दीपिकाची घाई झाली होती. आठ पन्नासची तिची बोरिवली फास्टलोकल. पहाटे उठून तिने मुलगा समीरचा डबा करून दिलेला. त्याची सातची शाळा.मग आपला आणि नवऱ्याचा डबा. सासरेबुवा एकटेच घरी असायचे. त्त्यांचे जेवण, दुपारी उषा कामाला आली कीं ती रामरावांना वाढायची. त्त्यांचे ताट, भांडी धुवून ठेवायची. दीपिकाला ही गाडी चुकवून चालायचे नाही कारण वांद्रे स्टेशनवरुन तिच्या कंपनीची बस असायची. दीपिकाने पर्स खादयाला लावली आणि ती दार उघडून बाहेर पडणार एव्हड्यात तिच्या सासऱ्याचा आवाज तिला ऐकू आला.
'दीपा... त्या वरच्या कपाटात 'दूरचे दिवे 'नावाचे पुस्तक आहे, ते काढून देतेस?
दीपिकाने घड्याळात पाहिले. पुस्तक काढत बसले तर गाडी चुकणार. ती म्हणाली
'बाबा.. संध्याकाळी देऊ का? मला उशीर होईल.
'अग पण मी दिवस कसा घालवू? तुम्ही सर्वजण बाहेर जाता मग माझा वेळ जात नाही.
चरफडत दीपिकाने कपाट उघडल आणि त्याना हवे ते पुस्तक काढून दिले. मग धावत ती बाहेर पडली आणि तिने रिक्षा पकडली.. आणि कशीबशी ट्रेन मिळवली.
रात्री ती दमूनभागून घरी आली तर तिचा मुलगा समीर तक्रार करू लागला..
'आई, आजोबा मला सतत हाक मारत रहातात, काही ना काही काम सांगतात..
'कसले काम सांगतात?
'माझा मोबाईल चार्जिंगला लाव, कधी मित्रांना फोन लाव, माझी पाठ खाजव, माझी नखे कापून दे.. त्यामुळे मला खेळायला जायला उशीर होतो..
'हो, बरोबर आहे.. मी सांगते आजोबांना समीरला खेळायला जायचं असत, त्याला काम सांगत जाऊ नंका म्हणून.
दुसऱ्या दिवशीची पण तीच तऱ्हा.. रोजच्याप्रमाणे दीपाली ऑफिसला जायला निघाली, तसे आजोबा तिला म्हणले..
'दीपा. माझे एक काम कर..
दीपालीच्या पोटात गोळा आला, आता काय हे सांगतात म्हणून.
'जाता जाता माझे हे पत्र कुरियरऑफिसला दे.
'बाबा, अर्जंट आहे का कुरिअर? उदया दिलीपला सांगते..
'अग त्याला मी काल सांगितलं, तो म्हणाला दीपाकडे द्या.. तो घाईत असतो ना सदा..
'द्या.. घडयाळाकडे पहात ती म्हणाली... तिला आपल्या नवऱ्याचा राग आला आणि सासऱ्यांचा सुद्धा. दोघेही सगळी कामे आपल्यावर सोपवून देतात.. रोज ट्रेन पकडण्याची घाई.. रोजच.. काय हे आपले जीवन? कमवत्या स्त्रीला घरचे करून बाहेर पडायचं.. सगळ्यांचे डबे, रोजचे वाणसामान, भाजी, मासे.. त्यात मुलाचा अभ्यास..? यात आपल्या मुलाकडे आपले दुर्लक्ष होतें आहे असे तिला वाटले.. या गडबडीत सासरे बाहेर पडताना रोज काहीतरी काम सांगतात.. तिला वाटायचे, यामुळे आपल्या तोंडातून चटकन त्त्यांचा अवमान व्हायचा... ते तसे होता नये.. तसा तिला आपल्या सासऱ्यांचा अभिमान होता.. मराठीतील ते नावाजलेले कथालेखक होतें, तिच्या माहेरच्याना, तिच्या मैत्रिणींना, ऑफिसमधील सहकाऱ्याना त्त्यांचे कौतुक होतें, त्त्यांची अनेक पुस्तके बेस्टसेलर होती. पण तिला ऑफिसमध्ये जाताना रोज उशीर होत होता, हे पण तितकेच खरे.
ती रात्री दिलीपला म्हणाली..
'हे बघ, बाबा हल्ली काही दिवस मी ऑफिसला जायला निघताना काम सांगतात. त्यामुळे मला ऑफिसला जायला उशीर होतो.
'अग हो... मी सकाळी लवकर बाहेर पडतो त्यामुळे ते तुला सांगत असतील पण मी संध्याकाळी घरी आल्यावर माझ्याशी गप्पा मारत रहातात. आईची आठवण काढत राहतात, माझ्या आणि रतनच्या लहानपणाच्या आठवणी काढतात, आईच्या आठवणीने त्त्यांचे डोळे ओले होतात, खरं सांगू का,बाबा एव्हडे मोठे लेखक, एव्हडया कथा -कादंबऱ्या लिहिल्या त्यानी, पण आयुष्याच्या या टप्प्यावर ते हलवे होतात. त्यामुळे ते सांगतात ते मी ऐकतो. पण मी त्याना आता सांगतो, दीपाला ऑफिसला जायच्या वेळी काम सांगू नका.
'हो, मी पण तेच म्हणते, इतर वेळी त्यानी सांगितले ते मी ऐकते, पण सकाळी खूप धावपळ असते रे माझी..
रामरावांचा रमेश भिडे हे जवळचे मित्र. ते कवी. ते बऱ्याच वेळा घरी यायचे मग दोन मित्रांच्या गप्पाना ऊत यायचा.. अनेक ठिकाणी आलेले लेख, कथा, कविता, नवीन नाटकें. गप्पा मारून चहा घेऊन रमेशराव घरी जायचे.
रामरावांचा मधुमेह मध्येच खूप वाढे. मग दिलीपची धावपळ होई. काही दिवस त्याना हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागे. अशाच एका महिन्यात समीरने वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होतें, दीपिकाला सुट्टी होती म्हणून ती सासऱ्यान्च्या खोलीत गेली.. खोली आवरता आवरता तिला त्यांची डायरी सापडली.. आपले सासरे काय लिहितात एव्हडे?.. ती सहजच त्त्यांची डायरी चाळू लागली.. गेल्या सत्तर वर्षांची.. कॉलेजमध्ये असतानाच्या आठवणी.. मग नोकरी, लेखन.. पुस्तके, मिळालेले पुरस्कार.. लग्न.. मग दिलीप आणि रतन ही दोन मुले.. मुलांचे संगोपन,मुले मोठी झाली.. रतनचे लग्न.. दिलीपचे लग्न.. समीरचा जन्म.. मग पत्नीचे निधन.....
या टप्प्यावर रामराव बदलले.. त्यान्च्या डायरी लेखनात विष्णणता आली.. पत्नीच्या निधनानंतर ते व्यथित झाले..त्याना आयुष्य भयाण वाटू लागले.. आणि ते मुलगा, सुन आणि नातवावर विस्मबून राहू लागले... रामराव पुढे लिहितात... तरुणपणात मधुमेह आला आणि तो उतारवयात वाढला. दर महिन्याला हॉस्पिटलची वारी.. तात्पुरता उपचार,त्यामुळे येणारे इतर रोग.. आपले दिवस आता कमी राहिलेत याची जाणीव झाली आणि मग मुला.. सुनेचा जास्तीत जास्त सहवास मिळावा म्हणून आपण प्रयत्न करू लागलो.. मुलगा दिलीप, सुन दीपिका आणि नातू समीर यांनी थोडावेळ तरी आपल्यासोबत काढावा म्हणून रोज सुनेला.. दीपिकाला काहीतरी काम सांगू लागलो.. संध्याकाळी मुलगा आला कीं त्याच्यासोबत जुन्या आठवणी काढू लागलो आणि नातू समीरला खेळायला जायचं असत पण त्यालाही काहीतरी काम सांगून आपल्या जवळ बसवू लागलो.. मला कल्पना असायची कीं त्याना याचा त्रास होतो.. दीपिकाची ट्रेन चुकते, समीरला खेळायला उशीर होतो... पण बाळांनो, मला क्षमा करा, माझ्याजवळ वेळ थोडा आहे, मी थोडया दिवसाचा सोबती आहे.. म्हणून....
दीपिकाला पुढे वाचवेना. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहवू लागल्या. रडतरडत तिने डायरी बंद केली आणि ती डोळे पुसत बाहेर आली. रात्री दीपिकाने नवऱ्याला बाबांच्या डायरीबंद्दल सांगितले. त्याला बाबा डायरी लिहितात हे माहित होतें. पण त्याने त्यांची डायरी वाचली नव्हती. दीपिका नवऱ्याला म्हणाली.
'बाबा रोज ऑफिसला जायच्या वेळी कामे सांगतात म्हणून राग यायचा. पण आता मी माझे काम दहा मिनिटे लवकर संपवेन आणि ती दहा मिनिटे बाबासोबत घालवीन. त्याच्याशी गप्पा मारीन. त्यान्च्या पुस्तकाविषयी बोलेन. दिलीप तू सुद्धा जास्तीत जास्त वेळ त्यान्च्याबरोबर घालव. तुझी कामे दहा मिनिटे लवकर संपव. मी समीरला पण सांगेन, दहा मिनिटे उशिरा खेळायला जा. ती दहा मिनिटे आजोबाना दे. शेवटी त्याना काय हवंय. आपली रोजची फक्त दहा मिनिटे. एक लहानशी गोष्ट. एक छोटीसी बात.
दुसऱ्या दिवसापासून दीपिका आपले लवकर आवरू लागली आणि दहा मिनिटे सासऱ्यासोबत घालवू लागली. दिलीप संध्याकाळी घरी आला कीं बाबासमवेत गप्पा मारू लागला, त्याना घेऊन बागेत जाऊ लागला. समीर शाळेत जाताना येताना आजोबाच्या बाजूला बसू लागले. गेले काही वर्षे खंगलेले रामराव आता टवटवीत दिसू लागले. त्याचे घरातील बोलणे, हसणे वाढले. त्यांचा मित्र रमेशरावाच्या नजरेत हे आले. आपल्या मित्राचा बदललेला मूड त्यान्च्या लक्षात आला. ते मित्राला म्हणाले..
'राम्या.. पूर्वीपेक्षा आता तू आनंदी दिसतोस. वहिनी गेल्यापासून नर्व्हस असायचास.'
'होय रमेश.. माझा मुलगा, सुन आणि नातू माझी खूप काळजी घेतात.. माझ्याशी बोलतात.. गप्पा मारतात. आणि मला काय हवंय? त्यांच्या प्रेमाचे टॉनिक मला मिळतेय.
'होय.. आहेस बाबा तू भाग्यवान.'
अचानक एका रात्री मधुमेह खूप वाढला आणि हॉस्पिटलला पोचण्याआधी रामराव निधन पावले. माणसे जमली. मित्र जमले, वाचक, नातेवाईक जमले. सर्वजण म्हणत होतें. रामराव गेले पण त्यांचा चेहेरा प्रसन्न होता. आंनदीत होता.
दीपिका हे ऐकत होती, नातेवाईकांचे बोलणे ऐकून तिला समाधान वाटले. शेवटी आपले सासरे समाधानाने गेले. आपण तिघांनी काय केले? त्याना थोडा वेळ दिला. त्याने त्याना आनंद मिळाला. किती लहानशी गोष्ट. एक छोटीसी बात.
लेखक : प्रदीप सुशीला रामदास केळूसकर
9422381299 / 9307521152..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा