आज स्वप्नाचा पासष्टावा वाढदिवस होता. आनंद रावांनी मोजक्याच लोकांना बोलावले होते. तीन तासांत कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले. जाताना प्रत्येकाने हसून निरोप घेतला; पण दार बंद होताच घर पुन्हा शांत झालं. जो तो आपल्या विश्वात बुडालेला होता. आपुलकीने थांबून, “कशी आहेस?” असं मनापासून विचारणारं कुणी उरलंय का, असा प्रश्न स्वप्नाच्या मनात आला. कोण आपलं आणि कोण परकं, हे कळेनासं झालं की माणूस नकळत गप्प होतो. स्वप्नाही तशीच शांत बसून राहिली. तिची पाखरं घरट्यातून केव्हाच उडून दूर गेली होती. मुलगा अवी परदेशात होता आणि मुलगी अरू दिल्लीत. मुलं लहान असताना ती आणि आनंदराव त्यांच्याकडे जाऊन मदत करत असत; पण आता कुठे जाणंसुद्धा नकोसं वाटे. नाही तरी अरूचा फोन नेहमीच असे.
“आई, हॅपी बर्थडे ! ऐक ना, तुझ्या जावयाच्या तऱ्हा ! आता तो त्याच्या आईला इथे राहायला बोलावतोय. आयुष्यभर माझा अपमान करण्यात आनंद मानलेल्या बाईची मी आता सेवा करू? मला नाही जमणार !”
अरू भडाभडा बोलून स्वतःचं ओझं आईवर टाकत असे आणि मग, “चल, कामाला निघते,” म्हणत फोन ठेवून मोकळी होत असे. अवीचंही काही वेगळं नव्हतं. त्याच्या रागीट बायकोच्या तक्रारी ऐकवण्यासाठी तो फोन करी. स्वप्ना दोघांचंही ऐकून घेई. त्यांचं दुःख दूर करण्याची तिची ताकद नसली, तरी ते दुःख आपल्या मनात साठवून ठेवण्याची तिची सवय झाली होती.
आजही अरूचा फोन संपताच स्वप्नाच्या फोनवर सुनेचा मेसेज आला.
अवीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. कालपासून खूप उलट्या होत आहेत.
स्वप्नाचं काळीज धस्स झालं.
अरूचं ओझं आधीच मनावर होतं. आता अवीची काळजी त्यावर येऊन बसली. तिनं आशेने आनंद रावांकडे पाहिलं.
ते फोनमध्ये काहीतरी वाचत होते.
क्षणभर तिच्याकडे पाहून त्यांनी विचारलं, “काय झालं?”
तिनं मेसेज दाखवला.
त्यांच्या चेहऱ्यावरही काळजी उमटली. त्यांनी लगेच अवीला फोन लावला. फोन उचलला गेला नाही. पुन्हा लावला. नाहीच.
“हॉस्पिटलमध्ये असेल,” ते म्हणाले; पण त्यांच्या आवाजातली अस्वस्थता स्वप्नाला जाणवली.
थोड्या वेळाने त्यांनी दासबोध उघडला. ओठ वाचत होते; पण मन मात्र अवीजवळ जाऊन पोहोचलं होतं.
मायेचे पाश असे लपेटले गेले होते की दुसरं काही सुचत नव्हतं.
स्वप्ना उठली. चपला घातल्या आणि घराबाहेर पडली.
गेल्या वर्षी गावातच राहणाऱ्या आक्कांचे यजमान गेले होते. आक्कांना भेटायला गेलं की मन हलकं होतं, हा स्वप्नाचा अनुभव होता. ती सरळ त्यांच्याकडे गेली.
“ये गं, स्वप्ना ! बरी आहेस ना?”
आक्कांचा प्रेमळ स्वर कानावर पडताच इतका वेळ डोळ्यांच्या कडेला अडवून ठेवलेलं पाणी काही न जुमानता वाहू लागलं. आक्कांनी नुकतीच सत्तरी पार केली होती. त्यांनी मुगाची खिचडी टाकली होती. त्या वासानं स्वप्नाची हरवलेली भूक परतली. आक्कांनी गरम, मऊ खिचडी बशीत वाढली. वाटीत गरमागरम कढी दिली आणि पाण्याचा पेला तिच्यासमोर ठेवला.
“दमलेली दिसतेस गं. आधी दोन घास खा.”
त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला.
“कशी झाली पार्टी? मला जमलं नाही म्हणून रागावू नकोस.”
समोरच्या टेबलावर आक्कांनी काढायला घेतलेलं नवं चित्र पसरलेलं होतं.
“आक्का,” स्वप्ना म्हणाली, “तू इतकी आनंदात कशी राहतेस गं? नवरा गेला, मुलगा विचारत नाही. मुलगी आजारी असते. तरी तुझं मन या चित्रात रमतं कसं?”
आक्कांनी तिच्याकडे पाहिलं. स्वप्नानं अरूची आणि अवीची आजची कहाणी त्यांना सांगितली. आक्का शांतपणे ऐकत राहिल्या.
मग म्हणाल्या, “तुला ओझं वाहणाऱ्या गाढवाची गोष्ट आठवतेय ना?”
स्वप्नानं मान हलवली.
“मालकाने त्याच्या पाठीवर मीठाची पोती लादली. नदीतून जाताना गाढव थकून पाण्यात बसलं. मीठ विरघळलं आणि ओझं हलकं झालं. पुढच्या वेळी त्याच्या पाठीवर कपड्यांची पोती होती. त्यानं तीच युक्ती केली. पण पाण्यात भिजून कपडे आणखी जड झाले.”
त्या थोड्या वेळ थांबल्या.
“तर सांग... आपलं ओझं हलकं करण्यासाठी तू काय करतेस?”
आक्का नेहमीच स्पष्ट बोलत. स्वप्ना हसली. पण ते हसू केविलवाणं होतं.
“खरं सांगू, आक्का? काळजी करत बसते. मुलांचं दुःख मनातून काढून टाकता येत नाही. ते झटकून कसं टाकायचं, काही कळत नाही.”
आक्का उठल्या आणि देवघरात गेल्या. तिथून त्यांनी मोठा स्टीलचा कुंडा आणून स्वप्नासमोर ठेवला.
तो कागदाच्या चिठ्ठ्यांनी भरला होता.
“हा बघ…माझ्या ओझ्याचा कुंडा.”
स्वप्नानं आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं.
“मनातलं ओझं आधी कागदावर उतरवायचं. मग ती चिठ्ठी बंद करून यात टाकायची. आणि मनाशी म्हणायचं
हे आता तुझ्याकडे दिलं, देवा. मला बळ दे. बस !”
आक्कांनी कुंड्यावर हात ठेवला.
“एकदा काळजी त्याच्याकडे दिली की परत परत तीच चिठ्ठी मनात उघडून वाचत बसायचं नाही. आलेला दिवस मनापासून जगायचा.”
हळू आवाजात आक्का मधुकर जोशी यांनी लिहलेलं गीत गाऊ लागली.
दुःख जेंव्हा दाटूनिया, भार होतो अंतरी
मी कसे विनवूं तुला रे, धांव तूं गरुडापरी
संकटांशी झुंजण्याला, हात दे मजला दहा.
स्वप्ना निःशब्द होऊन ऐकत होती.
“नाहीतर आयुष्याचं ओझं झेपणार नाही गं,” आक्का म्हणाल्या. “माणूस मेल्यावर स्वर्गात किंवा नरकात जातो की नाही, मला माहीत नाही. पण स्वर्गही इथेच आहे, नरकही इथेच आहे आणि परमेश्वरही इथेच आहे.”
मग त्यांनी तिच्या बशीकडे पाहिलं.
“खा ना ! खिचडी गार झाली बघ.”
आक्कांच्या डोळ्यांत प्रेम आणि धीर भरून वाहत होता. त्या प्रेमाच्या ऊबेत स्वप्नाच्या मनावरचं ओझं जरा हलकं झालं.
“अगं, तू जब वी मेट बघितलाय ना?” आक्का अचानक हसल्या. “ती करिना आपला प्रेमभंग टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकते ना? तसं काहीतरी शोधायचं बघ !”
स्वप्नाही कित्येक दिवसांनी मनापासून हसली. तेवढ्यात आक्कांची व्हीलचेअरमध्ये बसलेली मुलगी घरी आली.
“अगबाई ! किती गोड दिसतेय माझी ताई!”
आक्कांनी तिला आंजारलं-गोंजारलं. तिला घेऊन आलेल्या सपोर्ट इन्स्टिट्यूटच्या बाईंना चहा दिला. त्यांच्या चेहऱ्यावर ना दयेचा भाव होता, ना तक्रारीचा. होता फक्त मायेचा भाव. स्वप्ना त्या दृश्याकडे पाहत राहिली. क्षणभरापूर्वीच आक्का तिला ओझं परमेश्वराकडे सोपवायला सांगत होत्या. आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातलं एवढं मोठं ओझं प्रेमाने जवळ घेत होत्या. स्वप्नाच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं. पण यावेळी त्या पाण्याचं ओझं नव्हतं.
“आक्का, निघते मी. परत येईन चार दिवसांनी.”
घरी जाताना ती विचार करत होती.
कुठला कुंडा काळज्यांसाठी वापरावा?
घरी पोहोचल्यावर आनंद राव अजूनही जागे होते.
“अवीचा फोन आला?” तिनं विचारलं.
“नाही. पण सुनेचा मेसेज आला. डॉक्टर म्हणालेत, आता धोका नाही.”
स्वप्नानं सुटकेचा निःश्वास टाकला. तिनं कपाटातून एक छोटी वही काढली. पहिल्या पानावर लिहिलं,
”अरूचं दुःख.
अवीची काळजी.
माझी असहाय्यता.”
ती काही क्षण त्या शब्दांकडे पाहत राहिली. मग पान फाडलं. घडी घातली. आनंद रावांनी विचारलं,
“काय करतेस?”
स्वप्ना हसली.
“ओझं उतरवतेय.”
तिनं ती चिठ्ठी समोरच्या रिकाम्या कुंड्यात टाकली. फोन पुन्हा वाजला. अवीचा होता. तिनं क्षणभर डोळे मिटले. काळजी पुन्हा मनात डोकावलीच. पण यावेळी तिनं तिला घट्ट कवटाळलं नाही. फोन उचलत ती शांतपणे म्हणाली,
“बोल रे अवी. कसा आहेस?”
दूरवर कुठेतरी रविंद्र साठेंचा स्वर कानावर येत होता.
जगतात येथें कुणी मनांत कुजून,
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.
©® ज्योती रानडे
2026 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा