बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3113. सुगरण

    "नीलिमाताई तुमचं आवरलं असेल तर तुम्ही निघा. बराच वेळ झालाय.बाकीचं मी आवरून घेईल. "चव्हाण काकू हॉलमध्ये बसूनच बोलल्या. त्यांचं बोलण ऐकून नीलिमा ताई म्हणाल्या "आटोपलेच आहे बाईसाहेब! निघते मी आता." असे म्हणून हसत मुखाने नीलिमाताई रात्री साडेआठ वाजता आपल्या घराकडे निघाल्या.
       घरी पोहोचताच वृद्ध सासू-सासरे त्यांची आतुरतेने वाट बघत होते. पावणे नऊ वाजून गेले,अजून सुनबाई आली नाही. ती कधी येणार आणि स्वयंपाक करणार आणि आपण कधी जेवणार या चिंतेमध्ये ते होते. घाई घाईने नीलिमा ताई तडक स्वयंपाक घरात गेल्या. भाज्या चिरून घेतल्या. पोळ्यांचे पीठ मळून झालं. घाईघाईने भाजी केली. भात टाकला आणि पोळ्याही तयार झाल्या. सर्वात प्रथम सासू-सासर्‍यांना जेवायला दिले. त्यानंतर मुलाला आणि नवऱ्याला जेवू घातले आणि नंतर नीलिमा ताई मुलीबरोबर जेवायला बसल्या. जेवण आटपून भांडे घासून झोपायला नीलिमा ताईंना साडेबारा वाजले. सकाळी चार वाजता उठण्याचा आलार्म लावून नीलिमाताई झोपी गेल्या. सकाळी लवकर उठून मुलांचे शाळेसाठी डबे करून,घरच्यांसाठी स्वयंपाक करून, पाच घरचे सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करण्याचे काम नीलिमा ताई करत होत्या. दररोजचा हाच दिनक्रम. कधीही कोणत्याही प्रकारची निराशा किंवा थकवा नीलिमाताईंच्या चेहऱ्यावर जाणवायचा नाही. या उलट कोणत्याही गोष्टींसाठी त्या उत्स्फूर्तपणे लगेच तयार व्हायच्या. मंदिरात जायचे असो, सोसायटीमध्ये कोणाच्या घरात लग्न वगैरे काही कार्यक्रम असो, कोणाकडे हळदी कुंकू असो उत्स्फूर्तपणे नीलिमाताई सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असायच्या.नीलिमा ताईंचे वय साधारण चाळिशी मध्ये असावे. एकवीस बाविसाव्या वर्षी लग्न झाल्यानंतर नीलिमा ताई ज्या कामाला जुंपल्या त्या कधीही न थांबण्यासाठीच. लग्न झाले तेव्हा नवरा कुठेतरी तात्पुरत्या नोकरीला होता. लवकरच बाळंतपणा झाल्यामुळे दोन मुलांची जबाबदारी पडली. पुढे नवऱ्याचे खरे रंग दिसायला लागले. दिवसभर दारू पिऊन घरातच पडून राहणारा नवरा म्हणून घराची संपूर्ण जबाबदारी नीलिमाताईंच्याच खांद्यांवर येऊन पडली. सोबतीला वृद्ध सासू-सासरे आणि त्यांची आजारपणे आणि मुलांचे संगोपन आणि शिक्षण हे ही आलेच.
      परंतु म्हणतात ना, "देव एका हाताने नेतो तसे एका हाताने देतोही". त्याचप्रमाणे नीलिमा ताईंच्या हाताला एखाद्या सुगरणीच्या हाताची चव. शाकाहारी, मांसाहारी, गोडाचे, तिखटाचे, उन्हाळ्याचे, हिवाळ्याचे असे कोणतेही पदार्थ त्यांनी केले तर त्याला एक खमंग अशी चव असायची. त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी जेथे जेथे स्वयंपाकाचे काम करायला सुरुवात केली त्या सर्वच लोकांची मने त्यांनी जिंकून घेतली. सर्वांच्याच घरतल्या त्या अतिशय अविभाज्य अशा सदस्या बनल्या. नीलिमा ताईंच्या सर्व प्रकारच्या सुख दुःखांमध्ये या सर्वांनी त्यांना सढळ हाताने मदत केली. या सर्व लोकांच्या प्रेमामुळेच नीलिमाताईंना घरतल्या विपरीत परिस्थितीशी लढण्यासाठी एक वेगळेच बळ मिळायचे. शिवाय त्यांचा स्वभावही सहजासहजी हार मानणाऱ्यांमधला नव्हता. एखाद्या दिवशी घरातील कोणाच्या आजारपणामुळे नीलिमाताई एखाद्या जरी जेवण बनवण्यासाठी गेल्या नाही तर या सर्व लोकांना रुख रुख वाटत रहायची.
      अशाच प्रकारे धावपळ करत असताना एका दिवशी नीलिमाताई बाथरूम मध्ये घसरून पडल्या. कंबरेच्या खुब्याला मार लागल्यामुळे फ्रॅक्चर झाले होते. जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर ऑपरेशन करण्याची गरज आहे असे डॉक्टरांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आता काय करायचे? या चिंतेमध्ये नीलिमाताई आणि त्यांच्या घरचे होते. साधारण पन्नास एक हजार रुपये खर्च येणार होता. नीलिमा ताईंनी त्यांच्या हिमतीवर आतापर्यंत बचत करून साधारण वीस एक हजार रुपये वाचवून ठेवलेले होते. परंतु बाकीच्या पैशांची जमवाजमव कशी करायची हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. अश्यातच हॉस्पिटलमध्ये चव्हाण काकूंचा मुलगा नीलिमा ताईंना भेटण्यासाठी आला. सगळी विचारपूस केल्यानंतर त्याने एक छोटेसे पाकीट नीलिमाताईंच्या हातामध्ये दिले. आणि तो निघून गेला.तो निघून गेल्यानंतर नीलिमा ताईंनी पाकीट उघडून बघितले तर त्यामध्ये तीस हजार रुपये होते. आणि त्याबरोबर एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्यामध्ये लिहिलेले होते की तू आजवर आमच्या कुटुंबासाठी जी काही मेहनत घेतली, त्याबद्दल आम्ही स्वतःहून तुला ही एक छोटीशी भेट देत आहोत. आम्हाला माहित आहे तू अतिशय स्वाभिमानी आहे. तू अशी आमची मदत स्वीकारणार नाही. परंतु तुझ्या संकटाच्या काळामध्ये तुला मदत करण्यामागे आमचा स्वार्थ आहे. कारण तुझ्या हाताने बनवलेल्या भोजनाच्या रुचीची आम्हाला इतकी सवयीची झाली आहे की तू आजारी पडल्यापासून घरात कोणी धड जेवणही करत नाही. प्रत्येक घासाबरोबर तुझी आठवण येते. आमचा स्वार्थ सोड. परंतु तुझ्यासारखी अतिशय जिद्दीने आणि कष्टाने स्वतःचा संसार करणारी स्त्री लवकरात लवकर बरी होणे हे तुझ्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच ही एक छोटीशी मदत किंवा भेट तुला देत आहोत. तू लवकर बरी होऊन घरी ये हीच शुभेच्छा. चिठ्ठी वाचून नीलिमा ताईंचे मन आणि डोळे दोन्हीही भरून आले. आपल्या मोठ्या बहिणीनेच आपल्याला ही प्रेमपूर्वक चिठ्ठी आणि भेट दिली आहे असा आभास नीलिमाताईंना झाला. त्या रकमेतून नीलिमाताईंचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि ताई काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामावर रुजू झाल्या.

- डॉ.सुनिल वाघ. कांदिवली पश्चिम, मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...