बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

3122. दर्शन विठ्ठलाचे

" विठ्ठलाच्या  दर्शनाला जाऊन येते" ती सुनबाईला म्हणाली.
"आज कशाला जाता ? एकादशीची फार  गर्दी असेल."
"अग  पंढरपूरला जायचं नशिबात नाही.  ईथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते. देऊळ जवळ तर आहे."
सासूबाईंचा स्वर ऐकून ती म्हणाली, 
 "बरं या जाऊन "
"आजे मी येणार..." बारका नातु मागे लागला.
"अरे तुला कुठे गर्दीत सांभाळू..." तस नातवानं भोकाडच पसरलं.
"मला पण विठ्ठलाला यायचयं " तशी सुनबाई म्हणाली,
"एवढं रडतयं  तर न्या की...हे घ्या अकरा रुपये ठेवा देवाला. या दोघं दर्शन करून"
पोरगं खुष झालं खीदळायला लागल. देवळातही गर्दी होती . लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदात होत. नाचत होत. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तस पोरग थोड्या वेळा नंतर  कंटाळलं.
"आजे कधी दिसणार तुझा विठ्ठल?"
"थोड्या वेळानं दिसेल हं...आता जवळ आलो आपण. लगेच दर्शन होईल.."
तिनी नातवाची समजुत काढली. जरा वेळानं पोरगं म्हणालं ,
"आजे गोष्ट सांग ना "
"अरे इथे कुठे ? घरी गेल्यावर सांगते."
"इथचं सांग "
तिच्या लक्षात आलं  पोराला काहीतरी सांगून नादी लावायला हवं. म्हणून तीनी जनीची गोष्ट सांगायला सुरू केली.
जनी  दळण दळायला बसते.एकटीनं  दळताना तिला थकायला होते. मग ती विठुरायाला म्हणते, अरे एवढं काम करून मी दमून गेले आहे. ये की रे माझ्या मदतीला आणि खरोखरच प्रत्यक्ष  विठुराया येऊन तिला  दळायला मदत करतो. दोघ मिळून काम करतात.ती छोटी गोष्ट तीनी सांगितली ...
"आजे विठ्ठल तुझ्या घरी  आला होता का ? तुला दिसला का कधी तुझा  विठ्ठल ? "
"माझं कुठलं बाबा एवढं भाग्य.. मला कुठला दिसायला .." ती म्हणाली ,
"असं कसं झालं. विठ्ठल तुला कधीच कसा  दिसला नाही?"
त्याच्या निरागस प्रश्नाला काय उत्तर द्यावं तिला कळेना. तेवढी पुण्यवान नाही रे मी. असं ती मनाशीच म्हणाली.
ईतक्यात गोळ्या विकणारा मुलगा तिथे आला. नातु लगेच म्हणाला..
" आजे मला गोळ्या घे की...."
" गप रे...पैशे नाहीत"
" ए आजे घे की.."
पोरग ऐकेच ना.. देवाचे पैसे...अकरा रूपये तेवढे होते.
दुसऱे आणलेच नव्हते...पण पोरगं  आलय खरं .. बराच वेळ  झालाय कंटाळलय. .जाऊ दे..लहान लेकरू आहे .... दर्शन मिळायला अजून अवकाश आहे . हा विचार करून तिनी दहा रुपयाच  गोळ्यांच पाकीट  घेतलं. पोरगं जरा रमलं. पुढच्या दोन बारक्या पोरींनाही त्यानी गोळ्या दिल्या. तशा त्या पोरीपण  खुषं झाल्या.
" आजे तुला घे की गोळ्या...."
"नको रे राजा खा तु.."
आजीचं लक्ष विठ्ठलाकडे. बऱ्याच वेळानी नंबर जवळ आला. तसं आजीनी पोराला कडेवर घेतलं.
"हा घे रुपया जवळ गेलं की त्या पेटीत टाक...."
"आज दुसरं काहीच आणल  नाही  देवा. परत येईन तेव्हा आणीन रे."  हात जोडून तिने विनवणी केली.
 समोर विठ्ठलाला पाहिलं. आज ईथे का होईना. त्याच दर्शन  झालं. ते सावळं रूप समोर दिसलं.  पिवळा पितांबर , भरजरीचा लाल शेला, गळ्यात  तुळशीचे,फुलांचे हार, कपाळाला बुक्का भक्ती भावानी आजीनी दर्शन घेतलं. आपल्याबरोबर नातवाचही डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवलं. पोरगं हसलं.
पुजाऱ्यान पोराच्या कपाळाला बुक्का लावला. विठ्ठलाचा हार  पोराच्या गळ्यात घातला.
पोरगं हरखूनच गेलं. आजी बघायला लागली. गर्दीतून बाहेर आली .नातू गळ्यातला हार काढू देईना ..
"मी नाही काढणार "म्हणत पळायला लागला. तशीच घरी आली. आता पोरगं जाम खुष होतं. नाचत होतं.
दारातच सुनबाई ..म्हणाली,
" झालं का दर्शन ? आणि  ह्याच्या गळ्यात हार कोणी घातला ?"
"अगं दर्शन झालं आणि लगेच पुजाऱ्याने ह्याच्या  गळ्यात हार, कधी घातला मलाही कळलं नाही" 
" बसा पाणी देते. पोरान त्रास नाही ना दिला."
तसं पोरगं आईवर  रागवलं. कमरेवर हात ठेवून आईकडे बघायला लागलं..
"बघा सासूबाई ध्यान कसं दिसतय."
आईनी असं म्हटल्यावर पोरगं हसायला लागलं.
आजी बघायला लागली.
     कमरेवर हात, कपाळाला बुक्का, आणि गळ्यात तुळशीचा  हार घातलेला नातू तिच्याकडे बघून गोड हसत होता.
काय झालं कळलंच नाही. पण  नातवाचा चेहरा तिला आत्ता या क्षणी  वेगळाच दिसायला लागला. तिचे डोळे भरून आले. क्षणभर काही समजेच ना. तिला नातवाच्या जागी  विठ्ठल ऊभा आहे असा भास झाला. साक्षात्कार झाल्यासारखंच झालं. नातु हसत होता. ती निरखून  बघायला लागली. नातवाने मगाशी  विचारलेलं..
"आजे तुला दिसला का ग तुझा विठ्ठल "हे तिला आठवलं.
 तिच्या मनात आनंदाची एक लहर उठली होती.  हसत हसत. नातु एकदम  धूम पळाला. सुनबाई खिचडी करायला आत गेली. भरल्या गळ्यान आजी म्हणाली इतका वेळ जवळ  होतास का. धन्य आहे रे बाबा तुझी जनाबाईची दळणं तू दळायला गेलाच असशील. पटलं बाबा मला आज. आतून तिला लख्खपणे काहीतरी जाणवलं.
ती  मनात म्हणाली.  ईतकी वर्षे झाली  आमच्या आसपास आहेस. आम्हाला अजूनही समजायला उशीर होतोय."
एकादशीला पंढरपूरला जायला मिळालं नाही याचं दुःख  कुठल्या कुठे पळालं. विठ्ठलानी  नातवाच्या रूपात स्वतः येऊन क्षणभर का होईना. आपल्याला दर्शन दिलं असंच मनोमन  तिला वाटलं. त्याला  कशात बघायचं हेही तिला आज नीट ऊमगलं. आपल्याही आसपास असेलचं विठ्ठल.  जरा नीट बघू आपण.. प्रयत्न केला की हळुहळु येईल ती दृष्टी. आपल्यालाही  दिसेल. विठ्ठल विठ्ठल...👏🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3200. अज्ञान आणि अंधश्रद्धा

     रात्री २ वाजता १४ वर्षांची मुलगी विचित्र आवाज काढत अंगाचे लचके तोडत होती. भूत की भयंकर आजार? रात्रीचे २ वाजले होते. माझ्या ड्युटी रूममध...