आई गेल्यानंतर लगेचच दोन-तीन महिन्यांनी दिवाळी आली होती. चार दिवस आधीच फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला, म्हणून आपल्याला निदान सगळं समजलं तरी. नाहीतर आपल्यापर्यंत काही पोचणं शक्यच नव्हतं, असंच सविताला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते वेगळंच काहीतरी सांगत. रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघालीच. नेहमीसारखी रिझर्वेशन करायची तसदी आणि काळजीसुद्धा यावेळी तिने घेतली नाही.
"प्री-प्लॅन्ड असतं, तर मीही येऊ शकलो असतो." सारंग म्हणाला.
"हो, पण ते लांबणीवर पडलं असतं. आता ठरवलंय तसं जाऊन येते. त्याशिवाय मलाच चैन पडणार नाही."
"हो. काळजी घे पण. उगीच त्रागा करू नको बोलताना. मन शांत ठेव. सगळं ठीक होईल. हँडल द सिच्युएशन विथ केअर."
निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार आठवून सविताला आत्ताही भरून आलं.
'सगळीजणंच अशी समजूतदार असती, तर आज ही वेळ कशाला आली असती?..' तिला वाटत राहिलं.
सविता आज पुणे-मिरज बसमध्ये चढली, तीही अशी अस्वस्थता सोबत घेऊनच. समक्ष जाऊन आण्णांना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती.
आण्णा म्हणजे तिचे वडील. तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बऱ्यापैकी समृद्ध खेड्यातलं. मिरज स्टैंडला उतरून मग सिटी बसने पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागे. असं असूनही 'माहेरी जायचं' या कल्पनेने ती प्रत्येकवेळी इतकी आनंदी असायची, की प्रवासातले हे सहा तास कसे संपले तेच तिला कळायचं नाही. पण आजची वेळ तशी नव्हती. आजच्या इतका हा प्रवास तिला पूर्वी कधीच कंटाळवाणा वाटलेला नव्हता. अर्थात हा तिच्या अस्वस्थ मनःस्थितीचाच अपरिहार्य परिणाम होता. एरवी ती माहेरी जायची ते काही फक्त आई-आण्णांच्या ओढीनेच नव्हे. तिच्या एकुलत्या एका भावाच्या संसारात तिलाही मानाचं स्थान होतंच की ! पण आजची गोष्ट वेगळी होती !
आज ती निघाली होती ते अशीच वेळ आली, तर आण्णांना कायमचं पुण्याला आपल्याकडे रहायला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच आणि सारंगचाही या तिच्या निर्णयाला विरोध नव्हताच. एखाद्या माणसाच्या जाण्यानं, नसण्यानं, त्याच्या असतानाचे संदर्भइतक्या चटकन बदलू शकतात? तिला प्रश्न पडला होता. पण बदललेले संदर्भ स्वीकारून पुढे जायचं हे तिने ठरवून टाकलं होतं !
सविताची आई अचानक गेली, तेव्हापासून या सगळ्याला सुरुवात झाली होती. आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती. आई गेल्याचं तिच्या मनातलं दुःख असं अचानक दुपेडी होऊन बसलं. आई गेल्याचं दुःख होतं, त्यात आणि एकट्या पडलेल्या आण्णांची काळजी. आई-आण्णा दोघांबद्दलही सविता थोडी जास्तच हळवी होती. त्याला कारणही तसंच होतं. आण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते. आर्थिक परिस्थिती बेतासबात असूनही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा-मुलगी असा भेद कधीच केला नव्हता. म्हणून तर सवितासारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनियर होऊ शकली होती आणि पुण्यात एका आय.टी. कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होती !
आण्णा गावातल्याच एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. घरी पैशाचा ओघ बेतासबातच असे. तरीही स्वतः अगदी काटकसरीत राहून आई-आण्णांनी सविता अन् तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं. आण्णांच्या या शिक्षणाच्या संस्काराचा फायदा त्यांच्या सूनेलाही मिळाला होताच. सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनियर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून तिथे गावातच त्याने गॅरेज सुरु केले. तो कष्टाळू होता आणि महत्त्वाकांक्षीही. त्यामुळे त्याचं लग्नाचं पहायला सुरुवात केली, तेव्हा खूप चांगल्या मुली त्याला सांगून आल्या होत्या. पण कायम या खेड्यात रहायची त्यांची तयारी नसायची. अखेर गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्याने पसंत केली. ती लग्नाआधी बी.एस्सी. झाली होती. हुशार होती. आण्णांनीच तिला बी.एड. करायला प्रवृत्त केलं. तिला लगेच मिरजेला एका शाळेत जॉबही मिळाला. असं सगळं कसं छान, सुरळीत होतं.
निदान परवापरवापर्यंत तरी सविताला तसं वाटत होतं. पण... आई अचानक गेली ... आणि ?
वहिनीला नवीन नोकरी लागली होती. तेव्हा मिरजेला जाऊन येऊन करता करताच ती मेटाकुटीला यायची. पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती. ती होती तोपर्यंत घराला कसले प्रश्नच नव्हते जसे काही. तेव्हा घरात अधूनमधून भांड्याला भांड लागलंही असेल कदाचित, पण त्याचे आवाज सवितापर्यंत पोचले नव्हते. आई गेली, तिचं दिवसकार्य सगळं आवरलं, तेव्हाच सविता आणि सारंग दोघांनीही आण्णांना बदल म्हणून थोडे दिवस पुण्याला यायचा आग्रह केला होता. पण आण्णाच तेव्हा, 'नाही. नको. पुढं कधीतरी येईन.' म्हणाले होते. पण ते 'पुढे कधीतरी' असं नको त्या पद्धतीने आणि इतक्या लवकर येईल असं मात्र सविताला तेव्हा वाटलं नव्हतं. त्यांचा स्वाभिमान दुखवून आण्णांना तिथून बाहेर पडायला लागणार या कल्पनेनंच सविता अस्वस्थ होती. पण आता एक घाव दोन तुकडे करण्याशिवाय गत्यंतर नव्हतंच !
तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिथे पोचला तेव्हा आण्णा अंगण झाडून झाल्यावर व्हरांड्यातला केर काढू लागले होते. सारंगला अचानक समोर पाहून ते थोडे कावरे-बावरे झाल्यासारखे वाटले त्याला. थोडे थकल्यासारखेही. पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यानी सारंगचं स्वागत केलं होतं. हे ऐकून सविताला तेव्हा धक्काच बसला. आण्णा आणि घरकाम ? शक्य तरी आहे का हे ? निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे. त्यांना वाचनाची आवड होती. ते करायचे. त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नसताना ते न आवडणारी, न येणारी काम या वयात आपण होऊन करणं शक्य तरी आहे का? हे सगळं वहिनीचंच कारस्थान असणार हे उघडच होतं. तिचं जाऊ दे, पण दादा? त्याला कळायला नको ? सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती, ते याचसाठी ! आण्णांशीच नव्हे, दादा-वहिनीशीही या विषयावर बोलायचं आणि तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे तिनं ठरवूनच टाकलं होतं. मिरजेला उतरताच ती सिटीबससाठी स्टॉपवर येऊन उभी राहिली आणि अचानक तिला आण्णाच समोरून येताना दिसले. हातात दोन जड पिशव्या घेऊन ते पाय ओढत चालत होते. बसस्टॉपकडेच येत होते. त्यांना त्या अवस्थेत पाहून सविताला भरून आलं एकदम. ती कासावीस झाली. तशीच पुढे झेपावली.
"आण्णा, त्या पिशव्या द्या बघू इकडे. मी घेते" पाच-पाच किलो साखरेच्या त्या दोन जड पिशव्या होत्या. सविताच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिनली.
"सावू.. तू? तू इथे कशी?" कपाळावरचा घाम रुमालाने टिपत त्यांनी विचारलं. त्यांच्या थकून गेलेल्या चेहऱ्यावरही आनंद पसरला एकदम !
"मुद्दामच, तुम्हाला भेटायला आले."
"पण.. असं अचानक? काहीच न कळवता ?
"का? तसं येऊ शकत नाही का मी?"
"तसं नाही गं.. पण.."
"खरं सांगू आण्णा? तुम्हाला येऊन भेटावं, असं तीव्रतेने वाटलं, म्हणून आलेय. फक्त तुमच्यासाठी. कसे आहात तुम्ही?" तिने अपार करुणेने विचारलं.
"कसा वाटतोय?" कसनुसं हसत आण्णांनी विचारलं.
"खरं सांगू? खूप थकल्यासारखे वाटताहात." तिचा आवाज भरूनच आला एकदम.
"थकलो तर आहेच गं सावू, पण हरलो नाहीये."
"म्हणजे?" तिने न रहावून विचारलं.
"म्हणजे हेच, की अजूनही हिंडतोय-फिरतोय."
तेवढ्यात समोरून बस येताना दिसली आणि सविता काही बोललीच नाही. बसमध्ये सगळेच एका गावचे. ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणं तिलाच प्रशस्त वाटेना.
"आण्णा, आपण लगेच घरी नको जायला. बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली क्षणभर. "
" का गं?" त्यांनी आश्चर्याने विचारलं.
"शाळेजवळच्या देवळात थोडावेळ बसू, मग घरी जाऊ. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय."
"अगं मग बोल ना. घरी जाता जाता बोल. हवंतर घरी गेल्यानंतर निवांत बोल.
"नाही आण्णा, नको."
"सावू, बाळा एवढ्या लांबचा प्रवास करून आलीयेस. आधी घरी चल. हातपाय धू, फ्रेश हो. थोडी विश्रांती घे. मग बोल. घाई काय आहे एवढी ?"
सविताला पुढे काही बोलताच येईना.
"सविताताई, हे काय? असं अचानक ?"
बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे आली आणि सविताच्या हातातल्या दोन पिशव्या पाहून चपापली. तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि तिने आण्णांकडे चमकून पहाताना तिच्या नजरेत भरलेली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नव्हतीच. तिला बॅग न देता सविताने मुद्दाम त्या जड पिशव्याच तिच्या पुढे केल्या. तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं, मग मात्र वहिनीने त्या हसतमुखाने घेतल्या.
"आधी कळवलं असतंत तर मोटार सायकल घेऊन हे आले असते मिरज स्टँडवर तुम्हाला आणायला."
तिच्या बोलण्यात सहजपणाच होता, पण सविताला तो सहजपणे स्वीकारावासा वाटेना.
"मुद्दामच नाही कळवलं. अचानक रजा मिळाली. म्हटलं तसंच अचानकच जाऊया."
"मधेच रजा?"
"हो. आण्णांना भेटावसं वाटलं. म्हणून रजा घेतली." ती रोखून पहात म्हणाली.
ते जणू काही वहिनीच्या गावीच नव्हतं.
"बरं झालं आलात. आता आलाच आहात तशा चार दिवस आराम करा. मग आहेच पुन्हा रहाटगाडगं." वहिनी सहजपणे हसत म्हणाली. 'मी इथे आराम करायला आलेली नाहीये. असं ठणकावून सांगावं असं सविताला वाटलं, पण आण्णांकडे पाहून ती गप्प बसली. चहा-खाणं आवरलं, तसं ती उठली.
"वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते.'
"बर, या"
चला आण्णा."
"आण्णा ? त्यांना कशाला?" वहिनी आश्चर्यानं म्हणाली. "का? त्यांना का नको नेऊ?" सवितानं चिडून विचारलं,
तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखी वाटला. ती चपापली, कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली.
"तसं नाही सविताताई, पण...'
"मग कसं?" आता गप्प बसायचं नाही हं, सवितानं ठरवूनच टाकल.
"सविताताई, तुम्ही जा दोघं, पण मग अंधार व्हायच्या आत परत या."
सविता रागाने तिच्याकडे पहात राहिली. फट् म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता.
"आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय म्हणून म्हटलं.. फार अंधार करू नका."
"आण्णा?" सविताने आण्णांकडे पहात आश्चर्याने विचारलं. ते मानेनंच हो म्हणाले. तरीही खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवल्या. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली. देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.
"मला लगेच कळवलं का नाहीत?"
"कशाचं?"
"ऑपरेशनचं.
"त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीये. डॉक्टर करा म्हणाले, की लगेच करायचं आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं. तू उगाच काळजी करतेस."
"आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?"
तिने मुद्यालाच हात घातला. आण्णा थोडे सावध झाले. सावरून.
"मी? काम असं नाही गं."
"काहीच करत नाही?"
"म्हणजे काहीच नाही असं नाही. करतो आपलं मला जमेल ते. जमेल तसं."
"का?" तिने तीव्रतेने विचारलं.
"का म्हणजे? नुसतं बसून काय करायचं?" त्यांच्या घशात एकदम
आवंढा आला न् ते गप्प बसले.
"तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला. वहिनीला जमत नसेल, तर चार बायका लाव म्हणावं कामाला. तिने तुम्हाला कामं का लावायची ?"
"तुला सारंग बोललेले दिसतायत सगळं."
"सारंगनं कशाला सांगायला हवं? आज मीही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंच आहे की. दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही इतक्या लांबून का वहायच्या? तेही या वयात? वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला ये-जा करते. गॅरेजच्या कामासाठी एक दिवसाआड का होईना दादाचा मोटार सायकलवरून एखादा तरी हेलपाटा असतोच. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे या विषयावर."
"ए.. वेडी आहेस का तू? तू... तू... तिला यातलं काहीही
बोलायचं नाहीस."
"का?"
"मी सांगतो म्हणून."
"ठीक आहे. पण मग मी ... दादाशी तरी बोलणारच"
"दादाशी? न.. नाही, नको."
"का पण? त्यांनाही समजू दे ना, त्यांनाही जाब विचारणारं कुणीतरी बसले आहे."
"जाब ? कशाचा जाब सावू? हे बघ, तू रागाच्या भरात काहीतरी बोलून बसशील आणि दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखं सगळंच नासून
जाईल. ऐक माझं. तू काहीही बोलू नकोस."
"आण्णा, पण.."
"हे बघ, तू लक्ष घालावंस, त्रास करून घ्यावास, असं खरंच काही नाहीये."
हे खरं की खोटं तिला समजेना. ती अगदी हळवी होऊन गेली. आण्णांच्या काळजीनं तिचे डोळे भरून आले.
'सावू.. अगं रडायला काय झालं?"
"मला... मला तुमची खूप काळजी वाटतेय हो.."
ती त्यांना बिलगली आणि हमसाहमशी रडत राहिली.
ते पाहून आण्णा विचारात पडले. तिला हलक्या हाताने थोपटत राहिले. आपल्या हळव्या मुलीचा त्यांना आधारही वाटला आणि तिची
काळजीही !
"सावू, हे बघ, तू आधी शांत हो आणि मी जे सांगतो, ते नीट ऐक. तुझ्या वहिनीनं घरकामासाठी दोन बायका ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या मदतीने सगळी कामं तीच करते. दादा सगळं आणणं-सवरणं, बाजारहाट बघतो. 'तुम्ही आज अमूक एक काम करा. असं त्या दोघांपैकी कुणीच कोणतंच काम आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाहीये. अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला, तेव्हा तुझ्या वहिनीनंच तो माझ्याकडून काढून घेतला होता. रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. तरीही मी केर काढू नये म्हणून दोघांपैकी कुणीतरी लवकर उठून ते काम करू लागले. अखेर एके दिवशी त्या दोघांना समोर बसवून मीच माझ्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं. मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो. म्हणून मी ते करतो."
"आणि त्या साखरेच्या दहा किलो ओझ्याचं काय?"
"ती शुगरमिलच्या शेअर्सवरची साखर होती. शेवटची तारीख जवळ येत चालली होती आणि दोन-तीनदा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या. एकदा 'हवंतर मी आणतो' असं म्हटलं त्याला तर, तोच 'साखर फुकट जाऊ दे, पण तुम्ही जायचं नाही' असंच म्हणाला होता. आज शेवटची तारीख होती. मी मोकळाच होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपण होऊन गेलो होतो. मी जायला नको होतं ते त्या जड पिशव्या उचलल्या तेव्हाच समजलं."
सविता विचारात पडली. हे सगळं असंच असेल? आण्णा स्वतः खूप शांत आणि सोशिक आहेत, हे ती विसरू शकत नव्हती. ते त्या दोघांना पाठीशी घातल नसतील कशावरून?
सविताच्या हळव्या मनात रुतून बसलेला हा प्रश्न आण्णांच्या गावीच नव्हता. ते स्वतः तच हरवले होते.
"सावू, तुला सांगू? तुझ्या आईचं आजारपण म्हणजे कसोटीच होती एक. माझी आणि दादाचीच नसेल, एवढी तुझ्या वहिनीची, पण ती त्या कसोटीला पूर्णपणे उत्तरलीय, अखेरचे दोन महिने ती बिनपगारी रजा घेऊन घरी होती. तिची सगळी रजा हिच्या आजारपणात आधीच संपली होती. मी तुझ्या वहिनीला खूपदा सुचवलं होतं, 'आपण सावूला बोलावून घेऊ. थोडे दिवस ती रजा घेईल.' असं, पण तुझी वहिनीच 'इतक्यात नको' म्हणाली होती. 'सविताताई आपल्या हुकुमाचा एक्का आहेत. तो आत्ताच कशाला वापरायचा? तिथून उठून येऊन त्यांनी इथे रहाण्यापेक्षा होईल तितकं मी मॅनेज करते. अगदी अडेल तेव्हा त्या आहेतच.' असं ती म्हणायची. याच बाबतीत नाही सावू, एरवीही तिने स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाहीये. तुला सांगू? अशी एखादी वेळ येते ना, तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होत असते. त्या सगळ्याकडे पहाणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी."
सविताला हे पटत होतं, पण स्वीकारता येत नव्हतं. "माझ्यावरील प्रेमापोटी सावू, आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस, म्हणून तुला हे सगळं सांगावं लागलं. जसा मी, तसेच सावू, ते दोघेही तुझेच आहेत. आजवर तुझी आई सोडली, तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाचजवळ कधीच बोललेलो नाहीय. मात्र मी ती तुला सांगणं आज मला गरजेचं वाटतंय."
"कोणती गोष्ट आण्णा?"
"तुझा विश्वास बसणार नाही सावू, पण तुझ्या वहिनीच्या हातचा स्वयंपाक मला कधीच आवडायचा नाही. तुझ्या आईच्या हातच्या चवीनं मला लाडावून ठेवलं होतं. तुझ्या वहिनीनं स्वयंपाक केला असेल, तेव्हा ती आसपास नसताना, तुझी आई न बोलता माझ्या आवडीच काहीबाही रांधून मला खाऊ घालायची. आज ती नाहीये. पण कसं कुणास ठाऊक, आता मात्र तुझ्या वहिनीनं केलेल्या स्वयंपाकाची चव मला खूप छान वाटते. मनापासून आवडते. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. तीही सगळं मनापासून आणि प्रेमानं करतेय, हे जाणवल्यानंतरची आजची गोष्ट वेगळी आहे. फरक आपल्या दृष्टीकोनातला असतो सावू. खरं सांगायचं तर सगळी माणसं आपलीच असतात. आपणही त्यांच्याकडे त्याच आपुलकीने पाहिलं, तर ती खऱ्या अर्थाने आपली होऊन जातात. नाहीतर वेळ नाही लागत. मग नातेबंध तुटायला
एक सांगतो, ते कायम लक्षात ठेव. नाती जवळची, लांबची कशीही असोत, ती नाजूकच असतात. त्यांना 'हँडल विथ केअर' हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं तरच ती हलक्या हाताने जपता येतात.
नात्यांचं हे महत्त्व तुझी तुझी आई गेली, तेव्हा मला खऱ्या अर्थानं समजलं. केविलवाणा होऊन गेलो होतो गं मी, पण तुझ्या दादा-वहिनींनी मला समजून घेतलं, सांभाळल, म्हणूनच त्या अपार दुःखातून मी इतक्या लवकर स्वतःला सावरू शकलो.....!"
त्या दोघांवर अचानक टॉर्चचा प्रकाशझोत पडला आणि दोघेही दचकले.
"गप्पा संपल्या की नाही अजून?" दादानं विचारलं.
दादा-वहिनी दोघेही त्यांना न्यायला आले होते. तोवर इतकं अंधारून आल्याचं त्यांना समजलंच नव्हतं. सविताचं मन तर कितीतरी दिवस अशा अंधारातच बुडून गेलं होतं. पण आण्णांच्या बोलण्यामुळे तो अंधार मात्र आता विरून गेला होता. सगळं कसं आता लख्ख दिसू लागलं होतं..!
सविता चटकन् उठली. पुढे झेपावली. वहिनीच्या गळ्यात पडून बांध फुटल्यासारखी रडत राहिली.
ही असं का करतेय दोघांनाही समजेचना. "आण्णा, काय झालंय हिला असं अचानक ?"
काय झालंय ते फक्त आण्णांनाच माहित होतं. पण ते सगळं त्यांनी गिळून टाकलं. स्वतःशीच हसले.
"काही नाही रे. तिला तिच्या आईची आठवण आली असेल एकदम. म्हणून तिला बिलगलीय..."
आण्णा बोलले ते अनेक अर्थानी खरं होत! निदान आज, या क्षणापुरती तरी वहिनी तिची आईच झाली होती जशी काही ..! हा क्षण सविता मनात अतिशय हळुवारपणे जपून ठेवणार होती !!
लेखक - अरविंद लिमये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा