आज आईची डॉक्टर नाडकर्णी कडे अपॉइंटमेंट होती. सकाळी लवकर उठून आम्ही दोघांनी पण आवरले. साधारण 11 च्या सुमारास आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो.
का कुणास ठाऊक पण मला थोडं बेचैन झाल होत.
आईला हॉस्पिटलला आणलं की माझी अशीच अवस्था व्हायची. मी तिला कधी हे सांगूही शकत नव्हतो. तिच्या आजारपणाची उगाचच काळजी वाटायची.
लहानपणापासून मला नेहमी असं वाटायचं की आई कधीच आजारी पडू नये. पण सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. आजारपण हे सुद्धा आपल्या हातामध्ये नसतं.
ओपीडी मध्ये जास्त काही गर्दी नव्हती. दोन ते तीन पेशंट आमच्यापुढे असतील, पाऊण एक तासाने आमचा नंबर आला.
आईचे सर्व उपचार याच डॉक्टरांकडे चालू होते. अगदी सुरुवातीपासून मी कधीही डॉक्टर बदलले नाही, आईला या डॉक्टरांचा गुण पण यायचा. वेळोवेळी त्यांनी अतिशय चांगला सल्ला दिला.
तेवढ्यात आत गेलेले पेशंट बाहेर आले, डॉक्टरांनी आतून बेल दाबली. आता आमचाच नंबर होता.
हातातला मोबाईल बंद करत आई आत निघण्यास तयार झाली, मीही काढलेल्या चपला पायात घातल्या आणि डॉक्टरांच्या केबिनकडे बघितले,
तेवढ्यात नर्सने आम्हाला हातानेच आत जाण्याची सूचना केली.
आम्ही दोघेही आत गेलो .
डॉक्टरांनी आमचं अगदी हसऱ्या चेहऱ्याने स्वागत केलं.
खुर्चीकडे बोट दाखवत त्यांनी बसण्याची विनंती केली.
एकदा रुटीन चेकअप करून घेऊ असं म्हणत त्यांनी आईला अगदी व्यवस्थित तपासलं. आवश्यक त्या सगळ्या तपासण्या करून नर्स बाहेर गेली.
" रिपोर्टस आणलेत ना."? डॉक्टरांनी खुर्चीवर बसत विचारले.
"हो डॉक्टर, सर्व रिपोर्ट घेऊन आलोय ". मी हातातली फाईल डॉक्टरापुढे सरकवली.
त्यांनी अतिशय व्यवस्थित ती फाईल बघितली. ते बराच वेळ सर्व रिपोर्ट वाचत होते.
मी आईकडे बघितले, तिचे सर्व लक्ष डॉक्टरांकडे होते.
आपण सर्वसामान्य माणसं डॉक्टरांच्या सल्ल्यावरच अवलंबून असतो. रिपोर्ट बद्दल आपल्याला जास्त काही अंदाज येत नाही,
" हो,रिपोर्ट ठीक आहेत. मी काही वेगळी औषध लिहून देतो. ती चालू करा आणि आणखी काही आपण टेस्ट करू या. त्याबरोबरच काही पथ्य पण आहेत ते सुद्धा नेहमी पाळावे लागतील." डॉक्टरांनी सांगितले.
"डॉक्टर,एवढ्यात थकवा खूप यायला लागलाय आणि भूक पण कमी होत चाललीय ". आईने तिची समस्या डॉक्टरा समोर मांडली.
" आई, आता वयामानानुसार हे होणारच. आहार शक्यतो नेहमी वेळेवर घेत जा. आणि आराम करा." डॉक्टर नाडकर्णी बोलले.
एक महिन्याची औषधं लिहून देतो त्यानंतर पुन्हा या.
डॉक्टरांनी औषधे देण्यासाठी हातात पॅड घेतला आणि औषधे लिहून पेपर माझ्या हातात दिला.
आम्ही दोघेही बाहेर जाण्यासाठी निघालो. आई दरवाजा उघडून बाहेर निघाली, तेवढ्यात डॉक्टरांनी मला हाक मारली,
"शंतनु , जरा आत येतोस का "?
मी मागे वळून बघितले, डॉक्टरांनी मला पुन्हा आत बोलावले होते. तेवढ्या वेळात आई दरवाजा बंद करून बाहेर गेली.
केबिनमध्ये आता फक्त मी आणि डॉक्टर होतो.
डॉक्टरांनी मला खुर्चीकडे हात करत पुन्हा बसायला सांगितलं.
डॉक्टरांनी मला आत का बोलावलं असेल ? हा प्रश्न माझ्या मनात भीती निर्माण करून गेला.
डॉक्टर खूप शांत होते, त्यांना कशी सुरुवात करावी हेच कळेना.
"हे बघ शंतनु, आईचे रिपोर्ट मी चेक केले. रिपोर्ट थोडेसे गंभीर आहेत. आणि स्पष्ट सांगायचं झालं तर आई एक, दोन महिन्यांची सोबती आहे. त्यांचे जास्त दिवस उरलेले नाहीत.
मला क्षणभर काहीच सुचेना. भीतीने माझ्या पोटात गोळा आला आणि क्षणात डोळे पाणावले. माझा गळा दाटून आला होता,मोठ्या हिमतीने मी अवंढा गिळला. माझे डोळे भरून आले.आतापर्यंत आम्ही केलेले प्रयत्न, जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड, हे सगळं आता थांबणार होतं.
"हे बघ,काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. आपण प्रयत्न केले नाहीत असं नाही, दीड दोन महिने होईल तेवढी आईची सेवा कर, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर, शक्य होईल तेवढे जवळ कुठेतरी फिरव. त्यांचे शेवटचे दिवस सुखात जातील एवढी काळजी घे ." डॉक्टरांनी मला शेवटचा सल्ला दिला.
माझे तर हात पायच गळून गेले होते.
मी रिपोर्ट गोळा केले आणि डॉक्टरांकडे बघितले. तेही अगदी निशब्द झाले होते.
रिपोर्ट्स हातात घेऊन खुर्चीवरून उठलो, जड अंतकरणाने बाहेर जाणार तोच डॉक्टरांनी पुन्हा आवाज दिला.
" शंतनु,अरे तुझा मोबाईल राहिला वाटतं इथे."
" हो खरंच,माझा नाही आईचा आहे तो. आई विसरली वाटतं."
मी थँक्स म्हणत आईचा मोबाईल उचलला आणि बाहेर आलो.
आई आणि वडील बाहेर माझी वाटच बघत होते.
तिच्या चेहऱ्यावरचे तेज बघून माझ्या संपूर्ण आयुष्याला उजाळून टाकणारा हा सूर्य आता काही दिवसातच कायमचा अस्ताला जाणार आहे ह्या विचाराने मी गर्भगळीत झालो.
माझ्या चेहऱ्यावर एक उदासीनता होती. जीवनाचे एक सत्य मला मान्य करावं लागणार होतं. मृत्यू हा कुणाला टळलेला नाही, पण तो येणार आहे हे सत्य मान्य करणं आणि पचवणं सुद्धा खूप अवघड असतं.
तिच्याशी बोलावे तरी काय बोलावे? तिने विचारलं तर काय सांगावे? मी त्याच क्षणी ठरवलं की आईला काहीही सांगायचं नाही.
मी आईजवळ पोहोचलो.
"अरे शंतनु,माझा फोन आत राहिला होता?तू आणलास का रे? मी आतच विसरले होते बघ."
"हो,घेऊन आलोय सोबत, हा घे."
"काय म्हणाले डॉक्टर " ?
या प्रश्नाने मला खूप भरून आलं.
ज्या प्रश्नाचं खरं उत्तर मला मिळालं होतं, त्याच प्रश्नाचं खोटं उत्तर देण्याची माझ्यावर वेळ आली.
मी आई-वडिलांकडे बघितले. आशावादी नजरेने ते दोघेही माझ्याकडे बघत होते.दोघांनाही मी काय सांगतोय याची उत्सुकता लागली होती.
"डॉक्टर सांगत होते, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. काळजी घ्या लवकर बऱ्या होतील." मी दोघांची समजूत काढली. मला माहित होतं मी खोटं बोलतोय.
मी आईच्या समाधानासाठी आणि माझ्या समाधानासाठी खोट बोलत होतो. सत्य मला माहित होतं.
"मी तशी बरीच आहे रे, तू तुझी काळजी घे.' हे ऐकून माझ्या आसवांनी डोळ्यात गर्दी केली. ते आता कोणत्याही क्षणाला बाहेर पडणार होते.
जी आई स्वतःचे शेवटचे काही दिवस मोजत होती, तिला स्वतःपेक्षा माझी काळजी जास्त!!
आम्ही घरी आलो, एक दोन दिवस गेले असतील,
त्यादिवशी आई अगदी सकाळी उठली, देवपूजा केली आणि नेहमीप्रमाणे मंदिरात जाऊन येते असं सांगून मंदिरात गेली.
खूप वेळेपर्यंत ती आली नाही, आम्ही सगळे चिंतेत होतो, दुपारी जेवणाची वेळ झाली होती. तिला कॉल केला तर कॉल पण लागेना.
तेवढ्यात दारामध्ये एक रिक्षा घेऊन उभी राहिली.
पाहतो तर काय, त्यात आई.....
आणि हे काय तिच्या हातामध्ये खरेदीच्या मोठ्या बॅगा!!
"अगं आई,हे काय किती उशीर केला?आणि ही इतकी खरेदी"?
मी तिच्या हातातल्या बॅग घेऊन घरात आलो.
घरात येऊपर्यंत त्या बॅगांमध्ये काय आहे कुणालाही माहीत नव्हतं.
सर्व बॅगा आम्ही सोफ्यावर ठेवल्या.
"अहो आई,इतक्या वेळ कुठे गेला होता? आम्ही तुमची वाट बघतोय. " पत्नीने आश्चर्याने विचारले.
"काही नाही गं, थोडीशी खरेदी ".
असं म्हणत तिने मला, वडिलांना बोलावले.
तिने आमच्यासाठी सगळी खरेदी केली होती. मला एक ड्रेस, पत्नीला दोन साड्या,वडिलांना ड्रेस, माझ्या मुलांना सुंदर कपडे...
हे सगळं बघून आमच्या घरात एक आनंदाच वातावरण निर्माण झालं. सगळं वातावरण बदलून गेलं. सगळे खुश होते.
आयुष्यात पहिल्यांदा तिने एकटीने तिच्या पसंतीने हे सगळं केलं होतं.
आम्हाला सर्वांना हे सरप्राईज खूप आवडलं . विशेष म्हणजे माझी बहीण नम्रतासाठी तिने खास ड्रेस आणला होता.
"अरे,ही माझ्याकडून सगळ्यांना भेट."ती अगदी हसत म्हणाली, आणि हो उद्या आपण बाहेर जेवायला जाऊया. नम्रतालाही बोलावले मी."
त्या रात्री आम्ही नवीन कपडे घालून बाहेर जेवायला गेलो.
मी,नम्रता,आई-वडील, पत्नी,मुलं.....
काय तो क्षण होता, सगळेजण अगदी खुश होते, तो अनुभव वेगळा होता. आम्ही याआधी अनेक वेळा असं एकत्र जेवायला गेलो असेल,पण आजचा अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहील असा होता. का कुणास ठाऊक हा क्षण मला अविस्मरणीय वाटला. या अनुभवाची,या मिळणाऱ्या आनंदाची जाणीव मला क्षणोक्षणी होत होती.
हा असा क्षण होता की आम्ही कोणीही, कधीही हे विसरू शकणार नव्हतो. त्यावेळेस आमच्या गप्पा, प्रत्येकाचं एकमेकाबरोबर बोलणं, प्रत्येकाचं एकमेकावरचं प्रेम आज मला खरं वाटत होतं.
विशेष मला तेव्हा वाटलं, जेव्हा आईने हक्काने आम्हाला सर्वांनी वेगवेगळे पदार्थ स्वतःच्या हाताने वाढले.
आठ दहा दिवस गेले, एक दिवस आईने मला बोलावलं.
मला म्हणाली,"शंतनु,येत्या शनिवार रविवारी वेरूळ, संभाजीनगर ला जाऊया का दोन तीन दिवस"?
मला माहित होतं, आईची खूप दिवसापासून ची एक इच्छा होती ते म्हणजे वेरूळच्या लेण्या बघायच्या, तिथलं अप्रतिम कैलास मंदिर बघायचं, येताना संभाजीनगर - अहिल्यानगर हायवे वरचे श्रीक्षेत्र देवगड मंदिर बघायचं.
पण आज आईनं स्वतःहून ही गोष्ट बोलून दाखवली.
मी लगेच तयार झालो. शनिवार, रविवार मला सुट्टीच होती.सोमवारची एक सुट्टी मी घेतली.
कुठलाही वेळ न दवडता मी नम्रता ला फोन केला.
तीही यायला तयार होती.
तर मग काय...? आमचं सगळं लगेच ठरलं.
मी एक मोठी व्हॅन बुक केली. आमची फॅमिली, नम्रता ची फॅमिली. आम्ही दोन कुटुंबांनी वेरूळ,दौलताबाद, देवगड हे सगळं करायचं ठरवलं.
पंधरा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर गाडी बघून सर्व खूष झाले.
अगदी ठरल्याप्रमाणे शनिवारी आम्ही सगळेजण संभाजीनगर कडे निघालो. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही संपूर्ण संभाजीनगर बघितलं, बीबी का मकबरा बघितला.
आमच्या सगळ्यांमध्ये आई जास्त एन्जॉय करत होती. हे मला क्षणोक्षणी जाणवत होतं. इतरांच्या कुणाच्या लक्षात आलं असेल की नाही मला माहित नाही, पण आई तो प्रत्येक क्षण जगत होती. तिची जणू राहिलेली इच्छा ती पूर्ण करत होती.
खूप दिवसाचं एखादं मनात राहावं, आणि ते ह्या क्षणी या देही करायला मिळावं यासारखं सुख कोणतं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वेरूळला निघालो. वाटेत लागणारा दौलताबादचा देवगिरी किल्ला बघितला, किल्ला तसा चढायला अवघड होता, पण आईने मात्र शेवटपर्यंत संपूर्ण किल्ला बघितला, प्रत्येक क्षण ती डोळ्यात साठवत होती.
दुपारी आम्ही वेरूळ च्या लेणीमध्ये पोहोचलो. तिथल्या मंदिराचं प्रत्येक नक्षीकाम ती अगदी डोळे फोडून बघत होती. प्रत्येक नक्षीला,प्रत्येक दगडाला ती स्पर्श करत होती.त्या स्पर्शाने त्या अजरामर कलेची जणू साठवणूकच आपल्यामध्ये करत होती असं वाटलं,डोळ्यांनी एकीकडे तीच बघणं चालू होतं, तर हाताच्या स्पर्शाने ती त्या प्रसंगाशी एकरूप होत होती.
आपली कित्येक दिवसाची राहिलेली इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
तिला मी इतकं खुश आणि आनंदी याच्या आधी कधीही बघितलं नव्हतं.
माणसाच्या इच्छा छोट्या असतात, पण त्यातून मिळणारा आनंद हा गगनात न मावणार असतो. फक्त आवडत्या व्यक्तीच्या इच्छा ओळखता आल्या पाहिजे.
आज माझं भाग्य होतं की आईने स्वतःहून या गोष्टी बोलून दाखवल्या. आणि त्याही मी करू शकलो.
आमची ही ट्रिप अतिशय अविस्मरणीय होत चालली होती.
गाडीमध्ये आमचा धिंगाणा,गाणी, हे सगळं वेगळंच होतं.
संपूर्ण गाडीमध्ये तिच्या नातवांनी मात्र तिला काही सोडलं नाही. आईच्या शेजारी बसण्यासाठी सगळ्यांची भांडण होत होती, नातवांचे हे प्रेम पाहून मला आणि नम्रताला खूप हेवा वाटला आणि आम्ही दोघेही भावनिक झालो.
आम्ही आजवर खूप ट्रीप केल्या होत्या, पण आई सोबतची ही ट्रीप मला खूप वेगळी वाटली.
दुपारच्या वेळेस आम्ही श्रीक्षेत्र देवगड येथे पोहोचलो.
हे मंदिर आणि तो परिसर बघून मंत्रमुग्ध झालं नाही तर नवलंच.!!
आईच्या एका इच्छेमुळे आम्हाला हे अतिशय सुंदर आणि पवित्र स्थानाचे दर्शन करायला मिळाले. या मंदिरात आल्यानंतर आणि इथलं दर्शन घेतल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरचे जे समाधान दिसले ते बघून मी मनोमन तृप्त झालो . इथला स्वच्छ,सुंदर परिसर आणि मनाला मिळणारी एक शांती, त्या परिसरातील सकारात्मक ऊर्जा सगळ्यांनी आम्ही भारावून गेलो होतो.
तेवढ्यात मंदिराच्या बाजूला असलेल्या घाटावरून एक व्यक्ती पळत आली,
"अहो कोणी तरी आजी खाली चक्कर येऊन पडल्यात
तिकडे "?
माझ्या अंगाचा थरकाप सुरू झाला, माझी धडधड वाढली होती.
आमची आई त्याच दिशेने गेलेली होती. मी समोर बघितले बायकांचा एक घोळका जमला होता. खाली एक महिला पडलेली होती. मी भरभर पायऱ्या उतरत खाली गेलो.
घोळक्यात जाऊन बघितले, ती आई नव्हती.
एक अनोळखी वयस्कर महिला त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली होती.
मी मात्र आईला शोधत होतो, मी तसाच समोर पुढे गेलो, आणखी काही पायऱ्या उतरून बाजूला बघितले,
बाजूला असलेल्या पायऱ्यावर आई प्रवरा नदीच्या काठाला शांत बसली होती .
त्या वाहणाऱ्या प्रवाहाकडे डोळे मिटून तिचे ध्यान चालू होते.
मी आईला बघितले आणि माझ्या जिवात जीव आला.
मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. माझ्या हृदयाची वाढलेली धडधड हळूहळू कमी झाली.
मी आईकडे बघितले.
ध्यानाला बसलेल्या आईकडे बघून मला क्षणभर अस्वस्थ झाले. इतक्या शांत आणि संयमी आईला तिच्या मृत्यूबद्दल काहीही कल्पना नव्हती. तिच्या आयुष्यातला एक एक क्षण कमी होत चालला होता, काळ हळूहळू जवळ येत होता, हे सर्व होत असताना सुद्धा आई मात्र शांत होती,ध्यानात होती.
त्या रात्री फार उशिरा आम्ही पुण्यात पोहोचलो. आमची ट्रिप अतिशय सुंदर झाली.आम्ही सगळ्यांनीच एन्जॉय केला, पण सर्वात जास्त आनंद घेतला तो आईने!!
त्यानंतर चार, सहा आठवडे उलटून गेले असतील, अचानक आईची भूक हळूहळू कमी व्हायला लागली. जठरात होणारा त्रास हळूहळू वाढत गेला.
आणि एक दिवस अचानक तिला रक्ताची उलटी झाली.
मी ऑफिसमधून येऊ पर्यंत तिला हॉस्पिटल ऍडमिट केलं होतं.
तिच आजारपण हळूहळू वाढत गेलं. पुढे तीन-चार दिवसांमध्ये तिची तब्येत आणखी खालावली, तिच्यामध्ये आता जीवनाशी लढण्याची ताकद राहिली नव्हती. जठराचा झालेल्या कॅन्सरशी तिने खूप संघर्ष केला पण शेवटी तिला हार पत्करावी लागली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर दीड महिन्यामध्ये आईची प्राणज्योत मालवली होती.
शेवटपर्यंत सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोलणारी आई अचानक गेली.
आईला मृत्यू येणार होता हे मला माहीत असून सुद्धा मी मान्य करू शकत नव्हतो. घरात माझ्याशिवाय कुणालाही हे माहीत नव्हते. मी माझ्या बहिणीला काय,पत्नीला सुद्धा सांगितले नव्हते. आपल्या प्रिय व्यक्तीची मृत्यूची बातमी कोणाला आपण देणार कशी? मला ते शक्यच झालं नव्हतं.
आईच्या मृत्यूनंतर तिसऱ्या, चौथ्या दिवशी नम्रता मला म्हणाली, "दादा,आपल्याकडे आईचा फोटो आहे पण आपण आपल्या आईचा आवाज रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होता? त्या आवाजाच्या रूपाने ती आपल्याबरोबर कायम राहिली असती ".
तेवढ्यात मला आठवलं, मीच आईच्या मोबाईल मध्ये तिचा आवाज रेकॉर्ड केला होता.
माझ्या छोट्या मुलाबरोबर बोलतांना तिचा आवाज रेकॉर्ड केला होता हे मला आठवलं.
"नम्रता, अग आहे रेकॉर्ड केलेला आईचा आवाज तिच्या मोबाईल मध्ये."
मी आईचा मोबाईल घेतला आणि त्यात आईच्या आवाजाचे रेकॉर्डिंग शोधू लागलो.
त्यात मला दोन रेकॉर्डिंग सापडले.
एक आईच्या आवाजाच रेकॉर्डिंग होतं.
पण दुसरे रेकॉर्डिंग कोणत होत?
मला थोडी उत्सुकता वाटली,
मी ते रेकॉर्डिंग चालू केलं..............आणि मला धक्काच बसला,
हे रेकॉर्डिंग सगळं जेव्हा मी आणि आई आम्ही डॉक्टरांना भेटायला गेलो होतो त्यावेळेस होतं. आईच्या मोबाईल मध्ये सुरुवातीला डॉक्टरांनी आमच्याशी केलेले संभाषण, रिपोर्ट बद्दल सांगितलेली माहिती, आई बाहेर गेल्यानंतर डॉक्टरांनी मला पुन्हा बोलावलं त्यावेळी आमचं झालेले संभाषण, आणि डॉक्टरांनी दिलेली आईच्या मृत्यूची बातमी सगळं त्या ठिकाणी रेकॉर्ड झालं होतं.
याचा अर्थ आईला ह्याच रेकॉर्डिंग वरून तिच्या स्वतःच्या मृत्यूची बातमी कळाली होती.?
मला आत्ता आठवलं घरातून निघताना आई म्हणाली होती डॉक्टर जे काही सांगतात ते लवकर लक्षात राहत नाही तेव्हा रेकॉर्डिंग करून ठेवलेलं बरं. कदाचित तेव्हाच तिने आत मध्ये येण्यापूर्वी रेकॉर्डिंग चालू केल असेल, आणि नंतर ती मोबाईल विसरून तसेच बाहेर गेली, मात्र मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग चालू राहिलं. नंतर तोच मोबाईल बाहेर आल्यानंतर तिने माझ्याकडून घेतला. परंतु जेव्हा तिने मोबाईल बघितला असेल तेव्हा कदाचित एकांतात तिने ते सगळं रेकॉर्डिंग ऐकलं असेल, तेव्हाच तिला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली होती. ते रेकॉर्डिंग ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आता मी माझ्या अश्रूंचा बांध थांबवू शकत नव्हतो. मला पुन्हा आईची आठवण आली,तो सगळा प्रसंग आठवला. मी समोर बघितले, माझ्या अश्रूकडे कोणाचेही लक्ष नव्हतं. रुमालाने मी माझे डोळे पुसले आणि ते रेकॉर्डिंग डिलीट केले.
ज्या आठवणी आपल्याला त्रास देतात, आपल्याला दुःख देतात त्या आठवणी डिलीट केलेल्याच बऱ्या....!!
जेव्हा माणसाला आपल्या मृत्यूची चाहूल लागते, तेव्हा मात्र तो संसाराच्या मोहमायेतून लगेच बाहेर पडतो.
आमच्या आईच्याही बाबतीत तसं झालं असावं.
तिला जेव्हा समजलं की आपला मृत्यू दीड, दोन महिन्यात होणार आहे, तिने सगळ्या गोष्टी सोडून दिल्या.
तिच्या आजवरच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याला तिने प्राधान्य दिलं, कारण तिला कळून चुकलं होतं की मृत्यू आता केव्हाही घाला घालू शकतो.
याला म्हणतात मृत्यूला सामोरे जाणं. सत्य आहे तसं मान्य करणं. जी घटना घडणार आहे, तिला कोणीही टाळू शकत नाही, तेव्हा घडणाऱ्या घटनेचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या हातात जितके दिवस आहेत जितका वेळ आहे, त्याचा आनंद कसा घेता येईल, ते क्षण कसे उपभोगता येईल यावर भर देणं.
स्वतःच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर मनुष्य अगदी मनातून हरून जातो, पण आईच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणापर्यंत तिला मृत्यूची चाहूल लागलेली आहे असं कधीही दिसलं नाही उलटपक्षी आईच्या मरणाची भीती तिच्यापेक्षा मलाच जास्त होती.
खरंच या घटनेपासून आईकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा