“चला, मुलीचे मामा...मुलीला घेऊन या !” भटजीच्या आवाजानं तिनं दाराकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं. एवढा वेळ गौरीहार पूजतानाही तिचं लक्ष कशात लागत नव्हतं. ‘माय मरो आणि मावशी जगो’ या शब्दाला जागत शेजारी थरथरत का होईना पण मावशी गेल्या पाच दिवसापासून राणूच्या मागं उभी होती. फक्त जागा रिकामी होती ती मामाची !
लग्न ठरलं तसे अभिनंदनाचे सगळे फोन आले होते. पण मामानं फोन केला नाही, आपण केला तर, फक्त ‘हम्म’ म्हणून ऐकून घेतलं होतं. राणूच्या डोळ्याला तेव्हाच धारा लागल्या होत्या. आई असेपर्यंत फुलासारखा झेलणारा हा मामा एवढा कठोर कसा झाला असेल? आईच्या शेवटच्या आजारपणात मामानं जे केलं, ते कुणीच करू शकलं नसतं. आपले वडील देखिल नाही. पण त्यानंतर मामा एवढा बदलला? आपण लग्नाची पत्रिका द्यायला गेलो, तेव्हा किती कोरडेपणाने वागला पत्रिका अगदी बाजूला ठेवून दिली आणि एकच वाक्य बोलला,
“लग्नासाठी मामाची जागा रिक्त आहे, अशी जाहिरात दे.’ त्याच्या या वाक्यावर आपण रडतच बाहेर पडलो त्याच्या घरून. मनात नुसते विचार, ‘हा असा का वागत असेल?’
“जाहिरात द्यायची मामासाठी. इतकं सोपं असतं का मावशी?” म्हणत आपण किती रडलो मावशीच्या गळ्यात पडून. तेव्हा ती म्हणाली होती, “अग तो नुसतं बोलतो ग, तो नक्की येईल बघ, पाठीराखा म्हणून उभा राहायला !”
मावशीच्या त्या ‘पाठीराखा’ शब्दान मामासोबतचे बंध आठवले. आईकडचंअगदी हक्काचं माणूस ! आजोळी हट्ट करायला, मस्ती करायला. आजोळी आलं की बसस्टँड पासूनआपली दळणवळण व्यवस्था करणारा, अगदी आंनदी असणारा, आपल्याशी खोटं-मोठं भांडण करणारा मामा कधी खरा-खरा भांडायला लागला आणि ते ही आई गेल्यावर…! सगळं आठवून राणूनं मनसोक्त रडून घेतलं. मावशी तोंडापुरतं म्हणून गेली, “कुणी मंडपातलं उभं करू ‘मामा’ म्हणून… तू नको जीव जाळू!” पण नंतर मावशीनं घर गाठलं होतं मामाचं.
“नेमकं काय झालं तुला? पोरीला रडत परत पाठवलंस. तुला यावं लागेल लग्नाला. अरे, काही जागा ह्या हक्काच्या ओघानंच मनाशी जोडलेल्या असतात रे ! ती वेळ, ती जागा कदाचित कोणी भरून नेईलही पण तिच्या मनात असलेली ‘मामा’ नावाची जागा कायम रिती होऊन जाईल रे ! आज तिची आई असती तर…!”
एवढं बोलताच मामा रडायलाच लागला, “ताई, नको ग तिची आठवण काढू. खूप मुश्किलीनं मी तिला विसरू पाहातो. पण ही समोर आली की ताई आठवते, तिचे शेवटचे हाल आठवतात. तिचा आजार आणि त्या आजारात ह्या सगळ्यांनी सोडलेली तिची साथ.
“ती शेवटी शेवटी खुप दुःखी झाली. ज्या संसारासाठी खस्ता खाल्ल्या, त्या लोकांनी साथ सोडली. मी दिली साथ तिला. पण मृत्यूनं मला हरवून तिला नेलं ग ! तिचे शेवटचे अश्रू ह्या सगळ्यांच्या वागण्यामुळं आणखी वाढले. मला नको वाटतात ही माणसं !”
मावशीनं त्याच्या पाठीवर हात फिरवला, “दादा, अरे ती जाणार काही महिन्यात, हे डॉक्टरांनी सांगताच मुळातच ते सैरभैर झाले. कदाचित नव्हती त्यांच्यात ह्या सगळ्या प्रसंगाला तोंड द्यायची हिम्मत ! ते कमी पडले, हे युद्ध लढण्यात. पण लेकरं? त्यांना काय दोष रे? आपली संपत जाणारी आई बघणं, हे किती क्लेशदायक होतं त्यांना !
“चुकले असतील रे ते तेव्हा. पण म्हणून आता त्यांच्या आनंदाच्या क्षणात त्यांना एवढी शिक्षा देऊ नकोस. नात्यांच्या काही जागा ह्या रिक्तच असतात. उगाच तोंडदेखलं म्हंटल्यानं कुणी ‘मामा’ होत नसतं. ती मामाची जागा ‘मनातली’ असते. प्रसन्न, निरागस आणि आनंदी! ती तशीच तिच्या मनात जपलेली ठेव.
“मला मंडपात तुझी आस राहील आणि आपली अक्का स्वर्गातून नक्कीच पाहील. तुझं पाठीमागं उभं असणं, तिलाही कुठंतरी समाधान देईल. बघ, बाकी तू ठरव. निघते मी !” म्हणत ताई गेली. ती आता डोळ्यात अश्रू पुसतानाच मामानं पाहिली. मामा खोलीत आला. चटकन राणूच्या डोक्यावर हात ठेवत त्यानं स्वतःचे अश्रू पुसले. मंडपात तिची पावलं आता आनंदानं आणि आत्मविश्वासानं पडत होती. स्टेजवर अक्काच्या फोटोकडे मामाचं लक्ष गेलं आणि फोटोला घातलेला हार खाली पडला. त्याक्षणी ‘लेकीमागे उभा मामा’ ही भरलेली जागा आईला सुखावून गेली, असंच डोळ्यातले अश्रू लपवणाऱ्या राणूला वाटलं.
- स्वप्ना मुळे(मायी), छ.संभाजीनगर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा