"आज खुश तो बहुत होंगे तुम..." आठवला का अमिताभ, देवावर नाराज...हा दिवार चित्रपटातील संवाद केवळ सिनेमातील प्रसंग नाही, तर मानवी मनाच्या खोल तळाशी असणाऱ्या असुरक्षिततेचा, एकाकीपणाचा आणि आधार शोधण्याच्या गरजेचा प्रतिध्वनी आहे. देव न मानणारा नायकही शेवटी एका अदृश्य शक्तीकडे वळतो. हा क्षण आपल्याला प्रश्न विचारतो –
देव म्हणजे काय?आस्तिक असणं म्हणजे नेमकं काय? आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला का कुठेतरी मन मोकळं करून बोलायची जागा लागते?
आस्तिक असणं – श्रद्धेची पातळी : आस्तिकता म्हणजे केवळ मंदिरात जाणं किंवा पूजा करणं नाही. ती एक मानसिक अवस्था आहे. सांस्कृतिक स्तरावर ती परंपरेचा वारसा आहे तर मानसिक स्तरावर ती सुरक्षिततेची खात्री आहे. संकटात माणूस देवाशी बोलतो कारण त्याला वाटतं – कोणी तरी माझं ऐकणार आहे.
आणि सगळ्यात महत्वच म्हणजे तत्त्वज्ञानिक स्तरावर आस्तिकता म्हणजे स्वतःपेक्षा मोठं काही तरी अस्तित्व मान्य करणं. भारतीय वेद म्हणतात: “एको देवः सर्वभूतेषु गूढः” – एक अदृश्य शक्ती प्रत्येक जीवामध्ये दडलेली आहे.
जर अस्तिकता आहे तर नास्तिकता म्हणजे नेमकं काय? तर नास्तिकता म्हणजे श्रद्धेचं केंद्र बदलणं. नास्तिक असणं म्हणजे श्रद्धेचा अभाव नव्हे. मानसशास्त्र सांगतं, नास्तिक माणूस मानवी विवेक, निसर्गाचे नियम किंवा स्वतःचा प्रयत्न ह्यांवर विश्वास ठेवतो. म्हणजेच श्रद्धेचं केंद्र बदलतं, पण मनुष्याचा मानसिक पाया – काहीतरी आधार हवा – तसाच राहतो.
देवाशी बोलणं म्हणजे कॅथार्सिस. कॅथार्सिस (Catharsis) या ग्रीक शब्दाचा अर्थ 'शुद्धीकरण' किंवा 'शुद्धी' असा होतो. ही भावना व्यक्त करण्याची प्रक्रिया आहे, ज्यामुळे व्यक्तीला भावनिक आराम मिळतो आणि अंतर्गत तणाव कमी होतो. जेव्हा आपण देवाशी बोलतो, प्रार्थना करतो, तेव्हा आपण खरं तर स्वतःशी संवाद साधत असतो. हे मानसशास्त्रात कॅथार्सिस (Catharsis) म्हणतात – मनातील दडपलेल्या भावनांचं शुद्धीकरण. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ James Pennebaker यांनी केलेल्या "Expressive Writing" प्रयोगांत हे दिसलं. जे लोक आपलं दु:ख, राग किंवा गुपित लिहून काढतात, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, तणाव कमी होतो. म्हणजेच प्रार्थना, लेखन, किंवा कोणाशी बोलणं – हे तिन्ही मन शुद्ध करण्याचं साधन आहेत.
"मन मोकळं करणं" ही आहे मानसिक आरोग्याची सगळ्यात सोपी आणि आपल्या हाती असलेली गुरुकिल्ली. भावना दाबून ठेवणं म्हणजे मनावर भार वाढवणं. परिणाम? चिंता (Anxiety), नैराश्य (Depression), तणावजन्य विकार. याविरुद्ध मन मोकळं करणं म्हणजे आपल्या भावनांना शब्द देणं, कुणीतरी ऐकणार आहे या खात्रीतून सुरक्षितता अनुभवणं, आणि स्वतःला हलकं वाटणं – हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.
Gratitude Journaling च्या प्रयोगात (Robert Emmons, Michael McCullough), रोज ३ गोष्टी लिहिणारे लोक अधिक आशावादी, आनंदी आणि तणावमुक्त आढळले. देवाशी कृतज्ञतेची प्रार्थना करणं किंवा डायरी लिहिणं – दोन्हींचा परिणाम सारखाच सकारात्मक आहे.
प्रार्थना ही केवळ आध्यत्मिक कृती नाही तर त्यामागे आहे विज्ञान.
Duke University Medical Center च्या संशोधनात प्रार्थना करणाऱ्या हृदयविकार रुग्णांचा तणाव व रक्तदाब कमी झाल्याचं दिसलं. ध्यान, जप, श्वसनाच्या प्रार्थना – या सर्वांनी मेंदूतल्या ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी घटते. Carl Jung म्हणतात: “Prayer is not asking. It is a way of aligning the self with the deeper psyche.” म्हणजेच प्रार्थना म्हणजे मागणं नव्हे, तर स्वतःला अंतरात्म्याशी जोडणं.
भारतीय परंपरेत सामूहिक प्रार्थना, भजन, कीर्तन, कट्ट्यावर गप्पा – या सगळ्या पद्धती एक प्रकारची सामुदायिक थेरपी आहेत. लोक एकत्र आले की आपापले अनुभव शेअर करतात, त्याने एकटेपणा कमी होतो, आणि सामाजिक आधार प्रणाली तयार होते. Flow experience मध्ये हेच आहे – जेव्हा आपण प्रार्थना, भजन किंवा गप्पांत हरवतो, तेव्हा आपला मेंदू वर्तमान क्षणात जगतो. तणाव वितळून जातो.
शेवटी प्रश्न हा नाही की देव आहे की नाही. प्रश्न आहे आपल्याला कुणीतरी ऐकून घेणारं हवं आहे. कधी तो देव असतो, कधी जवळचा मित्र, कधी थेरपिस्ट, कधी स्वतःच स्वतःला ऐकतो.
“आज खुश तो बहुत होंगे तुम...” हा संवाद आठवण करून देतो – माणूस कितीही मजबूत असला तरी शेवटी त्याला एक जागा लागते जिथे तो स्वतःचं मन मोकळं करू शकतो.
सोनाली तेलंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा