व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल, तर ग्राहकांना काय हवं आहे हे शोधा - असा सल्ला नेहमी दिला जातो.
पण एका उद्योजकाने याच्या अगदी उलट प्रश्न विचारला.
लोकांना काय हवं आहे? याऐवजी लोकांना काय नको आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला.
ज्या वस्तूकडे कोणी पाहत नाही, जे काम कोणी करायला तयार नाही, ज्या बाजारातून प्रत्येकजण बाहेर पडत आहे-- तिथे काही संधी लपलेली असू शकते का?
Ingvar Kamprad इंग्वार काम्प्राड यांनी व्यवसायाला लहान वयातच सुरुवात केली.
घरातून ते पेन्स, पेन्सिली आणि अगदी मासेसुद्धा विकत. व्यवसाय वाढू लागला, तसं त्यांनी मेल ऑर्डरच्या माध्यमातून वस्तू विकायला सुरुवात केली.
पण वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या कशा?
स्वतःची वाहतूक व्यवस्था उभी करणं त्यांच्यासाठी महाग होतं. तेव्हा काम्प्राड यांच्या लक्षात आलं की दूध पोहोचवणाऱ्या ट्रकमध्ये बरीच जागा रिकामी राहत होती. ती जागा कोणालाच नको होती.
काम्प्राड यांनी तीच वापरली.
इतरांना दिसत होती रिकामी जागा.
त्यांना दिसली वितरण व्यवस्था.
पुढे फर्निचरच्या कारखान्यांमध्ये काम करताना त्यांना मोठ्या प्रमाणावर लाकडाचे उरलेले तुकडे दिसले. कारखान्यांसाठी ते टाकाऊ होते. ते उचलून नेणं हीसुद्धा एक डोकेदुखी होती.
काम्प्राड यांनी विचार केला—या तुकड्यांपासून फर्निचर बनवता येणार नाही का?
त्यामुळे कच्च्या मालाचा खर्च कमी झाला. कारखान्यांची टाकाऊ मालाची समस्या सुटली. आणि स्वस्त फर्निचर तयार होऊ लागलं.
बाजारात कोंबड्या आणि इतर पक्षी साफ केल्यानंतर पिसांचे ढीग साचत. ती पिसं उचलून नेण्यासाठी पैसे द्यावे लागत.
काम्प्राड म्हणाले, “मी ती मोफत घेऊन जातो.”
ज्या पिसांसाठी एकाला पैसे मोजावे लागत होते, त्याच पिसांपासून दुसऱ्याने उशा आणि पांघरुणं बनवली.
व्होल्वोच्या कारखान्यात रबराचे उरलेले तुकडे फेकून दिले जात होते. काम्प्राड यांनी त्यापासून फोटो फ्रेम्सची एक नवी श्रेणी तयार केली.
त्यांची खासियत स्वस्त वस्तू शोधण्यात नव्हती.
इतरांच्या दृष्टीने निरुपयोगी असलेल्या गोष्टींचा उपयोग शोधण्यात होती.
आणि मग एक दिवस इंग्वार काम्प्राडची ओळख बदलणारी घटना घडली.
त्यांच्या एका कर्मचाऱ्याला एक टेबल घरी न्यायचं होतं. पण ते कारमध्ये बसत नव्हतं.
त्याने सहज म्हटलं,
“याचे पाय काढता आले, तर टेबल कारमध्ये बसेल.”
बहुतेक लोकांनी हे वाक्य ऐकून टेबल मोठं आहे, कार लहान आहे किंवा दुसरं वाहन आणावं लागेल, एवढाच विचार केला असता.
काम्प्राड यांच्या मनात मात्र वेगळाच प्रश्न आला.
फर्निचरचे भाग वेगळे करून ते ग्राहकांना का विकू नयेत?
ग्राहकांनी फर्निचर घरी न्यावं. स्वतः जोडावं. वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च कमी व्हावा. किंमतही कमी राहावी.
आज आपण ज्याला ‘फ्लॅट-पॅक फर्निचर’ म्हणतो, त्यामागे हेच साधं निरीक्षण होतं.
टेबल कारमध्ये बसत नव्हतं.
पण त्या समस्येमध्ये जगभर पसरू शकणारी व्यवसायपद्धती दडलेली होती.
काम्प्राड यांनी अशा प्रकारचं फर्निचर बनवायला सुरुवात केली. या त्यांच्या व्यवसायाचं नाव होतं IKEA. त्यांनी उभारलेल्या IKEAच्या दुकानांतून आज जगभरातून दरवर्षी सुमारे ३१ कोटी ग्राहक वस्तू खरेदी करतात.
या प्रचंड व्यवसायाची सुरुवात कुठून झाली?
ज्या गोष्टी कोणालाच नको होत्या, त्यांच्याकडे कुतूहलाने पाहण्यापासून.
संधी नेहमी मोठ्या, चकचकीत आणि सर्वांना दिसणाऱ्या स्वरूपात येत नाही.
कधी ती रिकाम्या ट्रकमध्ये असते.
कधी टाकाऊ लाकडाच्या तुकड्यांत.
कधी बाजारात पडलेल्या पिसांमध्ये.
याचा अर्थ प्रत्येक टाकाऊ वस्तू सोनं असते का?
नाही.
प्रत्येक दुर्लक्षित बाजार फायदेशीर असतो का?
अजिबात नाही.
“कोणीच हे करत नाही” याचा अर्थ दोनपैकी एक असू शकतो.
कदाचित तिथे संधी आहे.
किंवा कदाचित तिथे खरोखरच मागणी नाही.
या दोन्ही गोष्टींमधला फरक ओळखण्यासाठी केवळ धाडस पुरेसं नसतं. निरीक्षण, ग्राहकांची समज आणि आर्थिक गणित लागतं.
काम्प्राड यांनी पिसं फक्त स्वस्त मिळत होती म्हणून घेतली नाहीत. त्यांना त्यापासून विकता येणारी वस्तू दिसली.
हीच खरी कसोटी आहे.
इतरांना नको असलेली गोष्ट तुमच्यासाठी स्वस्त असू शकते.
पण ग्राहकाला तिच्यापासून मिळणारा उपयोग मौल्यवान असला पाहिजे.
सगळे जिथे मासेमारी करत आहेत, तिथे मासे जास्त असतील.
पण तिथे जाळीसुद्धा जास्त असतात.
जिथे कोणीच जात नाही, तिथे मासे थोडे असतील.
पण कदाचित ते सगळे तुमचे असतील. (Blue Ocean Theory)
जेन ' झी या मोबाईल मध्ये गुरफटलेल्या पिढीला कोणीच गंभीरपणे घेत नव्हतं (कदाचित ते अजून मतदार नाहीत म्हणून !) ...पण जेव्हा कोणी त्यांना आवाज दिला तेव्हा संपूर्ण देश ढवळून निघाला. हे व्यवसायातील Blue Ocean Theory चं उत्तम उदाहरण आहे.
म्हणून पुढच्या वेळी एखादं काम, ग्राहक, बाजार किंवा कल्पना पाहून कोणी म्हणालं, “यात काहीच स्कोप नाही,” तेव्हा लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
क्षणभर थांबा.
कदाचित त्यांना खरंच काही दिसत नसेल.
आणि कदाचित म्हणूनच तिथे तुमच्यासाठी एखादी संधी वाट बघत असेल.
(बोनस ज्ञान :-)
IKEA नाव कसं तयार झालं ?
I म्हणजे Ingvar — इंग्वार
K म्हणजे Kamprad — काम्प्राड
E म्हणजे Elmtaryd — तो लहानाचा मोठा झाला ते शेत
A म्हणजे Agunnaryd — स्वीडनमधील त्याचं मूळ गाव
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा