रिटायर झाल्यानंतर त्यांना वाटलं, आता आपली कोणालाच गरज नाही.. पण सुनेने असा एक निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. ❤️ 🌱 निवृत्ती म्हणजे शेवट नाही. स्वतःला पुन्हा शोधण्याची वेळ.
सकाळचे सात वाजले होते. घरात नेहमीसारखी लगबग होती, पण देशमुख काकांच्या खोलीत मात्र एक वेगळीच शांतता होती. टेबलवर त्यांचा चष्मा, काही जुने कागद आणि नुकतंच मिळालेलं निवृत्तीचं पत्र पडलं होतं. काकांनी ते पत्र पुन्हा एकदा हातात घेतलं वाचलं आणि अलगद दुमडून कपाटात ठेवलं. तेवढ्यात त्यांची सून मृणाल चहा घेऊन आत आली.
"बाबा, आजही एवढ्या लवकर उठलात?"
काका फक्त हसले.
"सवय झालीये गं... तीस वर्षं रोज वेळेवर उठायची."
मृणालने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं.
"पण आज चेहरा इतका उतरलेला का बरं?"
काका काहीच बोलले नाहीत. शेवटी खिन्न होऊन म्हणाले,
"आता काय उरलंय गं? कालपर्यंत ऑफिसमध्ये सगळे माझं मत विचारायचे. फोनवर लोकांची कामं असायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ..."
ते थोडे थांबले.
"आता दिवसभर घरात बसून काय करायचं?"
मृणाल काही क्षण शांत राहिली. मग तिने विचारलं,
"बाबा, तुम्हाला खरंच वाटतं का की तुमची गरज फक्त ऑफिसलाच होती?"
काकांनी तिच्याकडे पाहिलं.
"म्हणजे?"
"तुम्ही तीस वर्षांत जे शिकलात, ते फक्त पगारासाठी होतं का?"
काका गप्प झाले. मृणाल पुढे म्हणाली,
"नोकरी करत करत तुम्ही कितीतरी लोकांना नोकरी मिळवून दिलीत. कित्येक मुलांना त्यांच्या करिअरबद्दल मार्गदर्शन केलंत. मग आता तुमच्याकडे वेळच वेळ आहे. मग त्या अनुभवाचा उपयोग कुणाला होऊ नये का?"
काकांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा थोडं कुतूहल दिसलं. पण ते म्हणाले,
"आता माझं कोण ऐकणार?"
मृणाल हसली.
"ज्यांना खरंच मार्गदर्शनाची गरज आहे, ते नक्की ऐकतील."
दुसऱ्या दिवशी तिने घराच्या खालील छोट्या हॉलमध्ये एक पाटी लावली.
"मोफत मार्गदर्शन केंद्र. नोकरी, फॉर्म, अर्ज आणि करिअरविषयक मदत."
काकांना काहीच सांगितलं नव्हतं. पहिल्याच दिवशी एक मुलगा संकोचत आत आला.
"काका. सरकारी नोकरीचा फॉर्म भरायचा आहे. पण मला काहीच समजत नाही."
काकांनी त्याला जवळ बसवलं. फॉर्म भरून दिला. दुसऱ्या दिवशी दोन मुलं आली. तिसऱ्या दिवशी चार.
आठवडाभरात त्यांच्या छोट्याशा खोलीत रोज मुलांची गर्दी होऊ लागली. 😊
काका पुन्हा उत्साहाने उठू लागले. सकाळी उठून दाढी करायची, नीट कपडे घालायचे आणि वेळेवर खाली जायचे.
एके दिवशी त्यांचा जुना ऑफिसमधला मित्र भेटायला आला. तो आश्चर्याने म्हणाला,
"अरे देशमुख, रिटायर झाल्यावर तर तू अजूनच व्यस्त दिसतोयस !"
काका हसले.
"पूर्वी पगारासाठी काम करायचो. आता समाधानासाठी करतो." ❤️
तेवढ्यात एक मुलगी धावत आली.
"काका ! माझी नोकरी लागली !"
तिने आनंदाने त्यांच्या हातात मिठाईचा डबा दिला. काकांच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. त्या रात्री मृणालने विचारलं,
"बाबा, आता निवृत्तीची भीती वाटते का?"
काका हसले.
"नाही गं...उलट एक गोष्ट कळली."
"काय?"
ते म्हणाले -
"नोकरी संपली की माणूस थांबत नाही. फक्त त्याला स्वतःसाठी जगण्याची दिशा बदलावी लागते." 🌿
मृणाल काही न बोलता हसली. कारण तिला माहीत होतं. तिने सासऱ्यांना फक्त काम दिलं नव्हतं तर तिने त्यांच्या अनुभवाला पुन्हा एक अर्थ दिला होता. ❤️
आणि कधी कधी एखाद्याला जगण्याची नवी सुरुवात करून देण्यासाठी मोठी मदत नाही, फक्त त्याच्यावरचा विश्वास पुरेसा असतो.
🌱 निवृत्ती म्हणजे शेवट नाही. नव्या सुरुवातीची वेळ असते. तुमच्या आयुष्यातही अशी नवी सुरुवात झाली आहे का? ❤️
क्रेडिट : ज्योती निंबाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा