बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3117. कधीकधी सर्वोत्तम औषध

    ओपिडीत चारेक जणांचं एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी टेबलवर वेगवेगळ्या टेस्टचे रिपोर्ट्स ठेवले. मध्यभागी पन्नाशीतले एक गृहस्थ गंभीरपणे मान खाली घालून बसले होते."डॉक्टर, दोनेक दिवस झालेत छातीत डाव्या बाजूला थोडं दुखतंय.” त्यांनी हळूच कोंडी फोडली.
सगळे पॅरामीटर्स तपासले, सेफरसाईड एक ईसीजी काढला सगळं काही एकदम नॉर्मल आणि त्यांनी आणलेले कार्डियॅक प्रोफाईलचे रिपोर्ट्सही एकदम नॅार्मल.
सामान्यतः अशा वेळी  "रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, गॅसेस अपचनानंही होतं अॅसिडिटीची गोळी घ्या, ठीक वाटेल." असं म्हणता येतं पण शिष्टमंडळाच्या चेहऱ्यांवरचे विशेषत: गृहस्थांचा ताण कमी झालेला नव्हता..
सगळे इतके गंभीर की डॅाक्टरलाच अटॅक यावा,सगळ्यांची नजर अजूनही खालीच होती..
वैद्यकशास्रात केस-टेकिंगमध्ये 'ICE Model' नावाची एक अत्यंत प्रभावी संकल्पना आहे; जेव्हा एखाद्या रुग्णाचे सर्व प्राथमिक शारीरिक रिपोर्ट नॉर्मल येतात तेव्हा रोगाचे मूळ शोधण्यासाठी त्याच्या ‘आजारापेक्षा’ त्याच्या ‘अनुभवाकडं’ पाहणं गरजेचं असतं.
आता मी त्यांना काही प्रश्न विचारायला सुरूवात केली पण टोन गप्पांचा ठेवला अघळपघळ,तेच प्रश्न फिरून फिरून.
आधी ICEमधला ‘I'  अर्थात Idea म्हणजे रुग्णाची कल्पना;
“काका,या त्रासाबद्दल तुम्हाला स्वतःला काय वाटतंय? हा त्रास कशामुळं होत असावा असं तुमचं मतंय?”
काका क्षणभर थांबले. मग थोडं पुढं झुकून हलक्या आवाजात म्हणाले, ”डॉक्टर, माझा साडूभाऊ गेल्या वर्षी अचानक गेला, त्यालाही असंच डाव्या बाजूला अस्वस्थ वाटत होतं. मला भीती वाटतेय की मलाही काही गंभीर हृदयविकार तर सुरू नाही ना झालाय?"
वैद्यकिय दृष्टीनं हे केवळ ‘Non-specific chest pain’ असू शकतं पण रुग्णाच्या डोक्यात तो ‘हार्ट अटॅक’चा सुरुवातीचा टप्पा असतो..
रुग्णाची स्वतःच्या त्रासाबद्दलची ही 'Idea' किंवा भीती शोधल्याशिवाय त्याच्या निदानाला पूर्णत्व येत नाही. ICEमधलं दुसरं अक्षर ‘C' म्हणजे Concerns अर्थात काळजी; ”काका तुम्हाला या त्रासामुळं सर्वात जास्त चिंता कशाची वाटतेय?" 
हा प्रश्न ऐकून काकांचा चेहरा आधी खुलला मग पडला आणि ते हळूच म्हणाले, ”डॉक्टर, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय,तारीख धरली नाही, घरात मी एकटाच कमवता आणि नियोजन करणारा आहे. मला जर काही झालं किंवा मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं तर हे लग्न कसं होणार? सगळं काम अडून पडेल!"
इथं शारीरिक लक्षणांपेक्षा सामाजिक आणि मानसिक ताण जास्त प्रभावी ठरत होता. हा ताणच त्यांच्या स्नायूंच्या आकुंचनाला आणि छातीतील अस्वस्थतेला खतपाणी घालत होता..
ICEमधलं तिसरं अक्षर ‘E' म्हणजे Expectations अर्थात अपेक्षा; आज माझ्याकडं आल्यानंतर तुम्हाला नक्की काय अपेक्षा आहे? मी तुमच्यासाठी काय करावं?
यावर काकांचं उत्तर अगदी साधं होतं,”डॉक्टर,मला खूप साऱ्या गोळ्या किंवा इंजेक्शन नकोत. फक्त मला खात्री हवीये की माझं हृदय सुरक्षित आहे, मी पुढच्या महिन्यातील लग्नाची धावपळ सांभाळू शकेन ना?"
बऱ्याचदा रुग्णाला मोठ्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते तर त्याला मानसिक धीर आणि त्याच्या शंकांचं शास्त्रोक्त निरसन हवं असतं. मग या ‘ICE मॉडेलनं नेमकं काय साध्य झालं? जेव्हा या तीनही गोष्टी स्पष्ट झाल्या, तेव्हा केसचा रोख पूर्णपणे बदलला. काकांचा ईसीजी आणि रिपोर्ट्स त्यांना प्रत्यक्ष दाखवून, त्यांच्या हृदयाची स्थिती अगदी उत्तम आहे हे समजवून सांगितलं.
नातलगाच्या निधनामुळं त्यांच्या मनात बसलेला धक्का आणि सध्याच्या लग्नाच्या धावपळीचा ताण यामुळं हे स्नायूंचं दुखणं कसं उद्भवलंय याचं सोप्या भाषेत विश्लेषण केलं. त्यांना वारेमाप औषधांऐवजी हलकासा धीर,रक्त पातळ ठेवणारी गोळी,जीवनशैलीतील बदल आणि ताणतणाव नियोजनाचं मार्गदर्शन केलं. जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण गायब झाला होता आणि चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला होता.
     वैद्यकीय शास्रात केस-टेकिंग दरम्यान पेशंट हा केवळ ‘लक्षणं असणारा अवयवसमूह’ नसतो तर तो एक माणूस असतो. फक्त शारीरिक लक्षणांवर लक्ष केंद्रित केलं तर कदाचित आणखी ५ अनावश्यक तपासण्या सुचल्या असत्या. जेव्हा रुग्णाला वाटतं की डॉक्टरांना माझं म्हणणं कळलंय, त्यांनी माझी भीती समजून घेतलीये तेव्हा तो उपचारांवर आणि सल्ल्यावर १००% विश्वास ठेवतो. हे मॉडेल केवळ औषध-गोळ्यांचं नातं न ठेवता संवादाचा एक मानवी पूल बांधतं. कधीकधी सर्वोत्तम औषध हे स्टेथोस्कोपमधून नाही तर रुग्णाचं मन मोकळेपणानं ऐकून घेण्याच्या ‘कौशल्यातून’ बाहेर पडतं आणि हेच ‘ICE MODELचं सर्वात सुंदर रहस्य आहे.

#Doctors_Diary

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...