बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3148. संस्कार शब्दांनी होत नाहीत; ते अनुकरणाने होतात !

 १. अकरा-बारा वर्षांचा असेल तो तेव्हा. आई मदतनीस म्हणून एका मोठ्या घरी दिवसभर कामाला जायची. बाबा त्याच्या लहानपणीच सोडून गेलेले. दोघं मामाच्या घरी राहत. आई खर्चाचा अर्धा हिस्सा द्यायचीच; शिवाय मामीच्या वाट्याचं पूर्ण काम करून इथे हजर व्हायची. मालकीण बरी होती. शाळा सुटल्यावर आईचं काम होईपर्यंत ती त्याला तिथे बसू द्यायची. हा चुणचुणीत मुलगा डोळ्यांनी आणि कानांनी सगळं चांगलं-वाईट टिपत मोठा होत होता. मेहनत, प्रामाणिकपणा, टापटीपपणा, कामाचा प्रचंड उरक यामुळे त्याच्या आईचं कौतुक आणि मालकीणीचा तिच्यावर असलेला विश्वास या गोष्टी आपोआपच त्याच्याही सवयींचा भाग बनत गेल्या. लॅा ची  पदवी घेऊन शिक्षण पूर्ण करत ,आईला मदत करत त्याने एका नामांकित वकिली फर्ममध्ये नोकरी मिळवली.
त्याचं काम, त्याची प्रगती पाहता, त्याचे सोन्याचे दिवस आता दूर नव्हते!
२. दोन भाऊ आणि त्यांची आई. उच्च मध्यमवर्गीय, नवश्रीमंत कुटुंब. बाबांची ओळख म्हणजे… बहुतेक वेळा व्यसनात आणि बाहेरख्यालीपणात व्यस्त! घरातही खाणं-पिणं वर्ज्य नव्हतं. आईने विरोध केला की तिच्याशी अनेकदा भांडणं आणि हिंसाही व्हायची. तसे ते मुलांचे भरपूर लाड करत; पण तरीही दोघांच्याही मनात त्यांच्याविषयी नकळत आकस निर्माण झाला होता. जसजसे ते मोठे होत गेले, तसतसं त्यांना आईचंच आश्चर्य वाटू लागलं. कारण ती कधीच तक्रार करत नसे. देवाजवळ नेहमी सद्बुद्धी आणि सहन करण्याची शक्तीच मागत असे. विशेष म्हणजे, बाबांच्या वागण्याने ती कितीही निराश झाली तरी मुलांच्या मनात तिने कधीच त्यांच्या विरुद्ध विष पेरलं नाही. ती तिच्या कर्तव्यात कधीच कसूर करत नसे.
“तक्रार करून कधीच गोष्टी बदलत नाहीत; मार्ग काढणं मात्र आपल्या हातात असतं.”
“प्रारब्ध चुकत नाही; मानसिक शांततेसाठी मात्र प्रयत्न केल्यावर यश नक्कीच मिळतं.”
पैशांची कमतरता नव्हतीच. तिच्यासारख्या अनेक जणी सुखी संसाराचा दिखावा करत विविध पार्ट्या, सहली, मित्र-मैत्रिणी आणि सोशल ड्रिंक्स यांच्या निमित्ताने थोडासा आनंद शोधतात आणि तशाच आयुष्यात व्यस्त आणि मस्त रमतात. पण तिने आनंद शोधला आध्यात्मात, विविध धार्मिक ग्रंथांच्या वाचनात आणि ध्यानधारणेत. तेच संस्कार मुलांवरही आपोआप झाले….कोणत्याही बळजबरीविना ! बालपणी एकदा का विचारांची बैठक पक्की झाली, की निसरड्या वाटेवरही तोल जात नाही, हे आता विशी पार केलेल्या त्या दोघांनी सिद्ध केलं आहे. बाह्य वातावरण कसंही असो, मनाने वाहवत न जाता खंबीर राहून आपण आपला मार्ग सुगंधी करू शकतो, हे तिने आणि तिच्या दोन्ही मुलांनी सहज सिद्ध करून दाखवलं.
३.सुमन एका व्यस्त उद्योजिकेच्या घरी कामाला होती. मॅडमला एक मुलगा आणि एक मुलगी. त्या दोघांना सांभाळणं, त्यांचं सगळं व्यवस्थित करणं एवढंच तिचं काम. बाकी सर्व कामांसाठी मदतनीसांची रेलचेल होती. म्हणायला साधं-सोपं काम… पण तितकंच अवघड !
कारण मॅडम इतर कामांत थोडीफार तडजोड करायच्या; पण मुलांच्या बाबतीत मात्र त्या अत्यंत कडक होत्या.
शाळेतून आल्यावर चार तास मुलं तिच्या ताब्यात असायची. त्यामुळे आधी सुमनचं प्रशिक्षण पूर्ण झालं. स्वच्छता, नीटनेटकेपणा, अभ्यास आणि वाचनाची गोडी लावण्यासाठी स्वतःही वाचन करणं, मुलांसोबत खेळणं, खेळता-खेळता बोधकथा सांगणं, जेवणापूर्वी ईश्वराचं स्मरण करून ताटाला नमस्कार करणं, संध्याकाळी दिवा लावून शुभंकरोती म्हणणं… हे सगळं आधी सुमनने स्वतः अंगीकारणं गरजेचं होतं. हेच ते प्रशिक्षण होतं ! आठ महिन्यांपूर्वी हे सगळं मॅडम स्वतः करत होत्या. अर्थात, सुमनला हे सगळं माहीत होतंच; पण आता मॅडमच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आली होती. सरांनी अर्धा डाव खेळून एक्झिट घेतल्यामुळे फॅक्टरीची सर्व जबाबदारी मॅडमवर पडली होती. पण त्या नादात मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मॅडमने सुमनला मुलांच्या संगोपनासाठी खास तयार केलं. यात मॅडमच्या मुलांचा तर फायदा झालाच; पण त्याहून अधिक अनपेक्षित फायदा झाला तो सुमनचा आणि तिच्या मुलांचा. कारण ती स्वतः आधी हे सगळं करू लागली आणि मॅडमची मुलं तिचं अनुकरण करू लागली. तिला अनेक बोधकथा समजल्या, स्तोत्रं पाठ झाली. विचारांमध्ये झालेला बदल तिच्या आचरणात दिसू लागला आणि त्याचाच परिणाम तिच्या तिन्ही मुलांवरही झाला. इथे मुलांच्या संगोपनाच्या ज्या चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी तिला शिकायला मिळाल्या, त्याच गोष्टींचे प्रयोग तिने स्वतःच्या मुलांवरही केले. ज्या सुंदर गोष्टींचा तिने कधी विचारही केला नव्हता, त्या तिच्या स्वतःच्या कुटुंबात प्रत्यक्ष घडू लागल्या.
नकळतपणे दोन्ही कुटुंबांतील मुलं उत्तम घडली.
ना श्रीमंतीत वाढणारी बिघडली, ना गरिबीत वाढणारी कोमेजली.
छोट्याशा बीजाचं विशाल वृक्षात रूपांतर व्हायचं असेल, तर योग्य काळजी, योग्य वेळ आणि धीर आवश्यक असतो.
आपलंही तसंच असतं. लहानपणी रुजवलेल्या छोट्या-छोट्या चांगल्या सवयी, विचार आणि संस्कार यांचंच पुढे उत्तम व्यक्तिमत्त्वात रूपांतर होतं.
म्हणूनच उपदेशापेक्षा योग्य वातावरण, योग्य उदाहरण आणि योग्य सहवास मिळणं अधिक महत्त्वाचं असतं.
कारण...ऐकण्यापेक्षा पाहून जास्त शिकणं असतं.
घर श्रीमंत की गरीब...
पालक सुशिक्षित की अशिक्षित...
परिस्थिती अनुकूल की प्रतिकूल..
यापेक्षा एक गोष्ट अधिक महत्त्वाची असते,
आजूबाजूला जगणारी माणसं !
कारण...
संस्कार शब्दांनी होत नाहीत; ते अनुकरणाने होतात.

©️रश्मी #rashmilahoti





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...