आज रविवार असल्याने चित्राच्या मागे कामाची गडबड नव्हती फारशी. रोहितला निवांत वेळ होता म्हणून हाॅलमध्ये बसुन चित्राचे सासु सासरे आणि नवरा रोहित घराचं रिनोव्हेशन करायचं असल्याने काय काय बदल करायचे यावर चर्चा करत होते. चित्रा आतमध्ये चहा बनवत होती सगळ्यांसाठी. रोहित आम्हाला आता जरी जास्त त्रास होत नसला तरी दिवसेंदिवस गुडघेदुखीचा त्रास बळावु शकतो. सरुमावशीचंच बघतोय ना..त्यामुळे आमच्या रुमला कमोड अटॅच करुन घेवू म्हणजे पुन्हा त्रास नको. सासूबाईंनी आपलं सजेशन दिलं. सासऱ्यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि रोहितने सुद्धा त्याला तडक मंजुरी दिली.
तेवढ्यात चित्रा किचनमधुन चहाचा ट्रे घेवुन आली..
"मी काय म्हणत होते रोहित जर आपण किचन मध्ये ओट्याचा आकार सी शेप केला तर? म्हणजे बघ मिक्सर, ओव्हन , टोस्टर सगळं नीट बसेल आणि दुसऱ्या बाजूने भांड्यांच सिंक पण व्यवस्थित अॅडजस्ट होईल. आपला ओटा लहान पडतो. खुप पसारा होतो. सी शेप बनवला म्हणजे कसं सगळं सुटसुटीत होईल आणि आपला जो डायनिंग टेबल आहे ना तो आणि जुनं झालेलं शोकेस एक्सचेंज करुन ते फोल्डिंग वालं डायनिंग टेबल आणुया ज्याचा टेबल वाला पार्ट शोकेस च्या खाली पार्टीशन सारखं राहतं इतर वेळी. म्हणजे आपला चिन्मय आता बराच चंचलपणा करायला लागलाय. एखादे वेळी लक्ष नसतांना टेबलचं कोपर वगैरे लागलं म्हणजे अवघड व्हायचं त्यापेक्षा बदलुन घेवुया. चित्रा चहाचे कप सगळ्यांना देत मनात कधीपासुन रेंगाळणारं सांगु लागली.
"तुला काय कळतं त्यातलं?? तुला कोणी विचारलंय का?? उगाच नसता खर्च वाढवायला सांगतेय. पैसे काय झाडाला लागलेत का. माझ्या मुलावर आधीच काय कमी भार आहे का?? महागाई किती वाढलीये. कसलीच समज नाही तरी नाक खुपसायचं. सासूबाईंनी नेहमीसारखं नन्नाचा पाढा लावत तिच्यावरच डाफरायला सुरुवात केली. तसं आतापर्यंत सगळं निमुटपणे ऐकणाऱ्या तिच्या सहनशक्तीचा आता मात्र कडेलोट झाला.. आणि ती विजेसारखी कडाडली..
बास्स झालं.. काय लावलंय तुम्ही. मला कळत नाही, मला समज नाही. अहो आत्ता आत्ता पर्यंत तुमच्या लेकाच्या बरोबरीने कमवत सगळा पगार या घरात देत होते ना मी?? तो पगार काय तुमच्या सारखं मैत्रिणींच्या घोळक्यात घरातल्या सुनेच्या कागाळ्या करण्याचा किंवा तासंतास फोनवर बहिणी व आईशी बोलण्याचा नव्हता मिळत मला. तेव्हा तर मैत्रीणींना तु्म्हीच फुशारक्या मारत सांगत होतात ना माझी सुन इतकी शिकलीये, इतकं कमावते मग आता घरात बोलतांना मी का नालायक होते?? नोकरी करत होते तेव्हा सुद्धा घर सांभाळलंय मी आई आणि आताही तुमच्या कडुन चिन्मयला बघणं होत नाही म्हणल्यावर लगेच नोकरी वर पाणी सोडलं ते सगळ्याची जाणीव आणि समज आहे म्हणुनच ना?? आणि महागाईच्या गोष्टी तुम्ही मला सांगताय. तुम्ही नुकत्याच यात्रेला जावून आलात. अधिकाचं वाण म्हणून रोहिणी ताई नको म्हणत असतांनाही तुम्ही किती काय दिलं त्यांना आणि भाऊजींना. आणि वर मावशींकडे लग्न होतं उन्हाळ्यात तेव्हा सुद्धा भलमोठं प्रेझेंट, आहेर सगळं तर केलं ना आपण. तेव्हा महागाई कुठे गेली होती?? तेव्हा एका शब्दाने मी काही बोलली का तुम्हाला मग दरवेळी मला काही सुचवायचं असेल, माझं मत मांडायचं असेल तर तुम्ही का मध्ये येता???
मी या घरासाठी मोलकरणी सारखं बिनपगारी राबते आणि त्यात काहीच वावगं किंवा विशेष नाही कारण हे घर माझं आहे असंच तुम्हाला वाटतं बरोबर ना??. मग निर्णय घेण्याचा हक्क मला का नसावा??? तेव्हा का, तुला कुणी विचारलंय का? असं बोलुन मला डावलता तुम्ही?? अहो साधी भांडेवाली लावली तरी ती तुम्हाला सांगते वयनी 'ही' साबण नको 'ती' आणा पुढच्या वेळी यानं चिकट भांडे निघंना झालेत. का कारण ती सुद्धा तिची सोय बघते. तिचं काहीच चुकत नसतं म्हणा त्यात. आता तुमचंच बघा तुम्ही सुद्धा आज ठणठणीत असूनही उद्याची सोय म्हणुन आत्ताच कमोड सिस्टीम बसवुन घेताय हो की नाही मग जर मी या घरची सुन आणि रोहितची बायको या नात्याने माझ्या घरात माझी आणि माझ्या मुलाची सोय बघत असेल तर त्यात चुकीचं काय आहे??? ..
त्यावर सासुबाईंकडे उत्तर नव्हतं
नाही ना उत्तर?? नसणारच कोणत्या तोंडाने सांगाल तुम्ही की मी सुन आहे आणि सासु म्हणुन तुमचंच वर्चस्व घरात रहावं ही संकुचित मानसिकता नडतेय इथे ते. चित्राने मुद्देसूद पणे बोलुन मर्मावर अचुक बोट ठेवलेलं पाहुन सासुबाईं गप्पगार झाल्या नसत्या तर नवल. सासरे आणि रोहित दोघंही मात्र शांतपणे जे सुरू आहे ते पाहत होते.
नाही माझी तक्रार तुमच्या विषयी नाहीच आहे आई, बाबाही तुम्हाला टोकत नाही याचंही मला काही वाटत नाही पण हा.. रोहित.... माझा नवरा... सप्तपदी घेतली ना आम्ही इथे मात्र माझ्यासाठी ठामपणे स्टॅण्ड घ्यायला एक पाऊल ही टाकु शकत नसेल आणि तोंडातून एक शब्द ही काढू शकत नसेल तर काय अर्थ आहे असला नवरा असण्याला, त्या सप्तपदीला आणि सात वचनांना ??? चित्रा रोहितकडे रागीट कटाक्ष टाकत तावातावाने बोलत होती.
चित्रा ssमला का तुमच्या मध्ये ओढतेय ...रोहित चिडुन म्हणाला
आवाज खाली आणि मध्ये ओढतेय म्हणजे ??. तु आहेस आणि असणार आहेसच रोहित मध्ये. तुझ्यासाठी, तुझ्या माझ्या नात्यासाठी या घराचा उंबरठा ओलांडून आलीये मी माझे आईबाप, माझं घरदार सोडून आलीये, तुझ्या सगळ्या माणसांना आपलं मानलंय. तु कधीतरी काहीतरी बोलशील, माझ्या साठी स्टॅण्ड घेशील, यांना यांची चुक उमगेल या आशेवर इतके दिवस ऐकून घेतलं मी यांच सगळं. पण कुठल्याही गोष्टीची एक मर्यादा असते. माझी सहन करण्याची मर्यादा संपलीये. म्हणुन आत्ता या क्षणी मी आणि चिन्मय या घरातून निघून जातोय. जेव्हा तुमच्यात बायको साठी स्टॅण्ड घेण्याची कुवत येईल ना मिस्टर रोहित तेव्हा आणि तरच या माझ्याकडे !! .. .. चित्रा निर्धाराच्या स्वरात म्हणाली.
रोहित आणि त्याचे आईबाबा अवाक् होवुन तिचा तो अविर्भाव पाहतच राहिले.
काय ??तु फक्त एवढ्यासाठी घर सोडून आलीस??? काय वेड बीड लागलं का तुला चित्रा?? अग़ं त्या पोराचा तरी विचार करायचा. चित्राचे बाबा चित्राने घरात पाऊल ठेवताच तिचा अविर्भाव पाहुन कडाडले.
हो मी घर सोडून आलीये. माझ्या स्वाभिमानासाठी आलीये आणि राहिला प्रश्न माझ्या मुलाचा तर त्याचाच सगळ्यात जास्त विचार करुनच मी हा निर्णय घेतलाय. उद्या आपल्या बापाचं पाहून तो सुद्धा हेच शिकेल. माझ्या सुनेच्या बाबतीत हाच कित्ता गिरवल्या जाईल जे मला मुळीच नकोय. मी जरी माझ्या सासु सारखी वागणार नसली तरी त्याने मात्र ठामपणे तिच्या स्वाभिमानी साठी जगाशीही लढायला तयार असावं असंच घडवायचंय मला माझ्या मुलाला. त्यामुळे रोहीतला जाणीव होत नाही आणि तो स्वतः त सुधारणा करत नाही तोपर्यंत मी तिथे जाणार नाही. माझा स्वाभिमान आणि माझ्या मुलावर मला अपेक्षित ते योग्य संस्कार करण्यास पोषक वातावरण आणि त्याचं नवरा व बाप म्हणून लायक नसणं तुम्हाला फक्त एवढीशी गोष्ट वाटत असेल तर मी इथेही तुमच्या वर ओझं बनून थांबणार नाही. मी माझी दुसरी व्यवस्था करेन. चित्रा करारीपणे म्हणाली आणि जायला निघाली सुद्धा.
थांब पोरी. स्त्रिच्या स्वाभिमानाचं मोलं पुरुषांना नाही कळायचं पण दुसऱ्या स्त्रिने तरी ते समजुन घेतलं पाहिजे. तुझ्या आत्याच्या वेळेस मी स्त्रि असुन, आई असुनही नाही तिची साथ देवु शकले..." हे असंच असतं. एवढं तर स्त्रिच्या जातीला सहन करावंच लागतं म्हणुन तिची समजुत काढली आणि तिला जन्मभर सोसावं लागलं ते लागलंच. पण तुझ्या बाबतीत मी तसं नाही होवु देणार. वसंता आपली पोर जाणती आहे, समजदार आहे तिने जर निर्णय घेतला असेल तर आपण तिला पाठिंबा द्यायलाच हवा. चित्रा इथेच राहिल जोपर्यंत जावईबापुंना त्यांची चुक सुधारण्याची सद्बुद्धी नाही होत तोपर्यंत. रमा आजी चित्राला थांबवत निर्णायक स्वरात म्हणाल्या.
हो बाळा तुझी आई सुद्धा तुझ्या पाठीशी आहे. माझ्या मुलीच्या मताला जिथे कवडीचं स्थान नसेल तिथे तिने मन मारुन नाही राहायचं. जानकीबाई भरल्या डोळ्यांनी चित्रा कडे बघत म्हणाल्या.
मला माफ कर बाळा. बापाचं काळीज असुन तुझा त्रास शुल्लक वाटला. पण आईचं बोलणं ऐकून अक्काचा त्रास, तिचं उदास राहणं आठवलं अन् माझी चुक मला उमगली बघ. तुझं बरोबर आहे. तुझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि या लहानग्या मुलावर सुद्धा चुकीचे संस्कार नको व्हायला. तु काळजी नको करु आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. चित्राचे बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले अन् सगळ्यांच्या नुसत्या शब्दांनीही चित्राला खुप भरुन आलं.
आपलं कुटुंब आपल्या सोबत आहे या जाणिवेनेच आपल्या आत्मसन्मानासाठीच्या लढाईसाठी तिच्यात दहा हत्तींच बळ आलं होतं. आता ती सोसणार नव्हती तर लढणार होती. तिला जे कळतं ते इतरांना कळत नाही तोपर्यंत !!!
-'मनस्वी' समीक्षा ✍️©®
(सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.. कथा व लिखाण आवडल्यास कृपया लेखिकेच्या नावासहीतच शेअर करा )
स्त्रियांनी सहन करु नये असं आपणच म्हणतो आणि हे तर चालायचंच असं सुद्धा आपणच म्हणतो. पण सत्य हे आहे की एक स्त्री जोपर्यंत दुसऱ्या स्त्रिच्या स्वाभिमानाचं मुल्य जाणत नाही आणि आपल्या मुलांना स्त्रिचा आदर करणं शिकवत नाही तोपर्यंत अश्या प्रकारच्या वागण्यातुन तिच्या आत्मसन्मानाची पायमल्ली होतच राहणार. . तेव्हा आता निर्णय आपल्या हातात आहे. आशा आहे कथेतून अपेक्षित संदेश वाचक घेतील व केवळ वाचुन कथा सोडणार नाहीत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा