टाळ्यांचा कडकडाट झाला. तो दिमाखात उठला. त्याच्या फोटोला ५०,००० रुपयांचं पहिलं बक्षीस मिळालं होतं! त्याला खूप आनंद झाला. त्यानं बक्षीस स्वीकारलं तेंव्हा पाहुणे म्हणाले,
“मला आवडेल तो फोटो पहायला येणं. कारण प्रदर्शनात माझं येणं झालं नाही. पण मी खूप ऐकलंय त्या फोटोविषयी. दोघंही परीक्षक माझे मित्र होते. त्यांनी खुप कौतुक केलंय फोटोचं. विषय, रंगसंगती, छाया-प्रकाशाचा अभ्यास. कधी पहायला मिळेल मला?”
तो हसत म्हणाला, “ऑलवेज वेल कम सर.”
आपलं कार्ड त्यानं अविनाशला दिलं. अविनाशनं ते ब्लेझरच्या खिशात ठेवलं आणि त्याला चेकचं पाकीट व बुके दिला. टाळ्यांच्या गजरात तो खाली परतला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी ब्लेझरच्या खिशातलं ते कार्ड अविनाशच्या हाती लागलं. खरंतर आपल्या पोरानंही सहभाग घेतला होता या स्पर्धेत. पण त्याला बक्षीस नाही मिळालं, म्हणून सुद्धा तो फोटो जाऊन बघण्याची खुमखुमी होतीच अविनाशला.
त्यानं कार्डवर पत्ता पाहिला. ‘संगीत विद्यालय’. त्याच्या कपाळावर आठी पडली. ‘नको तिथं आहे हा फोटोग्राफर. पण तो फोटो तर पहायचाच आहे,’ असं म्हणत तो निघाला.
कार्डवर असलेल्या पत्त्यावर तो पोहोचला. सुंदर फुलांची कमान असलेलं गेट ओलांडून तो आत आला. छोटंसं टुमदार घर. गेरूनं रंगवलेलं. त्यावर बारिक वारली चित्र - संगीत विषयाशी निगडित काढलेली. त्याला ही सगळी शैली, रंगसंगती मनात खोलवर काही तरी आठवण करून देऊ लागली. कोपऱ्यात सरस्वतीचं मंदिर. पांढरीशुभ्र मूर्ती, सगळा परिसर हिरव्यागार झाडीनं वेढलेला. त्यानं बेल दाबली. फोटोग्राफरनंच दार उघडलं. हसत स्वागत केलं.
“या सर, बसा.”
तो बसला खरा, पण त्याला सगळ्या वस्तू, सगळी रंगसंगती अनुराधाच्या आवडीची आहे असं वाटलं आणि हे कदाचित तिचंच घर तर नाही ना, या विचारानं त्याला घामच फुटला. तो लगेच म्हणाला,
“निघतो मी. जरा अर्जंट काम आठवलं. पुन्हा येईन.”
“सर, अहो बसा. चहा करतो. नेमकी आई आज बाहेरगावी गेलीय. नाहीतर तिनंच केला असता चहा आणि फोटो पहायचाय ना तुम्हाला?”
आई बाहेरगावी गेलीय, म्हणताच हा रिलॅक्स झाला. “हो फोटो पहायचा आहे ना ! एवढं पन्नास हजाराचं बक्षीस मिळालेला फोटो पहायलाच हवा ना !”
त्यानं त्यांना आतल्या खोलीत नेलं. समोर भिंतीवर तो फोटो होता. तल्लीन होऊन गाणारी ती आणि भोवताली पक्षी त्या सुरांनी आनंदी होऊन तिच्या भोवती कुणी, तिच्या खांद्यावर, कुणी. त्या अवती भोवती संगीत जीवन असा हा फोटो.
त्यानं नीट निरखलं… हो, तीच…! जिला आपण आयुष्याच्या वळणावर फसवलं आणि ह्याच संगीताचा राग राग करत पोटातल्या लेकरासह हाकलून दिलं. ती आज उभी आहे अजुनही तिचं संगीत घेऊन ! कदाचित हाच मुलगा असेल आपला, की केलं असेल लग्न?
त्यानं पटकन त्या मुलाला म्हटलं, “फोटोग्राफी खरंच खूप छान. अगदी बक्षीसपात्र ! ह्या गायिका कोण…??”
तो म्हणाला, “माझी आई आहे सर…!”
“आणि वडिल? म्हणजे ते कुठं असतात…?” चाचरत अविनाशनं विचारलं.
“ते नाही माहित. आई म्हणते, ‘माझं जगणं संगीत होतं’ पण लग्न झाल्यावर माझे वडिल तिला रियाझ करताना सतत ओरडत होते. पुढचं संगीत शिक्षण बंद केलं. लग्नाआधी म्हणायचे, ‘तुला संगीत शिकू देईल पुढे.’ पण लग्न झाल्यावर म्हणायचे, ‘ते तुणतुणं नाही वाजवायचं.’
“आई सांगते, ती आधी हादरली. आपला श्वास असलेलं संगीत बंद करायचं ! पण मी तिच्या पोटात असताना तिला म्हणे डोहळेच रियाजचे. त्यावरून मग भांडण. मग ती तशीच बाहेर पडली. म्हणजे तिला हाकललंच, पण ती खचली नाही. शाळेत संगीत शिक्षिकेची नोकरी मिळाली आणि पुढं अश्या गुरू मिळाल्या, ज्यांनी आईला मानस कन्याच मानलं.
“हे घर, हे संगीत त्यांचंच. आईला संगीत मिळालं, ती त्यावर जगली. म्हणून तर या फोटोत तिचं ते जगणं ती पहाटे रियाज करते, तेव्हाच मी कैद केलं फोटोमध्ये. अगदी आर्ततेनं गाते, पण खोलवर आयुष्यात जोडीदारानं दिलेली सल तिच्या चेहऱ्यावर येते. ते टिपलं आणि म्हणून तर कदाचित ह्या फोटोला बक्षीस मिळालं ! सर आवडला ना फोटो?”
तो गडबडत म्हणाला, “हो एकदम मस्त. निघतो मी.”
गाडी चालवत असताना त्याच्या डोळ्यासमोरून ती जाईना. मधली ही पंचवीस वर्षं आपण तिच्याविषयी विसरून गेलो होतो. कारण आपण आपलं दुसरं जग निर्माण केलं, ज्यात कुठंही कला नाहीच ! मग आपल्याला जाणवत राहतं आता. म्हणून आपल्या आयुष्याचा फोटो एवढा सुरेख नाही, रटाळ होऊन गेला !पैसा, प्रसिद्धी, प्रॉपर्टी असुनही ती आर्तता आपल्या जगण्यातच नाही. मग फोटोत कुठून येईल? आपल्या दुसऱ्या बायकोपासून असलेल्या मुलानं ह्या स्पर्धेत फोटो दिला होता. पण काय टिपलं होतं? दागिने ! आणि तिच्या मुलानं काय टिपलं. आयुष्यातल्या दुःखाचा दागिना !
या फोटोग्राफी स्पर्धेतच काय, पण आयुष्याच्या फोटोतही ती खरंच जिंकली होती !
- स्वप्ना मुळे (मायी), छ. संभाजीनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा