जंगलातली पन्नास झाडं तोडण्याच्या कामात तीन जणांना निवडण्यात आलं आणि प्रत्येकी विभागून त्यांना ते काम देण्यात आलं. कामाला सुरुवात झाली त्या दिवशी दोघांनी लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, तर तिसरी व्यक्ती मात्र आपल्या जवळील कुऱ्हाडीला धार काढायला लागली. एक तास होऊन गेला. बाकीच्या दोघांचं एक एक झाड तोडून सुद्धा झालं, तरी ही तिसरी व्यक्ती मात्र धारच काढत होती आणि बाकी दोघं जण ‘काय मूर्ख आहे हा’ म्हणून त्याला हसत सुद्धा होती. त्यांना ज्या सुपरवायझरनं कामाच्या सूचना दिल्या होत्या, तोही या तिसऱ्या व्यक्तीला समजावत काम सुरू करण्याचा आग्रह करत होता. साधारण तीन तास होऊन गेले. बाकीच्या दोघांची प्रत्येकी तीन झाडं तोडून झाली होती आणि आता या तिसऱ्या व्यक्तीनं कुऱ्हाडीला धार काढणं संपवून तो पहिल्या झाडाजवळ पोहोचला.
त्याच्या धारधार कुऱ्हाडीनं त्यानं पहिलं झाड केवळ पंधरा मिनिटात तोडलं...त्यानंतर दुसरं...त्यानंतर तिसरं... एका तासात चार झाडं तोडून त्यानं त्यानंतरच्या दुसऱ्या तासात तर सहा झाडं तोडली. कारण त्याला आता सराव झाला होता आणि झाडं तोडण्याचं मर्म व्यवस्थित कळलं सुद्धा होतं, कौशल्य गवसलं होतं. काम सुरू केल्यापासून तीन तास धार काढल्यानंतर साधारण साडेतीन तासात आपल्या वाट्याची सगळी झाडं तोडणं संपवून ही तिसरी व्यक्ती आपल्या कामाचा मोबदला घेऊन निघून सुद्धा गेली. उरलेल्या दोघांची प्रत्येकी सहा झाडं तोडून झाली होती आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा याच कामासाठी पूर्ण दिवस मेहनत करावी लागणार होती. इकडे ही छोटीशी गोष्ट संपली. काय अर्थबोध झाला ते आपण पाहू.
पहिल्या दोघांनी आणि तिसऱ्या व्यक्तीनं सुद्धा एकच प्रकारच्या कामाच्या स्वरूपाला खूप भिन्न पद्धतीनं पाहिलं आणि तिसऱ्या व्यक्तीनं हे काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘कुऱ्हाड’ या साधनाला सर्वात आधी धारधार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वेळ, ऊर्जा खर्च केली, कष्टाची तयारी ठेवली. परिणामी त्याचं काम अधिक वेगानं आणि अधिक सुलभ झालं. प्रश्न या छोट्याशा गोष्टीनं जो निर्माण केलाय, तो असा आहे की ‘तुम्ही तुमच्या कुऱ्हाडीला शेवटची धार कधी काढली होतीत?’
इकडे कुऱ्हाडीचा उल्लेख हा तुमचं ज्ञान, कौशल्य यांना विकसित करण्याच्या संदर्भातला आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच. शाळा-कॉलेजमध्ये सक्ती असल्यामुळं घेतलेले ज्ञान आजही त्याच अवस्थेत असलेलं किमान नव्वद टक्के व्यक्तींच्या बाबतीत सत्य आहे. त्यानंतर कितीतरी वर्षं ज्ञानार्जन झालेलंच नाही. काही जणांना शेवटचं ज्ञान किंवा शिक्षण घेऊन पंचवीस ते तीस वर्ष सुद्धा झालीत. पण त्यांना नव्या ज्ञानाची आणि कौशल्यांची गरजच वाटतं नाही. त्याच जुन्या ज्ञानाच्या कुऱ्हाडीनं त्यांच्या वाट्याला आलेल्या कामाचा ते विचार करताहेत. आणि फक्त वेळ ऊर्जा आणि कष्ट यांचा सढळ हस्ते विनियोग करताहेत. धार काढण्याची गोष्ट या मंडळींना महत्वाची वाटलीच नाही आणि कदाचित वाटणार सुद्धा नाही या पुढं. बदलणाऱ्या काळासोबत आपल्या ज्ञानाची धार रोज तेज असणं हे फक्त महत्वाचंच नाही, तर आत्यंतिक गरजेचं सुद्धा आहे ! क्षेत्र कुठलंही असो इथं काम पूर्ण करणं याहीपेक्षा ते तुम्ही कसं पूर्ण केले आणि किती वेळात केलं या गोष्टींना महत्व आलंय. आपली इच्छा असो व नसो. आपल्या पेक्षा हुशार आणि नव्या दमाच्या विचारांच्या पिढीनं ही कौशल्यं, ज्ञान आत्मसात केलीत. त्यांची कुऱ्हाड अधिक धारधार आहे. आपलं काय? याच्या पुढची पायरी म्हणजे याचा थेट परिणाम आपल्याला मिळणाऱ्या कामांवर किंवा आपल्याला जी कामं करण्यासाठी आपण स्वतः योग्य वाटतोय, त्याही कामातून आपल्या ऐवजी दुसरं कुणीतरी तिथे येण्याची शक्यता हळूहळू वाढतेय हे लक्षात असू द्या ! काळाची वेगवान गणितं व्यवहाराची समीकरणं बदलू लागली आहेत. झाडं कापण्याची कुऱ्हाड सुद्धा आता कालबाह्य होऊन त्या ऐवजी यंत्र आणि मशिन्स आलेली आहेत. थोडक्यात काय, तर आपण आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा दर्जा वाढवण्याच्या त्याला धार काढण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक दिवशी नसू तर मात्र कठीण आहे ! आणि हे आता प्रत्येक बाबतीत लागू व्हायला सुरुवात झालेलीच आहे. तंत्रज्ञान वेगात वाढतंय. त्याच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी ‘धार’ लावावीच लागेल. शिकावंच लागेल. ते मला आवडतं की नाही, हा भाग पुढचा. गरजेचं आहे ते शिकणं ! जेव्हा ते थेट तुमच्या रोजच्या भाकरीशी जोडले जाईल, तेव्हा ते करणं कठीण होईल. त्या आधीच ते करायला घेऊ. त्या वेळेची येण्याची वाट पाहत न राहणं हेच उत्तम असेल. ज्या कोणत्या क्षेत्रात असाल, त्या क्षेत्रातल्या संधी ओळखून त्यासाठी लागणाऱ्या ज्ञान आणि कौशल्यांचा अभ्यास करून ते शिकण्याच्या अर्थात धार लावण्याच्या या कार्यक्रमात लगेचच सहभागी व्हायलाच हवंय. पर्याय नाहीत फार आपल्याकडे. हे झालं कामाच्या बाबतीत.
अशाच कुऱ्हाडी अनेक आहेत. विचारांच्या...सवयींच्या...दृष्टिकोनाच्या...बदलाच्या... या सगळ्या कुऱ्हाडी वाट पाहताहेत. तुम्ही याल, धार काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात कराल. मेंदू, मन, हृदय पुन्हा एकदा पुनर्जीवित होऊ दे. नव्या धारेनं त्यांचे तेज पुन्हा बहरू दे आणि यानंतर दररोज असंच तेजस्वी राहण्यासाठी रोज थोडी तरी धार काढणारे. निश्चयाने स्व-सुधार करण्याच्या प्रक्रियेत असलेले ज्ञानार्जनाचा आग्रह धरणारे योगी व्हा ! आनंद, यश तिथंच आहे !
- विनय वाघ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा