बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3181. कलियुगातील सावित्री

      काल संध्याकाळी अचानक डोंबिवलीला जायचा मणिकांचन योग जुळून आला. ओला कॅब बुक केली मी. कॅबमध्ये बसल्यावर ओटीपी नंबर दिला मी ड्रायव्हरला आणि प्रवास सुरु झाला. मी साधारण अश्या प्रवासात ड्रायव्हर बरोबर थोड्याफार गप्पा मारतो . माझ्या ड्रायव्हरचे नाव होते रमेश यादव . नवी मुंबईचा रहिवासी होता तो. इकडच्या तिकडच्या जुजबी गप्पा झाल्यावर तो स्वतःच बोलायला लागला आणि त्याने त्याची कहाणी मला ऐकवली. त्याचे वडील माझगाव डॉक मध्ये ४२ वर्षे नोकरी करून निवृत्त झालेले. त्याचे बालपण धारावीत गेलेले. तिथल्या वातावरणात हा शिक्षणात मागे पडला आणि व्यसनांच्या आहारी गेला, तब्येत नकळत खराब होत होती.  वडिलांनीच ओळखीने मग नोकरीला लावले. कालांतराने लग्न करून दिले. वाईट संगतीमुळे  आपल्याला जे दिवस अनुभवायला लागले ते आपल्या मुलांना लागू नयेत म्हणून ह्याने नवी मुंबईमध्ये भाड्याने घर शोधून तिथेच राहायला लागला. जे काही पैसे घरात येत होते त्यात संसार सुरु झाला. पुढे एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सगळे काही नीट सुरु असताना एक दिवस ह्याची एक किडनी निकामी झाली. नशीब हात धुवून त्याच्या मागे लागले होते. वडील निवृत्त केंद्रीय कर्मचारी असल्याने बरेचसे  वैद्यकीय उपचार मोफत मिळाले. त्याचे  डायलिसिस सुरु झाले. हा निराश झाला. त्या दरम्यान हातातील चालू नोकरी सोडावी लागली .
      घराजवळील गणपती विसर्जनाच्या तलावाजवळ हताश होऊन विसर्जनाच्या मुर्त्या बघून ह्याच्या डोळ्यांत पाणी आले आणि त्याक्षणी पुढच्या वर्षी पासून ५ वर्षे घरात गणपती आणण्याचा निश्चय त्याने केला.  डायलिसिस जवळपास ३ वर्षे चालले. पुढच्या वर्षी दुर्दैवाने दुसरी किडनी देखील निकामी झाली. त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला. त्याच्या बायकोने तिची एक किडनी दान करून नवऱ्याचे प्राण वाचवले. आज दोघेही नवरा बायको एका किडनीवर जगत आहेत. ह्या सगळ्या काळात गणपती बाप्पाने मानसिक बळ वाढवले हे त्याने कृतज्ञापूर्वक सांगितले मला. पुढे तब्येत थोडी सुधारल्यावर ह्याने गाडी विकत घेऊन ती ओला, उबरला लावून व्यवसाय सुरु केला. तेव्हा पासून त्याच्या खाण्यापिण्याकडे बायकोचे व्यवस्थित लक्ष्य असते. सकाळी घरातून न्याहारी करून हा निघतो. सोबत पोळी भाजीचा डबा असतो. बायको उकळलेले पाणी २-३ बाटल्यात भरून देते. दिवसाचे कमीतकमी १४-१५ तास हा गाडी चालवतो. बाहेरचे काहीही खायचे नाही अशी सक्त ताकीद बायकोने त्याला दिली आहे. दर ४ तासानी १ अश्या दिवसातून ६ गोळ्या त्याला आयुष्यभर खायच्या आहेत. सगळा खर्च वजा जाता रोजचे १०००-१५०० दरम्यान पैसे सुटतात. कधी कधी शरीर साथ देत नाही. जीव थकतो. पण दोन मुलांकडे बघून ह्याचा जीव तुटतो.  मोठा मुलगा यंदा १० ची परीक्षा ८७% मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाला. धाकटी मुलगी ९ वीत गेली आहे. दोन्ही मुले गुणी आहेत. वडील किती कष्ट करतात ह्याची पुरेपूर जाणीव दोघांनाही आहे. मुलांचा कसलाही हट्ट नसतो. वडील जे देतील कौतुकाने त्यावर दोन्ही मुले समाधानी आहेत.
     जेमतेम ४५  वर्षाचा रमेश यादव. पण जगण्यासाठी त्याची चालली धडपड ऐकून क्षणभर मी सुद्धा हादरलो. थोडेसे उपदेशात्मक विचार त्याला ऐकवून त्याची जगण्याची धडपड कशा रीतीने सुसह्य होईल ह्या संदर्भात  चार गोष्टी त्याला सुचवल्या. सुदैवाने त्याला त्या मनोमन पटल्या. त्याबद्दल त्याने माझे आभार देखील मानले. ऐरोली टोल नाक्याजवळ त्याचे बोलणे संपले. एव्हाना माझे डोके सुन्न झाले होते. मी खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. तेवढ्यात मी कुठवर पोहोचलो आहे हे विचारायला माझ्या मित्राचा फोन आला. मी उत्तर दिले  आणि परत ज्या कार्यक्रमासाठी निघालो होतो त्याच्या विचारात गुरफटून गेलो. रमेश यादवच्या बायकोच्या रूपात काल मला खरोखरच भेटली कलियुगातील सावित्री. जिने स्वतःची एक किडनी नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी दान केली आणि त्या दिवसापासून डोळ्यांत तेल घालून ती सावित्री आपल्या नवऱ्याची काळजी घेत आहे.
     माझ्या उतरण्याच्या ठिकाणी साधारण पावणे सातच्या सुमारास गाडी थांबली. का कोण जाणे पण माझ्याबरोबर रमेश देखील गाडीतून खाली उतरला. माझ्या जवळ येऊन त्याने पाया पडून माझा आशीर्वाद घेतला. त्याच्या ह्या अश्या कृतीने मी आश्चर्यचकित झालो. मी त्याच्या पाठीवर थोपटून आयुष्यमान भव: सदा सुखी, निरोगी आणि यशस्वी भव: असा आशीर्वाद दिला. हे सगळे घडत असतानाच त्याला नवीन भाडं मिळाले आणि मी फोटोसाठी त्याला विनंती करायच्या आतच तो गाडी सुरु करून निघून गेला. त्याच्या सोबत फोटो काढायला मिळाला नाही ही चुटपुट मात्र मनाला लागली. ती तशीच बाजूला  ठेऊन मी त्या टोलेजंग इमारतीच्या तळ मजल्याच्या चार पायऱ्या चढून लिफ्टपाशी पोहोचलो.  

© सतीश बर्वे 
टीप : हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...