"काही वस्तू माणूस विकत घेतो...काही वस्तू माणसाला विकत घेतात."
सन २००१.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातलं केंद्रा हे छोटंसं गाव. पावसाळ्यात लाल मातीने नटणारं, उन्हाळ्यात धुळीने पांढरं पडणारं आणि आठवडी बाजाराच्या दिवशी अचानक जागं होणारं हे गाव. पहाटेच्या अजानने गाव जागं व्हायचं. त्या अजानसोबतच रहमानचीही झोप उडायची.
रहमान अब्दुल शेख. सगळ्या पंचक्रोशीत तो "रहमान भंगारवाला" म्हणून ओळखला जायचा. त्याचा व्यवसाय साधा होता; पण त्याच्या डोळ्यांना प्रत्येक जुन्या वस्तूची किंमत कळायची. जर्मनची ताटं, तांब्याचे हंडे, पितळी समया, फुटलेल्या बादल्या, पोच आलेली पातेली, जुनी कुलुपं, तुटलेल्या पेट्या आणि रद्दी झालेली पुस्तकं. सगळं काही तो किलोच्या भावाने विकत घ्यायचा. मग हिंगोलीच्या मोडी बाजारात नेऊन विकायचा. यातूनच त्याचा संसार चालायचा.
घरात पत्नी आयेशा, मुलगा सलीम आणि लहान मुलगी ताकिया. मातीचं घर, कौलारू छप्पर, दारात एक जुनी सायकल आणि अंगणात पावसाचं पाणी साठवण्यासाठी ठेवलेला लोखंडी ड्रम. इतकंच त्याचं विश्व होतं. रहमानच्या चेहऱ्यावर मात्र कधी तक्रार नसायची. नमाज चुकायचा नाही. रमजान आला की रोजे, ईद आली की जकात. आणि प्रत्येक दुआच्या शेवटी एकच इच्छा - "या अल्लाह... एकदा तरी मक्का-मदिना दाखव."
पण त्या घरात एक मन असं होतं, ज्याला या दुआवर विश्वास नव्हता. आयेशा. ती अनेकदा रहमानला म्हणायची, "नमाजने पोट भरत नाही रहमान... पैसा लागतो पैसा. मला आयुष्यभर या मातीच्या घरात मरायचं नाही." रहमान हसायचा, "रिज्क अल्लाह देतो." आयेशा चिडून निघून जायची. तिच्या डोळ्यांत घर नव्हतं, बंगला होता. सायकल नव्हती, गाडी होती. भंगार नव्हतं, सोनं होतं. त्या लोभाची सावली तिच्या बोलण्यात रोज थोडी थोडी वाढत होती.
त्या दिवशी गुरुवार होता. दुसऱ्या दिवशी नंदापूरचा आठवडी बाजार भरायचा होता. रहमानने नेहमीप्रमाणे पोती, काटा आणि जुने वजन सायकलवर बांधले. घरातून बाहेर पडताना ताकियाने मागून आवाज दिला, "ऐका..." "काय?" "आज गुलकंद मामाकडे जा."
रहमान थांबला. त्याच्या चेहऱ्यावरची शांतता एका क्षणात विरली. फकीर गुलकंद शहा , आयेशाचा धाकटा भाऊ. गावोगावी त्याच्याबद्दल कुजबुज व्हायची. कोणी म्हणायचं तो बायल्या आहे, कोणी म्हणायचे पायाळू असल्यामुळे जमिनीखालचं पाणी सांगतो, कोणी म्हणायचं तो पुरलेलं धन ओळखतो. कोणी म्हणत असे फकीर गुलकंद यांस मां कामाख्या प्रसन्न आहे; तर कोणी म्हणत असे फकीर गुलकंद शहा हे फार पाक असून त्यांनी दाताखाली चावून दिलेली नाणी गल्ल्यात ठेवली तर धंद्यात बरकत येते.
रहमानने त्या गोष्टींवर कधी विश्वास ठेवला नव्हता. पण एक गोष्ट मात्र खरी होती. फकीर गुलकंदला भेटायला लोक दिवसा कधीच जात नसत. रात्र, साडेदहा आणि त्याचं एकांतातलं छोटंसं घर, तेवढाच त्याचा वेळ.
रहमानने सायकल पुढे ढकलली. त्याला अजिबात कल्पना नव्हती की उद्याच्या नंदापूर बाजारातून तो जे भंगार विकत आणणार होता, त्यामुळे त्याच्या घराचं दार एका अशा अंधारासाठी उघडणार होतं की जो अंधार अनेक वर्षांपासून कोणाची तरी वाट पाहत होता.
नंदापूर हे हिंगोली तालुक्यातील अडीच हजार लोकवस्तीचे गाव होत. दर शुक्रवारी गावचा बाजार भरत असे. नंदापूरच्या उत्तरेला कदम पाटील यांचा वाडा होता. एकेकाळी गावचे वैभव असलेला हा वाडा आता केवळ गत वैभवाच्या खुणा मिळवत वर्तमानातील दारिद्र्य उराशी कवटाळून अनिश्चित भविष्यकाळाकडे उदासपणे टक लावून पाहत असल्यासारखा वाटायचा. अच्युतराव कदम पाटील हे या वाड्यावर अन गावावर राज्य करणारे शेवटचे पाटील होत. अच्युतराव पाटलांच्या पाठीमागे त्यांचा मुलगा बाजीराव हा फारसा कर्तबगार निघाला नाही. बाजीरावची पत्नी गिरजाबाई अजून हयात होती. अंदाजे नव्वदीच्या घरात असलेली गिरजाबाई हिला आता अंधुक दिसत होते.
अच्युतराव पाटलांच्या काळात त्यांनी आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाई या कुलदेवतेच्या पूजेसाठी दोन सोन्याच्या लक्ष्मीच्या मुर्त्या घडवून घेतल्या होत्या. परंतु कुणाला जर कळाले की या सोन्याच्या मुर्त्या आहेत तर मग या सोन्याच्या मुर्त्यांना कोणीतरी चोरून घेऊन जाईल किंवा कोणीतरी डाका घालेल, या भीतीने त्यांनी या सोन्याच्या मूर्ती पितळेच्या आहेत असे खोटेच सांगितलं होतं. अच्युतराव पाटलाच्या मृत्यू सोबत हे रहस्य तसेच गुलदस्त्यात राहिले. अच्युतराव पाटलांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सत्यभामाबाई सुद्धा लगेच निजधामास गेली. आई-वडिलांच्या माघारी बाजीराव कदम पाटील हा मोकाट सुटला. बाजीराव कदम पाटील हा दारूच्या व्यसनामध्ये पार बुडाला. फारसा कर्तबगार नसलेला बाजीराव घरातील वस्तू विकून आपल्या व्यसनाची थेर भागवू लागला. आपल्या व्यसनाच्या करिता लागणारे पैशासाठी बाजीरावने मग देवघरातील त्या लक्ष्मीच्या मूर्ती पितळेचे आहेत असे समजून विकण्याचे ठरविले. त्यामुळे मग बाजीरावने एका गुरुवारच्या रात्री पितळेच्या डब्यात लक्ष्मीच्या दोन मूर्ती ठेवून दिल्या व दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारच्या बाजारात विकण्याचे ठरविले. परंतु बाजीरावसाठी तो शुक्रवार उजडलाच नाही.
शुक्रवारी पहाटेच्या वेळी झोपेत असतानाच बाजीरावला त्याच्या छातीत कळ आल्याचे जाणवले. बाजीराव खोकला व त्यानंतर कायमचा शांत झाला. त्या पितळी डब्ब्यात त्या दोन मुर्त्या तशाच पडून राहिल्या. घरात सुतक पडल्याने गिरजा बाईने तो पितळी डब्बा उचलून तसाच फडताळामध्ये ठेवून दिला. अनेक वर्ष तो पितळी डबा त्यामधील मुर्त्यांसहित पडताळामध्ये तसाच पडून राहिला.
बाजीरावचा मृत्यूनंतर त्याचा मुलगा बालाजी हा वसमत मधील एक जाणता विश्वनाथ गुरु यांच्या नादी लागला. विश्वनाथ गुरुच्या नादी लागून गुप्तधन मिळते किंवा कसे याची चाचपणी करणारे त्याचे अनेक भगत दर पौर्णिमा आणि दर अमावस्येला विश्वनाथ गुरूच्या दरबारात हजरी लावत असत. विश्वनाथ गुरुच्या नादाला लागून बालाजीने आता तांत्रिक पूजा करणे, करणी धरणी, भानामती आणि काळी जादू असे प्रयोग करण्यास सुरुवात केली. नंदापूरच्या वाड्यात काही गुप्तधन मिळते किंवा कसे याची चाचपणी करण्यासाठी बालाजीने राहत्या वाड्यातच जागोजागी खोदून त्या ठिकाणी बकरी किंवा कोंबड्यांचा बळी घेऊन तांत्रिक पूजेद्वारे चतुर्मितीतील शक्तींना जागृत करण्याचा प्रयत्न करत असे.
अशाच एका अष्टमीच्या मध्यरात्री बालाजी कदम पाटील हा नेहमीप्रमाणे अनुष्ठानाला बसून पूजा करत असताना काही कळावयाच्या आत त्याला ते दिसले व ते पाहून बालाजी जागीच कोसळला. बालाजीचा आकस्मिक मृत्यू झाला. बालाजी अविवाहित असल्यामुळे लोकांनी वाड्यातील पिंपळाच्या झाडाखाली त्याचा मुंजा बसवा असे गिरजाबाईला सांगितले.
गिरजाबाई आता पूर्णपणे कोलमडून पडल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व आशा अपेक्षा बालाजीवर होत्या. पण बालाजीचे लग्न होण्यापूर्वीच बालाजीचा आकस्मिक मृत्यू झाला. गिरजाबाईचा वंश बुडाला. त्यामुळे गिरजाबाई हताश झाल्या होत्या. गिरजाबाईंनी त्यांच्या सावत्र भावाचा मुलगा हरी यास दत्तक घेतले. पण हे सुख सुद्धा गिरजाबाईला फार काळ लागू शकले नाही.
एके दिवशी वाड्यात खेळत असताना हरी हा पिंपळाच्या झाडाखाली जिथे बालाजीचा मुंजा बसवला होता त्या ठिकाणी गेला. त्यावेळी नकळतपणे त्याचा पाय पिंपळाच्या झाडाच्या पाठीमागून सरपटत येणाऱ्या अस्सल नागाच्या शेपटीवर पडला. फुत्कारत नागाने झटकन मागे वळून डोळ्याची पाते लवते न लवते तोच हरीच्या उजव्या पिंडरीवर दंश केला. काही कळायच्या आतच भीतीने व नागाच्या विषाने हरीचा मृत्यू झाला. सर्व लोक गिरजाबाईला बोल लावू लागले.
ज्याचा वंशक्षय झालेला आहे त्याची मिळकत कुणाला पावत नाही. अशी भूमका कदम पाटलाच्या वाड्या बाबत पसरली. गिरजाबाईला आता फारसे कोणी बोलत नव्हते. गिरजाबाईकडे आता माहेरच्या लोकांचे येणे जाणे ही थांबले. गिरजाबाई आता उरलीसुरली शेती विकून उदरनिर्वाह करत होती. अधून मधून घरातील भंगार आणि किडूक मिडुक वस्तू विकून घर प्रपंच चालवत होती.
पण गिरजाबाईला चिंता होती तिच्या कुलदेवतेच्या मूर्तींची. आपल्या माघारी त्या पितळी डब्यात ठेवलेल्या मूर्तींची कुणी पूजा करेल किंवा कसे, याची गिरजाबाईला चिंता लागून होती. गिरजाबाईने त्या पितळी डब्यात ठेवलेल्या त्या कुलदेवतेच्या मूर्ती काही कुटुंबाना पूजेसाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्या वाड्यात घडलेल्या घटना लक्षात घेऊन कोणीही त्या वाड्यातील मूर्ती पूजेसाठी घेण्याची हिंमत दाखवली नाही. शेवटी मग गिरजाबाईंनी त्या पितळी डब्यातील ठेवलेल्या त्या दोन मुर्त्या विकण्याचे ठरवले. त्या मूर्ती विकल्यानंतर कोणातरी भक्तांच्या हाती त्या पडतील व कुणीतरी त्या मुर्त्यांच्या पूजा करेल, या भोळ्या आशेतून त्यांनी त्या मूर्ती विकण्याचे ठरवले.
गिरजाबाईने गुरुवारच्या दिवशी उपवास केला. त्या पितळी डब्ब्यातून कुलदैवत असलेल्या लक्ष्मीच्या दोन मूर्ती काढल्या व त्यांची यथासांग पूजा केली. गुरुवारी सायंकाळी उत्तर पूजा करून पूजेचे विसर्जन केले. कुलदैवत असलेल्या लक्ष्मीची प्रार्थना केली व माफीसुद्धा मागितली. त्यानंतर त्या दोन्ही मुर्त्या त्या पितळी डब्यात ठेवून दिल्या.
नंदापुरमधील शुक्रवारचा बाजार फुलला होता. पण रहमानचे काम नंदापूरच्या बाजारात नव्हते. रहमान घरोघरी जाऊन भंगार गोळा करत होता. "भंगारवाला" अशी हाळी देत तो कदम पाटलाच्या वाड्या समोरून जात असताना वृद्ध गिरजाबाईंनी त्यास थांबवून घेतले. घरातील काही भंगार सामान विकावयाचे आहे असे त्यांनी सांगितले. परंतु त्यांनी एकदम पितळी डबा न काढता आधी काही जुनी पुस्तके बाहेर काढली. गिरजाबाईचा मुलगा बालाजी याने त्याचे गुरु विश्वनाथ यांच्याकडून मिळविलेली प्राचीन शाबरी विद्येची गुप्त मंत्र असलेली काही दुर्मिळ पुस्तके व एक डायरी मिळवली होती. परंतु बालाजीच्या मृत्यूनंतर आता त्या पुस्तकांना वाचणारा कोणीच उरला नव्हता. त्यामुळे मग गिरजाबाईने ती दुर्मिळ पुस्तके रद्दीमध्ये विकण्यास काढली.
रहमानने पुस्तकांचे वजन करून गिरजाबाईच्या हाती बारा रुपये टिकवले. गिरजा बाईने ते बारा रुपये लुगड्याच्या ओटीत खोचले. त्यानंतर गिरजाबाईने रहमानला थांबण्यास सांगून वाड्यातून तो पितळी डबा बाहेर आणला व रहमानला तो पितळी डबा व त्यातील दोन पितळी मूर्ती विकत असल्याचे सांगितले. त्या दोन मुर्त्यांची वजन दोन किलो तर डब्याचे वजन सव्वा किलो असा एकूण सव्वा तीन किलोचा माल होता. रहमानने गिरजाबाईला तीनशे साठ रुपये देऊन तो पितळी डबा त्यातील दोन मुर्त्यासहित विकत घेतला.
गिरजाबाईने मोठ्या भक्ती भावाने ते तीनशे साठ रुपये कपाळी लावले. त्या पितळी डब्याला शेवटचा नमस्कार केला व डोळ्यात आले पाणी लपवत गिरजाबाई वाड्याकडे फिरल्या. वाड्यामध्ये जाणाऱ्या गिरजाबाईकडे पाहत काही काळ रहमान तिथेच थबकला. थोड्या वेळाने भानावर येऊन त्याने पितळी डबा व पुस्तके सायकलवर व्यवस्थित बांधली व सायकलवर टांग मारून तो निघाला. आज त्यास त्याची सायकल त्या साडेतीन किलोच्या ओझ्यामुळे खूपच जड वाटू लागली. त्याच्यासाठी हा नवीन असा अनुभव होता. रहमान विनाकारण थोडासा उदास झाला. मग त्याने दुसरीकडे भंगार न गोळा करता सरळ आपल्या गावी निघून गेला.
संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. केंद्रा गावाच्या मशिदीतून मगरिबच्या अजानचे स्वर घुमू लागले. रहमान गावात शिरला. आज नेहमीप्रमाणे त्याने "भंगार... भंगार..." अशी हाक दिली नाही. सायकलही जणू नेहमीपेक्षा जास्त जड झाली होती. पायांत ताकद असूनही प्रत्येक पेडल मारताना त्याला अनामिक ओझं जाणवत होतं. घरासमोर सायकल थांबताच सलीम धावत बाहेर आला, "अब्बू आले!" तकियाही आनंदाने धावत आली. आयेशा अंगणात उभी होती, "आज एवढ्या लवकर कसे आलात?"
रहमानने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त सायकलचा स्टँड लावला आणि मागच्या कॅरियरवर बांधलेलं पोतं खाली उतरवलं. पोतं खाली ठेवताच धाड! जमीन हलल्यासारखा आवाज झाला. आयेशा दचकली, "काय एवढं जड आहे?" रहमानने पितळी डबा बाहेर काढला, "एका म्हाताऱ्या बाईंनी विकला. म्हणाल्या पितळ आहे."
आयेशाच्या डोळ्यांत क्षणार्धात चमक आली. तिने डबा हातात घेतला, "बराच जड आहे..." तिने झाकण उघडलं. आत लाल रंगाच्या जुन्या फडक्यात गुंडाळलेल्या दोन लक्ष्मीच्या मूर्ती होत्या. वर्षानुवर्षे बंद राहिल्यामुळे डब्ब्याचे पितळ काळपट झाली होती. पण मुर्त्या मात्र अजून चमकत होत्या. त्यातील हिंदू देवतांच्या मुर्त्या पाहून आयेशा नाक मुरडत म्हणाली, "अरे... या कोण घेणार? वितळवल्या तरच काही पैसे मिळतील." रहमानने शांतपणे उत्तर दिलं, "उद्या हिंगोलीला घेऊन जाऊ. मोडी बाजारात पाहू."
तेवढ्यात पोत्यातून काही जुनी पुस्तकं खाली पडली. धुळीचा लोट उडाला. रहमान ती उचलू लागला. एक जाड, चामड्याच्या कव्हरची वही त्याच्या हात आली. पहिलं पान उघडताच त्याच्या नजरेसमोर फिकट शाईतील अक्षरं उमटली, "नामदेव परीट यास... गुरु विश्वनाथ यांचा आशीर्वाद." खाली लाल शाईत आणखी एक ओळ होती - "ज्याला धन हवं आहे, त्याने आधी धनाच्या रक्षकाला ओळखलं पाहिजे." रहमानने कपाळावर आठ्या घातल्या, "काय विचित्र लिहिलंय..." त्याने वही पुन्हा पुस्तकांच्या ढिगात टाकली.
पण त्याला माहीत नव्हतं, त्या वहीचं पहिलं पान उघडल्यानंतर घरात जे जागं झालं होतं, ते त्या पितळी डब्यात बंद नव्हतं. ते अनेक वर्षांपासून कोणीतरी त्या वहीला स्पर्श करण्याचीच वाट पाहत होतं. रात्रीची इशाची अजान सुरू झाली आणि त्याच वेळी घराच्या मागच्या लोखंडी ड्रमवर "टण... टण... टण..." असे तीन स्पष्ट आवाज घुमले. रहमान बाहेर धावत आला. अंगणात कोणीच नव्हतं. फक्त ड्रमवर ताज्या पावसाच्या थेंबांसारखे तीन ओले ठसे दिसत होते. आणि घराच्या आत, लाल फडक्यात गुंडाळलेल्या त्या दोन लक्ष्मीच्या मूर्ती पहिल्यांदाच एकमेकींकडे तोंड करून उभ्या झाल्या होत्या.
रहमान काही क्षण त्या मूर्तींकडे पाहतच राहिला. त्याने स्वतः त्या लाल फडक्यात गुंडाळून डब्यात ठेवलेल्या होत्या हे त्याला पक्कं आठवत होतं. मग त्या बाहेर कशा आल्या? आणि एकमेकींकडे तोंड करून कोण उभं केलं? "आयेशा!" त्याने मोठ्याने हाक मारली. आयेशा स्वयंपाकघरातून बाहेर आली, "काय झालं?" "या मूर्ती तू बाहेर काढल्या का?" ती आश्चर्याने म्हणाली, "मी? नाही तर! मी तर जेवण बनवत होते." सलीम आणि तकियालाही विचारलं. दोघांनीही नकारार्थी मान हलवली.
रहमानने काही न बोलता पुन्हा त्या मूर्ती लाल फडक्यात गुंडाळल्या. पितळी डब्यात ठेवल्या. झाकण घट्ट बंद करून त्यावर जाड लोखंडी कुलूप लावलं, "उद्या सकाळी हिंगोलीला घेऊन जाईन." तो एवढंच म्हणाला. त्या रात्री रहमान नमाज अदा करून झोपला. मध्यरात्र उलटून गेली. अचानक ठक... ठक... ठक... घराच्या ओसरीवर कोणीतरी लाकडी काठी आपटत असल्यासारखा आवाज आला. रहमान दचकून उठला. त्याने कान टवकारले. पुन्हा ठक! यावेळी आवाज अगदी पितळी डबा ठेवलेल्या खोलीतून आला.
रहमानने दिवा पेटवला. खोलीत शिरला. सगळं शांत होतं. पण डब्यावर लावलेलं लोखंडी कुलूप जमिनीवर पडलेलं होतं. त्याने कुलूप उचललं. ते तुटलेलं नव्हतं. कोणीतरी किल्लीने उघडल्यासारखं सहज उघडलं होतं. रहमानच्या अंगावर काटा आला. त्याने थरथरत्या हाताने डब्याचं झाकण उघडलं. मूर्ती आत होत्याच. मात्र त्या दोन्ही मूर्तींच्या कपाळावर ताजं कुंकू लावलेलं होतं. आणि डब्याच्या तळाशी एक चिमूटभर हळद, काही तांदळाचे दाणे आणि विलक्षण सुगंध येणारी ताजी जाईची दोन फुलं पडली होती. रहमानचा श्वास अडकला. त्याच्या घरात ना कुंकू होतं, ना जाईची फुलं आणि त्यांच्या घरात अशी पूजा करणारा तर कोणीच नव्हता. "सुभानअल्लाह..." त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले.
पहाटे फजरची अजान झाली. रहमानने ठरवलं, आज हा डबा आणि ही पुस्तकं थेट हिंगोलीच्या मोडी बाजारात विकायची. त्याने सायकल तयार केली. पण तो पितळी डबा उचलायला गेला आणि क्षणभर थिजूनच गेला. काल साडेतीन किलो वजनाचा वाटणारा तो डबा आज जणू पन्नास किलोचा झाला होता. दोन्ही हातांनी उचलूनही तो जागेवरून हलत नव्हता.
तेवढ्यात दारातून एक वृद्ध फकीर चालत आला. हिरवा फाटका झगा, हातात लाकडी काठी, डोळ्यांत विलक्षण तेज. त्याने रहमानकडे न पाहता थेट त्या डब्याकडे पाहिलं आणि मंद आवाजात म्हणाला, "रहमान... ती वस्तू विकू नकोस..." रहमान दचकला, "बाबा... तुम्हाला माझं नाव कसं माहीत?" फकीर हसला, "तुझं नाव माहीत असणं महत्त्वाचं नाही... महत्त्वाचं हे आहे की... त्या डब्यात जे आहे, ते तुझं नाही... आणि ते स्वतःचा मालक स्वतःच निवडतं." हे बोलून तो वळला. रहमान दोन पावलं पुढे गेला, "अहो, थांबा...!" पण रस्त्यावर कोणीच नव्हतं. अवघ्या काही क्षणांत तो फकीर जणू हवेत विरघळून गेला होता. रहमानच्या हातातील पितळी डबा मात्र आता पुन्हा अगदी हलका झाला होता, जणू काही क्षणांपूर्वी घडलेलं सर्व काही त्यालाच दाखवण्यासाठी घडलं होतं.
फकीर नाहीसा झाल्यानंतर बराच वेळ रहमान दारातच उभा राहिला. त्याच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, "हा माणूस होता... की काही वेगळंच?" पण संसाराची गरज, मुलांचं भविष्य आणि रोजच्या उदरनिर्वाहाची चिंता या प्रश्नांपेक्षा मोठी होती. त्याने सायकल पुन्हा बाहेर काढली. पितळी डबा, रद्दीची पुस्तकं आणि नामदेव परीटची वही एका पोत्यात ठेवली. हिंगोलीला निघण्याऐवजी त्याने सायकलची दिशा बदलली. काल संध्याकाळी तकियाने सांगितलेले शब्द त्याच्या कानात पुन्हा घुमले, "आज गुलकंद मामाकडे जा..."
रात्र झाली होती. साडेदहा वाजले. केंद्रा गावापासून अर्ध्या कोसावर, जुन्या मुस्लिम कब्रस्तानाच्या पलीकडे गुलकंदचं मातीचं घर होतं. घरासमोर एक जुना लिंबाचा वृक्ष. फांद्यांना काळे दोरे, लिंबू-मिरच्या, मोरपिसं आणि तांब्याच्या छोट्या घंटा बांधलेल्या होत्या. रहमानने दार ठोठावलं. आतून खरखरीत आवाज आला, "कोण...?" "मी... रहमान." कडी उघडली. समोर उभा होता गुलकंद. कोरीव दाढी, ओठी लाली, डोळ्यात सुरमा, लालसर डोळे, गळ्यात ताईत, कमरेला एक छोटी तांब्याची घंटी बांधलेली व हाती उदीने काळवंडलेली जपमाळ. "या..." रहमान आत गेला. घरात धूपाचा तीव्र वास पसरला होता. भिंतींवर विचित्र आकृत्या काढलेल्या होत्या. एका कोपऱ्यात तेलाचा दिवा लुकलुकत होता.
रहमानने पोतं खाली ठेवलं, "एक वस्तू दाखवायची आहे." त्याने पितळी डबा बाहेर काढला. डबा पाहताच गुलकंदच्या चेहऱ्याचा रंग बदलला. त्याचे हात थरथरू लागले. तो नकळत दोन पावलं मागे सरकला, "हा... हा डबा तुला कुठे मिळाला...?" रहमानने नंदापूरच्या वाड्याची सगळी हकिगत सांगितली. गुलकंद एकटक डब्याकडे पाहत राहिला. त्याने डब्याला हातही लावला नाही. काही क्षणांनी तो मंद आवाजात म्हणाला, "रहमान... हा साधा डबा नाही." "मग?" "याचं उत्तर माझ्याकडे नाही... पण हे नाव मी आधी ऐकलं आहे." "कोणाचं?" "अच्युतराव कदम पाटील..." रहमान चकित झाला, "तुला कसं माहीत?" फकीर गुलकंदने खोल श्वास घेतला, "माझे गुरु... विश्वनाथ गुरु... त्यांनी एकदा त्यांच्या दरबारात या वाड्याचा उल्लेख केला होता."
रहमानच्या अंगावर शहारा आला, "काय सांगितलं होतं?" गुलकंदचा आवाज आता कुजबुजण्याइतकाच मंद झाला, "ते म्हणाले होते... 'ज्या घरात कुलदेवता स्वतः घर सोडून जाते... त्या घरात धन राहत नाही... पण त्याचा रक्षक मात्र कायम राहतो.'" घरात क्षणभर मृत शांतता पसरली. तेवढ्यात पोत्यात ठेवलेली नामदेव परीटची वही स्वतःहून खाली पडली. दोघेही दचकले. वहीचं पहिलं पान आपोआप उघडलं. त्यावर लिहिलं होतं - "शिष्य नामदेव परीट." त्याखाली "गुरु — विश्वनाथ." गुलकंदच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसू लागली, "ही वही... ही वही नामदेवची आहे..."
रहमानने विचारलं, "तुला हा नामदेव माहीत आहे?" गुलकंदने मान हलवली, "हो... तो माझ्या गुरुंचा सर्वात जिवलग शिष्य होता. पण एक अमावस्येच्या रात्री... गुप्तधनाच्या शोधासाठी तो एकटाच गेला. आणि... तो परत आला... पण नामदेव म्हणून नाही." हे शब्द ऐकताच वहीची पानं भराभर फडफडू लागली. घरात वाऱ्याची झुळूक नव्हती. तरीही प्रत्येक पान जणू कोणीतरी अदृश्य हाताने उलटत होतं. अचानक एक पान उघडून स्थिर झालं. त्या पानावर लाल शाईत एकच वाक्य लिहिलेलं होतं - "गुरुदेव... मी धन पाहिलं... पण धनाच्या रक्षकाने मला आधी पाहिलं..." आणि त्या वाक्याखाली रक्ताने उमटल्यासारखे पाच बोटांचे ठसे हळूहळू स्पष्ट होऊ लागले. रहमान आणि गुलकंद एकमेकांकडे पाहतच राहिले, कारण त्या ठशांमधून ताज्या रक्ताचा वास येत होता.
फकीर गुलकंदने क्षणाचाही विलंब न करता ती वही झटकन बंद केली. त्याचा श्वास धाप लागल्यासारखा झाला होता, "रहमान... ही वही पुन्हा उघडू नकोस." "का?" "कारण ही साधी वही नाही... ही साधना अपूर्ण राहिलेल्या माणसाची साक्ष आहे." रहमान काही बोलणार इतक्यात घराच्या बाहेर बांधलेली तांब्याची छोटी घंटा टण... टण... टण... सलग तीन वेळा वाजली. गुलकंदच्या चेहऱ्यावरचे रक्तच उतरले. तो सावधपणे उठला. दाराची फट उघडून बाहेर पाहिले. अंधार, निरव शांतता, लिंबाच्या झाडाची एकही फांदी हलत नव्हती. तरीही घंटा पुन्हा वाजली, टण! गुलकंदने दार बंद केले, "तो आला आहे..."
रहमान गोंधळला, "कोण?" गुलकंदने उत्तर दिले नाही. त्याने एका कपाटातून हिरव्या कापडात गुंडाळलेली एक जुनी वही बाहेर काढली, "ही माझ्या गुरु विश्वनाथांनी मला दिली होती. त्यांनी सांगितलं होतं - 'कधीतरी नामदेवची वही तुझ्यासमोर आली, तर ही वही उघड.'" रहमान शांत बसला. गुलकंदने थरथरत्या हातांनी वही उघडली. पहिल्याच पानावर विश्वनाथ गुरुंच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं - "शिष्य नामदेव परीट बुद्धिमान होता; पण त्याने एक चूक केली. त्याने गुप्तधन शोधण्यापूर्वी स्वतःच्या मनातील लोभ मारला नाही." दुसऱ्या पानावर एक नकाशा होता. नकाशात एक जुना वाडा, त्याच्या मागे पिंपळाचं झाड आणि झाडाच्या मुळाशी लाल शाईने काढलेलं एक वर्तुळ.
रहमानच्या अंगावर शहारा आला, "हे तर... कदम पाटलांचा वाडा!" गुलकंदने मान हलवली, "हो... पण नीट बघ." रहमानने पुन्हा नकाशाकडे पाहिलं. वाड्याच्या देवघरापासून पिंपळापर्यंत एक काळी रेघ काढलेली होती. आणि त्या रेषेजवळ फक्त तीन शब्द - "धनाचा श्वास इथे." तेवढ्यात पितळी डब्यातून हलकासा आवाज आला, टक... दोघांनीही डब्याकडे पाहिलं. डबा बंद होता. पुन्हा टक... टक... जणू आतून कोणीतरी नखांनी झाकण खरवडत होतं. रहमानचा घसा कोरडा पडला, "आत... उंदीर असेल का?" गुलकंदने त्याचा हात पकडला, "नको! डबा उघडू नकोस." "पण..." "आज गुरुवारची रात्र संपून शुक्रवार सुरू झाला आहे." "मग?" गुलकंदचा आवाज आता कुजबुजण्याइतकाच मंद झाला, "माझे गुरु म्हणायचे... 'लक्ष्मीच्या मूर्ती ज्या रात्री स्वतः आवाज करतात, त्या रात्री त्या मूर्ती एकट्या नसतात.'"
हे वाक्य संपताच डब्याचं झाकण स्वतःहून एक बोटभर वर उचललं गेलं. दोघे जागच्या जागी गोठले. त्या फटीतून थंडगार वाऱ्याची एक झुळूक बाहेर आली. पण त्या वाऱ्यासोबत धुळीचा किंवा जुन्या धातूचा वास नव्हता, तर ताज्या हळदी, कुंकू आणि कमळाच्या फुलांचा मंद सुगंध दरवळत होता. आणि त्या सुगंधात एक अतिशय मंद, स्त्रीस्वरातील कुजबुज ऐकू आली, "माझी पूजा झाली... पण माझा अपमानही झाला..." त्या आवाजानंतर डब्याचं झाकण पुन्हा हळूहळू बंद झालं. गुलकंदचे डोळे विस्फारले गेले. तो थरथरत म्हणाला, "रहमान... आता ही केवळ गुप्तधनाची गोष्ट राहिलेली नाही... ही कुलदेवतेच्या अपूर्ण संकल्पाची सुरुवात आहे."
.....
रहमान बराच वेळ निःशब्द बसून राहिला.
त्याच्या मनात एकाच वेळी दोन विचार चालू होते.
एकीकडे त्याचा अल्लाहवरील अढळ विश्वास...
आणि दुसरीकडे त्याच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या अकल्पित घटना.
तो हळू आवाजात म्हणाला,
"गुलकंद... मी मुसलमान माणूस आहे. अशा तांत्रिक गोष्टींवर माझा विश्वास नाही. पण आज जे माझ्या डोळ्यांनी पाहिलं... त्याचं उत्तर माझ्याकडे नाही."
गुलकंदने मान खाली घातली.
"विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हा प्रश्न नाही रहमान. काही गोष्टी आपण मानल्या नाहीत तरी त्या अस्तित्वात असतात."
त्याने नामदेव परीटची वही पुन्हा उघडली.
यावेळी पान आपोआप उघडलं नाही.
गुलकंदने काळजीपूर्वक पाने उलटायला सुरुवात केली.
त्यात विचित्र आकृत्या होत्या.
कुठे त्रिकोण...
कुठे मंडळ...
कुठे प्राचीन शाबरी लिपीतील मंत्र...
तर काही ठिकाणी विश्वनाथ गुरुंच्या हाताने केलेल्या टिपण्या.
अचानक...
एका पानावर रहमानची नजर खिळली.
त्या पानाच्या वर लिहिलं होतं—
"कदम वाडा — नंदापूर."
खाली नामदेव परीटने लिहिलं होतं—
"गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे वाड्याची चाचपणी केली. देवघरात धन नाही. पिंपळाखाली धन नाही. धनाचा मार्ग वेगळाच आहे. पण त्या मार्गावर एक स्त्री उभी आहे. ती स्वतःला लक्ष्मी म्हणवत नाही... ती स्वतःला 'रक्षक' म्हणते."
रहमानच्या अंगावर काटा आला.
गुलकंद पुढचं पान उलटणार इतक्यात...
त्याच्या हातातील कंदील अचानक विझला.
घर काळोखात बुडालं.
दोघांच्याही श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
आणि त्या अंधारात...
जणू एखादी वृद्ध स्त्री मंद स्वरात म्हणाली—
"गिरजा..."
रहमानने घाबरून विचारलं,
"ऐकलंस?"
गुलकंदने काही उत्तर दिलं नाही.
तो थरथरत उभा राहिला.
कापऱ्या हाताने पुन्हा कंदील पेटवला.
प्रकाश पडताच...
दोघांचेही डोळे टेबलावर गेले.
नामदेव परीटची वही बंद होती.
पण तिच्यावर...
एक सुरकुतलेला, थरथरता हात उमटल्यासारखा हळदीचा पिवळा ठसा होता.
गुलकंदने खोल श्वास घेतला.
"रहमान... गिरजाबाईंनी कालच त्या मूर्तींची शेवटची पूजा केली होती ना?"
"हो..."
"मग त्या कुलदेवतेला अजूनही तिच्या शेवटच्या भक्तेची ओढ आहे."
तो काही क्षण शांत राहिला.
"आपल्याला उद्या सकाळी नंदापूरला जावंच लागेल."
"कशासाठी?"
"गिरजाबाई जिवंत आहेत तोपर्यंत या रहस्याची किल्ली त्यांच्याकडेच आहे."
रहमानने मान डोलावली.
रात्रभर दोघांनाही झोप लागली नाही.
पहाटेची अजान होताच रहमानने वजू करून नमाज अदा केली.
गुलकंद शांतपणे त्याची वाट पाहत बसला.
दोघांनी पितळी डबा, नामदेव परीटची वही आणि विश्वनाथ गुरुंची टिपणवही पुन्हा पोत्यात ठेवली.
सूर्य नुकताच उगवत होता.
सायकल नंदापूरच्या दिशेने निघाली...
......
रहमान आणि फकीर गुलकंद नंदापूरच्या कदम पाटलांच्या वाड्यासमोर येऊन उभे राहिले.
सकाळ झाली होती; पण वाड्याभोवती एक विचित्र शांतता पसरली होती. पिंपळाची पानंसुद्धा हालत नव्हती.
रहमानने दाराशी उभं राहून मोठ्याने हाक मारली.
"गिरजाबाई... ओ गिरजाबाई...!"
दोन-तीन हाका मारल्यानंतर वाड्याचं जुनं लाकडी दार करकरत उघडलं.
दारातून पांढऱ्या नऊवारीत, हातात काठी घेतलेल्या गिरजाबाई बाहेर आल्या.
त्यांनी रहमानकडे एकटक पाहिलं.
त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण करुणा होती.
क्षणभर त्या थांबल्या...
पण काहीही न बोलता रहमान आणि गुलकंद यांच्या अगदी मधून चालत पुढे निघून गेल्या.
"गिरजाबाई... थांबा...!" रहमानने पुन्हा आवाज दिला.
त्या मात्र मागे वळूनही पाहिल्या नाहीत.
रहमान आणि गुलकंद एकमेकांकडे पाहू लागले.
"बहुतेक ऐकू येत नसेल..." रहमान पुटपुटला.
दोघेही वाड्यात शिरले.
अंगणातल्या पिंपळाच्या पारावर सात-आठ वर्षांचा एक मुलगा शांतपणे बसला होता.
त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं.
त्याने एक शब्दही न बोलता फक्त झोपाळ्याकडे बोट दाखवलं.
झोपाळ्यावर पांढरा नेहरू शर्ट आणि पायजमा घातलेला एक तरुण हळूहळू झोका घेत बसला होता.
त्याचा चेहरा गंभीर होता.
रहमान पुढे झाला.
"गिरजाबाई कुठे आहेत?"
तरुण काही क्षण शांत राहिला.
मग त्याने खोल नजरेने गुलकंदकडे पाहिलं आणि म्हणाला,
"तुम्ही उशीर केलात..."
"का...?"
"काल गुरुवारी संध्याकाळी आईचं निधन झालं."
रहमानच्या अंगावर अक्षरशः काटा आला.
त्याच्या हातातील पितळी डबा थरथरू लागला.
तो अडखळत म्हणाला,
"पण... आम्ही तर आत्ताच त्यांना वाड्याबाहेर जाताना पाहिलं..."
तरुणाच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही.
तो शांतपणे म्हणाला,
"मृत माणसं कधी कधी अपूर्ण कामासाठी परत येतात."
क्षणभर शांतता पसरली.
मग त्याने अचानक गुलकंदला विचारलं,
"आपण... गुरु विश्वनाथांना ओळखता काय?"
गुलकंद दचकला.
"हो... पण तुला त्यांचं नाव कसं माहीत?"
तरुण उत्तर देणार इतक्यात...
बाहेरून काही गावकरी वाड्यात आले.
त्यांनी रहमान आणि गुलकंदला पाहून विचारलं,
"कोणाला शोधताय?"
रहमानने थरथरत्या आवाजात सांगितलं,
"गिरजाबाई... आणि हे दोघे..."
तो मागे वळला.
पिंपळाचा पार रिकामा होता.
झोपाळा रिकामा होता.
मुलगा नव्हता.
तरुणही नव्हता.
फक्त रिकामा झोपाळा स्वतःहून हळूहळू हलत होता...
गावकऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं.
एक वृद्ध माणूस पुढे आला.
"कसला मुलगा?"
रहमानने पिंपळाकडे बोट दाखवलं.
"तो... सात-आठ वर्षांचा..."
म्हाताऱ्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला.
तो थरथरत म्हणाला,
"तो हरी होता..."
"कदम पाटलांनी दत्तक घेतलेला मुलगा..."
"वीस वर्षांपूर्वी याच पिंपळाखाली नागाने दंश करून त्याचा मृत्यू झाला."
रहमानचा घसा कोरडा पडला.
म्हातारा पुढे म्हणाला,
"आणि झोपाळ्यावर बसलेला तरुण..."
"...तो बालाजी कदम पाटील."
"...तांत्रिक अनुष्ठान करताना याच वाड्यात मेला."
"...त्यालाही पंचवीस वर्षं झाली."
हे शब्द ऐकताच...
रहमानच्या हातातील पितळी डब्याचं झाकण आपोआप उघडलं.
आत ठेवलेल्या लक्ष्मीच्या दोन्ही मूर्ती स्वतःहून सरळ उभ्या राहिल्या.
त्याच क्षणी...
वाड्याच्या देवघरातून एका वृद्ध स्त्रीचा आवाज घुमला...
"बालाजी... हरी... पाहुणे आलेत... त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका..."
तो आवाज गिरजाबाईंचाच होता...
आणि त्या क्षणी संपूर्ण वाड्यात एकाच वेळी...
एका लहान मुलाच्या हसण्याचा...
आणि एका तरुणाच्या मंद, भयाण हास्याचा आवाज घुमू लागला...
.......
वाड्याच्या अंगणात क्षणात मृत शांतता पसरली.
पिंपळाच्या पानांची सळसळ थांबली.
रिकामा झोपाळा मात्र अजूनही हळूहळू हलत होता...
कर्र... कर्र... कर्र...
रहमानच्या हातातील पितळी डबा अचानक तापू लागला.
"आह...!"
त्याच्या हाताची त्वचा भाजल्यासारखी झाली आणि डबा खाली पडला.
धाड...!
झाकण आपोआप उघडलं.
लाल फडक्यात गुंडाळलेल्या दोन्ही लक्ष्मीच्या मूर्ती सरळ उभ्या राहिल्या.
त्याच क्षणी...
देवघरातून आलेला उदबत्तीचा सुगंध एका क्षणात नाहीसा झाला.त्याच्या जागी जळक्या मांसाचा उग्र वास संपूर्ण वाड्यात पसरला.
गुलकंदच्या डोळ्यांत भीती दाटली.
तो पुटपुटला,
"तो... आला..."
अचानक पितळी डब्याभोवती काळसर धूर फिरू लागला.
धुराचे लोट वर जाऊन एकमेकांत मिसळले.
क्षणोक्षणी त्यांना मानवी आकार येऊ लागला.
लांबट चेहरा...
खोल गेलेले डोळे...
राखेने माखलेले शरीर...
आणि गळ्यात मानवी हाडांची माळ.
तो हवेतच उभा होता.
त्याच्या डोळ्यांत रक्तासारखी लाल चमक होती.
त्याने प्रथम लक्ष्मीच्या मूर्तींकडे पाहिलं...
आणि मग गुलकंदकडे.
त्याच्या ओठांवर एक विकृत हास्य उमटलं.
"गुलकंद..."
"शेवटी... विश्वनाथाचा शेवटचा माणूसही माझ्यासमोर आलाच."
गुलकंद काही बोलला नाही.
तो फक्त रहमानसमोर उभा राहिला.
तो काळाकुट्ट आकार पुन्हा हसला.
"ओळखलं नाहीस...?"
"मी..."
क्षणभर संपूर्ण वाड्यात कुजबुज घुमली.
"...नामदेव परीट!"
हे नाव ऐकताच गावकऱ्यांच्या तोंडून एकच किंकाळी फुटली.
एक वृद्ध माणूस थरथरत म्हणाला,
"अरे देवा... तो अजूनही इथेच आहे..."
नामदेवच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं.
"हो..."
"मी गेलोच कधी होतो?"
त्याचा आवाज आता संपूर्ण वाड्यात घुमत होता.
"या वाड्याचं खरं गुप्तधन जमिनीखाली नव्हतं..."
"ना पिंपळाखाली..."
"ना तळघरात..."
त्याने हवेत तरंगणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्तींकडे बोट दाखवलं.
"हेच गुप्तधन होतं!"
"अच्युतरावांनी संपूर्ण जगाला फसवलं..."
"पितळ म्हणून जपलेल्या या मूर्ती शुद्ध सोन्याच्या आहेत."
रहमान स्तब्ध झाला.
त्याला त्या म्हाताऱ्या गिरजाबाईंचा निरोप आठवला...
त्या डब्याला केलेला शेवटचा नमस्कार...
डोळ्यांतील अश्रू...
सगळं एका क्षणात स्पष्ट झालं.
नामदेवचा आवाज अधिक भयाण झाला.
"मी त्या मूर्तींसाठी आलो होतो..."
"विश्वनाथ गुरुंनी मला रोखलं..."
"गिरजाबाई आयुष्यभर त्यांचं रक्षण करत राहिल्या..."
"म्हणून..."
त्याच्या डोळ्यांत रक्त उतरलं.
"...मग गिरीजाला सुद्धा मारले ."
रहमानने रागाने विचारलं,
"म्हणजे... गिरजाबाईंना तू मारलंस?"
नामदेव जोरात हसला.
ते हास्य ऐकून पिंपळावर बसले कावळे एकदम उडून गेले.
"हो..."
"त्या मूर्ती विकल्या गेल्या..."
"आणि माझ्या मार्गातला शेवटचा अडथळा संपला."
तेवढ्यात...
पिंपळाच्या पारावर बसलेल्या त्या सात-आठ वर्षांच्या मुलाचा आवाज घुमला.
"खोटं बोलतोयस...!"
सगळ्यांनी मागे वळून पाहिलं.
हरी पुन्हा दिसत होता.
यावेळी त्याच्या पिंडरीवर नागदंशाची काळी खूण स्पष्ट दिसत होती.
त्याच्या शेजारी...
पांढऱ्या नेहरू शर्टात बालाजी उभा होता.
त्याच्या कपाळावर तांत्रिक पूजेच्या राखेचा काळा डाग होता.
बालाजीचा आवाज शांत होता...
पण त्यात संताप दडला होता.
"नामदेव..."
"आजी जिवंत असेपर्यंत तू देवघरात पाऊल ठेवू शकला नाहीस."
"म्हणून तिचा जीव घेतलास."
"आणि आता..."
"या मूर्ती घेऊन जाण्याचं स्वप्न पाहतोयस?"
नामदेवच्या चेहऱ्यावरचा क्रोध उफाळून आला.
"तुम्ही दोघे..."
"माझ्या वाटेतून बाजूला व्हा."
हरी हसला.
ते हसू लहान मुलाचं नव्हतं...
ते मृत्यूला पाहिलेल्या आत्म्याचं होतं.
"आम्ही आता जिवंत नाही..."
"आणि मृतांना पुन्हा मारता येत नाही."
वाड्याच्या अंगणात अचानक वादळ उठलं...
पिंपळाची हजारो पानं एकाच वेळी सळसळू लागली...
आणि गुलकंदने प्रथमच डोळे मिटून शांतपणे म्हटलं—
"आज निर्णय होईल...
लोभ जिंकतो...
की रक्षण."
......
क्षणभर आकाशात काळे ढग जमले.
दुपारची वेळ असूनही संपूर्ण नंदापूर काळोखात बुडाला.
नामदेव परीटचा विक्राळ आकार हळूहळू आणखी मोठा होऊ लागला. त्याच्या भोवती काळसर धूर फिरत होता. डोळ्यांतून निखाऱ्यांसारखी लाल ज्योत बाहेर पडत होती.
तो गुरगुरला.
"हरी... तू एक मूल आहेस."
"बालाजी... तू माझ्याच गुरुपरंपरेतला शिष्य आहेस."
"आणि गुलकंद..."
त्याने उपहासाने हसत विचारले,
"तू स्वतःला माझ्या आड येण्याइतका समर्थ समजतोस?"
गुलकंद शांत उभा होता.
त्याने रहमानकडे पाहून फक्त एवढेच म्हटले,
"डब्याला हात लावू नकोस. काहीही झाले तरी मूर्ती बाहेर जाऊ देऊ नकोस."
रहमानने डबा छातीशी घट्ट धरला.
नामदेवचा राग अनावर झाला.
त्याने काळ्या धुराचा एक प्रचंड लोट रहमानच्या दिशेने झेपावला.
पण...
हरी क्षणार्धात रहमानसमोर उभा राहिला.
तो धूर हरीच्या शरीराला स्पर्श होताच नागाच्या फुत्कारासारखा आवाज करत चार दिशांना विखुरला.
नामदेव गुरगुरला.
"अजूनही त्या नागाचे विष तुझ्या भोवती आहे..."
हरीच्या ओठांवर मंद स्मित उमटले.
"हो..."
"ज्याने माझा देह घेतला, त्याच विषाने आज या देवस्थानाचे रक्षण केले."
तेवढ्यात बालाजी पुढे आला.
त्याने पिंपळाकडे पाहिले.
वाऱ्याचा एक जोरदार झोत आला.
पिंपळाची कोरडी पाने हवेत फिरू लागली.
ती पानं नामदेवभोवती गोलाकार फिरू लागली.
नामदेव संतापला.
"बालाजी... मी तुला आधीही हरवलं होतं."
बालाजीचा आवाज पहिल्यांदाच कडक झाला.
"नाही..."
"तू मला हरवलं नव्हतंस."
"तू माझ्या लोभाला जिंकलास."
"आज मी लोभाशिवाय उभा आहे."
हे ऐकताच नामदेव काही क्षण गप्प झाला.
त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच अस्वस्थता दिसू लागली.
गुलकंदने रहमानच्या हातून नामदेव परीटची वही घेतली.
वहीची सर्व पाने स्वतःहून फडफडू लागली.
अचानक...
एका मागोमाग एक पाने फाटून हवेत उडू लागली.
त्या प्रत्येक पानावर एकच शब्द उमटत होता—
"लोभ..."
"लोभ..."
"लोभ..."
आणि शेवटच्या पानावर—
"याच लोभाने माझा नाश केला."
नामदेव किंचाळला.
"ती वही बंद कर!"
गुलकंदने वही मिटली नाही.
तो शांत स्वरात म्हणाला,
"नामदेव..."
"गुरु विश्वनाथांनी तुला धन शोधायला शिकवलं होतं..."
"धन लुटायला नाही."
"तू गुरूंचा विश्वासघात केलास."
नामदेवचा चेहरा विकृत झाला.
"गप्प!"
"विश्वनाथ मेलाय!"
"गिरजा मेलेली आहे!"
"आता या मूर्तींवर माझाच अधिकार आहे!"
तो रहमानवर झेपावला.
पण त्याच क्षणी...
देवघराचे बंद दार धाडकन उघडले.
आतून दिव्याचा तेजस्वी प्रकाश बाहेर पडला.
त्या प्रकाशात...
गिरजाबाईंची आकृती काही क्षणांसाठी दिसली.
त्यांच्या हातात आरतीचे ताट होते.
त्यांनी काहीही बोलले नाही.
फक्त लक्ष्मीच्या मूर्तींकडे प्रेमाने पाहिले...
आणि नामदेवकडे कठोर नजरेने.
नामदेव एकदम मागे फेकला गेला.
तो संतापाने ओरडला.
"गिरजा...!
तू मेलीस तरी माझ्या आड येतेस?"
त्या क्षणी रहमानच्या लक्षात आलं...
या वाड्याचे खरे रक्षक गुप्तधन नव्हते...
तर त्यासाठी प्राण देणारे लोक होते.
हरी...
बालाजी...
आणि गिरजाबाई...
नामदेव आता वेड्यासारखा ओरडत होता.
त्याच्या भोवतीचा काळा धूर विरघळू लागला.
पण त्याचे डोळे अजूनही मूर्तींवरच खिळले होते.
तो गुरगुरला—
"या मूर्ती...
आज नाही मिळाल्या...
तर शंभर वर्षांनी घेईन...
पण घेईनच..."
इतक्यात गुलकंद पुढे सरसावला.
त्याने पितळी डबा आपल्या हात घेतला.
आणि शांत, निर्धारपूर्ण आवाजात म्हणाला—
"मग आज...
या लोभाचा शेवट होईल."
त्याच क्षणी वाड्याभोवती वादळ आणखी भयानक झाले...
......
नामदेव परीटचा विक्राळ आत्मा काळ्या धुराच्या प्रचंड भोवऱ्यासारखा संपूर्ण वाड्यात पसरला.
त्याच्या डोळ्यांत सोन्याच्या लक्ष्मीच्या मूर्तींची विकृत लालसा अजूनही धगधगत होती.
तो भीषण आवाजात गर्जला,
"शंभर वर्षे... शंभर वर्षे मी या दोन मूर्तींची वाट पाहिली! अच्युतरावांनी मला फसवलं... गिरजाबाई माझ्या आड आल्या... आणि त्या म्हातारीने मूर्ती विकताच मी तिचा मार्ग कायमचा बंद केला. आता या मूर्ती माझ्याच आहेत...!"
इतक्यात पिंपळाच्या पारावर बसलेला हरीचा आत्मा उठून उभा राहिला.
झोपाळ्यावर बसलेला बालाजीही पुढे आला.
बालाजीचा आवाज घुमला,
"दुष्टा... आईला तू मारलंस!"
नामदेव उपहासाने हसला.
"हो... कारण तीच शेवटची अडथळा होती."
क्षणात काळा धूर बालाजीवर झेपावला.
हरी आणि बालाजी दोघांनीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला; पण नामदेवची तांत्रिक शक्ती अधिक प्रबळ होती.
दोघेही मागे फेकले गेले.
रहमान भयाने स्तब्ध झाला.
तेवढ्यात...
फकीर गुलकंद शांतपणे पुढे आला.
त्याने आपल्या हिरव्या फेट्याची गाठ सोडली.
गळ्यातील ताईत जमिनीवर ठेवला.
आणि प्रथमच आपल्या खऱ्या आवाजात म्हणाला,
"नामदेव... आज तुझी साधना संपणार आहे."
नामदेवने त्याच्याकडे पाहिलं... आणि क्षणभर त्याचा चेहरा बदलला.
"तू...?"
गुलकंद हसला.
"ओळखलंस?"
"मी पुरुष नाही."
"मी स्त्रीही नाही."
"मी किन्नर आहे."
क्षणभर संपूर्ण वाडा स्तब्ध झाला.
नामदेवचा आत्मा प्रथमच दोन पावलं मागे सरकला.
"नाही...!"
"हे अशक्य आहे!"
गुलकंद शांतपणे म्हणाला,
"माझे गुरु विश्वनाथ यांनी मला शेवटच्या दिवशी एकच गोष्ट सांगितली होती."
"नामदेव परीट विद्वान आहे... पण त्याचा अहंकार त्याच्या विद्येपेक्षा मोठा आहे. त्याने पुरुषाला जिंकण्याची विद्या शिकली... स्त्रीला जिंकण्याची विद्या शिकली... पण किन्नरावर कोणतंही तंत्र चालत नाही."
"म्हणूनच माझी निवड झाली."
नामदेव संतापाने गर्जला.
"मी तुलाही संपवीन!"
तो काळ्या वावटळीसारखा गुलकंदावर झेपावला.
पण...
गुलकंदाभोवती अदृश्य तेजाचं वर्तुळ निर्माण झालं.
नामदेवचा आत्मा त्या वर्तुळाला स्पर्श करताच जळल्यासारखा किंचाळत मागे फेकला गेला.
"आऽ!"
संपूर्ण वाडा हादरला.
"असं कसं...?"
गुलकंद म्हणाला,
"ही माझी शक्ती नाही..."
"ही त्या गुरूंची मर्यादा आहे, जी तू कधी पाळली नाहीस."
त्याने कमरेतून तांब्याची छोटी घंटा काढली.
ती सलग तीनदा वाजवली.
टण...! टण...! टण...!
त्या आवाजाबरोबर हरी आणि बालाजीचे आत्मे तेजस्वी झाले.
दोघांनी मागून नामदेवला घट्ट पकडलं.
नामदेव तडफडू लागला.
"मला सोडा...!"
"त्या मूर्ती माझ्या आहेत!"
गुलकंदने पितळी डबा उघडला. त्यातील देवीजींच्या दोन मुर्त्या रहमानच्या हाती दिल्या. मग त्या पितळी डब्यावर विश्वनाथ गुरुंनी दिलेला ताईत ठेवला.
मंत्रोच्चार सुरू झाले.
वाड्यातील हवा भयानक वेगाने फिरू लागली.
नामदेवचा आत्मा किंचाळू लागला.
"गुलकंद... नको...!"
"मला पुन्हा त्या कैदेत टाकू नको!"
गुलकंद कठोर आवाजात म्हणाला,
"हे धन तुझं कधीच नव्हतं."
"तू धनाचा रक्षक नव्हतास..."
"तू फक्त लोभाचा कैदी होतास."
त्याने दोन्ही हातांनी पितळी डबा पुढे धरला.
क्षणात नामदेवचा काळाकुट्ट आत्मा धुराच्या प्रचंड भोवऱ्यात बदलला आणि जोराने त्या डब्यात ओढला जाऊ लागला.
"नाऽऽही...!"
......
नामदेव परीटचा विक्राळ आत्मा धुराच्या महाभयंकर भोवऱ्यात तडफडत होता.
"नाही...! मला कैद करू नको...! त्या मूर्ती माझ्या आहेत...! त्या माझ्याच आहेत...!"
त्याची किंकाळी संपूर्ण नंदापूर हादरवत होती.
फकीर गुलकंद मात्र निर्विकार उभा होता.
त्याने आपल्या गळ्यातील विश्वनाथ गुरुंनी दिलेला ताईत काढला. पितळी डब्याचं झाकण उघडून आणि ताईत डब्याच्या काठावर ठेऊन गंभीर स्वरात मंत्रोच्चार सुरूच ठेवले होते.
क्षणात हरी आणि बालाजीचे आत्मे तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाले.
हरीने नामदेवच्या आत्म्याचे दोन्ही हात घट्ट पकडले.
बालाजीने त्याच्या पायांना आवळून धरले.
नामदेव तडफडू लागला.
"हरी...! बालाजी...! मला सोडा...! त्या मूर्ती माझ्या आहेत...!"
तेवढ्यात देवघरातून दिव्याचा प्रकाश पसरला.
गिरजाबाईंची तेजस्वी आकृती प्रकट झाली.
त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी माया होती; पण डोळ्यांत दुर्गेसारखं तेज होतं.
त्या रहमानकडे पाहून शांत स्वरात म्हणाल्या,
"बाळा... माझ्या अंबाबाईला पुन्हा तिच्या जागी बसव."
रहमानने थरथरत्या हातांनी लाल फडक्यात गुंडाळलेल्या त्या दोन सोन्याच्या लक्ष्मीच्या मूर्ती देवघरात नेल्या.
ज्या क्षणी मूर्ती पुन्हा आपल्या सिंहासनावर स्थापित झाल्या...
त्याच क्षणी संपूर्ण वाड्यात घंटानाद घुमला.
धुपाचा सुगंध दरवळला.
नामदेव भीषण किंकाळी फोडत राहिला.
गुलकंदने दोन्ही हात पुढे केले.
"नामदेव परीट... गुरु विश्वनाथांच्या आज्ञेने... आणि या वाड्याच्या रक्षकांच्या संमतीने... तुला मी पुन्हा कैद करीत आहे!"
क्षणात काळ्या धुराचा प्रचंड भोवरा तयार झाला.
नामदेवचा आत्मा त्यात ओढला जाऊ लागला.
"नाऽऽही...! मला सोडा...!"
"या मूर्ती... माझ्या आहेत...!"
हरी, बालाजी आणि गिरजाबाईंच्या तेजस्वी शक्तीसमोर त्याचा प्रतिकार क्षणाक्षणाला कमी होत गेला.
अखेर...
धाडकन्!
नामदेवचा संपूर्ण आत्मा पितळी डब्यात ओढला गेला.
झाकण स्वतःहून बंद झालं. फकीर गुलकंद शहाने झटकन ताईत डब्यावर बांधला.
क्षणात वाड्यातील वादळ थांबलं. काळोख नाहीसा झाला. सूर्यकिरणांनी देवघर उजळून निघालं.
हरीने रहमानकडे पाहून हलकंसं स्मित केलं.
बालाजीने फकीर गुलकंद शहा या आपल्या गुरुबंधूला नमस्कार केला.
गिरजाबाईंनी देवघराकडे समाधानाने पाहिलं.
तिघांचेही आत्मे प्रकाशाच्या लहरीत विलीन झाले.
रहमानने डोळे मिटून अल्लाहचे आभार मानले.
गुलकंद शांतपणे म्हणाला,
"ही कथा इथे संपलेली नाही..."
रहमानने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
गुलकंद म्हणाला,
"या मूर्ती आता कुणीही विकायच्या नाहीत. या वाड्याबाहेर जाणार नाहीत. आणि हा पितळी डबा... कुणीही कधी उघडायचा नाही."
रहमानने गंभीरपणे मान डोलावली.
दोघेही वाड्याबाहेर पडू लागले.
रहमानने शेवटच्यांदा मागे वळून देवघराकडे पाहिलं.
तेवढ्यात...
देवघरातील दिव्याची ज्योत अचानक थरथरली.
दोन्ही सोन्याच्या लक्ष्मीच्या मूर्तींवर पडलेल्या प्रकाशात...
एका मूर्तीच्या पायाशी...
एक काळी सावली क्षणभर हलली.
ती सावली...
हळूहळू वळली...
आणि देवघराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या त्या पितळी डब्याकडे पाहून...
हसली.
फकीर गुलकंद क्षणात थबकला.
तो धावत देवघरात गेला.
ताईत जागेवर होता.
डबा बंदच होता.
सगळं पूर्वीसारखंच...
पण...
डब्याच्या झाकणावर...
आतून उमटल्यासारखे...
तीन ताजे ओरखडे दिसत होते.
टक...
क्षणभर शांतता.
टक...
रहमानचा श्वास अडकला.
टक...
गुलकंदने थरथरत्या हाताने डब्यावर हात ठेवला.
त्याच्या चेहऱ्यावर आयुष्यात प्रथमच भीती स्पष्ट दिसत होती.
तो पुटपुटला,
"नामदेव...?"
त्याच क्षणी...
डब्याच्या आतून...
अतिशय मंद...
पण स्पष्ट...
एक भयाण हास्य ऐकू आलं.
"हाऽ... हाऽ... हाऽ..."
आणि त्यानंतर...
कानाशी कुजबुजल्यासारखा एक आवाज घुमला—
"गुप्तधन अजून इथेच आहे..."
देवघरातील दिवा एका झटक्यात विझला.
संपूर्ण वाडा पुन्हा अंधारात बुडाला.
आणि त्या अंधारात...
फक्त पितळी डब्यावरचे तीन ओरखडे...
मंद लालसर प्रकाशात चमकत राहिले... आणि त्या शांततेत...
"हाऽ... हाऽ... हाऽ..."
ते भयाण हास्य पुन्हा एकदा घुमलं.
रहमानने नकळत डोळे मिटले. गुलकंदने पितळी डब्यावर हात ठेवला, पण यावेळी त्याच्या ओठांवर कोणताही मंत्र नव्हता.
कारण त्याला समजलं होतं. नामदेव कैद झाला होता; पण लोभ कधीच कैद होत नाही.
"माणूस काही वस्तू विकत घेतो...आणि काही वस्तू... माणसालाच विकत घेतात.."
( समाप्त )
@ महेंद्रकुमार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा