१९८४ च्या कडक उन्हाळ्यात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील उत्तर रेल्वेचे आरक्षण कार्यालय म्हणजे जणू नरकाचे एक वर्तुळच होते. दररोज १ लाखांहून अधिक प्रवासी या स्थानकावर येत होते. लाकडी काउंटरच्या मागे बसलेले कारकून हजारो जाड, चामड्याच्या कव्हरमध्ये बांधलेल्या ‘चार्टिंग शीट्स’ नावाच्या नोंदवहीत अक्षरशः गाडले गेले होते. तिकीट काढण्यासाठी कारकुनाला प्रत्यक्ष संबंधित नोंदवही शोधावी लागे, फाउंटन पेनने उपलब्ध बर्थवर खूण करावी लागे, कागदी तिकीट हाताने लिहावे लागे आणि त्याची डुप्लिकेट स्लिप स्वतंत्रपणे फाइल करावी लागे. समजा, तुम्हाला मद्रासहून दिल्लीला जाण्याचे परतीचे तिकीट दिल्लीमध्येच घ्यायचे असेल, तर ते शक्य नव्हते. मद्रासला प्रत्यक्ष तार पाठवावी लागे, त्याच्या उत्तरासाठी ४८ ते ७२ तास वाट पाहावी लागे आणि तोपर्यंत तीच सीट दोनदा विकली गेलेली नसेल, अशी प्रार्थना करावी लागे!
याच काळात CMC Limited - Computer Maintenance Corporation — या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची या कथेत एंट्री झाली. तरुण, जिद्दी आणि अत्यंत कुशल भारतीय सिस्टीम इंजिनिअर्सची एक टीम आणि भारतीय रेल्वेची समर्पित टास्क फोर्स एकत्र काम करू लागली. त्यांच्यासमोरचे आव्हान प्रचंड होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल रेल्वे आरक्षणाची व्यवस्था विकसनशील जगात अस्तित्वातच नव्हती. परदेशी कंपन्या कस्टम सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी प्रचंड रक्कम मागत होत्या. त्यामुळे भारतीय टीमने हे संपूर्ण तंत्रज्ञान अगदी सुरुवातीपासून स्वतः विकसित करण्याचा निर्णय घेतला. मर्यादित हार्डवेअरवर त्यांनी VAX/VMS मिनीकॉम्प्युटर्स निवडले आणि प्रामुख्याने संख्यात्मक गणनेसाठी वापरली जाणारी FORTRAN ही भाषा वापरण्याचा निर्णय घेतला.
या सॉफ्टवेअरला नाव देण्यात आले-
IMPRESS
Integrated Multi-train Passenger Reservation System
आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस - १५ नोव्हेंबर १९८५
नवी दिल्ली स्थानकावर फक्त दोन गाड्यांसाठी -तमिळनाडू एक्सप्रेस आणि ग्रँड ट्रंक एक्सप्रेस -IMPRESS ची चाचणी सुरू झाली.
ना कोणताही भव्य उद्घाटन सोहळा...
ना उपग्रहांच्या झगमगाटात घोषणा...
सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी होत्या. हिरव्या रंगाच्या phosphor CRT मॉनिटर्सकडे पाहून कारकूनही घाबरले होते. सिस्टीम बंद पडली तर काय करायचे, यासाठी कागदी नोंदीही बाजूला ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्यांदा त्या हिरव्या स्क्रीनवरून कारकुनाने शाईच्या पॅडला हातही न लावता ६० सेकंदांपेक्षा कमी वेळात स्वयंचलित तिकीट बाहेर आले, तेव्हा मागच्या खोलीतील इंजिनिअर्सनी जल्लोष केला नाही.
ते फक्त श्वास रोखून उभे राहिले…
आता सिस्टीमची मेमरी क्रॅश होणार का?
पण तसे झाले नाही !
१९८७ - डिजिटल आरक्षणाचा विस्तार
१९८७ पर्यंत IMPRESS चा विस्तार मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे झाला.
मात्र एक मोठी समस्या होती.
ही सर्व केंद्रे एकमेकांपासून ‘बेटां’सारखी स्वतंत्र होती.
मुंबईला कलकत्त्यात काय चालले आहे याची माहिती नव्हती.
दिल्लीतील कारकून अजूनही मुख्यतः दिल्लीहून सुटणाऱ्या गाड्यांचीच तिकिटे विकू शकत होता.
ही वाढती डिजिटल व्यवस्था सांभाळण्यासाठी भारतीय रेल्वेने CRIS - Centre for Railway Information Systems ची निर्मिती केली. CRIS कडे पाच मोठे प्रादेशिक डेटाबेस आले.
दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास आणि सिकंदराबाद.
प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र डिजिटल व्यवस्था होती आणि वेगवेगळ्या हार्डवेअरवर ती चालत होती.
१९९० चे दशक — ‘Island Problem’ चे संकट
१९९० च्या दशकात रेल्वे प्रवास झपाट्याने वाढला. पण प्रवासी एका प्रदेशापुरते मर्यादित नव्हते.
म्हणून CRIS च्या इंजिनिअर्ससमोर एक भयंकर संगणकीय प्रश्न उभा राहिला-
४,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाच मोठ्या, उच्च-वेगाने व्यवहार करणाऱ्या डेटाबेसना अस्थिर टेलिग्राफ लाईन्स आणि प्राथमिक दूरसंचार यंत्रणांवर रिअल-टाइममध्ये एकमेकांशी कसे समक्रमित करायचे? समजा, सिकंदराबादमधील एखादा प्रवासी हावडा-मुंबई गाडीतील सीट बुक करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याच क्षणी अहमदाबादमधील दुसरा प्रवासी त्याच बर्थचे बुकिंग करीत आहे. एकाच वेळी दोन जणांनी तीच सीट बुक करण्याचा प्रयत्न केला तर काय?
डेडलॉक कसा टाळायचा?
संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्क कोलमडू न देता हा प्रश्न कसा सोडवायचा?
CRIS च्या इंजिनिअर्सनी यावर काम सुरू केले.
CONCERT - एक ऐतिहासिक संगणकीय क्रांती
त्यांनी एक मास्टर आर्किटेक्चर तयार केले -
CONCERT - Country-wide Network for Computerized Enhanced Reservation and Ticketing
हे केवळ सॉफ्टवेअर नव्हते.
ही एक संपूर्ण distributed computing architecture होती.
अभियंत्यांना स्वतःचे distributed database protocols तयार करावे लागले.
अविश्वसनीय BSNL लँडलाईन्स, डेटा पॅकेट्समध्ये होणारे व्यत्यय, आवाजयुक्त दूरध्वनी लाईन्स आणि अचानक होणारे वीजपुरवठ्याचे खंड यांचा सामना करणारे नेटवर्किंग सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. जिथे लँडलाईन्स अपयशी ठरत होत्या, तिथे microwave links, leased telecom lines आणि सुरुवातीच्या satellite VSATs यांचा वापर करून पर्यायी डेटा मार्ग तयार करण्यात आले.
१९९४ पासून ही प्रणाली टप्प्याटप्प्याने देशभर लागू होऊ लागली.
CRIS च्या सॉफ्टवेअर आर्किटेक्ट्सवर प्रचंड दबाव होता. मेमरी लॉकिंगमधील एक छोटीशी लॉजिकची चूकदेखील देशभरातील लाखो सीट्स लॉक करू शकत होती. आणि त्याचा परिणाम?
संपूर्ण देशातील रेल्वे आरक्षण व्यवस्था ठप्प होऊ शकत होती.
एप्रिल १९९९ — तो ऐतिहासिक क्षण !
अखेर एप्रिल १९९९ मध्ये अंतिम स्विच ऑन करण्यात आला.
पहिल्यांदाच भारताच्या एका दुर्गम भागातील - उदाहरणार्थ गुवाहाटीतील- तिकीट खिडकीवर बसलेला प्रवासी तिरुवनंतपुरम ते मुंबई जाणाऱ्या गाडीतील सीटची माहिती तात्काळ मिळवू शकत होता, ती सीट लॉक करू शकत होता आणि तिकीट खरेदी करू शकत होता.
आणि हे सर्व -
२ सेकंदांपेक्षाही कमी वेळात !
ही कामगिरी आधुनिक cloud infrastructure, high-speed internet किंवा मोठ्या venture-capital गुंतवणुकीच्या काळापूर्वीची होती. सुमारे १५ वर्षे CMC आणि CRIS मधील अभियंत्यांनी अथक परिश्रम केले. त्यांनी C आणि FORTRAN सारख्या भाषांमध्ये low-level code लिहिला, मर्यादित हार्डवेअरच्या अडचणींशी झुंज दिली आणि स्वतःचे networking protocols तयार केले. आणि मग आले IRCTC…
२००२ मध्ये IRCTC सुरू झाले आणि इंटरनेटच्या माध्यमातून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या.
IRCTC ने मूळ रेल्वे आरक्षण इंजिन तयार केले नव्हते. त्याने प्रामुख्याने वेब ब्राउझरसाठी एक front-end तयार केले, जो CRIS ने उभारलेल्या प्रचंड आणि अत्यंत मजबूत CONCERT backend शी जोडला गेला. आजही या विशाल तंत्रज्ञानाच्या पायावर उभी असलेली रेल्वे आरक्षण व्यवस्था दररोज १५ लाखांहून अधिक बुकिंग्ज हाताळते.
एका अशा देशासाठी, ज्याची लोकसंख्या अनेक संपूर्ण खंडांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
ही कथा लक्षात ठेवण्यासारखी आहे !
ही कहाणी कोणत्याही मोठ्या Venture Capital फंडिंगची नाही.
ही कहाणी Silicon Valley मधील अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीची नाही.
ही कहाणी अत्याधुनिक Cloud Computing च्या काळातील नाही.
ही कहाणी आहे -
मर्यादित साधने, अवघड परिस्थिती आणि प्रचंड राष्ट्रीय गरज यांच्यामध्ये भारतीय अभियंत्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर उभी केलेल्या एका अभूतपूर्व व्यवस्थेची. हजारो किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या रेल्वे आरक्षण केंद्रांना जोडणे.
एकाच सीटचे दुहेरी बुकिंग रोखणे.
अविश्वसनीय दूरसंचार व्यवस्थेत रिअल-टाइम व्यवहार करणे.
आणि हे सर्व आधुनिक इंटरनेट युग सुरू होण्यापूर्वी करणे.
हे खरोखरच भारतीय अभियांत्रिकीच्या क्षमतेचे विलक्षण उदाहरण आहे.
सलाम त्या काळातील CMC आणि CRIS च्या प्रतिभावान, समर्पित सार्वजनिक क्षेत्रातील अभियंत्यांना !
त्यांनी केवळ कोड लिहिला नाही.
त्यांनी भारताच्या रेल्वे प्रवासाला डिजिटल युगात नेणारा पाया घातला.
Pure Indian Engineering.
No Hype. No VC Billions.
Just Talent, Persistence and Nation-building.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा