा आता?“
अजयच्या या प्रश्नावर “ अन् मला काय झालंय“ असं आबांनी उत्तर दिले आणि अजयच्या आईने हसत हसत तोंडाला पदर लावला. आबा जाग्यावरून उठू लागले तर अजयने आबांच्या हाताला स्पर्श केला. रात्री भट्टी सारखे गरम लागणारे अंग अगदी थंड होते आणि अंगातला अशक्तपणा कुठच्या कुठे पळून गेला होता. उठून दरवाज्यापाशी आलेल्या आबांनी आपल्या सुनेला हाक दिली.
“ पोरी आवरून रानाकड य. तू लावलेल्या पिरविला सगळ्यात जास्त पिरू लागल्यात. आल्यास तर पिकावर हात फिरवून जा. लक्ष्मी हाईस आपल्या खानदानाची.” एवढं बोलून खिशातील गांधी टोपी डोक्यावर चढवून आबा ताठ कण्याने रानाच्या वाटेने जाऊ लागले. बाहेर येऊन आबांच्या पाठमोरी आकृती कडे पाहणाऱ्या अजयच्या शेजारी कल्याणी येऊन उभा राहिली तेव्हा अजय तिला म्हणाला,
“तू म्हणालीस ते खरंच आहे. केवळ पैसाच हा सगळीकडे उत्तर असू शकत नाही. पैसा सोबत असण्यापेक्षा आपली माणसं सोबत असणं खूप महत्वाचं आहे.”
अभिजित चोथे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा